आज २८ मे. ‘पद्मभूषण’ भाई माधवराव बागल यांची जयंती. भाई माधवराव बागल हे महाराष्ट्रातल्या प्रबोधनात्मक चळवळीतलं मोठं नाव. महात्मा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रभावात वाढलेल्या माधवरावांनी सामाजिक सुधारणा चळवळींसोबतच पत्रकारितेतही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्य आणि विचारांचं विश्लेषण करणारा हा विशेष लेख.
महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात माधवराव बागल यांचं स्थान फार महत्त्वाचं आहे. त्यांची दखल घेतल्याशिवाय महाराष्ट्रातला वैचारिक प्रबोधन आणि परिवर्तनाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही.
माधवराव बागल यांचा जन्म २८ मे १८९५ रोजी कोल्हापूरमधे झाला. वडील खंडेराव बागल हे नामांकित वकील आणि कोल्हापूर दरबारी मामलेदार होते. आई कमलाबाईंचं आजारपणात निधन झालं. तेव्हापासून माधवरावांचा देवावरचा विश्वास उडाला. आईच्या मृत्यूनंतर वडील त्यांच्याकडे अधिक लक्ष देऊ लागले. त्यांची सर्व तऱ्हेची काळजी घेऊ लागले.
मामलेदारांचा मुलगा म्हणून माधवरावांचं बालपण श्रीमंतीत आणि ऐषोआरामात गेलं. त्यांच्या घरी नोकर-चाकर, पट्टेवाले होते. खंडेराव हे एक संवेदनशील, लोकहितदक्ष अधिकारी होते. त्यांनी बालपणी गरिबीचा दाहक अनुभव घेतल्यामुळे गरिबांचे प्रश्न सोडविण्यास ते अग्रक्रम द्यायचे. गरिबांशी आपुलकीने, प्रेमाने वागायचे. सर्व गोष्टी माधवराव जवळून पाहायचे. त्यांच्या बालमनावर याचा परिणाम होत गेला.
वडलांच्याबरोबर ते फिरतीवर जायचे, तेव्हा त्यांना खेड्यापाड्यांतल्या शेतकऱ्यांच्या समस्या, दारिद्र्य, सावकारशाही, अंधश्रद्धा, दुष्काळ, कर्जबाजारीपण अशा अनेक समस्यांचं खरंखुरं स्वरुप माहीत झालं. त्यामुळे त्यांचं संवेदनशील मन गोरगरिबांच्या प्रश्नांशी जोडलं गेलं. विषमतेबरोबरच जातीयवाद, उच्चनीचतेचं भयंकर स्वरुप त्यांना जाणवलं.
एकदा एका गाव कुलकर्ण्याने खंडेरावांना जेवायला बोलावलं होतं. त्यांच्यासोबत माधवरावही गेले. तिथं बागलांसाठी वेगळी पाने मांडलेली पाहून खंडेराव संतापून बाहेर पडले. माधवरावांनी शाळेमधे अस्पृश्य मुलांबरोबर असला पंक्तिभेद पाहिला होता. आता त्यांना स्वतःला अनुभव आल्याने जातिभेदाची अमानुषता त्यांच्या लक्षात आली.
हेही वाचाः डॉ. रत्नाकर पंडितः पत्रकारितेच्या समर्पित शिक्षकाचा सन्मान
माधवरावांचं शालेय शिक्षण कोल्हापुरात झालं. त्यांचे मामा बापूराव सावंत यांच्यामुळे त्यांना संगीत, चित्रकला, साहित्य यांची आवड निर्माण झाली. चित्रकलेकडे त्यांचा ओढा होता. मॅट्रीक पास झाल्यावर त्यांनी चित्रकलेच्या पुढच्या शिक्षणासाठी मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधे प्रवेश घेतला. शाहू महाराजांनी त्यांची मुंबईत स्वतःच्या बंगल्यावर राहण्याची सोय केली आणि त्यांना शिष्यवृत्तीही दिली.
जे जे स्कूलमधे त्यांनी नाव मिळवलं. पेटिंगचा कोर्सही पूर्ण केला. या वेळी माधवरावांना पाठवलेल्या पत्रात खंडेराव बागल लिहितात, ‘केवळ पैसा मिळविण्याचा विचार करू नको. इतरांशी मित्रत्वाने वाग. उत्तम वाणी आणि वर्तनाने मित्र जोड. कोणाचा द्वेष करू नकोस. क्षमाशीलता वाढव.’ यावरून खंडेरावांचे संस्कार दिसून येतात.
त्याच काळात म. गांधींच्या विचाराने प्रभावित होऊन माधवरावांनी उंची कपडे सोडून खादी वापरण्यास सुरवात केली. त्यांचे विचार अंतर्बाह्य बदलले. माधवरावांवर त्यांच्या वडलांचा फार मोठा प्रभाव पडला होता. तसंच शाहू महाराजांशी त्यांचा संबंध आला होता. महाराजांच्या विचारकार्याचा त्यांच्यावर अमीट ठसा उमटला. महाराजांच्या विचारकार्याचा वारसा पुढे चालवत त्यांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आयुष्यभर कार्य केलं.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समाजोपयोगी क्षेत्रात काम करण्यासाठी माधवराव पत्रकारितेकडे वळले. खंडेराव बागलांनी ‘हंटर’ हे पत्र सुरु केलं. माधवराव वडलांना ‘हंटर’च्या कामात मदत करू लागले. प्रुफं तपासणं, बातम्या लेखन, भाषांतर, स्फूट लेखन यांसारखी कामे करू लागले. यातूनच त्यांचा सामाजिक पिंड घडला. एक तत्त्वनिष्ठ, समाजशील, निर्भय, निर्भीड पत्रकार जन्मास आला.
‘हंटर’चं धोरण म. गांधी आणि काँग्रेसला अनुकूल होतं. त्यामुळे दरबारचा रोष त्यांच्यावर झाला. कोल्हापुरातल्या शाहू मिलमधले कामगारांचे प्रश्न त्यांनी ‘हंटर’मधून मांडले. कामगारांची बाजू घेऊन मिलमालकावर टीका केली. त्यामुळे ‘हंटर’ छापखान्याला मिलचं मिळणारं काम बंद झालं.
कोल्हापूर संस्थानात भाषणबंदी, सभाबंदीचा कायदा होता. त्यामुळे माधवराव संस्थानालगतच्या गावात भाषणं देऊ लागले. खादी, स्वदेशी, अस्पृश्यता निवारण, जातिभेद अशा विषयांवर बोलू लागले. इस्लामपूरच्या सभेत त्यांनी परदेशी कपड्यांची होळी केली. गांधीजींच्या धोरणांनुसार कोल्हापुरात मिरवणुका, प्रभातफेऱ्या काढण्यात येऊ लागल्या. त्यामुळे राजसत्तेशी त्यांचा संघर्ष निर्माण झाला.
१९३०मधे त्यांनी ‘हंटर’मधे लेख लिहून दरबारकडे मागणी केली की, सभाबंदी, भाषणबंदी मागं घ्यावी. वेठबिगार पद्धत बंद करावी. शिकारीसाठी राखीव कुरणांतल्या प्राण्यांमुळे शेतीचं नुकसान होतं. म्हणून त्यांचा बंदोबस्त करावा. फॅक्टरी ऍक्ट अंमलात आणावा. राज्यात जबाबदार शासनपद्धती असावी. मिरवणूक, प्रभातफेऱ्यांना परवानगी द्यावी. अशा लोकहिताच्या मागण्या केल्यामुळे दरबारचा प्रचंड रोष झाला.
दरबारने त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा जामीन मागितला. बागल पितापुत्रांनी तो न भरल्याने शेवटी १९३०मधे ‘हंटर’ बंद झालं. दरबारने त्यापुढे जाऊन माधवरावांना हद्दपार केलं. एकंदरीत ‘हंटर’ आणि माधवरावांचा आवाज कायमचाच बंद करण्याचा प्रयत्न दरबारने केला. माधवराव हद्दपारीच्या काळात पुणे, मुंबई, रेवदंडा वगैरे ठिकाणी राहिले. या काळात त्यांना माणसांची अनेक भली बुरी रूपे पाहायला मिळाली.
हेही वाचाः महात्मा फुले अमर आहेतः प्रबोधनकार ठाकरेंचा दुर्मीळ लेख
याच काळात त्यांनी कार्ल मार्क्स, लेनिन, लास्की, रसेल अशांचं लेखन वाचलं. समाजवादी विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यानंतर त्यांनी कोल्हापुरातल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळीत हिरिरीने भाग घेतला. आपल्या वाणी आणि लेखणीबरोबरच प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक सुधारणेच्या लढ्याचं नेतृत्व केलं. स्त्रीमुक्तीचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून केला. गोषापद्धतीतून त्यांनी आपल्या पत्नीस मुक्त केलं.
‘लग्न बंधन की तुरुंगवास’ हे पुस्तक लिहून स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडली. आंतरजातीय विवाह लावून जातिभेद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरातल्या रामाच्या पारावर आंतरजातीय विवाह लावून धर्मसंस्थेच्या प्रांगणातच भेदाभेदांना तिलांजली दिली. लग्नातली वारेमाप उधळपट्टी कमी करण्यासाठी ‘सामूहिक विवाह’पद्धतीचा पुरस्कार केला.
अस्पृश्यता निर्मूलनासाठी सहभोजने केली. त्यांच्या घरी येणाऱ्या अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या ताटाला ताट लावून ते जेवायचे. अस्पृश्यांच्या वर्गात जाऊन त्यांना संघटित आणि प्रेरित करायचे. जातिभेद, अस्पृश्यता निर्मूलन या विषयांवर गावोगावी व्याख्याने द्यायचे. अस्पृश्यांचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांना शासकीय वरिष्ठ पदं दिली पाहिजेत, असं त्यांचं मत होतं.
१९४१मधे त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संघाने नगरपालिकेच्या निवडणुकीत २५ पैकी २२ जागा जिंकल्या. त्या वेळी त्यांनी आनंदराव सोनवणे या अस्पृश्य पदवीधराची नगराध्यक्षपदी निवड केली. अस्पृश्यांना मंदिर प्रवेशासाठी लोक आंदोलन उभारलं. १९३२मधे त्यांनी वाघमारे या अस्पृश्य व्यक्तीबरोबर अंबाबाई मंदिरात प्रवेश केला.
नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरातही त्यांनी गंगाराम कांबळे आणि इतर अस्पृश्य सहकाऱ्यांना घेऊन मंदिर प्रवेश केला. त्यांच्या चळवळीची दखल घेऊन कोल्हापूर संस्थानने राज्यातली सर्व सार्वजनिक मंदिरं सर्व जातींच्या लोकांसाठी खुली केली. माणसामाणसांत भेदभाव करून अस्पृश्यांना दूर लोटणारी ही पद्धत बंद करण्यासाठी त्यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ केली.
हेही वाचाः पत्रकारितेच्या पलीकडचे पत्रकार बाळशास्त्री जांभेकर
वास्तविक माधवराव विचाराने पूर्णतः नास्तिक होते. ते एरवी मंदिरात जातही नसत. म. फुले आणि बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे आदर्श होते. बाबासाहेबांशी त्यांचे घनिष्ट संबंध होते. बाबासाहेबांच्या विचारांना आणि कार्याला त्यांनी सदोदित पाठिंबा दिला. कोल्हापुरातल्या प्रसिद्ध बिंदू चौकामधे त्यांनी म. फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकवर्गणीतून पुतळे उभारले.
९ डिसेंबर १९५० रोजी समस्त करवीरवासीय जनतेच्या वतीने उपस्थित श्रोत्यांपैकी एकाला जवळ बोलावून त्याच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण केलं. या प्रसंगी माधवराव म्हणाले, ‘या थोर सुधारकांबद्दलची कृतज्ञता म्हणून हे पुतळे उभारले असून, त्यापासून लोकांना सतत प्रेरणा मिळेल आणि जातिनिर्मूलन होऊन समतेसाठी मदत होईल.’ बाबासाहेबांच्या हयातीमधे उभारलेला हा पुतळा होता.
माधवराव हे सत्यशोधक समाजाचे कट्टर अनुयायी होते. त्यांचे वडील खंडेराव बागल हे शाहू सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते. बालपणापासून त्यांची सत्यशोधकीय वातावरणात घडण झाली होती. ‘हंटर’मधून त्यांनी सत्यशोधक समाजमताचा जोरदार प्रचार केला. तसंच सामाजिक, धार्मिक समतेचा आग्रह धरला.
१९३१मधे त्यांनी ‘सत्यशोधकांस इशारा’ ही लेखमाला लिहिली आणि सत्यशोधक समाजाने सामाजिक, धार्मिक गोष्टींबरोबरच आर्थिक आणि इतर क्षेत्रांकडेही लक्ष द्यावं, अशी भूमिका मांडली. १९३३मधे सत्यशोधक हीरक महोत्सव ग्रंथाचं संपादन केलं. हा ग्रंथ सत्यशोधक समाजाच्या इतिहासाचं महत्त्वपूर्ण साधन आहे. सत्यशोधक समाजाच्या प्रचार-प्रसारात ते सतत कार्यरत राहिले. १९५८मधे साताऱ्याला झालेल्या सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाचे ते उद्घाटक होते.
जिथं अन्याय असेल, तो दूर करण्याचा प्रयत्न सत्यशोधकांनी केला पाहिजे, असं मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केलं. सत्यशोधकांनी बदलत्या काळाबरोबर शेतकरी, कामगारांचे प्रश्न, शिक्षणप्रसार, अंधश्रद्धानिर्मूलन, अस्पृश्यता निर्मूलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन असे प्रश्न हाती घ्यावेत, असं आवाहन त्यांनी केलं. मार्क्सवाद हा विषमता नष्ट करण्याचा सर्वोत्तम मार्ग असून सत्यशोधक समाजाने मार्क्सवादी दृष्टिकोन स्वीकारावा, असं मत व्यक्त केलं.
हेही वाचाः महात्मा फुलेः जितके मोठे समाजसुधारक, तितकेच यशस्वी उद्योजकही
१९७२मधे मुंबईत झालेल्या सत्यशोधक समाज परिषदेमधे त्यांनी समाजातली धार्मिकता, दांभिकता, देवदेवता, पूजा-अर्चा, अंधश्रद्धा वगैरेंवर कठोर टीका केली. त्यामुळे वादळ उठलं. बागलांच्या मते, सत्यशोधनाने राष्ट्रीय वृत्ती, अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धांचं निर्मूलन होऊ शकतं. स्वर्ग, नरक, पूर्वजन्म, पुनर्जन्म, देव धर्म या आधाररहित आणि काल्पनिक गोष्टी आहेत.
कोणी त्या पाहिलेल्या नाहीत. आपण जे पाहतो, ते सत्य होय. पुरोहित, मुल्लामौलवी, पाद्री हे स्वार्थी लोक असून देव म्हणजे त्यांच्या उपजीविकेचं साधन आहे. देवांच्या नावावर ते गरिबांना लुटतायत. सामान्य माणसाच्या दयनीय अवस्थेस देव ही संकल्पना कारणीभूत आहे. मानवता हाच खरा धर्म आहे. प्रत्येकाने मानवी मूल्यांचं जतन करावं आणि बंधुत्व वाढवावं.
माधवरांवाचे विचार काळाच्या फार पुढे होते. ते एक बंडखोर सुधारक होते. म. फुल्यांचे सच्चे अनुयायी होते. त्यांचे प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी विचार, रूढीपरंपराग्रस्त मानसिकतेच्या लोकांना रूचले, पचले नाहीत. त्यांनी बागलांना प्रखर विरोध केला. अनेकदा भाई एकाकी पडले, पण ते डगमगले नाहीत.
आपल्याला पटलेलं सत्य निर्भयपणे सांगत हा सत्यशोधक अखेरपर्यंत अचल राहिला. विचारसंगर आणि प्रबोधनाचा जागर म्हणजे माधवराव बागल. त्यांच्या तत्त्वाआड येणाऱ्या कोणाचाही मुलाहिजा त्यांनी ठेवला नाही. मग ते दत्ता बाळ असोत की, इतर कुणी. विसाव्या शतकात खऱ्या अर्थाने सत्यशोधक विचार तेवत ठेवण्याचं काम भाई बागलांनी केलं.
कामगार लढ्यामधेही बागलांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी कामगार संघटना उभारून मोठा संघर्ष उभा केला. त्यासाठी खूप त्रास सहन केला. शाहू मिलमधल्या कामगारांचं अत्यल्प वेतन, त्यांच्या समस्या, प्रशासनाचे जुलूम, दडपशाही यांविरुद्ध आवाज उठविला. कामगार संघटना बांधून १९४०मधे वीस दिवसांचा संप केला आणि फॅक्टरी ऍक्ट लागू करण्याची मागणी केली. पण सरकारने संप मोडून काढला.
१ मार्च १९४२ रोजी माधवरावांच्या अध्यक्षतेखाली शाहू मिल कामगार संघाची स्थापना करण्यात आली. कामगारांच्या मागण्यांची दखल घेणं सरकारला भाग पडलं. कोल्हापुरातल्या वेगवेगळ्या छोट्यामोठ्या उद्योगधंद्यात असणाऱ्या कामगारांना एकत्र करून त्यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर संस्थान राष्ट्रीय कामगार संघ १९४४मधे स्थापन करण्यात आला.
१९४६मधे शाहू मिलमधल्या कामगारांनी त्यांच्या नेतृत्वाखाली संप केला. संस्थानबाहेरही कामगारांच्या संघटना बांधून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी बागलांनी लढे उभारले. दक्षिण संस्थान कामगार समितीचे ते अध्यक्ष होते.
हेही वाचाः प्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत
प्रजापरिषदेची चळवळ हे बागलांच्या आयुष्यातलं सर्वांत मोठं कार्य. कोल्हापूर संस्थानातली भरमसाठ सारावाढ, शिकार आणि रेसकोर्ससारख्या चैनीच्या गोष्टी, वेठबिगार, कर, गुप्तपट्ट्या, शिकारीसाठी राखून ठेवलेल्या कुरणातल्या प्राण्यांपासून पिकांचं होणारं प्रचंड नुकसान यांसारख्या गोष्टींमुळे प्रजेमधे असंतोष निर्माण झाला होता. माधवरावांनी त्याला वाचा फोडली. दरबारकडे लोकहिताच्या मागण्या केल्या. पण त्याची दखल घेतली गेली नाही.
संस्थानातल्या भाषणबंदी, सभाबंदीमुळे त्यांनी कोल्हापूर संस्थानाबाहेर जाहीर सभा घेऊन संस्थानातल्या अन्यायाला वाचा फोडली आणि लोकजागृती केली. त्यांची लोकप्रियता वाढत गेली. लोकांना मूलभूत अधिकार, जबाबदार राज्यपद्धती, भाषणस्वातंत्र्य, सारावाढ रद्द अशा प्रमुख मागण्या त्यांनी दरबारकडे केल्या आणि या मागण्यांच्या पूर्ततेसाठी १९३८मधे दहा हजार शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा काढला.
सभेनंतर बागलांना अटक करण्यात आली. त्या नंतर शेतकऱ्यांनी दुसरा प्रचंड मोर्चा काढून राजसत्तेला लोकशक्तीचं दर्शन घडवलं. १९३९मधे त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्या नंतर माधवराव बागल आणि रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी संस्थानभर झंझावाती दौरे काढून प्रचंड जनजागृती केली.
६ फेब्रुवारी १९३९ रोजी माधवरावांच्या अध्यक्षतेखाली जयसिंगपूर येथे प्रजापरिषदेची स्थापना करण्यात आली. रत्नाप्पाण्णा कुंभार यांची सचिवपदी निवड करण्यात आली. या सभेत माधवराव बोलत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना दोषी ठरवून दोन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या विरुद्ध लोकांनी तीन दिवस हरताळ पाळला. तुरुंगात त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला.
१९४०मधे राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची सुटका झाली. त्या नंतर त्यांनी संस्थानभर दौरे काढून प्रजापरिषदेचं बळ वाढवलं. १९४१मधे स्थानिक स्वराज्य संघ स्थापन करून कोल्हापूर नगरपालिकेची निवडणूक लढविली आणि २५ पैकी २२ जागा जिंकल्या. तेव्हापासून १९५२पर्यंत ते सिवील बोर्डाचे अध्यक्ष होते. १९४२मधे प्रजापरिषदेचं भव्य अधिवेशन कोल्हापुरात झालं. मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर हे स्वागताध्यक्ष होते.
प्रजापरिषदेने कोल्हापूर संस्थानसाठी खेर यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन केली. या समितीने सादर केलेली घटना दरबारने स्वीकारली नाही. ८ ऑगस्ट १९४२च्या मुंबईतल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला माधवराव आणि रत्नाप्पाण्णा हजर होते. कोल्हापुरात परतल्यावर त्यांनी जाहीर सभा घेऊन स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्याचं सर्वांना आवाहन केलं. याबद्दल माधवरावांना अटक करण्यात आली.
दक्षिण भारतातल्या संस्थानांमधे प्रजापरिषदेची चळवळ सुरु करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण संस्थान प्रजापरिषदेची स्थापना १९४६मधे करण्यात आली. कोल्हापूर दरबारने प्रजापरिषदेची जबाबदार राज्यपद्धती देण्याची मागणी मान्य केली. १५ नोव्हेंबर १९४७ रोजी कोल्हापूर संस्थानचे मुख्यमंत्री म्हणून बागलांनी शपथ घेतली. पण अंतर्गत मतभेदांमुळे ४८ तासांच्या आत त्यांनी राजीनामा दिला. प्रजापरिषदेत फूट पडली.
हेही वाचाः ग्लोबल लोकल मेळ घालायचा असेल तर महात्मा फुले हवेत
माधवरावांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनामधे आघाडीवर राहून नेतृत्व केलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन करण्यात आली. यामधे पुरुषांबरोबर स्त्रियांनीही भाग घेतला.
बेळगाव सीमालढ्यात त्यांना अटक आणि पाच महिन्यांची कैद झाली. सीमाभाग महाराष्ट्रात यावा, यासाठी ते अखेरपर्यंत प्रयत्नरत होते. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी काही काळ शेतकरी कामगार पक्षात काम केलं. पण स्वातंत्र्योत्तर काळातील एकंदर राजकारण त्यांच्या तत्त्वनिष्ठ प्रकृतीला मानवलं नाही.
माधवरावांचं वाचनलेखन प्रचंड होतं. त्यांचं स्वतःचं समृद्ध ग्रंथालय होतं. त्यांनी जवळपास ५५ पुस्तकं लिहिली आहेत. ‘हंटर’ आणि ‘अखंड भारत’ या साप्ताहिकांचं संपादन केलं. वयाच्या ८१व्या वर्षी ‘सामाजिक विचारमंथन’ हे शेवटचं पुस्तक लिहिलं. वाचन, लेखन, प्रबोधन हाच त्यांचा श्वास होता.
वैचारिक लेखन, लघुकथा, व्यक्तिचित्र, आत्मचरित्र, समीक्षा अशा विविध वाङ्मयप्रकारांमधून त्यांनी मौलिक लेखन केलंय. त्यांच्या आत्मचरित्रामधून कोल्हापूरचा सामाजिक राजकीय इतिहास प्रकटतो. ‘जीवनप्रवाह’, ‘जीवनसंग्राम’, ‘बहुजन समाज शिल्पकार’, ‘शाहू महाराजांच्या आठवणी’ वगैरे त्यांचे ग्रंथ अत्यंत महत्त्वाचे आहेत.
माधवराव हे अव्वल दर्जाचे कलावंत होते. त्यांची चित्रं आणि कलाकृती गाजल्या आहेत. माधवरावांच्या समर्पित समाजकार्याची दखल घेऊन भारत सरकारने १९७२मधे त्यांना ‘पद्मभूषण’ हा सन्मान देऊन त्यांचा सन्मान केला. ‘दलितमित्र’, ‘डी.लिट.’ अशा पदव्यांनी त्यांचा गौरव करण्यात आला.
६ मार्च १९८६ रोजी वयाच्या एक्याण्णव्या वर्षी त्यांचं निधन झालं. माधवरावांनी चाळीस वर्षांहून अधिक काळ निःस्पृहपणे समाजकार्य केलं. कुटुंबाकडे दुर्लक्ष करून व्यक्तिगत फायद्यातोट्याचा कोणताही विचार न करता समाजाचा प्रपंच केला. समाज हेच त्यांचं कुटुंब होतं. विसाव्या शतकातला म. फुल्यांचा सच्चा वारसदार म्हणून त्यांचं कार्य अधोरेखित करावं लागतं.
हेही वाचाः
'हरी नरकेंच्या भाषणांवर बंदी आणा'
फुले, आंबेडकरांच्या रांगड्या वारशाचा अपमान
थोरांचे अज्ञात पैलूः आधुनिक महाराष्ट्रेतिहासाचा नवा अन्वयार्थ
जोतिबाच्या नावानं चांगभलं ही संपूर्ण मानवजातीच्या भल्याची मागणी