येणाऱ्या वर्ल्डकपसाठी अशी असेल 'टीम इंडिया'

२३ जानेवारी २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


या वर्षाच्या शेवटी भारतात वनडे क्रिकेट वर्ल्डकप आयोजित केला जातोय. या वर्ल्डकपसाठी संभाव्य खेळाडू कोण आहेत हे तपासणं आवश्यक ठरतं. गुणवत्ता, वय आणि अनुभव या तीन घटकांवर टीम बांधली तर ती आपसूकच मजबूत होते. नव्या पद्धतीनं क्रिकेट खेळायला आपल्याकडे गुणवत्तेला तोटा नाही पण टीमनिवडीचे निकष काय लावले जातात हे महत्वाचं ठरतं.

भारतानं श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-२० सामन्यांची मालिका जिंकली. १९९६च्या वर्ल्डकप विजेत्या श्रीलंकेचं अधःपतन व्हायला अनेक कारणं आहेत. २०२२चा आशिया कप श्रीलंकेनं जिंकून आपल्या गतवैभवाची झलक दाखवली पण श्रीलंकेच्या टीममधे सातत्याचा अभाव हा दिसून येतोय. भारतासाठी मात्र हीच वनडे सामन्यांची मालिका नाही तर यापुढचा प्रत्येक वनडे सामना महत्वाचा आहे तो या वर्षअखेरीस भारतात होणार्‍या वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने.

हेही वाचाः स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

वर्ल्डकप जिंकण्याचं दडपण

श्रीलंका मालिकेनंतर वनडे सामन्यांचं वेळापत्रक बघितलं तर आतापासून ऑक्टोबरला होणार्‍या वर्ल्डकपपर्यंत आपण न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या टीमसोबत ९ सामने मायदेशी आणि ३ बाहेर असे १२ वनडे सामने खेळणार आहोत.

भारतात वर्ल्डकप होत असल्यानं भारतीय टीमवर तो जिंकण्याचं अनन्यसाधारण दडपण असणार. त्यातून गेल्यावर्षी टी-२० वर्ल्डकपचे दावेदार मानले जाणार्‍या भारतावर इंग्लडकडून सेमीफायनलमधे मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागल्यानं घरचा वर्ल्डकप जिंकण्याचं दडपण जास्तच असणार हे नक्की.

जानेवारी अर्धा निघून गेला म्हणजे आपल्या हातात जेमतेम ९ महिने वर्ल्डकपच्या तयारीसाठी आहेत. या ९ महिन्यात आपल्याला पुनर्जन्म घेऊन विश्वविजेते बनायचंय पण वर्ल्डकप जिंकायला आपली टीम तयार आहे असं म्हणताना जीभ नक्कीच अडखळते.

बीसीसीआयच्या बैठकीत काय ठरलं?

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय क्रिकेट बोर्डाचे कार्यवाह जय शाह यांनी मुंबईत बीसीसीआयच्या कार्यालयात २०२३च्या आखणीसाठी तातडीची बैठक बोलावली होती. कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक लक्ष्मण, बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत ठरलेल्या मुख्य मुद्यांपैकी एक होता तो म्हणजे आयपीएलच्या टीममालकांशी सल्लामसलत करून भारतीय क्रिकेटपटूंचा वर्कलोड सांभाळायचा आणि त्यांच्या तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करायचं. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या गळ्यात ही अतिरिक्त जबाबदारी दिली. असंही अनधिकृतपणे कळलं ते म्हणजे या बैठकीत वर्ल्डकपसाठी संभाव्य २० खेळाडूंची निवड तयार आहे.

नव्या टीमची बांधणी

हे वीस खेळाडू कोण हे अजून गुलदस्त्यात आहे पण त्यांच्या निवडीचे निकष काय हेही गुलस्त्यात आहेत. २०१९च्या वर्ल्डकपसाठी अंबाती रायडूला चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन म्हणून तयार करताना त्याला तब्बल २४ सामने खेळवले आणि टीमनिवडीच्या वेळी विजय शंकरची निवड करण्यात आली. ही कुठच्या निकषांवर होती याची उत्तरं आपण आजही शोधतोय.

त्या वर्ल्डकपमधे सेमीफायनलच्या पराभवापर्यंत आपण चौथ्या क्रमांकाचा खेळाडू शोधतच होतो. या कटू आठवणींच्या शिदोरीवर आगामी वर्ल्डकपसाठी हे २० संभाव्य खेळाडू कोण आहेत हे आत्ताच तपासणं महत्वाचं ठरतं. गुणवत्ता, वय आणि अनुभव या तीन घटकांवर टीम बांधली तर आपसूकच ती मजबूत होते. भारताच्या अंतिम १५ जणांच्या टीममधे ८-९ नावं तर नक्कीच निश्चित आहेत असं मी मानतो.

पण आपल्या वारंवार टीमबदलानं रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल हीच नावं खात्रीलायक घेता येतील. केएल राहुल, श्रेयस अय्यर, शमी, सिराज, शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, ईशान किशन, चहल, कुलदीप यादव यांची नावं खात्रीलायक नावांच्या यादीत का नसावीत याला कारणं आहेत.

हेही वाचाः ख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम

टीमनिवडीचे निकष काय?

याचं मुख्य कारण म्हणजे वनडे क्रिकेट असो किंवा टी-२० क्रिकेट, भारत अजूनही जुन्या पद्धतीनेच खेळतोय. ते कसं तर पहिला पॉवरप्ले विकेट पडू न देता धावा करायच्या, मधल्या ओव्हरमधे संयत फटकेबाजी करायची आणि शेवटच्या ओव्हरमधे हल्लाबोल करायचा.

आज इंग्लडसारख्या देशांनी आपला खेळ बदलत धोका पत्करत पहिल्या ओव्हरपासून आपला धावांचा वेग कसा राखता येईल यावर लक्ष केंद्रित केलंय. यामुळे पन्नास ओव्हरच्या क्रिकेटमधे साडेतीनशेची धावसंख्या गाठणं हे वारंवार होतंय.

या नव्या पद्धतीनं क्रिकेट खेळायला आपल्याकडे १३५ कोटी जनतेत काय पर्याय आहेत? गुणवत्तेला तोटा नाही पण टीमनिवडीचे निकष काय लावले जातात हे महत्वाचं ठरतं.

सलामीच्या जागेसाठी पर्याय

सलामीच्या जागेचा विचार केला तर श्रीलंका, न्यूझीलंड मालिकेत रोहित शर्माबरोबर आपण शुभमन गिलला खेळवलं आणि त्यानं आपली छाप पाडली. दुबळ्या श्रीलंकेविरुद्ध शतक तर तगड्या न्यूझीलंडविरुद्ध द्विशतक ठोकत त्यानं सलामीच्या स्थानावर ते नाव नक्की केलंय असं म्हटलं तरी चूक ठरणार नाही.

भारताकडे सलामीला रोहित शर्मा, शुभमन गिल, पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन हे पर्याय आहेत. यात रोहित शर्माचं स्थान अबाधित आहे. बाकीच्या दावेदारांपैकी शुभमन गिलचं पारडं या दोन डावांनी जड झालं असलं तरी बाकीच्या नावांचा विचार करणं आवश्यक ठरतं.

पारंपरिक संमतीसाठी आपण रोहित शर्मा आणि राहुलची जोडी खेळवायचो. पांढर्‍या बॉलवर दोन्ही फॉरमॅटमधे राहुलचं सततचं अपयश, धावांचा वेग वाढवण्यात कमी पडणं हे वारंवार उघड झालं. तेव्हा राहुलची रवानगी आपण मधल्या फळीत केली आणि त्याला विकेटकीपरची जबाबदारी दिली.

राहुलला वाचवायचा अट्टाहास

२००२ला जेव्हा सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविडला आपण विकेटकीपर केलं तेव्हा ६ वर्षे आणि १६८ सामने खेळल्यावर द्रविडचा स्ट्राईक रेट ६८.४० होता. मोंगिया जायबंदी झाल्यावर आपण साबा करीम, एमएसके प्रसाद, अजय रात्रा, विजय दहिया, दीप दासगुप्ता आणि समीर दिघे या विकेटकीपरचा पर्याय बघितला पण त्यात कुणीच द्रविडइतकी चांगली बॅटींग करणारं नव्हतं.

तेव्हा आपल्याकडे अष्टपैलू नसल्यानं आपल्याला सात बॅट्समन खेळवणं गरजेचं असल्यानं द्रविडलाही टीममधे स्थान मिळालं आणि विकेटकीपरची जागाही भरली गेली. गेल्या वीस वर्षात भारतीय क्रिकेटमधे क्रांती घडलीय. आज पंड्यासारखा उत्तम अष्टपैलू आहे, पर्यायी चहर, शार्दूल ठाकूर आहेत.

मुख्य म्हणजे ऋषभ पंत जरी दुर्दैवानं बाहेर असला तरी उत्तम मूळचे विकेटकीपर आणि घणाघाती बॅट्समन असलेले ईशान किशन, संजू सॅमसन आहेत. राहुलच्या ५१ सामन्यांतल्या ८७.३४ स्ट्राईक रेटच्या तुलनेत ईशान किशन आणि संजू सॅमसन अनुक्रमे १० आणि ११ वनडे सामने खेळलेत पण दोघांचा स्ट्राईक रेट ११०च्या पुढे आहे पण मुख्य म्हणजे त्यांचा घणाघात एकहाती सामना फिरवणारा आहे.

हेही वाचाः क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट

पहिल्या पाच जागांचे पर्याय

तेव्हा सलामीला शुभमन गिलबरोबर ऋतुराज गायकवाड किंवा पृथ्वी शॉ ही ताज्या दमाची जोडी उत्तम सुरुवात करून देऊ शकते कारण या पठडीतले बॅट्समन पहिल्या बॉलपासून फटकेबाजी करू शकतात. राहुलला मधल्या फळीत ढकलण्यापेक्षा रोहित शर्मा तिथं खेळू शकतो.

रोहित शर्मा हा असा बॅट्समन आहे ज्यानं पहिले पंचवीस बॉल खेळून काढले तर मैदान त्याच्या मालकीचं असतं. त्याच्या फटक्याची ताकद आणि प्लेसमेंट कुठलीही फिल्डींग भेदू शकते आणि त्याला मुख्य म्हणजे ते सुरवातीचे बॉल मधल्या फळीत मिळतील. विराट कोहलीनं पुन्हा कात टाकून क्लास इज पर्मनंट दाखवून दिलंय. त्याचं स्थान त्यामुळे ध्रुव तार्‍याप्रमाणे अढळ ठरतं.

चौथ्या आणि पाचव्या जागेसाठी सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आहेत. श्रेयस अय्यर आज जरी अनफिट असला तरी त्याचं स्थान तो राखेल. वर्ल्डकपच्या आधी आयपीएल असल्यानं संभाव्य दुखापती आणि फॉर्मचा विचार करता आपल्याला टीममधल्या प्रत्येक जागेसाठी कमीतकमी एकास एक असा पर्याय तयार ठेवावा लागेल.

असे असतील संभाव्य पंधरा

बॉलिंग विभागात भारताकडे जलदगती बॉलरचा ताफा तयार आहे. त्यांच्या योग्य रोटेशन करत त्यांना फिट ठेवणं गरजेचं आहे. बुमराहची दुखापत वारंवार उचल खातेय. मोहम्मद शमीचा फिटनेस कधीही धोका देऊ शकतो. बीसीसीआयनं यो-यो टेस्ट आणि डेस्का स्कॅन हे टीमनिवडीसाठी आवश्यक केलेयत. शमी यो-यो टेस्टमधे पास होतोच असं नाही.

आपलं भुवनेश्वर कुमार प्रेम पुन्हा उफाळून यायला नको कारण भारतातल्या खेळपट्ट्यांवर त्याच्या वेगाचा उपयोग नाही. तेव्हा उरतात ते मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शार्दूल ठाकूर आणि दीपक चहर. यात सिराजला गेल्या टी-२० वर्ल्डकपमधे तेही ऑस्ट्रेलियातल्या वेगवान खेळपट्ट्यांवर का निवडलं नाही निवड समितीच जाणे.

वर्ल्डकप भारतात होत असल्यानं भारताला असे बॉलर निवडावे लागतील जे थोडीफार बॅटींग करू शकतील. फिरकी गटात यजुवेंद्र चहलचा प्रभाव कमी होत चाललाय पण कुलदीप यादवला नावडता असल्यासारखं तांदळातल्या खड्याप्रमाणे दूर सारतात. अक्षर पटेल त्याच्या बॅटींगच्या उपयुक्ततेमुळे साहजिकच टीममधे असेल. जडेजाचं पुनरागमन झालं असेल.

शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप, सिराज, अर्शदीप, उमरान मलिक हे पंधरा खेळाडू ताज्या दमाचे आणि अनुभव यांचा मिश्रण देणारे ठरतील. शार्दूल ठाकूर, संजू सॅमसन, दीपक चहर हे पर्यायी असतील. बुमराह फिट झाला तर अर्थातच तो पंधरात असेल. मोहम्मद शमीच्या फिटनेसवर त्याचं स्थान ठरेल.

गरज नव्या प्रयोगांची

टी-२० वर्ल्डकपसाठी भारतानं टीमनिवडीचे अनेक प्रयोग राबवले. या प्रयोगांमुळे टीमचा समतोल कधीच राखला गेला नाही आणि या लांबलेल्या प्रयोगांमुळे अंतिम टीमला एकत्र सराव करायला सामनेच मिळाले नाहीत. या वर्ल्डकपसाठीही आपण तेच करतोय.वर्ल्डकप जिंकायचा असेल तर योग्य निकष वापरून संभाव्य टीमला हे ९ सामने एकत्र सराव देण्याची गरज आहे.

२०११ची वर्ल्डकप विजेती टीम बांधायची सुरवात महेंद्रसिंग धोनीनं २००८ला केली होती. यासाठी गांगुली, सेहवाग, द्रविड, लक्ष्मण अशा दिग्गजांना पायउतार व्हावं लागलं. आज आपल्याकडे वेळ कमी असला तरी मोठे सामने खेळायला तयार असलेली गुणवत्ता उपलब्ध आहे. तेव्हा प्रश्न आहे तो काही कठोर निर्णयांचा.

वर्ल्डकप फुटबॉलमधे पोर्तुगाल रोनाल्डोला टीमबाहेर ठेऊ शकतं. त्याच्या जागी घेतलेल्या २१ वर्षीय रॅमॉसनं हॅट्ट्रिक करून आपली निवड सार्थ ठरवली. पोर्तुगाल भले वर्ल्डकप जिंकला नसेल पण जिंकण्यासाठी कठोर निर्णय घ्यायची तयारी त्यांनी दाखवली. बीसीसीआय असे धाडसी निर्णय किती लवकर घेऊन संभाव्य खेळाडूंना भरपूर सराव मिळायची सोय करेल यावर आपली वर्ल्डकपची कामगिरी अवलंबून असेल.

हेही वाचाः 

महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’

आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी

अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी

मानसिक आरोग्य नीट राहिलं तरच खेळाडू यश मिळवतील

वेस्ट इंडिजची 'त्रिमूर्ती' टी ट्वेन्टी वर्ल्डकपमधे धडकी भरवणार!

(साभार - पुढारी)