बायडनच्या विजयानं झालीय सर्वसमावेशक भविष्याची सुरवात

११ नोव्हेंबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


अमेरिकेची यंदाची निवडणूक वेगळी होती. या निवडणुकीत बायडेन विजयी झाल्यापेक्षा ट्रम्प पराभूत झाले, याचा अनेकांना आनंद झालाय. पण, जागतिक परिप्रेक्ष्यातून पाहता हा निकाल फोडाफोडीच्या राजकारणाकडून सर्वसमावेशकतेच्या भविष्याकडे झालेली सुरुवात आहे, असं म्हणावं लागेल.

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडेन विजयी झाल्यापेक्षाही डोनाल्ड ट्रम्प पराभूत झाले, याचाच जागतिक स्तरावर अनेकांना आनंद झालाय. दुहीच्या राजकारणाकडून सर्वसमावेशक भविष्याकडे सुरू झालेली वाटचाल, असं या निकालाचं वर्णन करायला हवं. विजयी सभेत बायडेन यांनी केलेल्या भाषणातही त्याचीच झलक दिसली.

‘तुम्ही डेमोक्रॅटिक पक्षाला मत दिलं असेल किंवा नसेल, माझ्या मते आपण सर्व अमेरिकन आहोत आणि मला आपण अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी काम करण्याची संधी दिलीय. आपण सर्वजण नव्या भविष्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न करूया...’ जो बायडेन यांनी विजय निश्चित झाल्यावर केलेल्या भाषणातील या मुद्द्यातून अमेरिकेत केवळ सत्ता नव्हे तर सर्वंकष बदलाची नांदी झाल्याचं स्पष्ट झालंय.

अमेरिकेतल्या या सत्तांतराचे पडसाद पुढील अनेक वर्ष, अनेक देशांत उमटतील. कारण, बायडेन यांच्या विजयाचा जल्लोष केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगातील अनेक देशांत साजरा होतोय.

जॉर्जिया, पेनसेल्विनिया निर्णायक

ज्यो बायडेन २९३ इलेक्ट्रोरल मतं घेऊन अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. अमेरिकन वेळेनुसार शनिवारी दुपारी १२ वाजता हा ऐतिहासिक निकाल लागला. मंगळवारी मतमोजणी सुरू झाली तसे बायडेन आघाडीवर होते. जॉर्जिया, पेनसेल्विनिया आणि नॉर्थ कॅरोलिना राज्यांत ट्रम्प आघाडीवर होते. त्यामुळे निकालाला निश्चित दिशा मिळत नव्हती.

गुरुवारी मध्यरात्रीनंतर जॉर्जिया,  पेनसेल्विनिया राज्यांत बाजू उलटली. ट्रम्प यांना मागे टाकून बायडेन पुढे गेले ते गेलेच. बायडेन यांनी अमेरिकन निवडणुकीच्या इतिहासातली सर्वाधिक मतं मिळवण्याचा विक्रम केला. डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात इलेक्ट्रोरल कॉलेजचं मतदान होईल ज्याचा निकाल जानेवारीत जाहीर होऊन २० जानेवारीला बायडेन पदग्रहण करतील.

हेही वाचा : 'ओबामा' नावाचा 'सक्सेस पासवर्ड' जगाला पुन्हा गवसतोय, तर!

निकाल स्वीकारायला तयार नाही

शनिवारी निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच बायडेन यांच्या समर्थकांनी न्यूयॉर्कमधे व्हाईट हाऊसजवळच्या ब्लॅक लाईव्ज मॅटर बिल्डिंगच्या बाहेर आनंद साजरा केला. तर ट्रम्प समर्थकांनी मिशिगन, नॉर्थ कॅरोलिना इथं जल्लोषावर विरजण घालण्याचा प्रयत्न केला.

निवडणुकीच्या निकालाबाबत पहिल्यापासूनच ट्रम्प यांनी सगळ्यांना धारेवर धरले. अजूनही ते हा निकाल मान्य करायला तयार नाहीत. निकालाविरोधात न्यायालयात जाण्याची त्यांनी शपथ घेतलीय. त्यांच्या प्रचार समितीने बर्‍याच केसेस फाईल केल्यात. अमेरिकन वेळेनुसार सोमवारी पुन्हा ते न्यायालयात जाऊन निवडणुकीचे सगळे नियम पाळलेत की नाही याची खात्री करायला लावणार आहेत. चुकीच्या मतपत्रिका मोजल्या. अजून निवडणूक संपलेली नाही, अजून बराच वेळ आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलंय.

कोरोनाकडे केलेले दुर्लक्ष महागात

राजकारणात नसतानाही २०१६ च्या निवडणुकीत निसटता का होईना, पण मिळालेला विजय ट्रम्प यांना यावेळीही जिंकण्याचा विश्वास देऊन गेला होता. यावेळी  ट्रम्प येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र, त्यांना २१४ इलेक्ट्रोरल मतांवरच समाधान मानावं लागलं. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कोरोना साथरोग. ट्रम्प यांना कोरोनामुळे जीवित आणि वित्तहानी टाळण्यात अपयश आलं.

त्यांनी मुळात कोरोनाच्या संकटाला कधी गांभीर्याने घेतलंच नाही. त्याबाबतीत अतिआत्मविश्वास दाखवला आणि तेच त्यांच्या अपयशास कारणीभूत ठरलं. कोरोनामुळे देशाची, नागरिकांची वाताहत झाली. त्यामुळे अमेरिकन नागरिक त्रासून गेले. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना नेतृत्व बदलण्याची गरज वाटू लागली होती. त्यामुळे ज्या लोकांनी निवडणुकीला कधी महत्त्व दिलं नाही त्यांनाही मतदान केलं. त्यामुळे यावेळी रेकॉर्डब्रेक मतदान झालं.

वर्णभेदाचा तडाखा

अमेरिकेत वर्णभेदाचा विषय कायमच धगधगता आहे. त्यात ठिणगी पडली जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूने. त्यानंतर उसळलेल्या दंगली, निदर्शनामुळे अमेरिकेतली परिस्थिती आणखीच बिघडली. या घटनांना ट्रम्प यांनी सामंजस्याने हाताळलं नाही. त्यांनी टोकाची पावलं उचलली. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी आगीत तेल ओतण्याचं काम केलं.

कृष्णवर्णीयांना ट्रम्प त्यांच्याविरोधी वाटत होते. या घटनेमुळे त्यात भरच पडली. त्यामुळे त्यांच्याविरोधातला असंतोष वाढतच गेला. त्यांनी बायडेन यांना मतदान करून असंतोषाला वाट करून दिली. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यामुळेही ट्रम्पविरोधाला बळ मिळालं.

हेही वाचा : बायडन आघाडीवर असतानाही ट्रम्प जिंकू शकतील का अमेरिकेची निवडणूक?

महिलांची भूमिका निर्णायक

ट्रम्प यांचा सार्वजनिक जीवनातला वावर आणि त्यांचा महिलांप्रती द़ृष्टिकोन अमेरिकन महिलांना कधीच रूचला नव्हता. यावेळी उमेदवार निवडण्यात महिला आणि पुरुष यांच्यात मतभिन्नता होती. पोलनुसार बहुतांश महिलांनी ट्रम्प यांना विरोध केला. या महिलांमधे  स्पॅनिश, कृष्णवर्णीय महिला यांच्यासह व्हाईट अमेरिकन महिलाही होत्या. एकाच कुटुंबातील पुरूष ट्रम्प यांच्या बाजूने तर महिला बायडेन यांच्या बाजूनं असंही चित्र दिसलं.

ट्रम्प यांना कोरोनाची परिस्थिती योग्यरित्या हाताळता आली नाही, अशी महिलांची धारणा होती. आरोग्यविम्याचे बदललेले धोरण, वाढती बेरोजगारी, दंगलीमुळे होणारे नुकसान याबाबतीत ट्रम्प यांचं काम महिलांना उदासीन वाटत होतं. आपण आणि आपला परिवार सध्याच्या परिस्थितीमधे असुरक्षित आहोत, अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली.

तसंच, ट्रम्प यांच्या बोलण्यातल्या ‘मी’पणा आणि पोकळ बोलणं महिलांना त्रासदायक वाटत होतं. त्यांचं वक्तव्य आणि वागणं जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना शोभत नाही. त्यामुळे देशाची प्रतिमा जागतिक पटलावर खराब होते, असं महिलांना वाटत होतं. ज्या महिलांनी २०१६ च्या निवडणुकीत ट्रम्प यांना मतदान केलं त्याचा त्यांना मन:स्ताप होत होता. त्यामुळेच यावेळी पुरुषांपेक्षा जास्त पूर्वमतदान महिलांनी  केलं.

भारतीयांची भूमिका

भारतीयांचा कल पहिल्यापासून डेमोक्रॅटिक पक्षाकडेच आहे. मात्र, सगळेच भारतीय ट्रम्पविरोधी आहेत असं नाही. ट्रम्प यांनी एच १ बी विसा, ग्रीन कार्ड, लॉटरी प्रक्रिया याबाबतीत नियम कडक केले. त्यामुळे आयटी क्षेत्रातले भारतीय नाराज झाले. अमेरिकेतल्या भविष्याबाबत त्यांना अनिश्चितता वाटू लागली. अमेरिकेचे नागरिक असलेल्या भारतीयांनी मोठं मतदान केलं.

कमला हॅरिस यांच्या आई भारतीय आहेत. त्यामुळे बर्‍याचशा भारतीयांनी बायडेन यांना पाठिंबा दिला. डेमोक्रॅटिक पक्षाला निवडणुकीचा सगळ्यात जास्त निधी भारतीय लोकांनी दिला. पहिल्यांदाच भारतीय वंशाची व्यक्ती जागतिक महासत्तेच्या एवढ्या मोठ्या पदासाठी निवडणूक लढवत होती. त्यामुळे भारतीयांना त्याचा सार्थ अभिमान वाटत होता.

कमला हॅरिस निवडून आल्याने ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याचा भारताला निश्चितच फायदा होईल. त्या अमेरिकेच्या  पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष तर आहेतच पण त्याबरोबरच भारतीय वंशाच्या आणि कृष्णवर्णीयांच्याही पहिल्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिका एवढा प्रगत देश असनूही आतापर्यंत राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदावर एकही महिला निवडून आली नव्हती, तो मान कमला हॅरिस यांना मिळाला. त्यामुळे त्यांचा हा विजय महत्त्वपूर्ण मानला जातोय.

हेही वाचा : अमेरिकन राजकारणाचा किस पाडणारी निवडणूक

सर्वसमावेशक धोरणाची घोषणा

जानेवारीमधे सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम कोरोनाच्या संकटातून अमेरिकेला बाहेर काढण्याचं काम करणार असल्याचं बायडेन यांनी घोषित केलं. त्यांनी ट्रम्प समर्थकांना मागचं सगळं विसरून फक्त अमेरिकन होऊन एकत्र काम करूया, असं आवाहन केलं. एच १ बी विसावर आणि ग्रीन कार्डवर ट्रम्प सरकारनं घातलेली बंधनं उठवण्याचं आणि ग्रीन कार्डचा देशनिहाय कोटा काढून टाकणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. कोरोनामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. त्यामुळे विसाबाबतचे आश्वासन ते कितपत पाळू शकतात याबाबत आताच काही सांगणं कठीण आहे.

कोरोनाच्या संकटामुळे निवडणुकीच्या मतदानापासून ते निकालापर्यंत बर्‍याच गोष्टींमधे बदल करावा लागला. सगळ्यांसाठी ही निवडणूक वेगळी होती. पण अमेरिकन माध्यमांनी जबाबदारीने कोरोनाबरोबरच निवडणुकीची माहिती, त्यातले बदल, होणारं मतदान, प्रचारसभा, नवीन घडामोडी यांचं वार्तांकन केलं. एकंदरित जगाच्या कानाकोपर्‍यातून लक्ष असलेल्या या निवडणुकीबाबतची अनिश्चितता संपलीय.

बायडेन विजयी झाल्यापेक्षा ट्रम्प पराभूत झाले, याचा अनेकांना आनंद झाला आहे. मात्र, जागतिक परिप्रेक्ष्यातून पाहता हा निकाल दुहीच्या राजकारणाकडून सर्वसमावेशकतेच्या भविष्याकडे झालेली सुरवात आहे, असं म्हणावं लागेल.

हेही वाचा : 

अर्णब घाबरू नकोस, जेएनयू तुझ्या सोबत आहे!

३२ हजार कोटींचा धंदा, टीआरपी युद्धाचा अजेंडा!

हत्ती आणि गाढव अमेरिकेच्या राजकारणात आले कसे?

बेरोजगारी कमी करण्यासाठी शेतीक्षेत्र खुलं करायला हवं!

समर्थन किंवा विरोध करण्याआधी शेती कायदे समजून तर घ्या!

(लेखिका अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यात वास्तव्यास आहेत.)