व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!

२५ जुलै २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


महेश केळुसकर यांचा ‘निद्रानाश’ हा अत्यंत गाजलेला कवितासंग्रह. बिघडत चाललेलं वर्तमान, घराजवळ पोचलेली हिंसा, साध्या गोष्टींमागचे भीषण वास्तव आणि अस्तित्वासमोरचे निर्णायक प्रश्नचिन्ह मांडणारी ही कविता वाचून आपलीही झोप उडेल. भारतीय तत्त्वज्ञानाचा आधार घेत जगण्याचं नेमकं स्वरूप उलगडण्याचा प्रयत्न केळूसकरांनी केला आहे.

भारतीय संस्कृतीत दर्शनांना एक विशिष्ट महत्त्व आहे. आपल्या अवघ्या जगण्याला कवटाळून बसलेली ही दर्शन शास्त्रं आपल्या अस्तित्वाचं तत्त्वज्ञान मांडतात. अशाच प्रकारच्या तात्त्विक अंगाने किंवा दार्शनिक अंगाने समकालीन क्रौर्याचं, भयाचं आणि हरवत चाललेल्या जगण्याचं नेमकं स्वरुप उलगडण्याचा प्रयत्न डॉ. महेश केळुसकर यांनी 'निद्रानाश'च्या निमित्ताने केलेला आढळतो.

स्वत: एक कवी आणि आकाशवाणीसारख्या संस्थेच्या सेवेत असल्याने केळुसकर भोवतालच्या घटनांकडे वृत्तीगांभिर्याने पाहत आलेत. गेल्या तीन चार दशकांपासून ते सगळे बदल टिपत आलेत. समष्टीचं भान आणि लोकपरंपरेची जाण यातून त्यांच्या कवितेची घट्ट वीण बनलीय. कोकणातल्या खेडयातून ते आले असल्याने त्यांना ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांचे प्रश्न माहीत आहेत.

हेही वाचा : तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

पाठीवर पडलेल्या झुरळाची अवस्था

सभोवतालच्या दृश्य, अदृश्य बदलांनी मानवी जीवन ढवळत जाताना आणि त्यातून भरडत निघत असताना लोकांची मानसिकता भलतीकडेच कशी जात आहे याबद्दल कवी उद्विग्ऩ होतो. लोकांच्या संवेदनशीलतेचं भलतंच रूप कवीला अस्वस्थ करतं.

लोक लाच देतात, आपण देतो
लोक लाच घेतात, आपण घेतो
लोक बोलतात खूप भ्रष्टाचाराविरुद्ध
आपणही बोलायला हवं;
पण आपल्या लोकांसोबत चालायला हव
आपण आपल्याच लोकांविरूध्द बोलून कसं चालेल?

लोकांची विचारशक्ती भरकटत असल्याचं पाहून कवीच्या मनाची अवस्था पाठीवर पडलेल्या झुरळासारखी झालीय. ते जिवाच्या आकांताने हातपाय झाडत राहतं. आतून आलेल्या संताप, चीड यामुळे त्याला पुण्याचा गळा पकडायचा आहे. इथं मनात क्रौर्य वाढत असल्याचं आणि सहिष्णुता संपत चालल्याचं अगतिक सूचन कवी करतो.

मग तो लोकलयीच्या लयीत 'तुजवीण शंभो मज कोण तारी' या धर्तीवर ‘तुजविण मज आता’ ही कविता या संग्रहात आहे. लेखनातल्या साहित्यिक संघटनेच्या बारकाव्यांच्या दृष्टीने शैलीविडंबनात मोडणारी प्रस्तुत कविता आहे. आपली अगतिकता प्रभावीपणे व्यक्त करणारी ही कविता आहे.

पाडगावकरांचा सहवास

पूर्वसूरींच्या गाजलेल्या रचनांची आठवण करून देताना केळुसकर आपले उपरोधाचे हत्यार मिश्किलपणे चालवताना दिसतात.

पिढीमागून रे पिढी वांझ येते
पहाटे पहाटे इथे सांज होते..
दिव्यांच्या तळाशी तमाचीच छाया
सुटेना सुटेना जिवा लाभ माया...

महेश केळुसकर एकाच वेळी मुक्तछंद आणि वसंततिलका, पृथ्वी इ. वृतांमधे कविता लिहीतात. 'पाडगावकर आणि वसंत सावंत या दोन दिग्गज कवींचा केळुसकरांना सहवास लाभलाय. त्यामुळे निसर्ग कविता, भावकविता आणि वृत्तबध्द कविता केळुसकर लिहितात. उदा. भुजंगप्रयात या वृत्तात लिहिलेली 'चंद्र काळा' ही कविता या संग्रहात आहे.

कुणी सोबतीला कसे येत नाही,
तुझा देवही सांग गेला कुठे?
रहाटावरी मध्यरात्री भुताला
अकस्मात का हुंदकाही फुटे?

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

आपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

सामाजिक आत्महत्येचे ताजे ठसे

व्यवसायाने आकाशवाणीवर अधिकारी असल्याने त्यांना पत्रकारितेचे एक जागते भान आहे. त्यामुळे त्यांच्या मिश्किल विरुपिकाही अंगावर येतात. 

आम्ही मेलो की सुटलो - तुम्हांला मरण नाही
कबर नाही, सरण नाही, यमदूतांनो...
किती वळत असतील पाय तुमचे
येरझारा घालून -घालून
तुमची म्हातारी आई कधी खोबरेल तेल लावते का
तुमच्या तळपायांना, कंदिलाच्या उजेडात?

किंवा

असे कसे झाले, बघता बघता असे कसे झाले ?
कोल्ह्या-कुत्र्यांचे वाघ-सिंह झाले,
वाघ -सिंहाचे ससे झाले...

अशी वरवर सुरुवात करुन पुढे कवी भोवतालाचे सुन्न वर्तमान पुढयात ठेवतो,

दिसताहेत जंगलवाटांवरुन सार्वत्रिक
सामाजिक आत्महत्यांचे ताजे ठसे ओले...

एखादा तरी गाव पृथ्वीवर असावा

लहानपणी हवाहवासा वाटणारा गाव आणि गावकूसही आता कूस बदलून टाऊन बनत चालले आहे .विकासाचा भकास वारा गावाच्याही मस्तकात भणभणत आहे. शहरी, कचकडी दुनियेतील चमचमाहट गावातही पोहोचली आहे. याची नोंद घेताना कवीची भाषा कडवट होत जाते- 

हे एक गाव
विसरून गेलंय आपलं नाव, आपला ठाव
...गावात शारूख खान वाढलेत
नि एमआयडीसीतून पर्सा लटकावत ऐश्वर्यांचे तांडे.
...प्रगती आहेच आणि विकासही
५ व्हिडीओ पार्लर्स, १० बार, १३ पुढारी
१५ चायनीज गाडया, ३० रिक्षा

गावाच्या आठवणीत रमणे या नॉस्टाल्जिक अंगाने कवी गावाकडे पाहात नाही. कारण गाव आणि कवी या दोघांनीही एकमेकांना सोडल्याचे कवी नोंदवतो -

गावा, सोडले तुला, तूही सोडले मला :
जसा पेरला दाणा तसाच उगवला !
ठेवू जपून आपण राख गणगोताची....

पण तरीही एखादा तरी गाव शिल्लक असू पृथ्वीवर म्हणून गावाच्या बाजूने कवी गावदेवाला कौल मागतो.

हेही वाचा : आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

काहीतरी दैवी घडण्याची इच्छा

जगण्याच्या या उद्यमशील आणि बेसुमार वेगात सुखासीन यंत्रांमुळे एक इवलीशी चिमणी शॉक लागून मरते याची नोंद कवीचे संवेदनशील मन घेत राहते. केळुसकरांच्या बहुतेक कवितांची प्रकृती ही 'घरेलू परिचिताला अनोखे रूप देण्याचा प्रयत्न करणं' या पद्धतीची आहे. म्हणजे वर्डस्वर्थच्या परंपरेतली ही कविता आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण केळुसकरही दैनंदिन जीवनातल्या परिचित घटिताला लोकविलक्षण रूप देण्यात वाकबगार आहेत. या दृष्टीने संग्रहातील 'चापट', ‘सावल्या : तीन चित्रं’, ‘भातुकली’ आणि ‘निद्रानाश’ या कविता हा अनुभव अधिक तीव्रतर देतात.

'कवी आणि जादूची कांडी' ही कविता फँटसीच्या अंगाने जाते. अशक्य, असंभव गोष्टी वास्तवात होताना त्यावर अनुभवाची विपरित मांडणी हे या कवितेचे वैशिष्टय म्हणता येईल. याबरोबरच काहीतरी दैवी, मिरॅक्युलस झाल्याशिवाय इथली व्यवस्था बदलणार नाही, अशी मराठी माणसाची दैवशरण मानसिकतेकडेही ही कविता निर्देश करते.

रात्रीचा एक वाजलाय आता,
डोळ्यांवर झोप येतेय...
दूरवरून कुणाचे हुंदके ऐकू येताहेत मला ;
पानांच्या पांघरुणात, झाडं हुस्कारून हुस्कारून 
मुळांवर घट्ट मुळं दाबून रडत असतील का?

ही कविता केळुसकरांची तरल आणि प्रातिभ अनुभूती अधोरेखित करते. भोवताल विषम होत जाताना, जगण्याच्या घिसाडघाईतही बिघडत चाललेल्या वर्तमानाची नोंद कवीच्या नेणीवेत घेतली जाते आणि मग विपरित भविष्याचे सूचन करताना कवी भाकिते करतो - 

पुढे पुढे दिवस आणखी कठीण येत जातील
मद्यालयांची देवालयं, न्यायालयांची प्रतिक्षालयं होतील
लोकांना कळणार नाही कुणाची घ्यावी बाजू...

किंवा

'म्हातारपणी खाऊ नये पोटभर, दोन घास कमीच जेवावं'
मोफतचा सल्ला मिळेल देशाला.
परदेशी पाहुणे आल्यावर
बाहेरच्या खोलीत यायला केली जाईल बंदी.
बाथरुममधे पाय घसरून पडताना
तारांबळ उडेल देशाची....

जागरण चढत जातं दारूसारखं

महानगरी संवेदन आणि मुंबईची स्थळ समीक्षा या दृष्टीने 'मुंबईच्या कविता' महत्त्वाची कविता आहे. विंदा करंदीकरांचा प्रभाव केळुसकरांच्या 'मुंबईच्या कविता', 'निमूट झोपी गेलो' अशा काही कवितांवर जरूर दिसतो. पण तरीही केळुसकरांची स्वतंत्र शैली, तिरकस भाष्य, मध्यमवर्गीय जाणीव आणि अनुभवाची सेंद्रिय वीण त्यांच्या कवितेतून प्रतीत होत राहते.

बिघडत चाललेले वर्तमान, घराजवळ पोहोचलेली हिंसा, साध्या गोष्टींमागचे भीषण वास्तव, अस्तित्वासमोरचे निर्णायक प्रश्नचिन्ह मांडणारी ही कविता आहे. समकालीन क्रौर्याचे विरुप दर्शन घडवणारी ही कविता आहे. व्यवस्थेकडून सातत्याने थकवलं आणि ठकवलं जाणं कवीला सहन होत नाही. म्हणूनच तर झोप उडाली आहे, दारूसारखं जागरण चढत जातं आणि हा निद्रानाश अटळ आहे!

हेही वाचा : 

कुछ वायरस अच्छे होते है!

श्वासाच्या हक्कांसाठीचा लढा

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

शेणगोळ्यांची फुलं करणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा

ग्लोबल लोकल मेळ घालायचा, तर महात्मा फुले हवेतच

आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

‘युगानयूगे तूच’: समग्र बाबासाहेबांकडे घेऊन जाणारी कविता