भुरा: तत्त्वज्ञान आणि सौंदर्यशास्त्राने सजलेलं आत्मकथन

१८ एप्रिल २०२२

वाचन वेळ : ११ मिनिटं


डॉ. शरद बाविस्करांचं ‘भुरा’ हे आत्मकथन एक असं पुस्तक आहे की जे तुमची सगळी कामं सोडून ताबडतोब वाचायला भाग पाडतं. ते तुम्हाला झपाटून टाकतं. उच्च शिक्षण घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आजचा काळ विशेषतः राजकीय आणि सामाजिक-सांस्कृतिक संदर्भात समजून घ्यायचा असेल त्यांनी आवर्जून ‘भुरा’ हे पुस्तक वाचायलाच हवं.

डॉ. शरद बाविस्करांचं ‘भुरा’ हे आत्मकथन ज्याप्रकारे चर्चेत होतं, त्यादृष्टीने ते माझ्या वाचनात उशिराच आलं. मी वाचायला घेतलं आणि त्यांची अचानक भेटच झाली. पण ‘भुरा’ हे पुस्तक म्हणून इतकं परिपूर्ण आहे की त्यासाठी शरद बाविस्कर या व्यक्तीची प्रत्यक्ष भेट होण्याची गरजच नाही. माझ्यासाठी हे एक असं पुस्तक आहे की जे तुमची सगळी कामं सोडून ताबडतोब वाचायला भाग पाडतं. ते तुम्हाला झपाटून टाकतं.

खरं तर वाचकप्रिय म्हणजेच बेस्टसेलर पुस्तकासाठी आवश्यक असा ‘कथाभाग’ या पुस्तकात अजिबातच नाही. पण लेखकाचा प्रामाणिकपणा हीच कोणत्याही उत्तम लेखनाची पूर्वअट असते आणि आपल्या वाचनात बहुतांश आत्मकथनात त्याच गोष्टीची उणीव असतं. ‘भुरा’ या आत्मकथनाच्या शब्दांचा श्वासच मुळात हा प्रामाणिकपणा आहे, हे कोणत्याही उत्तम वाचकाच्या लगेच लक्षात येतं.

इंग्रजी नापास ते प्राध्यापकी

शरद बाविस्कर हे धुळे जिल्ह्यातल्या रावेर या गावचे. दहावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयात नापास झाल्यापासून या आत्मकथनाची सुरवात होते. या अपयशाचा ‘भुरा’ला मोठा धक्का बसतो. कारण घरची परिस्थिती फारच गरिबीची. पण आई धीर देते, मनाला नको लावून घेऊ. गावगाड्यातली आपली शिक्षणव्यवस्था ‘अव्यवस्थे’च्या चिखलात रुतलेली. अशा स्थितीत इंग्रजीबद्दलचा कमालीचा न्यूनगंड हजारो लाखो मुलांचं भविष्य अंधकारमय करत असतो.

शरद बाविस्करांना खेड्यापाड्यातली ही कुचकामी व्यवस्था केवळ सामाजिक रचनेत आहे, असं वाटत नाही. आपण बोलतो ती भाषाही व्यवस्थेचं काम करत असते. ‘भाषिक व्यवस्थेचं’ हे वास्तव भुराच्या फार लवकर लक्षात येतं. म्हणूनच तो एकेक भाषा ‘घेरत’ पुढे जातो. प्रथम इंग्रजीला नामोहरण करतो. त्यासाठी डिक्शनरीच पाठ करतो.

धुळ्याच्या जयहिंद कॉलेजमधे शरदला फंक्शनल इंग्रजीचं घबाड सापडतं. दिवसभर फक्त चहाबिस्कीटांवर राहून तो जयहिंदमधल्या कमवा-शिका योजनेचं सोने करतो. प्रतिकूल परिस्थितीत प्रचंड मेहनत करून तो लखनऊच्या इंग्रजी आणि परकीय भाषा संस्थेत प्रवेश करतो. तिथं त्याला फ्रेंच भाषेची अलीबाबाची गुहा सापडते. या गुहेच्या अंतर्भागातूनच पॅरिस आणि युरोपात सगळीकडे तो पोचतो.

पुढे अनेक प्रकारच्या फेलोशिपच्या राजमार्गाने डॉ. शरद बाविस्कर दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्राध्यापक होतात. हा प्रवास जितका थक्क करणारा आहे, तेवढाच त्या प्रवासात त्यांनी ज्या मानसिक शक्तींना एकवटून पावलापावलावर आलेल्या संकटांशी जो लढा दिलाय, तो केवळ आश्चर्यकारक असा आहे.

हेही वाचा: धनगर संमेलनाच्या निमित्ताने मूक समाज बोलू पाहतोय

भाषिक व्यवस्थेचं वास्तव

शरद बाविस्करला सापडलेली भाषेची गुहा पोकळ शब्दांची नसते. ती जिवंत माणसांच्या वागण्यातली कार्यकारणभाव शोधणारी असते. ती समूहा-समूहांच्या सामाजिक-सांस्कृतिक विषमतांची चिकित्सा करणारी असते. भोवतालच्या वास्तवाचा अन्वयार्थ लावणारं तत्त्वज्ञानही भाषेतूनच मांडलं गेलं असतं, याची जाणीव शरदला हळूहळू होऊ लागते.

तो त्या तत्त्वज्ञानाच्या जाणिवेतून मग स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेऊ लागतो. त्यातून त्याला व्यवस्थेच्या उलट्या प्रवाहात पुढे जाण्याची दिशा सापडते. जगातल्या प्राचीन संस्कृती, इतिहास, साहित्य आणि तत्त्वज्ञानाच्या अमूर्त विश्वातून त्याला मूर्त पातळीवरील प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात. 

भाषेकडून तत्त्वज्ञान-सौंदर्यशास्त्र-संस्कृती असा प्रवास करत शरद बाविस्कर समकालीन भारतीय जीवनातल्या जात-वर्ण-धर्माच्या आधारावरील विषमतेचं सुप्त ताणेबाणे शोधू लागतात, तसंच बुद्धापासून तुकारामापर्यंतच्या अध्ययनातून स्वातंत्र्य आणि समतेच्या प्रवासाच्या शक्यताही धुंडाळू लागतात. त्यांचा हा प्रवास जसा वाचकाला अद्भुत वाटतो, तसा प्रत्येकालाच प्रेरणादायकही वाटतो. 

लेखकाच्या व्यासंगाची प्रचिती

आपल्या पूर्व आयुष्यात, विशेषतः बालपणात भोगाव्या लागलेल्या यातना, वाट्याला आलेलं दारिद्र्य आणि वंचना याही गोष्टी बहुतांश आत्मकथनाचा मोठा भाग असतात. पण त्या अनुभवाकडे कोणता लेखक ‘भांडवल’ म्हणून पाहतो आणि कोण मानव्यतेच्या विशाल नजरेने पाहतो, हेही वाचकांच्या लक्षात येतं. स्वत:चं अस्तित्व आपल्या कुटुंबाच्या, भोवतालच्या समाजाच्या आणि विशाल अशा देशाच्या सापेक्ष जोखणारे लेखक फार दुर्मिळ असतात.

‘भुरा’चा लेखक अशा दुर्मिळ लेखकांपैकी एक आहे. म्हणूनच ‘भुरा’ या आत्मकथनाची एक यशस्वी लेखनकृती म्हणून वैशिष्ट्ये नोंदविताना त्यातल्या लेखकाला भोगावे लागलेले पराकोटीचे यातनामय प्रसंग, शिक्षणासाठी करावा लागलेला संघर्ष या गोष्टींना महत्त्व असूनही त्या थोडावेळ बाजूला ठेवून या पुस्तकाकडे पाहावं लागतं.

शरद बाविस्कर हे ‘भाषा’ विषयाचे संशोधक आहेत. ‘तत्त्वज्ञाना’चे अभ्यासक आहेत. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात फ्रेंच भाषा आणि साहित्याचे प्राध्यापक आहेत. तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने त्यांनी सौंदर्यशास्त्राचाही अभ्यास केलाय. तसंच तत्त्वज्ञानाच्या सापेक्ष राजकीय विचारप्रणालीही त्यांच्या चिंतनाचा भाग आहे. त्यांचा हा व्यासंग, अभ्यास किंवा चिंतन म्हणजे हे पुस्तक नाही, हे ‘भुरा’मधल्या पानापानातून आपल्याला जाणवतं.

‘भुरा’तल्या प्रत्येक प्रसंगाच्या कथनाला तत्त्वज्ञानाचं अस्तर आहे आणि प्रत्येक शब्द न् शब्द सौंदर्यशास्त्राने भारित आहे. ‘भुरा’ या पुस्तकाच्या निवेदनाचं वैशिष्ट्यच हे आहे की, त्यात लेखक शरद बाविस्करांनी तत्त्वज्ञान आणि सौदर्यशास्त्राचं फार कौशल्याने उपयोजन केलंय. अर्थात या गोष्टी त्यांच्या विचारप्रक्रियेचा अपरिहार्य भागच असल्याने ते स्वाभाविकपणे घडून आलंय.

हेही वाचा: साहित्य संमेलनात आहात, तर तेरला जाऊन याच! 

विश्व नागरिकाचं आत्मकथन

त्यांच्या या पुस्तकाचा अवकाश त्यांच्या मर्यादित आयुष्याने व्यापलाय. दहावीच्या परीक्षेपासून पुस्तकाचा प्रारंभ होतो आणि त्याच्या वयाच्या चाळीशीपर्यंतची ही कहाणी आहे. ‘भुरा’ ते जेएनयूचा प्राध्यापक डॉ. शरद बाविस्कर हा एवढाच प्रवास आहे. पण या कथनाला एखाद्या विहिरीसारखी खोली आहे. अशी विहीर जिचं पाणी कमालीचं स्वच्छ आहे आणि विहिरीचा तळ स्पष्ट दिसतोय. 

असं होण्याचं कारण म्हणजे या विहिरीला विश्वात्मक दृष्टीचे झरे आहेत. या विहिरीच्या पाण्यात जातीय-वर्णीय किंवा धार्मिक अस्मितेचे कोणतेही क्षार अजिबात नाहीत. ‘भुरा’ मधून प्रा. शरद बाविस्करचं व्यक्तिमत्व विश्व नागरिकाचं दिसतं. त्याच्या हृदयात विशाल मानव्य आहे. त्याच विशाल दृष्टीतून लेखक आपल्या लहानपणापासूनच्या अनुभवांकडे पाहतो.

जगातल्या अनेक संस्कृती आणि अनेक तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून चाळीशीतल्या या तरुणाचं भान अमर्याद आहे. म्हणून बालपणात सोसावे लागलेले कष्ट, भोगावं लागलेलं दारिद्र्य आणि सामाजिक वंचना, त्यांचे केवळ व्यक्तिगत अनुभव म्हणून या पुस्तकात येत नाहीत. त्या अनुभवांना व्यापक परिमाण प्राप्त झालेत.

सामाजिक विषमतेची चिकित्सक कहाणी

लेखक पानोपानी स्वत:च्या अनुभवातून भोवतालच्या जातीय विषमतेचा वेध घेतो. गरीबीचे चटके सोसताना फुले-आंबेडकरांच्या दृष्टीतून आपल्या समाजातल्या विषमतेचं विश्लेषण करतो. फ्रान्सला शिकायला जाण्यासाठी त्याला सात-आठ लाख रुपयांची फेलोशिप मिळते, तेव्हा त्यांना अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आईने बहिणीच्या लग्नासाठी कमी किमतीत जमिनीचा तुकडा विकला, त्याची आठवण येते.

त्या क्षणी शिक्षणाचा दोर धरून आपण त्या दारिद्र्याच्या चिखलातून कसं वर येऊ शकलो, याची जाणीव होते. पण दुसऱ्याच क्षणी आपल्यासारखी लाखो मुलं संधीविना कशी खितपत पडलीत, या जाणिवेने त्यांच्या काळजाला पीळ पडतो. पण तो केवळ सहानुभूतीच्या स्वरूपाचा नसतो.

पारंपरिक सामाजिक व्यवस्था, जातीय-वर्णीय अस्मिता आणि जागतिकीकरणाने बदललेली बहुजनांच्या संघर्षाची दिशा यांची ते अभ्यासलेल्या तत्त्वज्ञान, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्राच्या आधारे चिकित्सा करतात करतात. पण या पुस्तकाचं मूळ स्वरूप त्या चिकित्सेत हरवत नाही. अखेर ही कहाणी शरद बाविस्करचीच उरते.

हेही वाचा: मराठीला कुणी अभिजात भाषेचा दर्जा देता का दर्जा?

लखनऊमधले कटू प्रसंग

लखनऊमधे शिकताना शरदला अनेक कटू प्रसंगांना सामोरे जावे लागतं. तिथल्या भाषा संस्थेतल्या प्रशासनातच नव्हे, तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधे सरंजामी मनोवृत्ती दिसते. गरीब असणं हा तर एक गुन्हा तिथं असतोच, पण तुम्ही वर्णव्यवस्थेच्या खालच्या पायरीवर असून कष्टाने शिक्षण घेऊन भाषेवर हुकुमत मिळवता, हाही गुन्हाच ठरतो.

शाळेत शिकताना शेतमजुरी, दगडांच्या खाणीत किंवा क्रेनसर्विस मधे काम करताना तुच्छता आणि अपमानाला तोंड द्यावं लागतं. पण फ्रेंच भाषेच्या वर्गाची फी परवडत नाही म्हणून रात्रभर जागून वर्गातल्या फळ्यावर सराव करणाऱ्या शरदला तिथंही गुलामीचा अनुभव येतो. एकेकाळी प्रतिकूल परिस्थतीत शारीरिक श्रम विकून आपल्या भोवतालची शरीराची गुलामगिरी मान्य करणं लेखकाला भाग पडतं. अशावेळी सगळ्यांपासून दूर जावून शरद एकांत पसंत करतो.

या सगळ्याबद्दल लिहिताना ते म्हणतात, ‘माझ्यासारख्या इतिहासावर प्रेम असणाऱ्या व्यक्तीसाठी लखनऊसारखं ऐतिहासिक शहर एकाच वेळी भूतकाळात लुटली गेलेली असंख्य शहरे जपताना दिसायचं. भूतकाळात आणि चांगल्या पुस्तकात भेटणारी लोकं मला तेवढीच महत्त्वाची वाटतात जेवढी समाजात वावरणारी हाडामासाची पात्र.’

‘फक्त आजूबाजूला वावरणाऱ्या मर्यादित लोकांवर अवलंबून राहिलो असतो, तर कदाचित हाती निराशा आणि वैफल्य जास्त आलं असतं. त्याची कसर भरून काढण्यासाठी निसर्गाशी आणि स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत राहिलो. ही काही एकोणिसाव्या शतकातील ओढ नसून आजच्या काळातील तुटलेपणाने भरलेल्या अस्तित्वातून सतत वाटेला येणारी निरर्थकता दूर करण्याचा प्रयत्न असावा.’

तात्त्विक खिडकीतून पाहिलेले अनुभव

आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अनुभवाला असं तात्त्विक खिडकीतून पाहताना हा लेखक लगेच म्हणतो, ‘भारतासारख्या देशात तत्त्वज्ञान म्हणजे अव्यवहारी विषय! तत्त्वज्ञानात शिरणं म्हणजे तुलनात्मक आणि स्पर्धात्मक जगातून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न जिथं स्वतःची ओळख बाह्य घटक जास्त ठरवत असतात आणि जिथं समजण्यापेक्षा सतत दाखवणे जास्त महत्त्वाचं असतं.’

आणखी पुढे हा लेखक लिहितो, ‘वाटतं की वैफल्य, पावलोपावली वाटणार निरर्थकता, निराशा, तुटलेपण अशा गोष्टी मनुष्याला स्वातंत्र्याच्या बदल्यात मोजावी लागणारी किंमत असावी. मनुष्यप्राणी सोडून इतर प्राणी चाकोरीबद्ध जीवन जगत पूर्वनिश्चित नियमांचं पालन करून निसर्गाशी संवादी असतात.’

‘मनुष्याने मात्र कधीतरी चाकोरीतून बाहेर पडून निसर्गाशी विसंवादी जीवन जगण्याचे धाडस केलेलं दिसतं. मानवी इतिहास म्हणजे निसर्गापासून सतत दूर नेणारा प्रवास आणि स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न. हा प्रवास जरी आपल्याला निसर्गापासून दूर नेणारा असेल तरी वाटतं की त्याच्याशी पूर्णतः नाळ तोडणारा नसावा.’

हेही वाचा: साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?

मानव्याचं मूल्य

प्रा. शरद बाविस्करांच्या व्यक्तिगत अनुभवांना असं व्यापक चिंतनाचं अस्तर लाभलेलं दिसतं, ह्याचं कारण त्यांच्या व्यक्तित्वातल्या स्वातंत्र्याची ओढ आणि विशाल मानव्य. या मानव्याच्या मूल्यालाच प्रा. शरच्चंद्र मुक्तिबोध यांनी ‘मानुषता’ असं संबोधलंय. तेच या आत्मकथनाचं केंद्रस्थानी असलेलं मूल्य आहे.

मानव्याचं मूल्य प्रा. बाविस्करांच्या व्यक्तित्वाचंच एक अभिन्न अंग कसं आहे, ते लखनऊमधल्या एका प्रसंगातून लक्षात येतं. शरदला आयईएफएलच्या बाहेर जाताना सायकल रिक्षा करावी लागायची. रिक्षावाला म्हातारा अशक्त माणूस. त्या रिक्षात बसणं त्याला अमानवी वाटायचं. मग शरद ती रिक्षा म्हताऱ्या रिक्षाचालकाकडून मागवून तो स्वतः चालवण्याचा सराव करतो आणि जेव्हा बाहेर जायचं असेल तेव्हा त्या रिक्षावाल्याला रिक्षात बसवून तो ती चालवतो. 

२००५मधे दिल्लीत जेएनयूच्या रस्त्यावरच एक अपघात घडतो. शरद बाविस्करांना पाठीमागून एक कार धडक देते. त्यातून त्यांच्या पाठीच्या मणक्यांना इजा होते. पुढे त्या अपघाताचे गंभीर परिणाम होतात आणि ते आयुष्यभराचं दुखणं होऊन बसतं. पॅरिस, लंडन आणि इटलीमधे अनेकदा या दुखण्यामुळे जीवावरचे प्रसंग उद्भवतात.

या प्रसंगांचं वर्णन हा लेखक फार संयमाने करतो. त्यात कुठे भावनाविवशता नाही की कुठे वाचकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न दिसत नाही. पण तशाही अवस्थेत भाषा, तत्त्वज्ञान आणि राजकीय इतिहासाचा अभ्यास बाविस्कर ज्या चिकाटीने करतात, ते कुणाही अभ्यासकासाठी अत्यंत प्रेरक आहे. खरोखरच अचंबा वाटावा असा तो एकूण प्रवास आहे. 

अनुभवाची संपन्नता

परकीय भाषा, इतिहास, राजकीय तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा अभ्यास करताना शरद बाविस्करांच्या आयुष्यात परकीय मैत्रिणींचा प्रवेश होतो. पण त्यासंबंधातही ते फार वस्तुनिष्ठ शैलीत लिहितात. अगदी तरुण वयात देशांच्या सीमा ओलांडणारा आणि परकीय भाषा-संस्कृतीच्या सर्व बंधनांना झुगारून देणारा हा लेखक त्याच्या मैत्रिणींच्या संबंधात एकाच वेळी हळुवार होतो आणि लिहिता लिहिता लगेच सावधही होतो.

मैत्री आणि प्रेम यांच्यात असलेल्या अदृश्य भिंती तो कौशल्याने अधिक धूसर करत जातो. अल्पवयातच स्थळकाळाच्या सीमा ओलांडल्याने त्याच्या व्यक्तित्वात उतरलेली अनुभवाची संपन्नता याही संबंधात दिसून येते. ते सगळं वाचताना वाचकालाही संपन्नतेचा अनुभव येतो. कोणत्याही साहित्यकृतीकडून यापेक्षा आणखी कोणत्या अपेक्षा असतात?

हेही वाचा: आनंद कुंभारः एक क्लार्क शिलालेख अभ्यासक बनतो त्याची गोष्ट

वेगवेगळ्या संदर्भांची झालर

मला या ‘भुरा’ला ‘कादंबरी’ असं संबोधण्याचा वारंवार मोह होतो. मला स्वतःला या पुस्तकाचा उत्तरार्ध अतिशय महत्त्वाचा वाटतो. उच्च शिक्षण घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आजचा काळ विशेषतः राजकीय आणि सामाजिक-सांस्कृतिक संदर्भात समजून घ्यायचा असेल त्यांनी आवर्जून ‘भुरा’ हे पुस्तक वाचायलाच हवं.

‘सत्योत्तर सत्याच्या’ या युगात आजही काही लोक भारताला स्वातंत्र्य १९४७ला नाही तर २०१४ला मिळालं असं ठासून सांगत असतील तर त्यांना दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचं कॅम्पस हे उदारमतवादी भारताचं एक छोटं मॉडेल आहे, असं पटणारच नाही. त्यांना ते ‘तुकडे तुकडे गँग’चं आश्रयस्थानच वाटेल.

कारण त्या विद्यापीठाचं नावच जवाहरलाल नेहरू असंय. भारताची सांस्कृतिक आणि धार्मिक विविधता, भाषिक संपन्नता आणि लोकशाहीला पूरक जीवनशैली या नेहरूंच्या स्वप्नाचं प्रतिबिंबच जेएनयूमधे दिसत असतं. पण काही लोकांना असा भारत आणि असं विद्यापीठ नको होतं, याचा प्रत्यय लवकरच येऊ लागला. 

२०१४ नंतरचा भारत

१९९० नंतर जग पूर्वी होतं तसं राहिलेलं नाही. आर्थिक स्वातंत्र्याने जगाची सांस्कृतिक आणि धार्मिक घडी कायमची विस्कटून गेली. मार्क्सवाद, साम्यवाद, समाजवाद या विचारसरणी ग्रंथालयाच्या कपाटात बंदिस्त होऊ लागल्या. लोकशाहीचा ‘आत्मा’ अस्तित्वात आहे काय, याचा शोध घेण्याची वेळ जवळ येऊ लागली. ‘कल्याणकारी राज्य’ ही संकल्पना तर रोजच अंशाअंशाने इतिहासजमा होतेय.

नव्वदीच्या दशकात ‘भुरा’चा नायक शाळा-कॉलेजमधे शिकत होता. जेएनयूमधे तो पीएचडी करतो आणि तो पुढे प्राध्यापक म्हणून रूजू होतो, तो काळ २०१४च्या अगदी अलीकडचा. १९९० नंतर भारतासाठी महत्वाच्या बदलाचं वर्ष म्हणजे २०१४ आणि ‘२०१४ नंतरचा भारत’ हाच ‘भुरा’च्या उत्तरार्धाचा विषय आहे.

हेही वाचा: संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंच्या भाषणाचं सारः लेखक हुजऱ्या नसतो

खासगी शिक्षणसंस्थांचा व्यापार

जेएनयूमधे जाण्यापूर्वी शरद बाविस्कर दिल्लीतल्या ‘अॅमिटी’ या खासगी विद्यापीठाचा अनुभव सांगतात. या काळातल्या भारतातल्या खासगी शिक्षणसंस्थांचा व्यापार कसा सुरु झाला, हे समजून घेण्यासाठी हा एक अनुभव पुरेसाय. ‘खासगी शाळा आणि विद्यापीठ म्हणजे आपल्या समाजातील बेरोजगार लोकांना कमीतकमी पैशात जास्तीत जास्त राबवून घेणारी व्यवस्था’ असं विधान ते करतात.

विदेशात पाच विषयात मास्टर्सच्या पदव्या मिळवलेल्या शरद बाविस्करला अॅमिटी विद्यापीठात नोकरीची मुलाखत देताना पगारावरून जी घासाघीस होते, ती वाचताना वाचकाचीच विवेकबुद्धी कासावीस होते. जणू काही भाजी बाजारात विकायला आणलेल्या मालाची ती घासाघीस वाटते. अशावेळी ते लिहितात,

‘आत्मसन्मान आणि स्वातंत्र्य सारख्या गोष्टी कोणी स्वतःहून देत नाही. ह्या मूलभूत गोष्टींविषयी जाणीव ठेवून सतत सतर्क राहावं लागतं आणि समोरच्याला जाणीव करून द्यावी की, ह्या गोष्टी प्राणवायूसारख्या असल्यामुळे नॉन निगोशिएबल आहेत. पण त्यासाठी आपल्या स्वतःच्या कामाविषयी उच्च पातळीची नैतिकता विकसित करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. नाहीतर स्वतः कामाविषयी अभिमान राहून इतरांपासून आदराची अपेक्षा करणं मोलीयर च्या पाखंडी तात्युर्फसारखं वागणं झालं.’

थोडक्यात अशा शैक्षणिक संस्थांमधे शिक्षण ही विक्रीची वस्तू होऊन विद्यार्थी गिऱ्हाईक आणि संस्थेचा मालक दुकानदार, जिथं शिक्षकांना सर्विस पुरवणाऱ्या कामगाराचं स्थान असतं. जागतिकीकरणात भारतीय शिक्षणाची अवस्था वर्णन करण्यासाठी अॅमिटी विद्यापीठ एक उत्तम नमुना आहे. 

जेएनयूमधली विवेकनिष्ठ भूमिका

जेएनयूमधे फेलोशिप घेऊन पीएचडी करताना आणि नंतर तिथंच प्राध्यापकी करताना शरद बाविस्कर जे अनुभव मांडतात, त्याचंही विभाजन २०१४ पूर्वीचं जेएनयू आणि २०१४ नंतरचं जेएनयू असंच करावं लागतं. जेएनयू कॅम्पसमधल्या अनुभवांच्या निमिताने देशभरच्या राजकारणात जे काही चाललं होतं, त्याचा जेएनयू कॅम्पस हा एक नमुनेदार छेद आहे असं म्हणता येईल.

धार्मिक कट्टरता, सांस्कृतिक असहिष्णुता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने, बँकापासून न्यायापर्यंतच्या संस्था एकाच वर्चस्वात आणणं, या गोष्टी घडत असताना भारतातल्या उदारमतवादी लोकशाहीचं रूप जेएनयू कॅम्पसमधे कसं दिसत होतं आणि पुढे धार्मिक-सांस्कृतिक सत्तासंघर्षासाठी उघड उघड कशी दडपशाही आणि हिंसाचाराचा वापर केला जाऊ लागला त्याचं काही नेमक्या प्रसंगातून बाविस्करांनी चित्र उभे केलंय, ते मुळातून वाचण्यासारखं आहे.

पण ते डावी किंवा उजवी बाजू न घेता आधी तटस्थपणे निरीक्षण करतात आणि विवेकनिष्ठ भूमिका स्वीकारतात, तेव्हा जेएनयू कॅम्पसमधे डाव्या-उजव्याच्यामधे अनेक छटा दिसतात. त्यात भारतातल्या गरीब घरातले, मागास राज्यातले विद्यार्थी कसे शिकायला येतात आणि त्यांना या राजकारणाचा नाईलाजाने कसा सामना करावा लागतो तेही सांगतात.

हेही वाचा: लेखक, कवींनी बहिष्कार टाकला, संमेलनाध्यक्ष काय करणार?

२०१६नंतरचं जेएनयू

२०१६मधे ज्या घडामोडी जेएनयू कॅम्पसमधे घडल्या त्याचे पडसाद देशभर उमटले. नवीन कुलगुरू आल्यानंतर काही दिवसातच पूर्वनियोजित पद्धतीने जेएनयूविरुद्ध षडयंत्र आखण्याची अंमलबजावणी केली जाऊ लागते. 

बाविस्कर लिहितात की, जेएनयू कॅम्पसमधे रणगाडे पाठवण्याचा सल्ला एक आर्मीचे रिटायर्ड अधिकारी देतात. एक उच्च शिक्षित एचआरडी महिला केंद्रीय मंत्री म्हणतात, की ‘जेएनयुच्या प्रशासकीय मुख्यालयावर तिरंगा ध्वज लावण्याची गरज आहे, जेणेकरून येथील देशद्रोही लोकांना देशभक्ती कळेल.’

यावर बाविस्कर टिप्पणी करतात, ‘जी बाई तिरंगा ध्वज लावण्याचा आग्रह धरत होती, तिच्या विचारसरणीने बरीच वर्षे तिरंगा नाकारला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेएनयुच्या प्रशासकीय मुख्यालयावर पूर्वीपासूनच तिरंगा होता; पण मला कळत होतं की सध्याच्या परिस्थितीत सत्य-असत्य यात फरक असतो हे कुणाला जाणून घ्यायचंच नव्हतं.’ 

‘नोटाबंदीनंतर रसातळाला जाणारी अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी, कृषीक्षेत्राची होणारी वाताहत, महागाई सारख्या ज्वलंत प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी जेएनयुचा वापर सतत एक ‘पंचिंग बॅग’ म्हणून करण्यात येत होता. कधी विद्यार्थीविरोधी फर्मान निघत असत, तर कधी अशा तुघलकी फर्मानांचा विरोध करणाऱ्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर आरोपपत्र आणि कठोर कारवाईच्या धमक्या.’ अशा प्रकारे प्रकरण चिघळवलं जाऊ लागलं.

प्रबुद्ध भारताचं प्रतिक

पुढे प्रकरण खूप तापलं. देशात जेएनयूसंबंधित व्यक्तींच्या जिवाला धोका निर्माण झाला. प्रचंड प्रचारतंत्राचा वापर करून जेएनयूच्या विरोधात जनक्षोभ निर्माण करण्यात आला. कथित देशविरोधी नारेबाजीच्या आरोपाखाली जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमारला अटक होते. हे सगळं शरद बाविस्करांना क्लेशदायक वाटतं. त्यांना तटस्थ राहणं अशक्य होत जातं.

सगळे टीवी चॅनेल खोडसाळ प्रचार करत असूनही सत्याच्या बाजूने उभं रहावंच लागतं. कारण जेएनयूला संपवून टाकण्याचाच तो प्रकार आहे असं लक्षात येतं आणि जेएनयूला का वाचवलं पाहिजे? तर बाविस्कर लिहितात, ‘जेएनयुला संपवून टाकण्याची मोहीम उघडणाऱ्याना कदाचित कल्पना नसावी की, जेएनयु फक्त दक्षिण दिल्लीतील हजार एक जमिनीचा तुकडा नसून एका दृष्टीने पुरोगामी, परिवर्तनवादी आणि प्रबुद्ध भारताचं प्रतीक होतं.’

भारतीय लोकमानस कसं द्वंद्वात्मक आहे, त्याचं दर्शनही त्याच काळात लेखकाला होतं. तो लिहितो, ‘एका बाजूला सम्यक स्वातंत्र्याचा आग्रह धरणारे तर दुसरीकडे विषमतावादी मानसिकतेचं गौरवीकरण करणारे. एक मानसिकता लोकशाहीला पूरक. तर दुसरी लोकशाही शब्दाचा तिरस्कार करणारी. समाजात आणि व्यक्तीमध्ये अशा एकमेकांना छेद देणाऱ्या लिबर्टीसाईड आणि लिबर्टीरिअन मानसिकता एकमेकावर कुरघोडी करताना दिसतात. हे द्वंद्व या धरतीवर स्पष्टपणे प्रकट होताना दिसत होतं.’ 

हे सगळं दुर्दैवी असलं तरी ‘भुरा’ची अखेर मात्र एखाद्या ‘युटोपीअन’ कादंबरीसारखी आहे. दहावी नापास झालेला आणि शिक्षणव्यवस्थेच्या बाहेर फेकला गेलेला भुरा देशातल्या एका अग्रगण्य विद्यापीठाच्या एक्झिक्युटीव कौन्सिलचा सदस्य म्हणून निवडून येतो. संघ पुरस्कृत उमेदवाराच्या विरुद्ध डावे आणि आंबेडकरवादी प्राध्यापक संघाकडून प्रा. शरद बाविस्कर निवडून येतात. थोडक्यात ‘भुरा’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचलंच पाहिजे असं आहे.

हेही वाचा: 

मराठी भाषेच्या अभिजातपणाची कूळकथा

सुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन

नयनतारा सहगलः फुले, आंबेडकरांच्या रांगड्या वारशाचा अपमान

वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण