राजा म्हणजे तो सर्वश्रेष्ठ, त्याचा हुकुम म्हणजे जणू काळ्या दगडावरची पांढरी रेघच. मात्र याला काही राजे अपवाद ठरले. त्यापैकीच एक म्हणजे राजर्षी शाहू महाराज. ज्यांनी स्वत:ला प्रजेचा सेवक म्हणवलं. शाहू महाराजांवर मावळमराठा साप्ताहिकाच्या सदरातून छापून येणाऱ्या लेखांचं ‘श्री राजा शाहू छत्रपती स्वामी’ या नावाने पुस्तक आलंय. या पुस्तकाचा प्रवास सांगताहेत लेखक सदानंद खोपकर.
राजर्षी शाहू महाराजांच्या चरित्रावर पुस्तक लिहावं ही माझ्या अंतरीची आस होती. ती यंदा पूर्ण होताना मन आनंदानं भरून आलंय. राजा शाहू छत्रपती स्वामी ही माझी सोळावी साहित्यकृती. ‘मावळमराठा’ साप्ताहिकातून गेले वर्षभर या सदरातून शाहू महाराज आपले मनोगत उलगडत आहेत आणि राजांच्या अंतरंगात सर्वसामान्य माणूस, अतिगरीब, दीनदुबळ्यांविषयी अथांग माया भरून राहिली होती तिचे दर्शन वाचकांना होतहोते.
शाहू महाराजांविषयी मराठी वाचकांना जी काही माहिती होती ती फक्त अभ्यासाच्या पुस्तकांतून आणि त्यांच्या स्मृतिदिन, पुण्यतिथी निमित्त वृत्तपत्रांत होणाऱ्या लेखांतून किंवा संमेलनांतून, राजकारणी किंवा पुढाऱ्यांच्या भाषणांतून.
गेल्या शंभर वर्षात शाहू महाराजांविषयी अक्षरशः शेकडो ग्रंथ, पुस्तकं आणि अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित झालेत. रयतेच्या मनात देवत्व प्राप्त झालेल्या या राजर्षींविषयी त्याहून अधिक ते आपण काय लिहिणार, अशी विनम्रतेची भावना माझ्या मनात होती. पण लिहिण्याची अंतःप्रेरणा स्वस्थही राहू देत नव्हती.
हेही वाचा: शिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी
शाहू महाराज आपलं जीवन चरित्र, आठवणींच्या स्वरूपात सांगत आहेत, अशी शैली मी स्वीकारली. आधुनिक काळातल्या वाचकांना, स्वतःला शेतकरी म्हणवणं या राजांचं साधेपण इतकं भावलं की गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या स्तरांतून वाचक आपली मतं कळवत होते. शाहू महाराजांच्या जीवनातील अमूक प्रसंगावर लिहा अशा सूचनाही करत होते.
राजा असूनही शाहू महाराजांना आयुष्यभर जी संकटं, यातना आणि संघर्ष झेलावं लागलं त्याची इतिहासातून वर्णनं वाचतांना अनेकदा प्रयत्न करूनही डोळ्यातले अश्रू आम्ही रोखू शकलो नाही.
त्या काळात आणि अगदी आताही हे मनोगत लिहित असतानाही, राजर्षींची भव्य, साध्या पेहरावातली मूर्ती नजरेसमोर आहे. आपण केलेली शब्दसेवा राजर्षींना भावत आहे, अशी कृतार्थ भावना त्यामुळेच माझ्या मनी आहे.
हेही वाचा: महात्मा फुले अमर आहेतः प्रबोधनकार ठाकरेंचा दुर्मीळ लेख
शककर्ते शिवराय आणि त्यांच्या राज्याभिषेकाचं पुनरुज्जीवन करणारे शाहूराय दोन्ही व्यक्तिमत्वांत विलक्षण साम्य माझ्या वर्षभराच्या अभ्यासात मला आढळलीत. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असं म्हणणारे शिव छत्रपती आणि मी रयतेचा सेवक आहे, मला साधा शेतकरी म्हणा, असं म्हणणारे छत्रपती शाहू महाराज ही महाराष्ट्रभूमीनं दिलेली तेजस्वी रत्नंच.
राजर्षी शाहू महाराजांबद्धलचा माझा अभ्यास परिपूर्ण आहे असा माझा दावा नाही. अगणित विचारधन त्यांच्या मनोवृत्तीचा अभ्यास करू पाहतील, अशी माझी भावना आहे. दरपिढीतल्या नवनव्या लेखकांनी राजर्षींच्यी विचारांचा, कर्तृत्वाचा अभ्यास करावा अशी आग्रहाची विनंती.
हेही वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार
श्री राजा शाहू छत्रपती स्वामी पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकासाठी वेळातवेळ काढून प्रस्तावना लिहिण्याची तयारी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ अध्यक्ष दैनिक पुढारीचे मंत्रालय प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार दिलीप सपाटे यांनी दर्शविणं ही सर्व राजर्षी शाहूरायांची कृपा असेच मी मानतो.
कला क्षेत्रातले प्रदीप म्हापसेकर यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून शाहू महाराजांचं समरसून मुखपृष्ठ केलं. सुगी ग्राफिकस्च्या सुरेखा राणे, श्वेता घमसे यांनी अक्षर जुळवणी. मुद्रित शोधन रमाकांत मुकादम यांनी केलं. दै. निर्भय पथिकचे संपादक अश्विनीकुमार मिश्र यांचे आशीर्वाद तसंच निधी प्रिटिंग प्रेसचे मनोज नायक यांचं सहकार्य मोलाचं आहे. सीमंतिनी, सुपुत्र शैलेंद्र, कृपा शैलेंद्र खोपकर यांच्याही शुभेच्छा आहेत. माझ्या पुस्तकांचं स्वागत करणारे सर्व वाचक, रयतेच्या रत्नांची केलेली ही शब्दसेवा रूजू करून घेतील असा विश्वास बाळगतो.
हेही वाचा: जोतिबाच्या नावानं चांगभलं ही संपूर्ण मानवजातीच्या भल्याची मागणी