व्यक्तीरेखांचे कपडे ठरवायचे असतील तर भानूताई स्वतः गावोगावी फिरायच्या. ‘लगान’ सिनेमासाठी कच्छ प्रांतातल्या अनेक भागात जाऊन त्यांनी कलर पॅलेट बनवला होता. अभिनेत्रींना ग्लॅमरस बनवण्यासाठी काय वेशभूषा करायची हे त्यांना माहीत होतं तसंच वास्तवदर्शी सिनेमांसाठी काय लागेल याचीही त्यांना जाण होती. असं समतोल साधता येणारं ज्ञान खूप कमी जणांकडे पहायला मिळतं.
विख्यात वेशभूषाकार भानू अथैय्या यांचं गुरुवारी १५ ऑक्टोबरला निधन झालं. हिंदी सिनेमातील व्यक्तिरेखांचा चेहरामोहरा आपल्या वेशभूषेद्वारे बदलण्यात भानू अथैय्या यांचा मोठा वाटा होता. गुरुदत्त यांच्यापासून ते अलीकडच्या काळातले विख्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्याबरोबर त्यांनी काही उत्कृष्ट कलाकृती दिल्या. ‘लगान’ आणि ‘स्वदेस’ या दोन सिनेमाच्या निमित्तानं आशुतोष गोवारीकर यांना भानूताईंचं काम अगदी जवळून पाहता आलं. याबद्दल श्री. गोवारीकर यांनी आठवणींना दिलेला उजाळा.
भानूताईंचं निधन हा जसा आपल्या भारतीय सिनेमासृष्टीसाठी मोठा धक्का आहे. तसंच माझ्यासाठीही ते वैयक्तिकदृष्ट्या खूप मोठं नुकसान आहे. कारण मी त्यांच्यासोबत ‘लगान’ आणि ‘स्वदेस’ हे दोनच सिनेमे केले असले तरी त्यावेळी मला त्यांचा जो अनुभव आला, तो समृद्ध करणारा ठरला. भानूताईंबरोबर प्रत्यक्ष काम करण्यापूर्वीच मी त्यांच्याबद्दल खूप काही ऐकलेलं होतं.
१९६० आणि १९७० च्या दशकातल्या काही हिंदी चित्रपटांमधल्या अभिनेत्र्यांचे भानूताईंनी केलेले कॉश्च्युम्स कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहणारे होते. वहिदा रेहमानजी, मुमताजजी, वैजयंतीमालाजी यांच्या वेशभूषा विशेषकरून माझ्या स्मरणात होत्या. त्याखेरीज अनेकदा माझ्या आई-वडिलांकडून भानू अथैय्याजींबद्दल सतत काही ना काहीतरी ऐकायला मिळत असे.
हेही वाचा : भानू अथैय्या : भारताला पहिला ऑस्कर जिंकून देणारी कोल्हापूरची मुलगी
‘गांधी’ सिनेमा पाहिल्यानंतर मी त्यांच्या कामानं प्रचंड प्रभावित झालो होतो. तेव्हाच माझ्या मनानं ठरवलं होतं की भविष्यात आपल्याही वाट्याला अशी एखादी वेगळी कलाकृती आली तर त्याचं काम भानूताईंच्या हातून व्हावं. तशी मला संधी मिळाली ती ‘लगान’ सिनेमामुळे. या चित्रपटाचं विश्व, त्यातील पात्रं जेव्हा माझ्याकडून कागदावर उतरली जात होती, तेव्हाच मला वाटायला लागलं होतं की त्यांना जिवंत करण्याचं काम भानूताईंच्याच हातून हवं. त्यामुळे ‘लगान’साठी माझी पहिली पसंती भानूताईंच्याच नावाला होती.
त्यावेळेला भानूताईंनी आपलं काम थोडं कमी केलं असल्याचं माझ्या कानावर आलं होतं. तरीदेखील मी त्यांना भेटायचं ठरवलं. ती आमची पहिली भेट. या भेटीत मी त्यांना ‘लगान’चं पूर्ण स्क्रीप्ट ऐकवलं. ते त्यांना खूप आवडलं. त्यांनी लगेचच सांगून टाकलं की, ‘ही गोष्ट अशी आहे की जिच्यावर मला काम करायला आवडेल.’ ते ऐकून मला खूप आनंद झाला. कारण भानूताईंबद्दल इतकी वर्ष माझ्या मनात आदर असल्यामुळे त्या आपल्या कामाला दाद देतात, ही गोष्टच मुळात खूप सुखावणारी होती.
त्यामुळेच ‘लगान’ची जी टीम पुढे निर्मिली गेली, त्यातल्या पहिल्या काही सदस्यांमधे भानूताईंचा समावेश होता. माझ्या ‘स्क्रीप्ट’मधल्या कथानकाचा काळ हा १८९०चा होता. ही ‘स्क्रीप्ट’ ऐकल्यानंतर भानूताई मला म्हणाल्या, ‘तू ज्या वर्षामधे ही कथा मांडतोयस ती त्या वर्षी न मांडता आणखी तीन वर्षांनी पुढं ढकलू शकतोस का? १९८०च्या ऐवजी तू १८९३ मधे ही कथा मांडलीस तर...’ त्यावर मी लगेच त्यांना म्हटलं, ‘मला काहीच अडचण नाही कथानक पुढं न्यायला. पण असं करण्यामागचं कारण जाणून घेण्याचं कुतूहल नक्कीच मला आहे.’
माझ्या शंकेचं निरसन करताना भानूताई पुन्हा म्हणाल्या, ‘१९८० मधे इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया ही दुखवट्यात होती. तिच्या पतीचं त्या वर्षी निधन झालं होतं. त्यामुळे राणी व्हिक्टोरियासह संपूर्ण इंग्लंड देश दुःखात होता. या दुखवट्याचं प्रतीक म्हणून या देशातली सगळी स्त्री-पुरुष मंडळी या काळात काळे, तपकिरी, राखाडी रंगाचे कपडे घातल होते. १९८३ मधे हा दुखवटा संपुष्टात आला. त्यामुळे महिलांच्या वेशभूषांचे रंग बदलले. ते तजेलदार झाले. असे कपडे आपण दाखवले तर ते त्या व्यक्तिरेखांवर उठून दिसतील.’ ते ऐकून मी खूप आश्चर्यचकीत झालो.
‘लगान’चं ‘स्क्रीप्ट’ ऐकवल्यानंतर लगेचच भानूताईंनी अशाप्रकारची सूचना मला केली होती. ‘मी थोडा रीसर्च करून तुला सांगते,’ असं त्या मला म्हणाल्या नाहीत. मी ज्या काळातला सिनेमा बनवण्याचा विचार करत होतो, त्या कालखंडाचा त्यांनी आधीच अभ्यास केला होता. यातूनच त्या किती ज्ञानवंत होत्या, याची मला प्रत्यक्ष कल्पना आली.
‘लगान’ची ‘स्क्रीप्ट’ ऐकवण्यापूर्वी मी त्यांच्याकडे त्यांच्या कलेचा एक चाहता म्हणून गेलो होतो. परंतु, भानूताईंनी मला ही जी काही सूचना केली, ती ऐकल्यानंतर माझं ठाम मत झालं की भानूताई आपल्या वेशभूषेमधून व्यक्तिरेखांना जो काही उठाव आणणार आहेत, त्याचा लाभ या सिनेमाच्या ‘लुक’ला मिळणार आहे. पुढे अगदी तसंच झालं.
काही दिवसांनी मग भानूताई इंग्लंडला गेल्या. तिथं जाऊन त्यांनी सिनेमामधील व्यक्तिरेखांचे कपडे तयार केले. कच्छ प्रांतातल्या वेगवेगळ्या गावांना त्यांनी भेटी दिल्या. तिथं राहणार्या महिलांच्या कपड्यांची बांधणी पाहिली. अशा प्रकारे त्यांनी या सिनेमाचा एक ‘कलर पॅलेट’ तयार केला. भानूताईंचं हे सगळं काम पाहत असताना त्यांच्याबद्दलचा माझा आदर प्रत्येक दिवसागणिक वाढत होता. ‘लगान’ खूप चांगला बनण्यात भानूताईंचं योगदान खूप मोठं होतं.
हेही वाचा : दीपिकाच्या मौनातही जय हिंदचा नारा घुमतो!
पुढं हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्याला चांगलं व्यावसायिक यश मिळालं. ऑस्कर पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट विदेशी सिनेमांच्या गटामधे ‘लगान’ला नामांकन मिळालं. तोपर्यंत ऑस्कर पुरस्कार मिळवणार्याट एकमेव भारतीय म्हणून भानूताईंचा गौरव केला जायचा. ही गोष्ट लक्षात घेऊन मी एकदा भानूताईंना गमतीत म्हणालो होतो, ‘भानूताई, तुमचं ऑस्कर लक आमच्यासोबत असल्यामुळे ‘लगान’लादेखील एक नामांकन मिळालं आहे. पाहूया, आता पुढं काय होतं ते.’
भानूताई मूळच्या कोल्हापूरच्या. आम्ही गोवारीकर कुटुंबीयही कोल्हापूरचे. त्याचा आम्हा दोघांनाही खूप अभिमान होता. भारतीयांसाठी पहिला ऑस्कर पुरस्कार आणि पहिलं ऑस्कर नामांकन हे एक प्रकारे कोल्हापूरच्याच वाट्याला आलं होतं. आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ‘लगान’साठी मला आणि भानूताईंना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
‘लगान’च्या यशानंतर मी भानूताईंबरोबर ‘स्वदेस’ हा सिनेमा केला. या दोन्ही सिनेमांमधे खूपच फरक होता. ‘लगान’ हा पीरियड सिनेमा होता, तर ‘स्वदेस’ आजच्या काळातला आणि ग्रामीण पार्श्वभूमी असलेला सिनेमा होता. ‘स्वदेस’च्या कथानकालाही खूप मोठी रेंज होता. मोहन भार्गव अमेरिकेतून भारतात परतलेला असतो. त्यामुळे आम्हांला एकाच वेळी त्याचं अमेरिकेतलं विश्व आणि भारतातलं विश्व दाखवायचं होतं. अमेरिकेतले त्याचे कपडे वेगळे होते, गावातले कपडे वेगळे होते. तसंच फकीर, रामलीलाचं गाणंही होतं.
आमच्यापुढचं सर्वात मोठं आव्हान होतं ते शाहरुख खानला ‘नॉनग्लॅमरस’ करणं. एकीकडे आम्ही त्याला हाफ स्लीवचे शर्ट दिले. पण ते देताना त्याचं थोडं स्टारडम राहिलं पाहिजे, तो चांगलाही दिसला पाहिजे याची काळजी घेतली गेली. या सगळ्याचा बॅलन्स सांभाळताना भानूताईंचं ज्ञान कामी आलं. हे ज्ञान खूप कमी जणांकडे पाहायला मिळतं.
त्या एकमेव व्यक्ती अशा आहेत की, त्यांना माहीत होतं की मुख्य प्रवाहातील व्यावसायिक सिनेमांमधल्या अभिनेत्रींना कशाप्रकारची वेशभूषा असावी. त्यांच्या अभिनेत्रींच्या कपड्यांमधे एक वेगळ्याच पद्धतीचा उठावदारपणा आपल्याला आढळतो. दुसरीकडे वास्तवदर्शी सिनेमांमधे त्या अचूकपणे वास्तविकता मांडायच्या. ‘गांधी’, ‘लगान’, ‘स्वदेस’ या सिनेमांमधे या दोन टोकाच्या गोष्टी एकाचवेळी पाहायला मिळतात. ही कला त्यांनी प्रयत्नपूर्वक आत्मसात केली होती.
हेही वाचा : तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?
एक व्यक्ती म्हणून त्या कमाल होत्या. अत्यंत मृदू बोलणं. कधीही त्यांचा आवाज कोणावर चढल्याचं माझ्या पाहण्यात आलेलं नाही. आपल्या सहाकाऱ्यांनाही त्या कधी मोठ्या आवाजात रागावायच्या नाहीत. ‘लगान’च्या शूटिंगवेळी त्या मुंबईवरून भूजमधल्या आमच्या लोकेशनपर्यंत प्रवास करायच्या. प्रत्येक कलाकाराला आपण केलेले कपडे नीट येतात की नाहीत, हे त्या स्वतः पाहायच्या. कलाकारांच्या वेशभूषेबाबत काहीही समस्या असल्या तरी त्या त्याचं निराकरण करायच्या. मी हा कट बनवलेला आहे, तोच तुम्हांला आता घालावा लागेल, अशी भाषा त्यांच्या तोंडी कधीच मी ऐकली नाही.
हाच अनुभव मला ‘स्वदेस’च्या मेकिंगदरम्यानही आला. भारतामधली पहिली अशी व्यक्ती की जिनं ऑस्कर पुरस्कार मिळवलेला आहे, त्याशिवाय आपल्याकडच्या सर्व नामांकित अभिनेत्र्या त्यांना मानतात, अशी व्यक्ती एवढी जमिनीवर असणं ही खूप आश्चर्यचकीत करणारी गोष्ट आहे. ‘लगान’ पाहिल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला होता. आपण केलेले कपडे ज्या पद्धतीनं पडद्यावर आले, ते खूप त्यांना आवडलं होतं. त्याबद्दल त्यांनी माझं आणि आमच्या सिनेमॅटोग्राफरचंही कौतुक केलं होतं.
वाईट लायटिंगमुळे एखादी चांगली वेशभूषा वाईट दिसू शकते. तसेच एखादा शॉट चुकीचा लावला असेल तर संबंधित व्यक्तिरेखांवरचे कपडे त्यांना शोभून दिसत नाहीत. म्हणूनच त्यांनी सिनेमॅटोग्राफरचंही कौतुक केलं. ‘लगान’मधल्या एलिझाबेथचं तसेच इतर ब्रिटिश व्यक्तिरेखांचं सादरीकरण त्यांना खूप आवडलं होतं.
थोडक्यात माझा त्यांच्याबरोबरचा बाँड खूपच छान होता. त्यांच्याबरोबर शूटिंगच्या निमित्तानं घालवलेला प्रत्येक दिवस हा नवीन काहीतरी शिकवण देणारा होता. ‘स्वदेस’नंतर काही काळानं मी ‘जोधा अकबर’वर काम सुरू केलं तेव्हा भानूताई खूपच थकल्या होत्या. या चित्रपटाचा पसारा खूप मोठा होता. शारीरिकदृष्ट्या खूप दगदग करायला लावणारा हा सिनेमा होता. त्यामुळे त्या सिनेमासाठी आम्ही एकत्र काम नाही करू शकलो
भानूताईंनी साधारण दहा वर्षांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास मी उपस्थित होतो. ती आमची प्रत्यक्ष झालेली अखेरची भेट. त्यानंतर आमचं अधूनमधून फोनवर बोलणं व्हायचं. परंतु, त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढे तेही बोलणं खूप कमी झालं. भानूताईंच्या कन्या राधिकाजी यांच्याकडून पुढे मला त्यांच्या प्रकृतीबद्दल समजत असे. आता त्या प्रत्यक्षात आपल्यात नाहीत, याची आता सवय करून घ्यावी लागणार आहे. त्यांची उणीव नेहमीच मला जाणवेल.
हेही वाचा :
सुशांतचा तपास आणि आपण सगळे त्यात नापास!
सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?
(शब्दांकन - मंदार जोशी)