शहरी भागात मोदी लाट असूनही भाजपची चिंता काही संपेना!

१८ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


झारखंडमधे आता शेवटच्या टप्प्याचं मतदान शिल्लक आहे. आतापर्यंतच्या मतदानात शहरी भागातल्या मतदारांत निरुत्साह दिसून आला. याउलट ग्रामीण भागात मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या. शहरी भागातला मतदारांचा हा निरुत्साह पुन्हा सत्तेवर येताना भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो.

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी काल १६ डिसेंबरला चौथ्या टप्प्याचं मतदान झालं. १५ जागांवर ६२.५४ टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्यावेळच्या तुलनेत यंदा मतदानाचं प्रमाण ३.२१ टक्क्यांनी घटलीय. शहरी भागामुळे मतदानाची ही टक्केवारी घटलीय. शहरी भागात मतदानाची टक्केवारी घटणं भाजपला पुन्हा सत्तेवर येण्यासाठी अडचणी निर्माण करणारं आहे.

भाजप कुणाविरुद्ध लढतेय

झारखंडमधल्या निवडणुकीत एक ट्रेंड दिसतोय. आपण शहरात फिरतो तसं आपल्याला भाजपचे समर्थक दिसतात. अगदी इथून जवळच असलेल्या बंगालच्या उपसागरातून भाजपची लाट आल्याचा फील येतो. काही अपवाद वगळता विरोधी पक्षांचा कुणी उमेदवार रिंगणातच नसल्याचं दिसतं. मैदानात कुणी नसताना भाजप कुणाविरोधात लढतेय, आणि कशाला एवढा प्रचार करून शक्ती वाया घालवतेय, असं वाटायला लावण्यासारखं वातावरण शहरी भागात आहे.

याउलट ग्रामीण भागात भाजपला तितका जनाधार दिसत नाही. जसं जसं आपण आदिवासीबहुल भागात जातो तसंतसं आपल्या अरे इथे तर भाजपचं अस्तित्वच नाही, असं वाटायला लागतं. जसं शहरी भागात विरोधी पक्षांचं अस्तित्व नसल्याचा भास होतो.

तसा हा ट्रेंड सर्वसाधारण स्वरुपाचा आहे. आपल्याकडे महाराष्ट्रातही बनिया पार्टी अशी ओळख असलेल्या भाजपला २०१४ च्या निवडणुकीपर्यंत गावखेड्यांत आपलं साधं अस्तित्वही निर्माण करण्यासाठी प्रचंड झगडावं लागलं. अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण झारखंडच्या बाबतीत या ट्रेंडमधे एक वेगळेपण आहे. आणि निवडणुकीच्या राजकारणात त्याचा भाजपला चांगलाच फटका बसू शकतो.

हेही वाचा : आदिवासीबहुल झारखंडमधे ओबीसी राजकारणाला अच्छे दिन

घटलेला टक्का कुणाचा घात करणार

काल झालेल्या मतदानात काही शहरांमधे घटलेली मतदानाची टक्केवारी भाजपसाठी अडचणीची बाब आहे. चौथ्या टप्प्यात १५ पैकी १२ मतदारसंघात गेल्यावेळच्या तुलनेत कमी मतदान झालं. दुसरीकडे चंदनकियारी, जमुआ आणि मधुपुर या तीन जागी मतदानाचा टक्का वाढलाय.

कोल कॅपिटल अशी ओळख असलेल्या धनबादमधे आदिवासी समाज खूप कमी आहे. मोदी लाटेच्या खूप आधीपासून इथे वेळोवेळी भाजपचा उमेदवार जिंकत आलाय. गेल्यावेळी भाजपचे राज सिंह हे 50 हजार मतांनी जिंकले होते. यावेळी मतदानाच्या टक्केवारीत तब्बल ६.५८ टक्क्यांनी घट झालीय.

चौथ्या टप्प्यात सर्वाधिक मतदानाची घट धनबाद मतदारसंघातच नोंद झालीय. इथल्या मतदारांशी बोलल्यावर यंदाही भाजपच्या उमेदवाराच्या बाजूने वातावरण असल्याचं दिसतं. पण मतदानाची घटलेली टक्केवारी भाजपसाठी चिंतेचा विषय आहे.

स्टील सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोकारोत गेल्यावेळी भाजपच्या बिरंची नारायण यांनी राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवलं होतं. इथे एकूण मतांच्या ४३ टक्के मतं भाजपला, तर त्या खालोखाल १० टक्के मतं काँग्रेस उमेदवार मंजूर अन्सारी यांना मिळाली होती. दोघांच्या मतातला फरक २७.२२ टक्के एवढा होता. पण यंदा बोकारोमधे मताची टक्केवारी २.८३ टक्क्यांनी घटून ५३.४७ वरून ५०.६४ टक्क्यांवर आलीय. 

ग्रामीण भागातल्या टुंडीत वाढलं मतदान

दुसरीकडे, टुंडी मतदारसंघात चौरंगी लढत झाली. भाजपसोबतच झारखंड मुक्ती मोर्चा, झारखंड विकास मोर्चा आणि ऑल झारखंड स्टुडन्ट युनियन या प्रादेशिक पक्षांनी ताकद लावल्याने मतदानाचं प्रमाण आठ टक्क्यांनी वाढलंय. मतदानाचा टक्का ५९.५६ वरून ६७.५४ टक्क्यांवर गेलाय.

भाजपशिवायच्या तिन्ही पक्षांना ग्रामीण भागात चांगला जनाधार आहे. गेल्यावेळी आजसूच्या राजकिशोर महतो यांनी झामुमोच्या मथुरा महतो यांचा हजारभर मतांनी पराभव केला होता.

शहरातल्या मतदारांमधे निरुत्साह असतानाच विरोधी पक्षांचे पारंपरिक मतदार असलेल्या बूथवर मात्र लांबच लांब रांगा दिसल्या. आदिवासी, अल्पसंख्यांकबहुल मतदान केंद्रांवरच्या या रांगा भाजपची डोकेदुखी वाढवणाऱ्या आहेत. प्रशासनाने शहरांमधे मतदानाचा टक्का वाढावा म्हणून मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे कार्यक्रम राबवले. धनबादसारख्या शहरात तर राजकीय पक्षांच्या बनरबाजीपेक्षा निवडणूक आयोगाची बॅनरबाजीच नजरेस भरणारी होती.

हेही वाचा : झारखंडचं भविष्य महिला ठरवणार, तिकीट देताना प्राधान्य मात्र पुरुषांना

भाजप म्हणजे शहरी तोंडवळ्याची बनिया पार्टी

शहरी तोंडवळा असलेल्या मतदार ही भाजपची आजच्या राजकारणतली सगळ्यात मोठी ताकद आहे. देशभरातल्या जवळपास सगळ्याच राज्यांत शहरीकरणाचा वेळ खूप आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपसाठी वाढतं शहरीकरण ही एक बाबही पत्थ्यावर पडणारी ठरली.

भाजपने २०१४ मधे केंद्रात सत्ता आल्यावर आपला शहरी तोंडवळा पूसून काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केलाय. त्याचा परिणाम म्हणून अनेक राज्यांमधल्या निवडणुकांमधे भाजपने ग्रामीण तोंडवळा असलेल्या मतदारसंघात निव्वळ मुसंडी मारली नाही तर तिथे विजय मिळवलाय. अगदी आपल्याकडे काँग्रेसचा कुणीच धक्का पोचवू न शकलेला नंदूरबार मतदारसंघ भाजपने जिंकला.

झारखंडमधल्या शहरीकरणाचं वेगळेपण

देशातल्या अनेक राज्यांनी शहरीकरणात वेग घेतलाय. पण एकाचवेळी निर्माण झालेल्या उत्तराखंड, छत्तीसगड या राज्यांच्या तुलनेत झारखंडमधे शहरीकरणाचा वेग खूप कमी आहे. सरकारी आकडेवारीनुसार, २००० साली अस्तित्वात आलेल्या झारखंडमधे शहरी भाग जवळपास २२ टक्के होता. तो आता दोनेक टक्क्यांनी वाढून २४.०५ टक्क्यांवर पोचलाय.

नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, भाजपमधलं शहरीकरण हे काही महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरांसारखं औद्योगिकरणाचा चेहरा असलेलं नाही. झारखंडमधल्या शहरीकरणाचा तोंडवळा हा ग्रामीण आहे. आपण त्याला गावपण असलेली शहरं असं म्हणू शकतो.

इथल्या शहरांमधे भाजपचा वोटर जेवढ्या खंबीरपणे आपली मतं मांडतो, तसं विरोधी पक्षांचे मतदार अबोला धरून राहतात. विरोधी पक्षांचा वोटर अगदी दबा धरून बसल्यासारखा आहे. विरोधी पक्षांना पाठिंबा देणारे लोक नव्या माणसाला बोलायलाही तयार नसतात. मोठ्या कौशल्याने विश्वासात घेऊन त्यांना बोलतं करावं लागतं. तेव्हा कुठे ते काठाकाठाने आपली मतं मांडायला लागतात.

हेही वाचा : 

झारखंडच्या निवडणुकीत काय सुरू आहे?

झारखंडमधे नरेंद्र मोदींच्या सभेला लाखोंची गर्दी, पण

झारखंडमधे किंग नाही तर किंगमेकर होण्यासाठी ताकद पणाला

भाजपला सत्ता टिकवण्यासाठी कोयलांचल जिंकावं लागणार, कारण