गायपट्ट्यातल्या राजकारणात अडकलेला भोजपुरी सिनेमा

०१ जुलै २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


गेल्या रविवारी, भोजपुरी सिनेसृष्टीतला सुपरस्टार निरहुआ म्हणजेच दिनेश लाल यादव हा उत्तरप्रदेशच्या आझमगढ मतदारसंघांतून खासदार म्हणून निवडून आला. याआधीही रवी किशन आणि मनोज तिवारी या भोजपुरी सुपरस्टार्सनी खासदारकी मिळवलीय. आता नव्याने खासदार झालेल्या निरहुआच्या निमित्ताने भोजपुरी सिनेवर्तुळात राजकीय गप्पागोष्टींना उधाण आलंय.

‘निरहुआ भैय्या झिंदाबाद’च्या घोषणा सध्या आझमगढच्या गल्लीमोहल्यांतून कानावर येतायत. त्याचं कारण या मतदारसंघातली लोकसभा पोटनिवडणूक. समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला समजला जाणारा हा मतदारसंघ उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या ताब्यात होता. पण आगामी राजकीय संधींसाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने इथं पोटनिवडणूक जाहीर झाली.

या पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टीने खासदारकीची हॅटट्रिक केलेल्या धर्मेंद्र यादवांना उमेदवारी देत आपला गड राखण्यासाठी भक्कम मोर्चेबांधणी केली होती. पण प्रतिस्पर्धी भाजपाने सुप्रसिद्ध भोजपुरी सुपरस्टार निरहुआला उमेदवारी देऊन सपाच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावलाय. रवी किशन आणि मनोज तिवारीनंतर खासदारकी मिळवणारा तिसरा भोजपुरी सिनेकलाकार ठरलाय. या निमित्ताने भोजपुरी सिनेमा आणि गायपट्ट्यातल्या राजकारणाचं नातं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

निरहुआलाच उमेदवारी का?

कोलकात्यात शिक्षण घेतलेला दिनेश लाल यादव म्हणजेच निरहुआ हा मूळचा गाझीपूर, उत्तर प्रदेशचा. बिरहा लोकगीतांची मोठी परंपरा लाभलेलं त्याचं घराणं. ‘बिरहा सम्राट’ विजयलाल यादव आणि ‘कवीजी’ प्यारेलाल यादव हे त्याचे भाऊ. साहजिकच, त्याच्या कारकिर्दीची सुरवातही बिरहा लोककलावंत म्हणूनच झाली होती. २००३मधे आलेल्या ‘निरहुआ सटल रहे’ या टी-सिरीजच्या घरोघर पोचलेल्या अल्बमने त्याला ‘निरहुआ’ हे नाव मिळवून दिलं.

‘चलत मुसाफिर मोह लियो रे’ हा जरी त्याचा पहिला रिलीज झालेला सिनेमा असला, तरी त्याच्या अभिनयाची सुरवात ‘हमका ऐसा वैसा ना समझा’पासून झाली होती, ज्यात त्याने भोजपुरी भाषेची अस्मिता अबाधित ठेवणाऱ्या युवकाची भूमिका साकारली होती. ‘निरहुआ रिक्शावाला’च्या निमित्ताने भोजपुरी सिनेमाला सातासमुद्रापार नेण्याचा मानही निरहुआलाच मिळाला. केवळ आपल्या नावापासून डझनभर आणि तेही हिट सिनेमे बनवण्याचा विक्रमही निरहुआच्याच नावावर आहे.

निरहुआ ज्या यादव समाजातून येतो, त्या यादवांचा गायपट्ट्यातल्या राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आझमगढमधे निरहुआलाच उमेदवारी द्यायचं भाजपाने ठरवलं. खरं तर, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघात अखिलेश यादवांनी निरहुआचा दणदणीत पराभव केला होता. पण यावेळी मात्र अखिलेश आणि त्यांचा पक्ष प्रचाराबद्दल काहीसा उदासीनच दिसला.

दुसरीकडे, काही महिन्यांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळवलेल्या भाजपाने निरहुआच्या पाठीशी भक्कम जनाधार उभा केला होता. निरहुआनेही आपल्या बिरहा लोकगीतांच्या माध्यमातून अखिलेश यांनी आपला मतदारसंघ कसा वाऱ्यावर सोडला याचं वर्णन सुरुच ठेवलं. शेवटी समाजवादी पार्टीचा विधानसभेतला पराभव आणि लोकसभेतली उदासीनता निरहुआच्या पथ्यावर पडली, असंच म्हणावं लागेल.

तिन्ही सुपरस्टार्स संसदेत

रवी किशन, मनोज तिवारी आणि निरहुआ हे तिघेही भोजपुरी सिनेमाचे त्रिदेव आहेत, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. निरहुआचा अपवाद वगळता इतर दोघेही आपली पहिली लोकसभा निवडणूक भाजपाच्याच विरोधात लढले होते आणि हारलेही होते. त्यानंतर मनोज तिवारींनी समाजवादी पार्टीला तर रवी किशन यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला आणि पुढच्याच निवडणुकीत खासदार म्हणून निवडूनही आले.

भोजपुरी सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर नेहमीच एकमेकांच्या आमनेसामने येणारे हे तिघेही सुपरस्टार आझमगढ लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले. त्यांच्याबरोबरच जवळपास ७५% भोजपुरी सिनेसृष्टी यावेळी निरहुआच्या प्रचारासाठी मैदानात उतरली होती. गेल्या काही काळात, भाजपाने आणि विशेषतः योगी आदित्यनाथ यांनी भोजपुरी सिनेविश्वावर जमवलेली पकड या निवडणुकीत पाहायला मिळाली.

हेही वाचा: आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

 

भोजपुरी सिनेमा आणि राजकारण

राजकारण आणि भोजपुरी सिनेमांचं नातं फार जुनं आणि तितकंच घट्ट आहे. भोजपुरी सिनेमाचा उदय मुळातच एका राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या महत्त्वाकांक्षेतून झाला होता. ती व्यक्ती म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद. १९६३मधे सुरु झालेल्या भोजपुरी सिनेसृष्टीला आपला हक्काचा सुपरस्टार मिळवण्यासाठी ४० वर्षं वाट पहावी लागली आणि तो सुपरस्टार होता, ‘सैय्या हमार’मधून झळकलेला रवी किशन!

त्याच वर्षी, रिलीज झालेल्या अजय सिन्हा दिग्दर्शित ‘ससुरा बडा पैसावाला’ने तिकीटबारीवर कमाईचा जो आकडा गाठला, तो आजतागायत अबाधित आहे. या सिनेमाने भोजपुरी सिनेसृष्टीला मनोज तिवारी नावाचा दुसरा सुपरस्टार दिला. मनोज तिवारींचा पूर्वांचल भागातला चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मिडीयाने वेढलेल्या इंटरनेट जगतात तिवारींनी गायलेलं ‘रिंकीया के पापा’ हे गाणं ऐकलं नसेल, असा नेटकरी दुर्मिळच.

रवी किशन यांना योगी आदित्यनाथांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूर लोकसभेसाठी तिकीट देताना, भाजपाने त्यांच्या स्टारडमबरोबरच ब्राम्हण असण्याचाही विचार केला होता. महाराष्ट्रात उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन होत असतानाही शिवसेनेला समर्थन देणाऱ्या योगी आदित्यनाथांवर २००९च्या लोकसभा निवडणुकीत मनोज तिवारींनी जाहीर टीका केली होती, हे विसरून चालणार नाही. इथूनच त्यांचा पूर्वांचल भागातला जनसंपर्क अधिकच बळकट झाला.

‘निरहुआ रिक्शावाला’ ते ‘निरहुआ चलल लंडन’ हा सिनेमॅटीक प्रवास म्हणजे फक्त निरहुआच्याच नाही, तर भोजपुरी सिनेमाच्याही सर्वांगीण प्रगतीचा आलेख आहे. यातला निरहुआचा झालेला विकास पाहून आपलंही आयुष्य असं व्हावं, याची दिवास्वप्ने बघत इथला भोजपुरी प्रेक्षक कमळाचं बटण दाबून येतो, यात काही नवल नाही. निरहुआचं यश म्हणजे सिनेमा आणि ‘स्टार कल्चर’चा प्रभावीपणे राजकारणासाठी वापर करणं भाजपाला चांगलंच जमलंय, याचं मूर्तिमंत उदाहरण आहे.

सांस्कृतिक राजकारणाचा प्रभाव

सिनेकलाकारांनी राजकारणात उतरणं ही काही नवीन गोष्ट नाही. स्टार प्रचारक ते नेते हा प्रवास बऱ्याच सिनेकलाकारांच्या आयुष्यात आलेला या देशाने पाहिलाय. त्याला भोजपुरी सिनेकलाकारही अपवाद नाहीत. राजकारणात आलेल्या भोजपुरी कलाकारांचं प्रमाण इतर सिनेसृष्टीतल्या कलाकारांपेक्षा कमी आहे. पण त्यांना सत्तेच्या पटावर मिळालेलं स्थान मात्र बरंचसं प्रभावशाली आहे. यासाठी गायपट्ट्यातलं सांस्कृतिक राजकारणही तितकंच कारणीभूत आहे.

बिहार आणि उत्तरप्रदेशमधला जातीयवाद पडद्यावरच्या आशयात उतरत नसला तरी तो पडद्यामागच्या आणि तिकीटबारीवरच्या हालचालींवर प्रभाव पाडून आहे. मुळात, बरेचसे भोजपुरी सिनेकलाकार हे ठराविक जातींची मक्तेदारी असलेल्या लोककलेतून प्रसिद्धी मिळवून नंतर चंदेरी दुनियेत आले आहेत. त्यामुळे त्यांच्यामागे त्या त्या जातीतल्या लोकांचा बराच मोठा जनाधार असलेला आपल्याला पाहायला मिळतो.

हे कलाकार आता त्या त्या जातीचे चेहरे बनलेत. त्यांनी पडद्यावर इतर जातीच्या व्यक्तीची भूमिका साकारणं प्रेक्षकांना पटत नाही. हिंदुत्ववादी राजकारण्यांची कळसूत्री बनलेल्या या सिनेसृष्टीत मुस्लिम कलाकारही कमीच आहेत. भोजपुरी सिनेमाची माधुरी दिक्षीत म्हणून ओळखली जाणारी राणी चॅटर्जी ही हिंदू किंवा बंगाली नसून मुंबईची मुस्लिम छोकरी आहे. तिला हे नाव अपघातानेच मिळालं होतं, पण मूळ नाव बदलल्यामुळेच आज आपण यशाच्या शिखरावर पोचल्याचं ती स्वतः मान्य करते.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युनंतर गायपट्ट्यातलं राजकीय वातावरण पाहता बॉलीवूड मुंबईतून उचलून गायपट्ट्यात नेण्याचा चंग योगी सरकारने बांधला होता. त्या दृष्टीने दिल्लीच्या सीमेवर एक फिल्मसिटी उभारण्यासाठी त्यांनी बॉलीवूडकडे मदतही मागितली होती. या निमित्ताने, मराठी सिनेसृष्टीसारखाच भोजपुरी सिनेसृष्टीलाही फायदा होत असला तरी, गायपट्ट्यातल्या राजकारणाला पूरक अशी सांस्कृतिक चळवळही उभी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे खरं!

हेही वाचा: 

ऑस्करच्या आयचा घो!

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा