आज गुरुवार २२ ऑगस्ट. याच दिवशी १८४४ ला डायरिस्ट म्हणजे डायरी लिहिणाऱ्या सोफिया बेहर यांचा जन्म झाला. यंदा त्यांचं स्मृतिशताब्दी वर्ष आहे. आयुष्यभर त्या महान फिलॉसॉफर लिओ टॉलस्टॉय यांची बायको म्हणून ओळखल्या गेल्या. पण निधनानंतर त्यांच्या डायरीवरून त्यांच्या आयुष्यावरची बरीच पुस्तकं आली. आणि त्या लोकप्रिय झाल्या. त्यांच्या डायरीतून उलगडलेली ही कथा.
सोफिया बेहरने १८६२ मधे लिओ टॉलस्टॉयशी लग्न केलं. तेव्हा ती अठरा वर्षांची होती. टॉलस्टॉय ३४ वर्षांचा होता. दोघांच्या वयात सोळा वर्षांचं अंतर. पण ही गोष्ट नजरेआड करण्यासारखी होती. सोफियाची आई ल्यूनोशी ओळख असल्याने मॉस्कोच्या त्यांच्या घरी त्याचं येणं जाणं होतं. तोपर्यंत टॉयस्टॉय लेखक म्हणून प्रसिद्ध झाला होता.
टॉलस्टॉय घरातल्या सर्वांचा लाडका होता. सोफियाची मोठी बहीण लिझा हिच्याशी तो लग्न करेल असं सर्वांना वाटत होतं. सोफिया ही मधली मुलगी. तिला तर त्याचं लेखन फार आवडत होतं. त्याच्या लेखनातले उतारे ती वहीत उतरवून ठेवत. ती सुशिक्षित होती. गायन, वादन, साहित्य अशा कलांची आवड होती.
युद्धात शौर्य गाजवलेल्या टॉलस्टॉयबद्दल सोफियाच्या मनात सुप्त आकर्षण होतं. टॉलस्टॉयलाही सोफिया म्हणजे सोन्या अधिक मोहक वाटायची. पण बरेच दिवस आपल्या भावनांना तो आवर घालत होता. मागणी घालण्याचं धैर्य त्याला होत नव्हतं. शेवटी एक पत्र लिहून त्याने ‘तू माझी पत्नी होशील का?’ असं तिला विचारलं. लिझाला धक्का बसला. पण आईने आनंदाने मान्यता दिली. लग्नाआधी, टॉलस्टॉयने तेव्हाच्या श्रीमंत तरुणांप्रमाणे स्वैर, रंगेल आणि मजेत आयुष्य घालवलं.
त्याने लग्नाच्या दृष्टीने अनेक मुलींचा विचार केला. पण एका क्षणी आवडलेली तरुणी त्याला काही क्षणातच अयोग्य वाटू लागायची. सोफियाशी लग्न ठरल्यावर मात्र त्याने आठवडाभरात लग्नाची तारीखही ठरवली. लग्नाच्या आदल्या दिवशी त्याने आपल्या डायऱ्या तिला वाचायला दिल्या. त्याने तोपर्यंत घालवलेल्या पुर्वायुष्यातील चुकांचे, गैरवर्तनाचे सर्व तपशील त्यात होते.
त्या डायऱ्या वाचताना सोन्या हादरुन गेली. तिला अश्रू आवरेनासे झाले. त्याने तिच्यावरच्या प्रेमाची कबुलीही दिली होती. त्यामुळे तिने स्वत:ला सावरलं. आपल्या डायऱ्या वाचून तिचं मन पालटलं तर नाही ना, हे विचारायला टॉलस्टॉय लग्नाच्या दिवशी सकाळी आला. त्याने तिची क्षमा मागितली. सोन्याने मनोमन त्याला माफ केलं. ठरवल्याप्रमाणे २३ सप्टेंबर १८६२ ला लग्न पार पडलं. पण त्याचे पूर्वायुष्य ती कधीच विसरू शकली नाही.
सोन्या त्याच्याशी लग्न करून मॉस्को आणि आई, वडील, बहिणीला सोडलं. ती टॉलस्टॉयबरोबर त्याच्या यास्नाया पोल्याना भागातल्या घरी राहायला गेली. या भागात टॉलस्टॉयच्या वाट्याला चार हजार एकर जमीन, ३३० गुलाम एवढं वैभव आलं. १८६२ मधे गुलामगिरी कायद्याने बंद झाली. तेव्हा घरात टॉलस्टॉयच्या दोन आत्या आणि अनेक नोकरचाकर होते. पण शेवटी ते खेडंच होतं. भोवतीची माणसं अडाणी, ते तिला आवडत नव्हतं.
हेही वाचा: कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने पाऊस पडला तरी तो खरंच चांगला आहे?
टॉलस्टॉयच्या विलासी, रंगेल, विषयासक्त पूर्वायुष्याची चालतीबोलती खूण म्हणजे ऑक्सिनिया नावाची खेडूत महिला. आणि टॉलस्टॉयपासून तिला झालेला मुलगा जवळच राहत होता. त्यांना पाहून सोन्याचे मन द्वेषाने भरुन जाई. टॉलस्टॉय तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करीत होता. पण त्याच्या प्रेमाच्या खरेपणाबद्दल तिच्या मनात राहून राहून शंका येई.
लग्नापुर्वी तीसुद्धा डायरी लिहित असे. लग्नानंतर महिन्याच्या आतच तिने पुन्हा डायरी लिहिणं सुरु केलं. सोन्याच्या डायऱ्यांमधून टॉलस्टॉयबरोबरचं तिचं सहजीवन, तिच्या मनातली भावनांची आंदोलनं, सुख-दु:खाचे क्षण, व्यथा-वेदना दिसतात. तसंच एकाकीपणा सहन करत तिने घालवलेल्या घटका या साऱ्यांचं पारदर्शी वर्णनही त्यात आलंय. यातून रशियातल्या एकोणिसाव्या शतकातल्या महिलांच्या जीवनाचं प्रतिबिंब उमटतं.
टॉलस्टॉयसारख्या विश्र्वविख्यात, मानवी मनाचं, स्वभावाचं प्रत्ययकारी आणि जिवंत चित्रण करणाऱ्या, तत्वज्ञ, चिंतनशील लेखकाच्या सहचारिणीच्या जीवनाला हळूहळू एका शोकांतिकेचं रूप का आणि कुणामुळे आलं या प्रश्नांनी व्याकूळ व्हायला होतं.
हेही वाचा: मोहन भागवत आरक्षणावर बोलल्यावर वाद का होतो?
सोफियाला आपल्या लग्नापूर्वीच्या जगण्याचे तपशील सांगणाऱ्या डायऱ्या वाचायला देणं हा टॉलस्टॉयचा प्रामाणिकपणा. पण प्रामाणिकपणा हा स्वत:च्याच विवेकाची टोचणी नसावी. याची मानसिक गरज आणि परस्परांवरचा विश्वास प्रकट करणं असं अंत:स्थ हेतू असेल. पण त्या डायऱ्यांमुळे सोफियाच्या मनावर झालेला खोलवरचा आघात कधीही नष्ट झाला नाही.
त्याचं पूर्वायुष्य तिच्या दृष्टीने इतकं घाणेरडं होतं की, त्याला क्षमा करणं आपल्याला शक्य नाही, असं तिला वाटू लागलं. अनेक प्रकारची व्यसनं, स्वैराचार, वैश्यागमन, जुगारीपणा यात आयुष्याची कित्येक वर्षं त्याने घालवली. ते तपशील तिच्या मनातून जात नव्हते. त्याच्याविषयीच्या संतापाने तिचं मन भरून येई. आपण त्याच्यापासून तुटून जाऊ, जात आहोत असं तिला वाटत राही. तो तिला जवळ घेई, तेव्हा आपण त्याच्या आयुष्यातली पहिली स्त्री नाही, याची तिला जाणीव होत राही.
टॉलस्टॉयच्या आयुष्यात येऊन गेलेल्या सुंदर, आकर्षक, चंचल आणि वेगवेगळ्या चेहऱ्यांच्या महिलांपैकी मी एक, असं वाटून ती खिन्न व्हायची. आपण म्हणजे त्याचे एक नाजूक खेळणं आहोत. या कल्पनेने ती त्रस्त होई. आपला आनंदी, खेळकर स्वभाव, आपल्या आयुष्यातले आनंदाचे क्षण तो स्वत:च्या गांभीर्याने चुरगाळून टाकतो, असं तिला वाटे.
घराच्या इस्टेटीच्या देखभालीच्या जबाबदाऱ्या सोन्याने आनंदाने स्वीकारल्या. ती टॉलस्टॉयची सर्वतोपरी काळजी घेई. विशेष म्हणजे टॉलस्टॉयने केलेल्या कच्च्या लेखनाचं पुनर्लेखन ती करीत असे. त्याने लिहून ठेवलेल्या कागदांवरचा मजकूर, खाडाखोड, समासात घतलेली भर हे सगळं वाचून त्याची नीट जुळवाजुळव करून लिहून ठेवत असे. हे करताना ती कधीच कंटाळली नाही.
टॉलस्टॉयमधल्या प्रतिभावंतावर तिचं उत्कट प्रेम होतं. पती म्हणून तो तीचं सर्वस्व होता. त्याच्या प्रक़ृतीत जरा चढउतार झाला की, ती अस्वस्थ होई. स्वत:च्या भवितव्याच्या काळजीने व्यग्र होई. टॉलस्टॉय लेखनात, इतर कामात गर्क असे. अधूनमधून प्रवासाला जाई. लग्नानंतर काही महीन्यात तिला दिवस गेले. त्यामुळे तो आपल्यापासून दूर जातोय, असं तिला वाटे.
सोफियाने लिहिलेल्या डायऱ्यांमधला मजकूर वाचताना लक्षात येतं की, बुद्धिमान, प्रतिभावंत टॉलस्टॉय स्वत:च्या कामात, जगण्याच्या वेगवेगळ्या प्रयोगात, लेखनात, विचारात, प्रवासात गुंतलेला असताना सोफियाला एकटेपणाने घेरलं. यासाठी ती स्वत:ला दोष देते. आपल्याला या खेड्याची सवय नाही. आपलं मन इथे रमवलं पाहिजे अशी ती स्वत:ची समजूत घाले. आपलं बालपण विसरून आपण एक प्रगल्भ, प्रौढ महिला बनायला हवं, असंही ती स्वत:ला सांगते.
टॉलस्टॉय इतका मग्न असे की तिला समजून घेतलं पाहिजे, असा विचारही त्याच्या मनात येत नसे. माहेर, आईवडील, बहिणी, मित्रमैत्रिणी यांच्याबरोबरचं तिचं शहरातलं खळखळतं जीवन सोडून ती इथे एकटी जगतेय, हे त्याच्या गावीही नव्हतं. किंवा असं सर्वस्वी समर्पणच त्याला हवं होतं. आदर्श वैवाहिक जीवनाचं चित्र त्याने वॉर अँड पीस कादंबरीतून रंगवलंय.
महिला ही स्वत:च्या उपभोगाचं, सुखाचं, आनंदाचं आणि करमणुकीचं साधन आहे, असं मानणाऱ्या पुरूषप्रधान, पुरूषकेंद्री समाजव्यवस्थेचे संस्कार टॉलस्टॉयमधे पुरेपूर भिनलेले. पूर्वायुष्यातही त्याने याच नजरेने महिलांकडे पाहिलं. सोफिया त्याची पत्नी होती खरी, त्याचे लेखनविषयक व्यवहार ती साभाळी, त्याला सल्ला देई पण होती महिलाच.
तिचं अवखळ वागणं, तिची फॅशनेबल राहणी, नटणं-थटणं याविषयी तो नापसंती व्यक्त करी. खोचकपणे बोले. त्याच्या दृष्टीने आपण केवळ एक मादी आहोत, संसारातील एक वस्तू असं तिला वाटावं, असंच त्याचं तिच्याशी वागणं होतं. तिला असं जाणवण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे १८६२ ते १८७४ या बारा वर्षात तिला सहा अपत्यं झाली. आणि ७२ ते ७५ या काळात तीन मुलं मृत्यू पावली.
हेही वाचा: लोकांनी अंडरवेयरची खरेदी थांबवण्यामागे खरंच मंदीचं कारण आहे?
गर्भारपण, बाळंतपण, मुलांचे संगोपन, त्यांची आजारपणे या चक्रात तिचं जीवन भरडून निघत होतं. आपल्यातच काही उणीव आहे, आपल्याजवळ बुद्धी नाही, प्रतिभा नाही, अशा गंडाने ती ग्रासली जात होती. त्यावेळी टॉलस्टॉय त्याच्या प्रसिद्ध कलाकृती निर्माण करत होता साक्षरतेचे प्रयोग करणं, नवीन जमीनजुमला विकत घेऊन तिथल्या लोकांसाठी कार्यक्रम करणं, असे त्याचे विविध उद्योग सुरू होते. स्वत:च्या घराकडे, कुटुंबाकडे लक्ष देण्याची त्याला गरज वाटत नव्हती.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातली टॉलस्टॉय आणि सोफिया यांच्या सहजीवनाची कहाणी वाचताना उदारमतवादी ब्रिटिश विचारवंतांमुळे प्रभावित झालेली सुधारकांची पिढी माझ्या नजरेपुढे आली. महात्मा फुले, ना. वा. टिळक, आगरकर, गोपाळराव जोशी, म. गो. रानडे यांचे महिलाविषयक विचार आणि त्यांची आपल्या सहधर्मचारिणीच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिलेलं महत्व यांची शेखी पटली.
रशियात झारची राजवट होती. चर्च या धर्मसंस्थेला महत्त्व होतं. घरची आणि दारची महिला ही केवळ बाई होती. पुरूषाच्या सुखासाठी ती निर्माण झाली होती. आणि समाजधारणेपुरतंच तिचं अस्तित्व गृहित धरणारी व्यवस्था वर्षानुवर्षे दृढ झाली. ती नष्ट होण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी क्रांतीचं हिंस्र वादळ घोंघावत येणार. याची जाणीवही भौतिक सुखोपभोगात रमलेल्या वर्गाला नव्हती.
टॉलस्टॉय हा सुरवातीला याच वर्गाचा प्रतिनिधी होता. त्याच्या लेखनावर वाचकांच्या उड्या पडत होत्या. त्याच्या कादंबऱ्यांची पुढची प्रकरणं वाचायची महिलांना इतकी उत्सुकता असे की, ती पुस्तकरूपात येण्यापूर्वीच ती मागवून घेतली जात. या लोकप्रिय लेखनापासून मिळणाऱ्या संपत्तीमुळे सोफिया खूश होती.
मुलांचं संगोपन, पालनपोषण, शिक्षण यांची जबाबदारी तिच्यावर होती. त्यामुळे घर, कुटुंब, मुलं, लेखक म्हणून टॉलस्टॉयची प्रतिष्ठा, घराची सजावट करण्यासाठी खरेदी या साऱ्यात ती गुंतून गेली. एक व्यक्ती म्हणून आणि लेखक म्हणून टॉलस्टॉय विकसित होत गेला. प्रस्थापित राजवट आणि धर्मव्यवस्था याविषयीच्या असमाधानातून, मृत्यूच्या भीतीमुळे केलेल्या तत्वज्ञानाच्या अभ्यासातून त्याच्या स्वभावात आणि जीवनविषयक विचारात आमुलाग्र परिवर्तन झालं. त्याग आणि सेवा ही मुल्यं त्याने स्वीकारली. ललित साहित्यकृती लिहिणं त्याने थांबवलं आणि धर्मविषयक चिंतन मांडणारं लेखन तो करू लागला.
दोन वर्षांच्या चिंतनातून त्याचं सार सांगणारं कन्फेशन हे पुस्तक त्याच्या स्वतःच्या आयुष्याचं डोळस पुनर्विलोकन मानलं जातं. या आत्मीक प्रवासात त्याने सोफियाला बरोबर घेतलं नाही. तिचं जीवन पुर्ववतच सुरू राहावं अशीच स्थिती होती. कन्फेशनची निर्मिती सुरु असताना सोफियाने दहाव्या अपत्याला जन्म दिला. दोघे दोन पातळ्यांवर जगत होते.
सोफियाचं एकूण जीवन हे मला शोकात्मिकेतील मुख्य पात्राच्या ‘ट्रॅजिक वेस्ट’चं जितंजागतं उदाहरण. सुंदर, बुद्धिमान, कर्तृत्त्ववान, रोमँटिक, स्वप्नाळू, भावूक, मुलांवर आणि नवऱ्यावर मनस्वी प्रेम करणारी, भावनेच्या आवेगाने वाहून जाणारी. टॉलस्टॉयचा संसार तिने जपला. त्यांच्यासाठी सर्व प्रकारचा त्याग केला.
पण तिची धडपड, संत्रस्तता, तिचा मनस्वी स्वभाव, तिचं हिस्टेरिक होणं आणि एकूण थकवा कुणाला कळलाच नाही. त्याच्या थोरवीमुळे ती खुजी ठरली. तिच्या वागण्यामुळे टॉलस्टॉयला घर सोडावं लागलं. त्याने कोणत्यातरी स्टेशन मास्तरच्या घरी शेवटचा श्वास घेतला. त्याने तिला शेवटच्या क्षणी भेटूही दिलं नाही. त्यामुळे तिच्यावर पूर्ण आयुष्यभर अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला गेला.
टॉलस्टॉयनंतरचं तिचं आयुष्य भीषण अपराधभावनेनं ग्रासलं. ज्याची तिला भीती होती. तेच घडलं. सारं वैभव नष्ट झालं. मुलं देशोधडीला लागली. नैराश्य, वैफल्य आणि अवहेलना तिच्या वाट्याला आली. ती मला तिच्यासारख्या अनेक महिलांची आठवण करून देते. कितीतरी महिला ‘मी ती तूच का गं?’ असं तिला विचारतायत असं वाटू लागलं. बाईपणामुळे पत्कराव्या लागलेल्या अनेकींच्या जीवनाच्या व्यर्थतेमुळे मन खिन्न होऊन जातं.
हेही वाचा:
सोनिया गांधींपुढे काँग्रेसला बांधून ठेवण्याचं आव्हान
‘मिशन मंगल’ सिनेमा बघून आपलं मंगलयानही आत्महत्या करेल!
फेसबूकर्स पूरग्रस्तांसाठी कशी मदत करतात, याचं कुबेर ग्रुप हे उदाहरण
(मिळून साऱ्याजणीच्या ऑगस्ट अंकातला एका शोकांत जीवनवाट्याची नायिका या लेखाचा संपादित अंश.)