मुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे! जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं.
'आपण नदीपासून दुरावत गेलो की आपलं उदात्तपणही हिरावून गेलं. माणसाच्या जगण्यातला निसर्गदत्त आणि निसर्गरूप विचार एवढीच सरळसोट असलेली संस्कृतीची व्याख्या आपण तोडून मरोडून आपल्या सोयीनुसार बदलून टाकली आणि संस्कृतीच्या नावाखाली वाटेल ते लादण्यास सुरवात केली. विकास या शब्दाखाली सारेच निभावून नेण्याचा प्रयत्न केला.'
नदीष्ट कादंबरीचा सुरवातीचा हा परिच्छेद. 'नदीष्ट' ही यंदा प्रकाशित झालेली कादंबरी. मुळात, कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या या कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे!
नदीच्या खोऱ्यात संस्कृती विकसित झाली. वाढली. रुजली. काळ बदलला तशी संस्कृती बदलत गेली. आता पैशांच्या लालचेपोटी लोक नदीतली वाळू उपसतात ही गोष्ट लेखकाला बेचैन करते. बोरगावकर यांना नदीचा गाभा हा स्त्रीच्या गर्भाशयासारखा वाटतो. जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं.
आज आपण बर्याचदा आत्ममग्न आयुष्य जगतो. आपल्याला कुणाचं काही देणंघेणं नसतं. हे आत्ममग्न वागणं मध्यमवर्गाचा - प्रस्थापित वर्गाचा स्वभावच नाही तर त्यांची जीवनशैली असते. मात्र लेखक, आयुष्य जगताना कायम माणूसपण सोबतीला ठेवतो. खरंतर ते माणूसपण प्रत्येकाने सोबत ठेवायला हवं. लेखक ठेवतो. त्यामुळे लेखक त्याला नदीवर भेटणाऱ्या उपेक्षित जिवांच्या कहाण्या जाणून घेतो.
ज्यांचं माणूसपण नाकारलं त्यांना माणूस म्हणून समजून घेतो. त्यांच्याशी माणूस म्हणून वागतो, बोलतो आणि त्यातून उलगडत गेलेल्या त्या उपेक्षित लोकांच्या दुःखाची गोष्ट सांगतो. या कादंबरीत आपल्याला सकिनाबी, कालुभैय्या, पुजारी, बामनवाड, मालाडी, दादाराव, सर्पमित्र प्रशांत, भिकाजी ही पात्रं भेटतात. या प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आहे. या सगळ्यांचं जगणं, त्यांचा भूतकाळ जाणून घेण्याचा प्रयत्न लेखकाने केलाय.
कादंबरीतले अनेक प्रसंग, घटना या आपल्याला विचार करायला भाग पाडतात. ही कादंबरी आपल्याला माणूसपणाचा नवा दृष्टीकोन आणि जगण्याचं भान देऊन, संवेदनशील बनवते.
लेखकाला नदीवर पोहताना धडे देणारे दादाराव भूतकाळातील आईच्या मरणाच्या प्रसंगाने भावूक होतात. ते आईच्या मृत्यूचा प्रसंग सांगतात. मेलेल्या आईचे दूध पिण्याचा हा प्रसंग आपण वाचतो तेव्हा सुन्न व्हायला होतं.
सगुणाची कहाणीदेखील आपल्याला संवेदनशील बनवते. सगुणा ही तृतीयपंथी. प्रस्थापित समाज व्यवस्थेकडून नाकारली गेलेली. सुरवातीला सगुना ट्रेनमधे लेखकाला भेटते. तेव्हा तिच्याकडे लेखक तुच्छतेने बघतो. पण नंतर पुन्हा एकदा तिची लेखकाशी भेट होते. आणि ती सगळी भडास लेखकावर काढते.
दूर पळणाऱ्या लेखकाला सगुना प्रश्न विचारते, 'नजर चुरानेवाले तुम.. और हिजडे हम.. वा रे व्वा.. सच्ची बता, आँख में आँख डाल के देखनेवाला हिजडा की नजर चुरानेवाला हिजडा?' हा प्रश्न सगुणाने केवळ लेखकाला विचारलेला नाही तर समस्त प्रस्थापित व्यवस्थेतल्या मानवजातीला विचारलाय.
सगुणा आपली भळभळणारी जखम लेखकापुढे उघडी करताना म्हणते, 'आयुष्याला एखादं वळण देण्यापूर्वी नियती तुम्हाला क्षणभर थांबायला लावते. सुसाट पळत सुटण्याची संधी देते आणि तशी संधी असूनही न पळता थांबलेले ते चार दोन क्षणच आपल्या आयुष्यासाठी - भोगासाठी जबाबदार आहेत, असं सांगून नियती अलगद आपल्या जबाबदारीतून मोकळी होते' हे तिचं विधान किती खरंय!
ट्रान्सजेंडर समाजातले अनेक बारकावे लेखकाने अचूक टिपलेत. त्यांची जीवनशैली, भाषाशैली याचं यथार्थ दर्शन कादंबरीत होतं. ट्रान्सजेंडर आपल्या रोजच्या जगण्यात वापरत असलेले शब्द लेखकाने कादंबरीत वापरलेत. यातून लेखकाची संशोधनवृत्ती आपल्याला दिसून येते. ट्रान्सजेंडर समाजाविषयी आपल्या मनात अनेक प्रश्न असतात, त्याची उत्तरे आपल्याला या कादंबरीत गवसतात. ट्रान्सजेंडर समाजामधली दीक्षा देण्याची प्रथा वाचताना अंगावर काटा येतो. ट्रान्सजेंडरच्या व्यथा, वेदना यांचं दाहक वास्तव या कादंबरीत आलंय.
हेही वाचा : केला होता अट्टहासः शोषणमुक्त भारत प्रत्यक्षात येण्यासाठी तरुणांनी वाचायला हवी अशी कादंबरी
कादंबरीत भिकाऱ्याचं पात्र असलेला भिकाजी हा दारूच्या नशेत आपल्या तान्ह्या मुलीला जिवानिशी मारून टाकतो. त्यामुळे कादंबरी वाचताना सुरवातीला भिकाजीचा तिरस्कार वाटतो. त्याच्या हातून झालेल्या बाळाच्या मृत्युसाठी भिकाजीला पंधरा वर्षाची शिक्षादेखील होते. मात्र तो स्वतःला कायम अपराधी समजत राहतो. बाळाच्या मृत्युनंतर भिकाजीचं बदललेलं जगणं, त्याचं दुःख, अबोलवृत्ती, त्याला झालेला मांजराचा फोबिया या गोष्टी त्यांच्याविषयी वाचकांच्या मनात सहानुभूती निर्माण करतात.
नवस फेडण्यासाठी आलेल्या स्त्रीवर बामनवाडाच्या डोळ्यांसमोर बलात्कार होतो. पण जिवाच्या भीतीने बामनवाड काही करू शकत नाही. नंतर बामणवाड कितीतरी दिवस नदीवर येत नाही. अचानक एक दिवस लेखकाला बामनवाड दिसतो. लेखक नदीवर न येण्याचं कारण त्याला विचारतो, तर मग हा सगळा वृत्तांत बामनवाड लेखकाला सांगतो.
बामनवाड म्हणतो, ‘त्या दिवशी त्या बाईच्या डोळ्यासमोर नदीचं पाणी कमजोर वाटलं!' हे सगळं ऐकताना लेखक स्वतःशीच विचार करतो, तेव्हा लेखकाला प्रश्न पडतो, नदीवर बलात्कार होऊनही त्या बाईला घरी जाऊन नवऱ्यासोबत शरीरखेळ करावाच लागेल, तेव्हा दोन्हीपैकी कोणता बलात्कार त्या बाईला असहाय्य झाला असेल? हा लेखकाला पडलेला प्रश्न वाचकांना अंतर्मुख करून सोडतो.
कादंबरीतला एक प्रसंग माकडं आणि माणूस यांच्यातला संबंध दर्शवतो. एकदा चिंचेच्या झाडावर माकडांचा उच्छाद चालू असतो. लेखक नदीमधे पोहत असतो. सहज मागं वळून बघतो तर हरणांचा कळप झाडाखाली येऊन थांबलेला असतो. मग लेखकाला मेळघाटतल्या जंगलात एका फॉरेस्ट ऑफिसरने सांगितलेली गोष्ट आठवते.
'माकडं जेव्हा फांद्या हलवून झाडावरची फळं खाली पडतात, तेव्हा त्या त्यांच्या माकडचेष्टा नसतात तर जंगलातल्या इतर प्राण्यांना देखील रानमेवा मिळावा ही त्यांची धारणा असते.’ ही खरंतर एक प्रकारची प्राण्यांची सामाजिक बांधिलकीच असते.
दुसरा एक प्रसंग असा आहे. ‘एप्रिल महिन्यात चिंचेच्या झाडाला चिंचा नसतात. झाडावर माकडे असतात. त्याच हरणांचा कळप आशाळभूतपणे चिंचेच्या झाडाखाली पोहोचलेला असतो, माकड पुन्हा चिंच खाली टाकतील या आशेने. पण यावेळी तसं झालं नाही. दोन तीन माकडे झाडावरून खाली आली आणि त्यांनी हरणांच्या एका छोट्या पाडसाला तंगडी धरून झाडावर नेले. पाडस कें कें करत होतं. पुढच्या काही मिनिटात झाडावरून रक्ताची टपोर धार खाली पडली. माकडांनी पाडसाचा फडशा पाडला होता.’ या प्रसंगावरून सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट हा डार्विनचा सिद्धांत आपल्याला पटतो. माणसंही अशीच वागतात. कोणत्याही गोष्टीचा मोबदला वसूल करतो आपण. स्वतःचं अस्तित्व टिकण्यासाठी माणूस हिंसादेखील करतो, हे सत्य यातून आपल्या लक्षात येतं.
या कादंबरीची निवेदन शैली प्रथमपुरुषी एकवचनी आहे. त्यामुळे ही कादंबरी आत्मकथनात्मक आहे असं वाटत. तरी लेखक या कादंबरीचा नायक वाटत नाही. कादंबरीतली उपेक्षित पात्रं मला या कादंबरीचे नायक वाटतात. कादंबरीचं निवेदन 'मी' करत आहे. त्यामुळे लेखकाने या 'मी'ला माणूस म्हणून रेखाटलंय, असं वाटतं.
या कादंबरीतील भाषा सुंदर आहे. कादंबरीत येणारे हिंदू, उर्दू शब्द कादंबरीची भाषिक श्रीमंती वाढवतात. दुसरं असं, नदीष्ट ही कादंबरी जगातल्या कुठल्याही नदीच्या काठावर, पात्रावर घडू शकते. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही कादंबरी मला प्रदेशमुक्त आणि भाषामुक्त वाटते. जे साहित्य अस्मितामुक्त असते, तेच साहित्य जागतिक पातळीवर पोचू शकते. ही कादंबरी जागतिक साहित्याची जेवढी उंची आहे, तितकी मजल गाठू शकेल, यात मला तिळमात्र शंका वाटत नाही.
कालू भैय्या, पुजारी यांच्या विषयाचे प्रसंग त्रोटक वाटतात. या पात्रांच्या जगण्याविषयी, सुखदुःख या विषयीदेखील वाचकांना वाचायला नक्की आवडलं असतं.
या कादंबरीत निसर्गातले अनेक सूक्ष्म बारकावे आलेत. निसर्ग आणि निसर्गातल्या अनेक गोष्टी लेखकाला कळल्या. लेखकाला निसर्गाने आणि नदीने समृद्ध केलं. लेखकाचा जीवनानुभव प्रचंड समृद्ध आहे, असं कादंबरी वाचतांना आपल्या लक्षात येतं. शिवाय परिसरातील अनेक तपशील प्रचंड ताकदीने वर्णिलेले आहेत. त्यामुळे ही कादंबरी वाचताना डोळ्यांसमोर अगदी हुबेहुब चित्र येतं. जणूकाही आपणच प्रत्यक्षदर्शी त्या घटनांचा साक्षीदार आहोत.
नदीच्या काठावर घडलेली नदीष्ट ही कादंबरी नदी, नदीची विविध रूपं आणि नदीची संस्कृती टिपते. माणूस आणि नदी यांचं आदिम नातं लेखकाने या कादंबरीतून अधोरेखित केलंय. नदी आणि माणूस यांचा समांतर प्रवास म्हणजे नदीष्ट. संवेदनशीलता, गांभीर्य, काळाचं भान आणि वास्तवता हे बोरगावकर यांच्या लेखनीची वैशिष्ट्ये आहेत.
कादंबरी वाचताना संपुच नये, असं वाटतं. सगुणा निघून जाते तेव्हा कादंबरी संपेल असं वाटतं. पण पुढच्या पानावर लेखकाला फकीर भेटतो आणि मग कादंबरी संपते. फकीर लेखकाला का भेटतो? लेखकाला याच्या पुढचा भाग लिहायचा आहे का, अशी उत्सुकता वाचकांच्या मनात निर्माण करते. एक वाचक म्हणून मला या कादंबरीचा पुढचा भाग वाचायला नक्की आवडेल.
कादंबरीचं नावः नदीष्ट
लेखकः मनोज बोरगावकर
प्रकाशकः ग्रंथाली प्रकाशन
पानंः १६८
मूल्यः २०० रुपये
हेही वाचा :
नलिनी पंडितः दलित, बहुजनांच्या वकील
अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी
चे गवेराची मुलगी दिल्लीत येऊन काय बोलली?
आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू