देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई… हे गदिमांनी लिहून कैक वर्ष उलटली. पण देवळांच्याच जीवावर ज्यांचं राजकारण उभं आहे, त्यांना हे कसं समजवणार? आता खरा भीमाशंकर महाराष्ट्रात नसून, आसाममधे आहे, असा वाद आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंत सरमा यांनी उकरून काढलाय. त्यामुळे आता लोकांच्या रोजीरोटीपेक्षा देवाची पेटी महत्त्वाची ठरलीय.
देशातली महागाई वाढतेय, छोटे व्यापारी अडचणीत आहेत, शेतकरी हवालदिल झालाय, तरुणांना रोजगार नाही, श्रीमंत अधिक श्रीमंत होतोय आणि गरीब देशोधडीला लागतोय… हे सगळं महत्त्वाचं नसून खरा भीमाशंकर हा महाराष्ट्रात आहे की आसाममधे हे जास्त महत्त्वाचं ठरतं आहे. अयोध्येतलं राममंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर याला प्राधान्य देऊन आपण नक्की काय सिद्ध करतोय? असे प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह आहे.
तर, सध्याचा हॉट टॉपिक हा आहे की, बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातलं भीमाशंकर आहे की असाममधलं पामही इथलं भीमाशंकर आहे, यावर सध्या चर्चेचं गुऱ्हाळ तेजीत आहे. त्यासाठी संस्कृतमधल्या श्लोकांचे संदर्भ दिले जातायत, तीर्थयात्रांचे दाखले दाखवले जातायत. हे सारं सारं कशासाठी, तर ज्योतिर्लिंग म्हणून मिळणारे फायदे आपल्या राज्याच्या पदरात पडावे म्हणून. पण हे फक्त एवढ्यापुरतंच मर्यादीत आहे का? या प्रश्नात खरी गोम आहे.
१४ फेब्रुवारीचा वॅलेंटाइन डे हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही, म्हणून आधी गायीला मिठ्या मारण्याचा दिवस म्हणून ठरला होता. पण सर्वच बाजूंनी त्यावर तुफान टीका झाल्यानंतर गायीला मिठ्या मारण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्याच दिवशी सकाळी देशातल्या अनेक पेपरच्या पहिल्या पानावार आसाम सरकारच्या पर्यटन खात्याची जाहीरात प्रसिद्ध झाली.
या जाहिरातीत एका बाजुला जी २० चा लोगो आणि दुसऱ्या बाजूला आसाम पर्यटन खात्याचा लोगो आणि मधे अशोकस्तंभ छापून जाहीरात आली की, भारतातल्या सहाव्या ज्योतिर्लिंग असलेल्या कामरूप इथल्या डाकिनी डोंगरात आपलं स्वागत आहे. ही जाहीरात पाहून महाराष्ट्रात आवाज सुरू झाला. आतापर्यंत सर्वच ठिकाणी सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातलं भीमाशंकर होतं. आसाममधेही भीमाशंकर आहे, हे तोपर्यंत अनेकांना माहितही नव्हतं.
आता ज्योतिर्लिंगावर आसामने दावा केला म्हणजे उद्यापासून लगेच महाराष्ट्रातल्या भीमांशकरची गर्दी कमी होणार नव्हती. तसंच आता खरं ज्योतिर्लिंग नक्की कुठेय, म्हणून कैलासावरून शंकाराचा रिपोर्टही मागवता येणार नाहीए. त्यामुळे आता या दाव्यामुळे नक्की काय बदलणार आहे, हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. देशातलं सांस्कृतिक राजकारण बदलून स्वार्थाचं गणित साधण्याचा हा डाव आहे, हे नीट समजून घ्यायला हवंय.
हेही वाचा: राजकारणाची भाषा आणि भाषेचं राजकारण
सहाव्या ज्योतिर्लिंगावर आसामने केलेल्या दाव्याकडे महाराष्ट्रातल्या सत्तातरांचा संदर्भ देऊनही टीका झाली. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या वेळी सगळ्या बंडखोर आमदारांनी आसाममधे आश्रय घेतला. तो तिथल्या राजकीय समर्थनाशिवाय शक्यच नाही. त्यावेळी गुवाहटीतल्या कामाख्या मंदिरात झालेल्या पूजाअर्चनांचीही चर्चा झाली. आता त्याच आसामने ज्योतिर्लिंगावर दावा केल्यानं, यामागे काही राजकीय मिलीभगत आहे का? अशी शंकाही व्यक्त केली जातेय.
एकूण १२ ज्योतिर्लिंगाच्या यादीत आज महाराष्ट्रात नक्की किती असा प्रश्न आपण शोधला तर तीन किंवा पाच असं उत्तर मिळतं. औरंगाबादजवळचं घृष्णेश्वर, नाशिकजवळचं त्र्यंबकेश्वर आणि पुण्याजवळचं भीमाशंकर ही तीन या यादीत नक्की असतात. पण परळी वैजनाथ आणि औंढ्या नागनाथ ही ज्योतिर्लिंगं महाराष्ट्रात असली तरी, काहींच्या मते झारखंडमधलं वैजनाथ आणि गुजरामधलं नागेश्वर ही ज्योतिर्लिंगं आहेत.
याचाच अर्थ महाराष्ट्रातल्या दोन ज्योतिर्लिंगांबद्दल आधीच वाद असताना आता त्यातल्या आणखी एका ज्योतिर्लिंगावर आसामनं दावा ठोकलाय. आता एक देऊळ आणि त्याच्या भोवतीचं अर्थकारण ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही. पण नेमकं आसाममधे बंडखोरी करून गेलेले नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात आणि वर्ष उलटायच्या आता इथल्या ज्योतिर्लिंगावर दावा होतो, यात काहीच नातं नाही हे मान्य करणं अनेकांना अवघड जातंय.
शिवमहापुराण हा ग्रंथ शिवभक्तांमधे लोकप्रिय असा ग्रंथ आहे. या ग्रंथात द्वादश ज्योतिर्लिंगांसंदर्भातला लोकप्रिय श्लोक आहे. सौराष्ट्रे सोमनाथं अशी सुरवात असलेल्या या श्लोकात डाकिन्यां भीमाशंकरम् असा उल्लेख आहे. आता महाराष्ट्रात डाकिन्या नावाचा पर्वतच नाही असं आासामचं म्हणणं आहे. हा डाकिनी भाग असाममधे असून खरं भीमाशंकर आसाममधेच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ त्यांनी शिवपुराणातल्या रावणाची कथाही प्रसिद्ध केलीय. एवढंच नाही तर या डाकिनी पर्वतरांगांमधे कसं यायचं याचा नकाशा आणि सोबत महाशिवरात्रीच्या उत्सवाला येण्याचं आग्रहाचं आमंत्रणही त्यांनी प्रसिद्ध केलंय. सोबत हल्ली देवापेक्षाही राजकारण्यांचे फोटो महत्त्वाचे असतात, तसंच मुख्यमंत्री हिमंत सर्मा यांचा हसरा फोटोही छापलाय. आता या राजकीय धर्माकडे कसं पाहायचं ते लोकांनीच ठरवायचं आहे.
एक ज्योतिर्लिंग राज्यात आलं की त्यासोबत पर्यटन येणार. पर्यटन आलं की हॉटेलांपासून रिक्षावाल्यापर्यंतची अर्थव्यवस्था चालणार. त्यासोबत आर्थिक हितसंबंध, राजकीय मक्तेदारी आणि मतांचं राजकारण हेही जोडीने आलंच. त्यामुळे महाराष्ट्रात तीन निर्विवाद ज्योतिर्लिंगं असताना एक असाममधे घेतलं तर काय बिघडलं, असा राजकीय विचार तर यामागे नाही ना? हे कुणालाच कधी सांगितलं जाणार नाही.
हेही वाचा: नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला का विरोध केला पाहिजे?
असामच्या या दाव्याबद्दल महाराष्ट्रात पहिली प्रतिक्रिया उमटली ती विरोधकांकडूनच. राज्यातले उद्योगधंदे राज्याबाहेर चालले तसंच इथली देवस्थानंही राज्याबाहेर पाठवली जातायत का? इथपासून ते आसाममधे खोक्याच्या राजकारणासोबत आणखी काही ठरलंय का? इथपर्यंत टीका करण्यात आली. पण महाराष्ट्र सरकारनं किंवा पर्यटन विभागानं याबद्दल अधिकृतरित्या काहीही प्रसिद्ध केलेलं नाही.
आता महाराष्ट्रातल्या भीमाशंकर मंदिराचे मुख्य पुजारी असलेले मधुकरशास्त्री गवांदे यांनी सर्व माध्यमांना सांगितलंय की, 'भीमा नदी काठी वसलेलं ज्योर्तिलिंग हे भीमाशंकर म्हणून अनादी काळापासून प्रसिद्ध आहे. फक्त भीमाशंकर नावाने मंदिर आहे म्ह्णून आसाममधे ज्योर्तिलिंग होवू शकत नाही. देशातल्या इतर ज्योर्तिलिंगामधेही असेच वाद निर्माण केले गेलेत. आसाम सरकारच्या म्हणण्यावर कोणीही विश्वास ठेवू नका.'
आता मुद्दा हाच की, मंदिरातले पुजारी असो किंवा विरोधी पक्षनेते हे आपापल्या पद्धतीने आपली भूमिका मांडणारच. पण राज्यातल्या लोकांच्या श्रद्धेची आणि धारणांची पुनरुक्ती राज्य सरकार करणार की राजकीय हितसंबंध सांभाळणार? हे पाहणं राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं आहे. एक ज्योतिर्लिंग जाणं हा मुद्दा नसून राज्याची भूमिका नक्की कोणाला सांभाळणार? हा अडचणीचा मुद्दा ठरू शकतो.
आज पर्यंटन हा आर्थिक घडामोडीमधला मोठा भाग आहे. धार्मिक पर्यटन हा तर त्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. देवळाचं अर्थकारण आणि त्यामुळे राज्याला होणारा फायदा हा खूप मोठा असतो. त्यामुळे आसामच्या या दाव्याने पर्यटनाच्या यादीतलं एक महत्त्वाचं स्थान कमकुवत होण्याची शक्यता आहे. आज राज्यात एकेका तीर्थक्षेत्रामुळे त्या त्या शहराचं अर्थकारण चाललंय अशी अनेक शहरं आहेत.
भीमाशंकरही त्यातलं एक महत्त्वाचं ठिकाण आहे. तिथली वार्षिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. या स्थानाला असलेल्या ज्योतिर्लिंगाच्या महत्त्वामुळे तिथं येणारे देशभरातले आणि परदेशातलेही भाविक आहेत. उद्या हे स्थान आसाममधे गेलं तर ही गर्दी आसाममधे जाईल किंवा संभ्रमामुळे इथली गर्दी कमी तरी होईल. यातलं काही झालं तरी नुकसान हे महाराष्ट्राचंच आहे.
देव देवळात नाही, हे जरी खरं असलं तर देवळातल्या देवामुळे गावातल्या अनेकांचं पोट भरतं, हे सत्य कोणीही नाकारलेलं नाही. त्यामुळे देऊळ आणि त्याला असलेली मान्यता, हा फक्त धर्माचा भाग म्हणून न पाहता त्या पाठचं अर्थकारण खुल्यादिलानं मान्य करायला हवं. देव चोरून नेता येत नाही, पण देवळाचा धंदा चोरून नेता येतो. महाराष्ट्रातले अनेक धंदे इतर राज्यांनी चोरले तसं देवळाचा धंदा तरी बाहेर जाऊ नये, याची काळजी सरकारनं घ्यायला हवी.
हेही वाचा:
हिंदी पत्रकारितेनं हिंदी भाषिक प्रदेशांना अंधारात ठेवलंय!
कर्नाटकच्या निकालाचा महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारसाठी धडा काय?
लोक म्हणतील पोलिस असे असतात, वकील तसे असतात. पण मुद्दा तो नाहीच
'तुम्हीच आहात बलात्कारी' असं सांगणारं गाणं जगाचं बलात्कार विरोधी गीत झालंय!