महाराजा सयाजीराव गायकवाडांचं हे छोटं चरित्र वाचायलाच हवं

०७ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


सयाजीराव गायकवाडांसारखा राजा भारतात झाला नाही, पुढे होणार नाही. भारताच्या निरनिराळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या कार्यालयात इतर फोटो टांगण्याऐवजी सयाजीरावांचा फोटो लावावा, असं प्र. के. अत्र्यांनी लिहून ठेवलंय. अशा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील छोटेखानी चरित्राचा हा परिचय.

ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड लिखित ‘आधुनिक भारताचे शिल्पकार : महाराजा सयाजीराव गायकवाड’ चरित्राचं नुकतंच प्रकाशन झालं. महाराजांच्या १५६व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम झाला. भांड हे राज्य सरकारच्या महाराज सयाजीराव गायकवाड चरित्र प्रकाशन समितीचे सचिव आहेत. गेल्या दहा, बारा वर्षांपासून बाबा भांड सयाजीराव महाराजांच्या राज्यकारभाराचा, व्यक्तिमत्त्वाचा आणि समकालीन सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करताहेत.

पुस्तकांचं हिंदी, इंग्रजी, गुजरातीत भाषांतर

भांड यांनी सयाजीरावांच्या जीवनावर आतापर्यंत ‘युगदृष्टा महाराज’ (कादंबरी), ‘लोकपाळ राजा सयाजीराव’ (चरित्र), ‘भारतीय साहित्याचे निर्माते’, ‘स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे: सयाजीराव गायकवाड’ (इतिहास), ‘गौरवगाथा युगपुरुषाची’, ‘भाषणे’ (खंड १ते५), ‘सृष्टीची सेवा ईश्वराची मैत्री’ (धर्मविषयक विचार), ‘सयाजीराव महाराजांचे विचारधन’, ‘राजा बनायला आलोय’ (बालकथा), ‘गोष्ट महाराज सयाजीरावांची’ (किशोर कादंबरी) इत्यादी ग्रंथांचे लेखन आणि संपादन केलंयं. या पुस्तकांचं गुजराती, हिंदी आणि इंग्रजीत भाषांतर झालंयं.

‘सयाजीरावांचे संस्कार पर्व’, ‘सयाजीरावांचे सुप्रशासन’, आणि ‘जनकल्याणातच मोक्ष शोधणारे सयाजीराव’ या चरित्राची विभागणी केलीयं. या भागात असलेल्या सुसंगतीमुळे त्यातला वेगळेपणा जाणवत नाही.

सयाजीराव महाराज कसं बनले?

नाशिकच्या कौळाणे गावातल्या गायकवाड घराण्यातल्या मुलाला बडोद्याचा राजा करण्याचं ठरवलं. मग बडोद्यात आणलेल्या सर्व मुलांना एक प्रश्न विचारला. त्याचे गोपाळने म्हणजेच सयाजीराव महाराजांनी दिलेल्या उत्तरानं राजा बनण्याची क्षमता दाखवून दिली. मुलांना विचारण्यात आलं, ‘तुम्ही इथं कशाला आलात?’ त्यावर कुणीचं पटेल असं उत्तर दिलं नाही. मात्र गोपाळने धाडसानं आणि आत्मविश्वासानं ‘मी राजा बनण्यासाठी आलोय,’ असं उत्तर दिलं. सयाजीरावांचा महाराज बनण्याचा हा भाग लेखकांनं चरित्रात अत्यंत खुबीनं लिहिलायं. त्यामुळे चरित्र वाचण्याची उत्सुकता वाढत जाते.

हेही वाचाः महाराजा सयाजीरावांच्या मदतीने घडले अनेक राष्ट्रपुरुष

दत्तक माता महाराणी जमनाबाई, गुरू इलियट आणि दिवाण टी. माधवराव यांनीच सयाजीरावांना आदर्श राजा होण्याचे संस्कार दिले. त्यासाठी लेखकानं तिघांच्या संस्काराचं वर्णन योग्य शब्दांत केलंयं. या संस्काराला उत्तम प्रतिसाद देत सयाजीरावांनी वयाच्या पंधराव्या वर्षी पंक्तिभेद दूर केला.

सयाजीरावांनी अस्पृश्यता नाकारली

सयाजीरावांनी कमी वयात जातीभेदाची बंधनं स्वतःच्या आचरणाने दूर केली. राज्यकारभार हातात घेतल्यावर अस्पृश्य, आदिवासींच्या शिक्षणाचा हुकूम काढला. त्यावेळी त्यांचं वय अठरा-एकोणावीस होतं. एवढ्या कमी वयात त्यांनी जनकल्याणाचा ध्यास धरलेला. ही अपूर्व गोष्ट नेमकेपणाने लेखक वाचकांसमोर ठेवतात.

सयाजीरावांनी अल्पावधीतच संस्थानात सुप्रशासन आणलं. त्यांनी शिक्षण, राज्यकारभार, शेती, उद्योग, सहकार आणि पाणी व्यवस्थापन केलं. तसंच सामाजिक, धर्मविषयक, साहित्य, ललितकलेला प्रोत्साहन दिलं. 

हेही वाचाः महाराजा सयाजीरावः पहिले आणि एकमेव

सगळ्यांना मदत करणारा राजा हा भाग ‘सयाजीरावांचे सुप्रशासन’ यात आहे. शिक्षणात खूप सामर्थ्य आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी प्रजेसाठी शिक्षण सक्तीचं आणि मोफत देण्याचा निर्णय घेतला. सात वर्षांचा प्रत्येक मुलगा, मुलगी शाळेत यावा म्हणून १८९२ मधे कायदा केला. आणि सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केलं. शिक्षणाच्या एकूण खर्चापैकी ३/४ खर्च प्राथमिक शिक्षणावर केला जाऊ लागला.

जनकल्याण हेच अंतिम ध्येय

मुळात बडोदा संस्थान हे सयाजीराव महाराजांनी केलेल्या जागतिक दर्जाच्या सुधारणांमुळं ओळखलं जातं. त्यामुळे महाराजांच्या सुधारणांची दिलेली माहिती या चरित्राचा गाभा आहे. लेखकांनी हे नेमकेपणाने ओळखत सुधारणा थोडक्यात सांगितल्या आहेत.

सयाजीराव महाराजांनी जनतेसाठी काम करण्यात आपलं संपूर्ण आयुष्य सत्कारणी लावलं. अनेक ठिकाणी भाषण करताना ‘जनकल्याण हेच माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे.’ असं महाराज म्हणत. त्यामुळे या चरित्राचा शेवटचा भाग ‘जनकल्याणातच मोक्ष शोधणारे सयाजीराव’ अत्यंत समर्पक झालायं. चरित्र लेखकांनी महाराजांच्या सर्व सुधारणांचे आजच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीशी जोडलंयं. त्यामुळे महाराजांच्या सर्व सुधारणा त्याकाळात प्रजेसाठी किती लाभदायक ठरल्या हे आपल्याला समजतं.

हेही वाचाः परिवर्तनशील जगात धर्माची जागा सांगणारं सयाजीरावांचं भाषण

चरित्राच्या सुरवातीलाच प्र. के. अत्रे यांच्या ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या पुस्तकातलं एक वाक्य वाचकांचं लक्ष वेधून घेतं. ‘सयाजीराव गायकवाडांसारखा राजा भारतात झाला नाही, पुढे होणार नाही. भारताच्या निरनिराळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या कार्यालयात इतर फोटो टांगण्याऐवजी सयाजीरावांचा फोटो लावावा. सयाजीरावांसारखा नेता किंवा पंतप्रधान या भारताला कधी मिळेल का हो? या स्वप्नरंजणात आम्ही हा लेख संपवतो. त्याचा अर्थ वाचकांनी समजून घ्यावा.’

पुस्तक कशासाठी वाचावं?

सयाजीराव महाराजांच्या अफाट कार्याचा अशा चरित्रातून आढावा घेणं शक्य नसलं तरी, चरित्र लेखकांची सयाजीरावांच्या एकूणच जीवनाकडे पाहण्याची दृष्टी, महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाढा अभ्यास, व्यासंग यामुळं हे शक्य झालंय. लेखकांनी महाराजांच्या कार्याचा कमी शब्दांत घेतलेला आढावा हे या चरित्राचं वैशिष्ट्य आहे.

महाराजांच्या कार्याची महाराष्ट्राला ओळख करून देण्याचं महान कार्य लेखक बाबा भांड यांनी त्यांच्या लेखणीतून केलंय. सयाजीरावांविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हे चरित्र अत्यंत उपयुक्त आहे. या चरित्राचे मराठीबरोबर हिंदी आणि इंग्रजीमधेही भाषांतर उपलब्ध आहे.

हेही वाचाः सयाजीराव गायकवाड महाराजः व्यवस्थापन शास्त्राचे दीपस्तंभ

या चरित्रातून सयाजीराव महाराजांचा सामान्य ते असामान्य प्रवास दिसतो. तसंच या चरित्रातून प्रामाणिकपणे कष्ट केलं, आपल्या बुद्धीचा तारतम्याने वापर केला, देशबांधवांवर प्रेम केलं तर आपण हाती घेतलेल्या कार्यात यशाचे शिखर गाठता येतं, ही गोष्ट अधोरेखित होते. महाराजांच्या आयुष्यात सामाजिक बांधिलकी, दूरदृष्टी, प्रामाणिकपणा, देशप्रेम, बंधुत्वाची शिकवण या सर्वांचा समावेश होता. त्यामुळे महाराजांचं हे चरित्र स्वतःचं, कुटुंबाचं, समाजाचं, देशाचं भवितव्य घडवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरेल.

--

पुस्तकाचं नावः आधुनिक भारताचे शिल्पकार : महाराज सयाजीराव गायकवाड (चरित्र)

लेखकः बाबा भांड 

प्रकाशक: महाराज सयाजीराव गायकवाड संशोधन प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद.

पानांची संख्याः ३२

किंमतः २५ रुपये.

(लेखक हे राज्य सरकारच्या औरंगाबाद इथल्या महाराज सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती संशोधन सहायक म्हणून काम करतात.)