गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी खाताय, पण तुम्हाला त्याविषयी काय माहितीय?

०६ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


सण साजरा करण्यासाठी गोडाशिवाय पर्यायच नसतो. आणि त्यात नवीन वर्षाचं स्वागत असंल तर मग क्रिमी, यम्मी आणि मधाळ अशा श्रीखंडाला कसं विसरणार? हा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ. पण काय आहे या श्रीखंडामागची कहाणी ते या लेखातून जाणून घेऊया.

भारतात प्राचीन काळापासून गोड पदार्थ बनवले जाताहेत. विविध संस्कृतींच्या प्रभावाने भारतीय गोड पदार्थांच्या यादीत अगणित गोड पदार्थांची भर पडत गेली. कोणताही आनंद, उत्सव आणि सण साजरा करताना सर्वप्रथम गोड काय हा प्रश्न आपल्याला पडतो. प्रत्येक सणासोबत काही गोड पदार्थांचं समीकरण बनलंय. तसंच नववर्ष म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या गुढीपाडवा सणाचं नाव श्रीखंडासोबत जोडलं गेलंय.

जिभेवरुन सहज विरघळत जाणाऱ्या या श्रीखंडाला खाण्याची मजा खुसखुशीत पुरी सोबत घ्यायला सगळ्यांना आवडतं.

श्रीखंड शब्द संस्कृत की फारसी? 

या पदार्थाच्या नावातच वेगवेगळ्या कथा लपलेल्या आहेत. श्रीखंड क्षीर कंद यावरुन आला असावा. क्षीर म्हणजे दूध आणि कंद म्हणजे साखर. मात्र हाच शब्द दुसरीकडे क्षीर खंड या शब्दात मूळ असल्याचं सांगितलं जातं. यात क्षीर म्हणजे दूध हाच अर्थ आहे. मात्र यात दूधाचं दही आणि दह्याचा एक भाग म्हणजे खंड त्यामुळे श्रीखंड, असं फुड एक्स्प्लोरर आफ्रिन शेख यांनी सांगितलं.

तर क्षीरखंड ह्या शब्दाचं मूळ शिखरीणी या नावात आहे, असं के. टी. आचार्य यांनी इंडियन फूड: अ हिस्टॉरीकल कम्पॅनियन या आपल्या पुस्तकात लिहिलंय.

त्याचबरोबर शीर कंद या फारसी शब्दावरुन श्रीखंड हा शब्द आलाय. फारसी भाषेत शीर म्हणजे दूध आणि कंद म्हणजे साखर शब्द शीरकंद शब्दाचा अपभ्रंश असल्याचंही महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांच्या शोधयात्रेत लिहिलं असल्याची माहिती एन्शिअंट कलनरीचे अभ्यासक गजानन क. पंडीत यांनी दिली.

हेही वाचाः गुढीपाडव्याला वाचुयाचः राज ठाकरेंनी शरद पवारांची घेतलेली मुलाखत

आणखी एक कहाणी म्हणजे श्रीखंडाचा जन्म हा यात्रेकरु मार्फत झाला. पूर्वीच्या काळात व्यापार, धार्मिकस्थळांना भेटी देण्यासाठी लोक यात्रेला जात असत. त्यावेळी सर्व साधनांची सुविधा नसल्यामुळे घरातून गरजेचं सामान आणि खाण्याचे पदार्थ घेऊन जात असत. अशात दही घेऊन जाताना त्याला पाणी सुटायचं म्हणून त्याचं पाणी काढून चक्का बनवला जायचा. तेव्हा त्याचं टेक्श्चर क्रिमी असल्यानेही नंतर त्यात मधुर रस घालून श्रीखंड खात असत. त्याचबरोबर यात कच्च्या खाल्ल्या जाऊ शकतात अशा भाज्यांही एकत्र करून खाल्लं जायचं, असं संशोधक हेन्री ट्वेक्सबरी यांनी सांगितलं.

आणि श्रीखंडात साखर आली

ह्या पदार्थाच्या रेसिपीत साखरेचं महत्त्व अधिक असलं तरी पूर्वीच्या काळी हा पदार्थ घट्ट चक्क्यामध्ये साखर किंवा पिठीसाखर न मिसळता त्यात उसाचा रस, काकवी, गूळ, खजूर किंवा विविध फळं घालून बनवलं जायचा.  

याचा उल्लेख महाभारतातल्या एका कथेतही आढळतो. पराक्रमी पांडव भीमाने विराट राजाकडे बल्लवाचार्य म्हणजेच कुक म्हणून काम केलं होतं. त्यावेळी फळांच्या स्वादाचं शिखरिणी बनवलं. म्हणजेच फ्रुटखंड बनवलं, अशी माहिती हेन्री यांनी दिली. 

हेही वाचाः युधिष्ठिर शक ते शिवशक, जाणून घेऊया महाराष्ट्राच्या कालगणनेचा प्रवास

साधारण १९ व्या शतकापासून साखरेच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. साखर बारीक असते, लगेच वितळते, कशातही मिसळता येते, रंग बदलत नाही, चव बदलत नाही. त्यामुळे प्रत्येक गोड पदार्थात त्याचा वापर वाढला. त्यानुसार श्रीखंडातही साखरेचा वापर वाढला.

घरच्या घरी श्रीखंड कसं बनवाल? 

श्रीखंडासाठी फुल क्रिम दूधाचा वापर करतात. ते दूध मातीच्या भांड्यात दही बनवण्यासाठी ठेवलं जातं. दूधात कोकम किंवा आधीचे दही एकत्र करून जमण्यास गरम जागी ठेवतात. या दुधामुळेच दही क्रिमी होतं. हे दही मलमलच्या कापडात किमान ४ ते ८ तास बांधून ठेवण्यात येतं. मग या चक्क्याला मलमलच्याच कपड्यातून घोटून भांड्यात काढतात. मग यात पिठी साखर मिसळतात. मलमलच्या कपड्यातून काढल्यामुळे श्रीखंडाला मुलायम टेक्श्चर मिळतं. काही वेळा चक्का चाळणीतून घोटूनही काढतात. त्यामुळे त्याला दाणेदार टेक्शरच मिळतं, असं मराठी पारंपरिक खाद्यपदार्थ पुस्तकाच्या लेखिका वैशाली कामेरकर यांनी सांगितलं.

हेही वाचाः गुढीपाडवा FAQs: आपल्या मनात असणाऱ्या प्रश्नांची साधीसरळ उत्तरं

या श्रीखंडात आवडीचे ड्रायफ्रुट्स कुटून किंवा अख्खे घालू शकता. तसंच केशर, गुलकंद, फळांची वाटून पेस्ट घातल्यास फ्लेवर्ड श्रीखंड बनवता येईल, असं फुड डिझाइनर अल्का सावंत यांनी सांगितलं. ताजं बनवलेलं श्रीखंड ८ ते १० तास टिकतं. मात्र बाजारात पॅक डब्ब्यातून मिळणाऱ्या श्रीखंडास मात्र प्रिजर्वेटीवचा वापर केला असल्यामुळे ते सहा महिन्यांपर्यंत टिकतं. मात्र ताज्या आणि पॅक्ड श्रीखंडात खूप फरक असतो, अशी माहिती कामेरकर यांनी दिली.

श्रीखंडाचे अनेक फायदेही आहेत

सणाला गोड खावं म्हटलं तरी डाएटमुळे खाताना खूप गिल्टी वाटतं. या श्रीखंडातसुद्धा अनेक चांगले गुणधर्म असतात. त्यामुळे डाएटमधेही श्रीखंड खाता येऊ शकतं.

यात कॅल्शिअम, लॅक्टीक ऍसिड आणि विटॅमिन बी असतं. तसेच दह्यामुळे त्वचा मऊ होते, केसातला डॅंड्रफ निघतो. तसंच पोट बिघडलं असल्यास ताजं श्रीखंड किंवा त्यात फळ घालून खाल्ल्यास बरं वाटतं, असं डायटिशिअन मोनिका सिंह यांनी सांगितलं.

हेही वाचाः गुढीपाडव्याला गुढीपाडवाच राहू दे, त्याला हिंदू नववर्ष कशाला बनवताय?

डाएट करताना गोड खात नसाल तर तुम्ही घरच्या घरी श्रीखंड करून त्यात गूळ, खजूर किंवा कोणत्याही फळांचा वापर करून ते खाऊ शकता, असंही सिंह म्हणाल्या.

बाजारातल्या ऑफर्स आणि इंस्टंट श्रीखंड

गुढी पाडव्यानिमित्त बाजारात अनेक ऑफर्स सुरु आहेत. कपडे, गॅजेट्स, गाड्या, घरगुती सामान इत्यादींवर. तसंच श्रीखंडाच्या सर्वच ब्रॅंडवरही १० ते २५ टक्के सवलत देण्यात आलीय. काही दुकानांमधे एकावर एक मोफत अशीसुद्धा स्किम सुरु आहे.

सोशल मीडियावर इंन्स्टट श्रीखंड कसं बनवाल याचे अनेक विडियो येताहेत. त्याचबरोबर श्रीखंड कसं डेकोरेट करावं, कशापद्धतीने झटपट आणि अट्रॅक्टिव पद्धतीने सर्व्ह करावं याचे डीआयवाय विडियोजही प्रसिद्ध होतायत.

हेही वाचाः

गुढीपाडव्याला साजरा करुया महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन

गुढीपाडवाः शिवपार्वती विवाहाचा वारसा सांगणारा हजारो वर्षं जुना उत्सव