शेतकऱ्याच्या पोरासाठी झटणाऱ्या पंजाबरावांचा वारसदार विदर्भाला कधी मिळणार?

१० एप्रिल २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन. पंजाबरावांनी भारताच्या शेतीला नवं वळण दिलं. प्रतिकुल परिस्थितीत इंग्लंडमधे शिकून आलेल्या पंजाबरावांनी विदर्भात शिक्षणाचा पाया रचला. आंतरजातीय लग्न करून पंजाबरावांनी जातीप्रथेला धक्का दिला. पंजाबरावांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा वेध घेणारा हा लेख.

भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख निव्वळ विदर्भचं नाही तर संपूर्ण देशाच्या समाजकारण, राजकारण आणि शिक्षणाच्या क्षेत्रातले कर्मयोगी आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत फक्त आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या भरवशावर विदर्भातल्या टिकलीएवढ्या गावातून थेट केंब्रिज विद्यापीठापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. 

ब्रिटनमधल्या एडिंबरो युनिवर्सिटीतून त्यांनी एम. ए. ऑनर्स, तर ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतून बार ऍट लॉ आणि पीएचडी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. पीएचडीच्या त्यांचा विषय होता, वैदिक वाड्मयात धर्माचा उगम, विकास आणि त्याचा आंतर संबंध. 

ज्योतिबांचा वैचारिक वारसदार

एवढी दैदिप्यमान शैक्षणिक कारकीर्द असताना कष्टकऱ्यांच्या वेदनेशी नाळ जुळलेला तुकोबा,  ज्योतिबाचा हा वैचारिक वारसदार, बॅरिस्टर असलेला हा व्यक्ती स्वदेशीच्या प्रचार प्रसारासाठी पदयात्रा काढायचा. स्वतःच्या खांद्यावर खादीच्या कापडाचा गठ्ठा घेऊन एक बॅरिस्टर आपल्या अमरावती जिल्ह्यात ११६ मैल अंतराची पदयात्रा काढतो, हे आजही लोकांना अविश्वसनीय वाटतं.

पंजाबरावांनी अमरावतीच्या कोर्टात वकिली करताना शिवाजी मराठा हायस्कूलमधे एक पैसाही न घेता शेतकऱ्यांच्या पोरांना इंग्रजी, संस्कृत, गणित आणि भूगोल हे विषय शिकवण्याचा काम केलं. वकिली करताना कुठल्याच पक्षकाराला फीसाठी अडवणूक केली नाही. नोव्हेंबर १९४५ मध्ये इंग्रजांनी आझाद हिंद फौजेच्या विरोधात देशद्रोहाचे खटले भरले होते. तेव्हा आझाद हिंद फौजेचे वकील म्हणून जवाहरलाल नेहरूंसारख्या मातब्बर वकिलाच्या टीममधे भाऊसाहेबसुद्धा सहभागी होते आणि तेही विनावेतन केस लढले.

हेही वाचा : पंजाबराव देशमुखांना आपण आतातरी स्वीकारायला हवं: डॉ. स्वामिनाथन

शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे

अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात कथित अस्पृश्य समजल्या जाणाऱ्यांना प्रवेश नव्हता. अशा प्रवेशाला धर्माचे ठेकेदार विरोध करायचे. मांगोजी नामक कथित अस्पृश्य व्यक्तीने मंदिर प्रवेश करून दर्शन घेतलं म्हणून मंदिर प्रशासनानं पोलिस केस करून खटला भरला होता. भाऊसाहेबांनी त्या व्यक्तीची केस चालवली. आणि या खटल्यातून त्याला निर्दोष सोडवून घेतलं. एवढंच नाहीतर पंजाबरावांनी सनातन्यांचा प्रचंड विरोध झुगारून अस्पृश्यांसाठी मंदिराची कवाडं खुली करून दिली.

१९२७ मधे महाराष्ट्रात समाजमन ढवळून दोन घटना घडल्या. एक म्हणजे मार्च महिन्यात चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि दुसरी म्हणजे अंबादेवी प्रवेश सत्याग्रह. भाऊसाहेबांच्या या आंदोलनाची दखल कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनीही घेतली. या आंदोलनात भाऊसाहेबांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचंही सहकार्य मिळालं. नंतरच्या काळात विदर्भभर या आंदोलनाचे पडसाद उमटले. अमरावती जिल्ह्यात विहिरी आणि पाणवठे अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले. बघताबघता विदर्भाच्या इतर जिल्ह्यांतही हे लोण पसरलं.

भाऊसाहेबांचा सर्वच जातीधर्मात मित्रपरिवार होता. वेगवेगळ्या संघर्षकाळात त्यांनी हा सारी दोस्त दुनियादारी जोडली. मंदिर प्रवेश आंदोलन आणि देवस्थान संपत्ती बिलाच्या वेळेस धर्मवाद्यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली. प्रसंगी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ब्राम्हणेतर चळवळीचा विरोध पत्करला. विमलाताई वैद्य यांच्याशी आंतरजातीय लग्न करून सरंजामी वृत्तीविरोधातही मोठं बंड केलं.

हेही वाचा : पॅथॉलॉजीविषयी ४ : ब्लड बँकमुळे जीवन आणि पोस्टमॉर्टममुळे मृत्यू समजतो

विद्यार्थ्यांसाठी निजामाचीही घेतली मदत

ख्रिस्त महंमद मांग ब्राम्हणाशी, धरावे पोटाशी बंधुपरी हा विचार महात्मा फुल्यांनी सांगितला. भाऊसाहेबांनी १९२६ मधे अमरावती जिल्ह्यात सर्वप्रथम श्रद्धानंद छात्रालय स्थापन करून तो प्रत्यक्ष साकारला. जातीअंताच्या लढाईसाठी सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना एकत्र आणून अगदी नाममात्र दरात जेवणाची सोय तसंच राहण्याची व्यवस्था केली. गरजुंना ही व्यवस्था विनामूल्य उपलब्ध करून दिली. आपले गाडगेबाबांही भाऊसाहेबांच्या या कृतिशीलतेचं प्रशसंक आणि हितचिंतक होते. बाबांनीही वेळोवेळी या छात्रालयातल्या विद्यार्थ्यांना मदत केली.

विदर्भामधे आपल्याला सध्या जे काही शैक्षणिक वातावरण, प्रगती दिसते याचं फार मोठं श्रेय गाडगेबाबा आणि भाऊसाहेबांना जातं. शिक्षण हे कुठल्या एका जातीची मिरासदारी होऊ नये आणि वंचिताना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी भाऊसाहेबांनी १९३१ मधे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी भाऊसाहेबांनी जीवाचं रान केलं. गुणवंत शिक्षकांना हेरलं. 

विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी प्रसंगी सनातन्यांचा विरोध पत्करून हैद्राबादच्या निजामाकडून आर्थिक मदत घेतली. एवढंच नाही तर स्वतःचा बंगला गहाण ठेवून सर्वसामान्यांसाठी शिक्षणाचा हायवे मोकळा करून दिला.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनाः मुस्लिम माऊली कुछ तो सोचोना, बोलोना

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं होतंय जगभर कौतूक

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आरक्षण मागणारी पार्टी

युरोपियन देशाच्या लोकशिक्षण पद्धतीचा अभ्यास करून ३० डिसेंबर १९५० ला श्री शिवाजी विद्यापीठाची स्थापना केली. ग्रामीण भागात वैचारिक आणि कार्यक्षम नेतृत्व निर्मितीसाठी या विद्यापिठांतर्गत जनता कॉलेज सुरू केलं. ही संस्था काही निव्वळ विदर्भापुरती मर्यादित नव्हती. १९६३ मधे संस्थेनं थेट लंडनमधे श्री शिवाजी वसतिगृह स्थापन केलं होतं

परदेशात शिकून आलेल्या भाऊसाहेबांनी शिक्षणासोबतच शेती, समाजकारण, राजकारण या क्षेत्रातही अतुलनीय कामगिरी केली. एकाचवेळी अनेक पातळ्यांवर त्यांचं काम चालायचं. एकीकडे अस्पृश्य समजल्या जातींना त्यांचे हक्क मिळवून देण्याचा लढा उभारायचे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी संघटित होऊन अन्यायाविरोधात संघर्ष करावा म्हणून १९२७ मधेच 'शेतकरी संघ' या पक्षाची स्थापना करायचे. कुठलंही काम उभं करताना त्यात सर्व जातीधर्माच्या लोकांचा सहभाग असला पाहिजे यावर त्यांचा विशेष कटाक्ष असायचा.

शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण व सरकारी नोकरीत ८० टक्के आरक्षण असावं. विशिष्ट उत्पन्नाची अट न ठेवता प्रत्येक प्रौढाला मतदानाचा अधिकार मिळावा. शेतकऱ्यांची बँक काढून कमी व्याजदरात दीर्घ मुदतीचं कर्ज उपलब्ध करावं. देवस्थानाच्या मालमत्तेचा उपयोग शिक्षणासाठी आणि दवाखान्यासाठी करावा. महाविद्यालयीन तरुणांसोबत इतरांना लष्करी शिक्षण सक्तीचं करावं, या शेतकी संघ पक्षाच्या प्रमुख मागण्या होत्या. शेतकऱ्यांची कैफियत मांडण्यासाठी पक्षानं 'महाराष्ट्र केसरी' नावाचं मुखपत्रही सुरू केलं होतं.

हेही वाचा : जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी

देवस्थानांची संपत्ती जनतेसाठी वापरा

भाऊसाहेबांनी आपल्या उण्यापुऱ्या ६७ वर्षांच्या आयुष्यात पायाभूत सोयीसुविधांच्या उभारणीचं काम केलं. खेडोपाडी शिक्षणाचा प्रचार व्हावा म्हणून सत्यशोधक जलशांसाठी वग लिहिले. १९४५ मधे सत्तेचे गुलाम या नाटकात कलाकार म्हणून भूमिका निभावली. 

तेव्हाच्या मध्य प्रांतात मंत्री असताना 'कर्ज लवाद बिल' हा क्रांतिकारी कायदा पास करून त्याची अंमलबजावणी सुरू केली. यामुळे विदर्भातल्या ९० टक्के शेतकऱ्यांच्या जमीन सावकारांच्या घशातून सुटका झाली. या कायदेनिर्मितीचा २५ ऑगस्ट १९३२ हा दिवस विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी मुक्तिदिनच ठरला. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचा कायदा तयार करण्यात आला होता.देशाचे पहिले कृषीमंत्री म्हणून काम करताना भाऊसाहेबांनी देवस्थान संपत्ती बिल आणलं. एखाद्या धार्मिक संस्थेजवळ गरजेहून अधिक पैसा साठतो तेव्हा तिची श्रद्धा नारायणाऐवजी लक्ष्मीवर जाऊन टेकण्याची भीती निर्माण होते. महात्मा गांधीजींचा हा विचार कृतीत आणण्यासाठी भाऊसाहेबांनी प्रयत्न केला. पण दुर्दैवाने ते बिल काही कट्टर धर्मवाद्यांमुळे मंजुर होऊ शकलं नाही.

हेही वाचा : नऊ जणांच्या हौतात्म्यातून झालेल्या कृषी विद्यापीठाची पन्नाशी

जागतिक कृषी प्रदर्शनाची गोष्ट

१९६० मधे भाऊसाहेबांनी दिल्लीत जागतिक कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. याद्वारे जगभरात चाललेल्या कृषीविषयक प्रयोगांची प्रात्यक्षिकं आणि कृषियंत्र सामग्री पाहण्याची संधी देशवासियांना उपलब्ध झाली. जगातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ही पृथ्वी सुंदर करावी असं आवाहन भाऊसाहेबांनी केलं होतं. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर हे या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आले होते.

प्रदर्शनाचा माहोल बघून आयसेनहॉवरही आश्चर्यचकित झाले. स्वातंत्र्य मिळून १५ वर्ष झालेला एक देश किती देखणं जागतिक दर्जाचं प्रदर्शन भरवतो, याबद्दल त्यांनी भाऊसाहेबांची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. आत्ता आपल्याकडे गावोगावी, जिल्होजिल्ही कृषी प्रदर्शन भरतात. अनेकांचा तो व्यवसाय झालाय.

इथं एक प्रसंग सांगितला पाहिजे. ऑक्टोबर १९२८ मध्ये एका ट्रकनं भाऊसाहेबांच्या कारला जोरदार धडक दिली. पण यातून भाऊसाहेब बालंबाल बचावले. भाऊसाहेबांना थोडी दुखापत झाली. हा जाणीवपूर्वक घडवून आणलेला अपघात होता, असं अनेकांचं म्हणणं होतं. आपला अक्षरशः जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या ड्रायव्हरला कुठलीही शिक्षा न करता भाऊसाहेबांनी त्याला मोठ्या मनाने माफ केलं.

असा नेते होणे नाही!

भाऊसाहेबांचं संपूर्ण आयुष्य हे धकाधकीत आणि धावपळीत गेलं. त्यांनी भारत सेवक दल, श्री शिवाजी व्यायाम प्रसारक संस्था, मधमाशी पालक संघटना, लाखोंसाठी अन्न संघटना Meals for Millions India, भारत कृषक समाज, युवक कृषक समाज, राष्ट्रीय कापूस व्यापारी संघटना, कृषक सहकारी पेढी, अखिल भारतीय खरेदी विक्री संघटना, ऑल इंडिया बॅकवर्ड क्लासेस फेडरेशन यासारख्या संघटनांचं अध्यक्षपद भूषवलं. त्यांचा विस्तार केला.

भाऊसाहेब भारतीय राज्यघटना समितीचे सदस्यसुद्धा होते. बाबासाहेबांनी भाऊसाहेबांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले होते. शिक्षणाद्वारे लाखो शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं आयुष्य उजळवणारा डॉ. पंजाबराव देशमुख नावाचा तेजस्वी सूर्य १० एप्रिल, १९६५ ला अस्ताला गेला.

भाऊसाहेबांची वैचारिक उंची अफाट होती. भाऊसाहेबांसारखा वैचारिक खुलेपणा आणि खिलाडूवृत्ती फार कमी लोकांमधे बघायला मिळते. आपल्या जवळच्या लोकांचं सोडाच, विरोधकांनाही आणीबाणीच्या काळात सहकार्य करण्यासाठी आभाळाएवढं मन लागतं. भाऊसाहेबानंतर विदर्भातला कोणताही समाजकारणी, राजकारणी ही उंची गाठू शकला नाही. किंवा आसपाससुद्धा पोचू शकला नाही.

हेही वाचा : 

महाराष्ट्राचे एक मंत्री कोरोना संशयित बनतात तेव्हा

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

तबलीगने भारतात कोरोना पसरवण्याचा कट केलाय का?

रघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो? 

भारताची इटली बनायला निघालेल्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉ़डेल बनवलं