आज बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस. मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून त्यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन साजरा केला जातो. पण बाळशास्त्रींनी निव्वळ मराठी पत्रकारितेचीच सुरवात केली नाही. तर ते अनेक सुधारणांचे प्रवर्तक होते. म्हणूनच त्यांना एकोणिसाव्या शतकातले मराठीचे आद्य प्रवर्तक म्हटलं जातं. महाराष्ट्राला विद्येची गोडी लावणाऱ्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाची ही ओळख.
प्रजेची मनोवृत्ती आपल्या राजसत्तेस अनुकूल करून घेण्याच्या दृष्टीनं त्यावेळच्या गवर्नर एलफिस्टनने २१ ऑगस्ट १८२२ ला ‘द बॉम्बे नेटिव स्कूल बुक अँड स्कूल सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली. कॅप्टन जर्विस आणि बापू छत्रे हे दोघं शाळेचा संपूर्ण कारभार बघायचे. जर्सिवने तर या ठिकाणी इंग्रजी ग्रंथाचं मराठीत भाषांतर करण्याचा सपाटाच लावला होता.
या शाळेत बाळशास्त्री जांभेकर यांचा प्रवेश झाला तो बापू छत्रे यांच्यामुळेच. चार वर्षांत तिथला अभ्यासक्रम पूर्ण करून बापू छत्र्यांच्याच जागेसाठी, त्यांच्या आग्रहावरून बाळशास्त्र्यांनी इंग्रज साहेबांकडे अर्ज केला. अर्ज करतेवेळी इंग्रजी, मराठी आणि संस्कृत या भाषांव्यतिरिक्त गुजराती, बंगाली, फारसी, कन्नड, हिंदी, उर्दू या भाषांमध्येही बाळशास्त्र्यांनी नैपुण्य मिळवलं होतं.
बापू छत्र्यांची जागा चालवू शकेल, असा उमेदवार आलेल्या अर्जातून कुणी हाती लागेना. शेवटी एका १७ वर्षाच्या मुलाचा अर्ज तपासायचा राहिला. हा १७ वर्षाचा मुलगा सर्व कसोट्यांना उतरत असेल, तर त्याला मुलाखतीसाठी बोलवावं असं ठरलं. या सतरा वर्षाच्या मुलानं आपल्या अर्जात लिहिलं होतं,
‘मा. कॅप्टन जर्विस यांसी,
नेटिव एज्युकेशन सोयायटी, मुंबई यांचे सध्याचे सेक्रेटरी पेन्शन घेऊन निवृत्त होत आहेत. असे समजल्यावरून या पदासाठी सदरचा अर्ज मी करीत आहे. गेली सव्वा वर्ष मी या शाळेत गणित हा विषय शिकवतो. परंतु संस्कृत, इंग्रजी, मराठी, गुजराती, बंगाली आणि पर्शियन या भाषाही मला अवगत आहेत. सर, माझं वय १७ आहे. परंतु मला खात्री आहे. आपण वयापेक्षा पात्रतेला अधिक महत्त्व द्याल. आपण माझ्या अर्जाचा विचार करून शिफारस करावी ही विनंती!
आपला आज्ञाधारक
बाळगंगाधरशास्त्री जांभेकर’
हा अर्ज वाचल्यावर बाळशास्त्रींना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं आणि अवघ्या सतरा वर्षाच्या मुलाची नेमणूक ‘डेप्युटी सेक्रेटरी’ या जबाबदारीच्या पदावर केली. तांत्रिक अडचणींवर मात करण्यात आली. त्या काळात ३०० रुपये एवढा भरघोस पगार त्यांना मिळत होतं. विद्या खात्यात काम करताना बाळशास्त्र्यांनी महाराष्ट्रात आधुनिक शिक्षणाची पायाभरणी केली, असं म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती होणार नाही.
बाळशास्त्री जांभेकर हे नाव उच्चारलं की, आपल्याला त्यांची ओळख पटते ती फक्त मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणूनच. पण प्रत्यक्षात मात्र पत्रकारितेबरोबरच अनेक क्षेत्रात पहिली सुरवात करणारे म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. ते आद्य आधुनिक ज्योतिषशास्त्र विशारद, तसंच आद्य बाल व्याकरणकार, आद्य भूगोलकारही ठरलेले आहेत. म्हणूनच एकोणिसाव्या शतकातले मराठीचे आद्य प्रवर्तक असं ज्यांना म्हणता येईल, त्या बाळशास्त्री जांभेकरांना पत्रकारितेबरोबरच अनेक सामाजिक सुधारणांचे जनक असंच म्हणावं लागेल.
पेशवाई संपून महाराष्ट्रात इंग्रजी सत्तेचा अंमल सुरू होण्याच्या कालखंडात बाळशास्त्र्यांचा जन्म झाला. आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोंबुर्ले या गावी गंगाधरशास्त्री आणि सगुणाबाई या दाम्पत्याच्या पोटी १८१२ मधे बाळशास्त्रींचा जन्म झाला. त्यांचं घराणं व्युत्पन्न पुराणिकाचं होतं. या मुलाची ग्रहणशक्ती अफाट असल्यामुळं सगळी मंडळी त्याला ‘बालबृहस्पती’ म्हणायचे.
भारतीय इतिहासात बाळ गंगाधर या आद्याक्षरांच्या दोन महापुरुषांनी वेगवेगळ्या कालखंडात इंग्रजांना पुरतं चकित करून ठेवलेलं दिसतं. एकाचा अस्त आणि दुसऱ्याचा उदय; परंतु काळ मात्र इंग्रजी राजवटीचाच. ‘बाळ गंगाधरशास्त्री’ अशी सही करणारे बाळशास्त्री जांभेकर, हे इंग्रजांच्या कौतुकास पात्र झालेले होते. तर नंतरचे बाळ गंगाधर हे इंग्रजांच्या रोषास कारणीभूत ठरले होते. इंग्रज अध्यापक बाळशास्त्री जांभेकरांवर निहायत खूश असले, तरीही बाळशास्त्री त्यांच्या कौतुकांवर भारावून जाणारे कधीच नव्हते.
एक आध्यात्मिक तत्त्वज्ञान सोडल्यास ज्ञान विज्ञानाच्या बळावर आपण या गोऱ्या साहेबावर कुरघोडी करू शकणार नाही. जगातलं त्रिकाल ज्ञान फक्त आपल्याच धर्मग्रंथात आहे, असा टेंभा मिरवून आपल्या संस्कृतीचा विकास आपण थांबवला आहे, असं बाळशास्त्रींना वाटायचं.
त्यात पुन्हा समुद्र पर्यटन बंदी, सोवळं ओवळं, छापाच्या शाईमध्ये चरबी असते म्हणून शाईनं लिहिलेलं पुस्तक अपवित्र या गोष्टी म्हणजे ज्ञान मिळवण्यापासून आपला समाज आणखीनच वंचित राहत होता. त्यामुळंच गोरी मंडळी अगदी बेमालूमपणे ख्रिस्ती धर्मप्रसार करतात आणि कर्मठ मंडळी आणखी कर्मठ होतात, हे बाळशास्त्रींच्या ध्यानात आलं.
बाळशास्त्री जांभेकर सेक्रेटरी पदाबरोबरच भाषांतर समितीचंही काम बघायचे. ‘ट्रिटाईज ऑन ऑब्जेक्ट्स’ आणि ‘अॅडवाँटेजेस अँड प्लेजर ऑफ नॉलेज’ या प्रसिद्ध शास्त्रीय ग्रंथाच्या मराठी अनुवादाच्या कामात बाळशास्त्री जांभेकरांनी मोठं योगदान दिलं. त्यामुळंच एलफिन्स्टन साहेब बाळशास्त्र्यांच्या कामावर खूप खूश होते.
या कामाबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी जेव्हा जांभेकरांना त्यांनी बोलावलं, तेव्हा बाळशास्त्रींनी त्यांच्यासमोर मराठी वृत्तपत्र सुरू करण्याचा विचार असल्याचं सांगितलं. या कामात रघुनाथ हरिश्चंचद्रजी आणि जनार्दन वासुदेवजी हे दोघंही मदत करणार आहेत, हेही त्यांनी त्यांच्या कानावर घातलं. या उपक्रमाची अधिक चौकशी करून मदत करण्याचं आश्वानस एलफिस्टन साहेबांनी बाळशास्त्रींना दिलं.
नुसती सरकारी नोकरी करून द्रव्यार्जन करणं, ही बाळशास्त्र्यांची महत्त्वाकांक्षा कधीच नव्हती. नव्या शिक्षणाचे वारे केवळ शाळेत कोंडून ठेवून चालणार नाही, तर ते बाहेरही खेळवलं गेलं पाहिजे, या विचाराने बाळशास्त्र्यांनी आधुनिक काळातल्या प्रभावी हत्याराचा अवलंब करायचं ठरवलं आणि हे हत्यार म्हणजे वर्तमानपत्र!
या मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण काय करू शकू याचा विचार करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधरांप्रमाणेच याही बाळ गंगाधरानं त्यांच्याही कित्येक वर्ष आधी मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला. आणि १८३१ च्या १२ नोव्हेंबर रोजी दर्पणच्या एकंदर उपक्रमाचा स्वरुपदर्शक प्रस्ताव जाहीर झाला. तो प्रस्ताव असाः
‘...असे एक वर्तमानपत्र पाहिजे ज्यात मुख्यत्त्वे करून एतद्देशीय लोकांचा स्वार्थ होईल. ज्यायोगे त्यांची मनोगते कळतील, इच्छा कळतील. जवळच्या प्रदेशात आणि परकीय मुलुखात जी वर्तमाने होतात ती समजतील. जे विचार विद्येपासून उत्पन्न होतात आणि ज्या लोकांची नीती बुद्धी आणि राजरिती यांच्या सुरुपतेस कारण होते ते विचार करण्यास उद्योगी आणि जिज्ञासू मनास मदत होईल. स्वदेशी लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी आणि येथील लोकांचे कल्याण या विषयी स्वतंत्रतेने आणि उघड रितीने विचार करण्यास साधन मिळावे, या दृष्टीने मनात आहे की दर्पण नावाचे नियतकालिक काढावे.’
आपली पुरातन परंपरा आणि नवं ज्ञान यांचा समन्वय या मातृभूमीचं पांग फेडण्यासाठी कसा करता येईल, याचा ध्यास घेतलेल्या, इंग्रजी शिक्षणाचं वाघिणीचं दूध पुरतं पचवलेला हा विचारवंत बाळशास्त्री जांभेकर!
आचार्य अत्रे म्हणतात, ते तंतोतंत खरं आहे. आपलं राज्य का गेलं आणि इंग्रजी राज्य या देशात का आलं याचा अचूक विचार करणारा महाराष्ट्रातला हा पहिला पुरुष!
१८३२ च्या जानेवारी महिन्यात दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला. रघुनाथ हरिश्चंद्रजी आणि जनार्दन वासुदेवजी हे बाळशास्त्र्यांच्या बरोबरीनं या अंकासाठी काम करत होते. नव्या ज्ञानाचा परिचय करून देऊन शतकानुशतकं मानसिक निष्क्रियतेच्या आणि सोवळ्या ओवळ्याच्या वेडगळ समजुतीमध्ये निष्क्रिय असलेल्या आपल्या समाजाला जागृत करायचं आणि त्यातूनच त्याला आपल्या स्वत्वाची जाणीव करून द्यायची याच केवळ उद्देशानं!
द्रष्ट्या बाळशास्त्र्यांनी द्वैभाषिक दर्पण सुरू केलं. प्रत्येक पानावर दोन कॉलम असं दर्पणचं स्वरुप होतं. एक कॉलम इंग्रजी मजकुराचा आणि त्याच्या शेजारी त्याचा स्वैर अनुवाद असलेला कॉलम मराठी मजकुराचा. जगभरातल्या इतर विषयांची माहिती, मनोरंजनाचा वेगळा विभाग. जाचक सामाजिक रुढी परंपरांवर टीका, विधवा विवाह, बालविवाहाला विरोधी भूमिका अशा विविध विचारांचा पाठपुरावा दर्पणमध्ये केला जात. त्याच विचारांचा पाठपुरावा करून पुढं त्यांनी दिग्दर्शन हे मासिकही सुरू केलं.
हिंदू समाजातल्या रुढीप्रियतेच्या गतानुगतिकतेच्या आणि विशाल जगाच्या नवनवीन ज्ञानाच्या पाठ फिरवणाऱ्या वृत्तीचा ब्रिटिश मिशनऱ्यांनी फायदा घ्यायला सुरवात केली होती. त्यानुसार ख्रिस्ती धर्माचा प्रसार जोमानं करायला सुररवात केली होती. समजुतीनं झालेल्या धर्मांतराबद्दल आक्षेप घ्यायचं काहीच कारण नव्हतं. परंतु परळी इथल्या शेषाद्री यांच्या नारायण या विद्यार्थ्याचं सक्तीनं झालेलं धर्मांतर आणि त्याचा भाऊ श्रीपत याचं त्याच रेव्हरंड रॉबर्ट नेजबिट याच्याकडे काही दिवस वास्तव्य, हा त्यावेळच्या हिंदू समाजातला वादळाचा विषय ठरला.
बाळशास्त्र्यांनी श्रीपतला वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न केले. शेषाद्री यांच्या पाठिशी ते खंबीरपणे उभं राहिले. मॅजिस्ट्रेट लेगेट पुढं फिर्याद दाखल केली. अगदी सुप्रीम कोर्टाचीही दारं ठोठावली. अखेर तिथल्या न्यायमूर्ती पेरीं यांनी निःपक्षपातीपणाने निर्णय दिला आणि लढ्याला यश आलं. पण खरी लढाई तर पुढंच होती.
एवढ्या महत्प्रयत्नानं जिंकलेली ही लढाई, आणि त्यातून झालेला न्यायनिर्णय पुण्यातल्या समस्त ब्रह्मवृदांला मान्य झाला नाही. श्रीपत ५७ दिवस पाद्र्याकडे राहिल्यामुळे त्याच्याकडून अभक्ष भक्षण आणि अपेयपान घडलं असण्याच्या कल्पनेनं त्याला आपल्या धर्मात पुन्हा कसा थारा द्यायचा, हा प्रश्नक कर्मठ हिंदूंना पडला.
या मुलाला पुन्हा हिंदू धर्मात थारा द्यायचा नाही. या निर्णयात भविष्यातले अनेक धोके लपले होते. समाजानं वाळीत टाकलेल्या या निराधार मंडळींना पुन्हा ख्रिश्चान धर्मात घेण्यासाठी ख्रिस्ती धर्मप्रसारक टपलेलेच आहेत, हे या कर्मठ मंडळींना समजत नाही. या कर्मठ मंडळींची ही कृती म्हणजे आपणच आपल्या धर्माला खिंडारं पाडण्यासारखं आहे, हे बाळशास्त्रींच्या लक्षात आलं. आणि त्यांनी समाजातली ही वेडगळ आणि मूर्खपणाची समजूत समूळ नष्ट केलीच पाहिजे, यासाठी बाळशास्त्र्यांनी कर्मठ समाजाचं आव्हान विलक्षण धडाडीनं पेललं.
शुद्धीकरणाच्या अनेक खटपटी लटपटी केल्या. मोरशास्त्री साठे, त्रिंबकशास्त्री शाळिग्राम आणि जगन्नाथ शंकरशेठ या आपल्या स्नेह्यांच्या मदतीनं श्रीपतला स्वधर्मात परत घेण्याचा एक फार मोठा आव्हानात्मक उपक्रम यशस्वी केला. समाजातल्या सनातनी कर्मठ माणसांनी कोणत्याही थराला जाऊन बाळशास्त्र्यांना त्रास दिला. त्यांच्यावर बहिष्कार टाकला. अडचणी उभ्या केल्या. परंतु संपूर्ण हिंदुस्थानभर गाजलेल्या या नाट्यपूर्ण प्रकरणाची त्यांनी विलक्षण कौशल्याने आणि धडाडीने हाताळणी केली आणि श्रीपतला न्याय मिळवून दिला.
बाळशास्त्री जांभेकर एक बहुपेडी व्यक्तिमत्त्व! पत्रकारिता फक्त एवढ्या एकाच त्यांच्या कार्याचा उल्लेख करून आपण मंडळींनी त्यांना उपेक्षित ठेवलं. परंतु बाळशास्त्री जांभेकर या अवघ्या ३४ वर्षाच्या तरुणानं प्रत्यक्षात फक्त १७ वर्षाच्या कालखंडात अक्षरशः आकाशाला कवेत घेतलं होतं, असं म्हणायला हरकत नाही.
गणित, व्याकरण, ज्योतिष, संस्कृतपांडित्य, शिलालेखांचा अभ्यास, अनुवादित साहित्य या सर्व क्षेत्रात भरघोस कामगिरी करताना त्यांनी सामाजिक सुधारणांच्या बाबतीत फार मोठं काम केलं. स्त्रियांच्या प्रश्नांकडे ते ज्ञाननिष्ठ भूमिकेतून बघायचे. आणि म्हणूनच दर्पणमधून त्यांनी पुनर्विवाह, स्त्रीजीवनाचा अभ्यास, स्त्रीशिक्षण, स्त्रीशिक्षणाची दिशा, स्त्रीपुरुष समान हक्क या विषयी सखोल निबंध लिहिले.
ठराविक मंडळींसाठी उपलब्ध असणारं ज्ञानभांडार, जनसामान्यांसाठी उपलब्ध हवं, हा त्यांचा ठाम दृष्टिकोन होता. त्यामुळंच मित्रांच्या मदतीनं त्यांनी बॉम्बे नेटिव जनरल लायब्ररी या आद्य सार्वजनिक वाचनालयाची १८४५ मधेच स्थापना केली. दादाभाई नवरोजी, डॉ. भाऊ दाजी, विश्वबनाथ नारायण मंडलिक असे शिष्योत्तम निर्माण करताना शैक्षणिक चारित्र्याविषयी आग्रही भूमिका स्वीकारली. त्यांचे समृद्ध असे शोधनिबंध ज्ञाननिष्ठेची साक्ष देतात.
वयाच्या अवघ्या चौतिसाव्या वर्षी त्यांचं निधन झाल्यामुळं त्यांच्या सार्वजनिक कार्याचा कालावधी जेमतेम एक तपाचा होता. तरीही लोकशिक्षणाचं व्रत अंगीकारलेल्या बाळशास्त्रींनी सामाजिक सुधारणांना नेहमीच अग्रक्रम दिला. त्यांना ज्ञानाच्या प्रचंड शक्तीचा साक्षात्कार झालेला होता. आणि म्हणूनच ज्ञानप्रसार हा त्यांच्या जीवनाचा प्रमुख स्त्रोत बनला होता.
त्या काळात म्हणजे साधारण दीडशे वर्षांपूर्वी तीनशे रुपयांइतका भरघोस पगार असूनही त्यांनी विद्येपेक्षा त्याला जास्त महत्त्व दिलं नाही. आणि म्हणूनच अखेरीला थोड्या विपन्नावस्थेत त्यांचं निधन झालं.
त्यांनी शिक्षकांना म्हटलं होतं, विद्येची अभिलाषा धरा. लोकांना शिक्षण द्या. पूर्वीचे ऋषी अरण्यवास पत्करून विद्याव्यासंग करीत, आणि शिष्यांना ज्ञानदान करीत. त्या ऋषींचे वंशज आपण स्वतःला म्हणवून घेतो. पण दुर्देव असं आम्हाला अंमलदार व्हावसं वाटतं. कारकून व्हावसं वाटतं. परंतु शिक्षक व्हावंसं वाटत नाही. शिक्षकाजवळ दसपट असेल, तर त्यातलं एकपट तरी विद्यार्थ्याला देणं शक्य होईल. तुम्ही शंभरपट ज्ञानी असाल, तर विद्यार्थ्यांच्या वाट्याला दसपट ज्ञान येईल. सरकार, प्रजा, चाकर, आईवडील, मुलं या सर्वांचा आपापसात प्रेमभाव राहावा, आणि स्वदेशाभिमान सदैव जागृत राहावा, यासाठी प्रयत्न करा. हेच आपल्या ऋषिवंशजांचं काम आहे.
ते नेमकं जाणून होते की परकीय सत्तेशी लढण्यासाठी आता पुरातन हत्यारं काही कामाची नाही, तर आता यापुढे विद्येचं हत्यार वापरूनच या परकीय सत्तेशी मुकाबला करावा लागेल. महाराष्ट्राला विद्येची गोडी लावणारा हा पहिला पुरुष! विद्या व्यासंग आणि वर्तमानपत्र या दोन आधुनिक शस्त्रांचा उपयोग करण्याची सुरवातच बाळशास्त्रींनी केली असं म्हणावं लागेल. म्हणूनच बाळशास्त्री जांभेकरांना आधुनिक भारत असं संबोधलं जातं.
आधुनिक विचार मांडताना त्यांनी परंपरेकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही. कारण ज्ञानेश्वचरीसारख्या मौलिक काव्यग्रंथाचं सर्वपाठभेदासहीत संशोधन करून १८४५ मधे ग्रंथरुपाने ते प्रकाशित करण्याचं ऐतिहासिक कार्यही त्यांनी केलं. बाळशास्त्र्यांच्या कार्याचा विचार करता आत्ताच्या काळापर्यंत सर्व आधुनिक पिढ्यांना त्यांनी विद्येच्या विचाराचा नवीन दृष्टिकोन दिला. आणि आजही पत्रकारितेत रुढ असलेले अनेक नवे पायंडे त्यांनी त्या काळात घातले.
(लेखक ज्येष्ठ विचारवंत आहेत.)