बॉलीवूडवाल्यांना मराठी प्रेक्षकांची नस सापडणार तरी कधी?

२१ एप्रिल २०२३

वाचन वेळ : ४ मिनिटं


'स्कूल कॉलेज आणि लाईफ' हा मराठी सिनेमा गेल्या आठवड्यात रिलीज झाला. रोहित शेट्टीची निर्मिती असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद लाभतोय. दुसरीकडे काही आठवड्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'रौंदळ' आणि 'घर बंदूक बिर्याणी'ला मात्र प्रेक्षकांची अजूनही गर्दी होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर बॉलीवूडला मराठी प्रेक्षकांची नस ओळखण्यात आलेलं अपयश पुन्हा एकदा ठळक झालंय.

२०१६ला आलेला 'व्हेंटिलेटर' हा सिनेमा अनेकार्थाने हिट ठरला. पदार्पणातच 'फेरारी की सवारी'सारखा सुपरहिट सिनेमा देणाऱ्या राजेश म्हापुसकरांचा हा दुसराच सिनेमा होता. त्याचबरोबर मराठीतल्या तगड्या सिनेकलाकारांच्या फौजेसोबत दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरही आपल्या अभिनयाची जादू यात दाखवणार होते. याहून खास गोष्ट म्हणजे बॉलीवूडची प्रथितयश अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही या सिनेमाची निर्माती होती.

मराठी सिनेनिर्मितीचं अवजड शिवधनुष्य

प्रियांकाच्या 'पर्पल पेबल पिक्चर्स' या निर्मितीसंस्थेची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर'ने त्यावर्षीच्या तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहर उमटवली होती. नोवेंबर २०१६च्या पहिल्या आठवड्यात रिलीज झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनोरंजनात कसलीच कसर सोडली नाही. त्याचबरोबर तिकीटबारीवर घसघशीत यश मिळवत तो सर्वाधिक कमाई करणाऱ्या दहा मराठी सिनेमांपैकी एक ठरला.

बॉलीवूडमधे यश मिळवल्यानंतर मराठी सिनेनिर्मिती क्षेत्रात उतरणारी प्रियांका ही पहिलीच अभिनेत्री नव्हती. तिच्याआधीही अनेकांनी मराठी सिनेमांच्या निर्मितीचं शिवधनुष्य पेलायचा प्रयत्न केला होता. पण प्रत्येकालाच प्रियांकाइतकं यश मिळवता आलं नव्हतं. त्यातही ज्यांना आपल्या पहिल्या प्रयत्नात यश मिळालं होतं, त्यांना पुढे ते सातत्य राखण्यात अपयश आलं.

प्रियांकाही याला अपवाद नव्हती. 'व्हेंटिलेटर' बॉक्स ऑफिसवर चांगला चालल्यामुळे तिने पुढे 'काय रे रास्कला', 'फायरब्रँड' आणि 'पाणी' या तीन मराठी सिनेमांसाठी निर्माती म्हणून काम पाहिलं. यातला 'फायरब्रॅंड' नेटफ्लिक्सवर रिलीज झाला, तर 'काय रे रास्कला' म्हणजे प्रेक्षकांची निव्वळ फसवणूक होती. 'पाणी' या तिच्या शेवटच्या निर्मित मराठी सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारली होती.

हेही वाचा: जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

हिंदी निर्मात्यांचं अपयश

सध्या रोहित शेट्टी निर्मित 'स्कूल कॉलेज आणि लाईफ' या मराठी सिनेमाचे शो महाराष्ट्रातल्या काही थियेटरमधे लागलेत. रोहित शेट्टीचा निर्माता म्हणून हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. आत्ता जरी या सिनेमाला महाराष्ट्रात बऱ्यापैकी शो मिळत असले, तरीही मराठी प्रसारमाध्यमांमधे, प्रमोशनल एपिसोड चालवणाऱ्या मालिकांमधे या सिनेमाचा साधा उल्लेखही होताना दिसत नाही.

याबरोबरच सध्या 'सर्किट' हा आणखी एक मराठी सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय. या सिनेमात वैभव तत्ववादी, हृता दुर्गुळे आणि मिलिंद शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'कली' या मल्याळम सिनेमाचा रिमेक असलेला हा सिनेमा 'चांदणी बार', 'ट्रॅफिक सिग्नल' आणि 'फॅशन'सारख्या दर्जेदार सिनेमांचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी निर्मित केलाय. तिन्ही मेनस्ट्रीम चेहरे असूनही व्यवस्थित प्रमोशन न झाल्याने हाही सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरतोय.

त्यात नेहमीप्रमाणे या सिनेमांच्या अपयशाचं खापर बॉलीवूडच्या थियेटर वर्चस्वावरही फोडता येत नाही. कारण अपयशी ठरत असलेला सिनेमा जरी मराठी असला तरी त्यांचे निर्माते बॉलीवूडमधे बरंच वजन राखून आहेत, हे विसरून चालणार नाही. दुसरीकडे 'रौंदळ' आणि 'घर बंदूक बिर्याणी' या दोन्ही मराठी सिनेमांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे 'सर्किट' आणि 'स्कूल कॉलेज आणि लाईफ' या दोन्ही सिनेमांच्या अपयशासाठी त्यांच्या आशयाला जबाबदार धरावं लागेल.

प्रेक्षकांना गृहीत धरताय?

काही महिन्यांपूर्वीच बॉलीवूडचे शोमॅन अशी ख्याती असलेल्या सुभाष घईंनी 'विजेता' या मराठी स्पोर्ट्स ड्रामा सिनेमाची निर्मिती केली होती. त्याच्या प्रमोशनसाठी त्यांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'सारख्या लोकप्रिय कार्यक्रमातही आपली उपस्थिती नोंदवली होती. तरीही सुबोध भावे, पूजा सावंत आणि सुशांत शेलार सारख्या नामवंत सिनेकलाकारांचा भरणा असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यथातथाच चालला.

आपल्या हिंदी सिनेमांना तिकीटबारीवर ध्रुवासारखं अढळपद मिळवून देण्यासाठी धडपड करणारे हे निर्माते मराठी सिनेनिर्मितीबद्दल मात्र प्रचंड उदासीन वृत्ती बाळगून असतात. एक ठराविक रक्कम देऊन आपलं नाव सिनेमाच्या बॅनरवर लागलं की निर्माता म्हणून आपली जबाबदारी संपली, असा अविर्भाव त्यांच्या वागण्यातून जाणवत असतो. अगदी कथाबांधणीपासून ते प्रदर्शनापर्यंत हे निर्माते फक्त बॅनरवरच असण्यात समाधान मानतात.

जॉन अब्राहमचा 'सविता दामोदर परांजपे', अनुराग कश्यप आणि ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा या जोडगोळीचा 'वक्रतुंड महाकाय' ही अशीच काही फ्लॉप सिनेमांची उदाहरणं. अमिताभ बच्चन यांचा 'विहीर', अजय देवगणचे 'विटीदांडू' आणि 'आपला माणूस', अक्षय कुमार-ट्विंकल खन्नाचा '७२ मैल एक प्रवास' अशा काही सिनेमांकडे या हिंदी निर्मात्यांनी आशयाच्या दृष्टीने उत्कृष्ट मराठी सिनेनिर्मिती म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायला हवं.

घई किंवा प्रियांकासारख्या एक दोन निर्मात्यांचा अपवाद वगळला, तर कुणी आपली मराठी निर्मिती प्रमोट करायचीही तसदी घेताना दिसत नाही. आपल्या हिंदी सिनेमांना मराठी प्रेक्षकांची होणारी गर्दी पुढे आपल्या मराठी निर्मितीच्या प्रदर्शनानंतरही होईल, हा निर्मात्यांचा फाजील आत्मविश्वास या सिनेमांमधून अधोरेखित होतो. गाजलेल्या निर्मात्यांकडून ना चांगला आशय, ना सुयोग्य निर्मितीमूल्य असा मराठी सिनेमा पाहणं दुर्दैवच आहे.

हेही वाचा: 

तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?

‘मिशन मंगल’ सिनेमा बघून आपलं मंगलयानही आत्महत्या करेल!

भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या