गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह

१५ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


आपण पेपरामधे, टीवीत गाव धरणाखाली गेल्याच्या बातम्या वाचल्या, ऐकल्यात. एवढंच नाही तर सरकारी नोकरीच्या जाहिरातीत धरणग्रस्तांसाठीचा वेगळा कॉलमही बघितलाय. पण एक गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, धरणग्रस्त होणं काय असतं या प्रश्नांचं उत्तर आपल्याला संदीप जगदाळे यांच्या असो आता चाड या कविता संग्रहात मिळतं. त्याचं प्रसाद कुमठेकर यांनी केलेलं हे परीक्षण.

बुड बुड घागरीपासूनच गोष्टी गोष्टीत घागर बुडवत आलेल्या मला बुडणं आणि बुडवणं फार सहज, सोपं वाटत आलंय. आम्ही आम्हाला वाटेल तेव्हा, वाटेल तेवढ्या वेळेला, अगदी सरळ, सोप्या आणि सहज पद्धतीने शाळा बुडवलीय. कॉलेजमधले पिरेड बुडवलेत. चहासुपारीची लेणी देणी बुडवलीत आणि असं वागून चटदिशी जाणारी आमच्या बापाची पर्यायाने खानदानाची इज्जतसुद्धा बुडवलीय.

आणि अगदीच आश्चर्य नसलेली गोष्ट म्हणजे आम्ही बुडवलेली प्रत्येक गोष्ट तितक्याच सहजपणे आमच्यासाठी, आम्हाला वाटेल तेव्हा तशीच कोरडीठाक वर पण आलेली आहे. आम्हाला हेच सत्य आहे असं सांगून सांगून आमच्या मनावर बिंबवल्या गेलेल्या ‘उदकीं अभंग रक्षिले’ असं म्हणत इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकलेली तुकोबांरायाची गाथा जशी आपोआप वर आली अगदी तशी!

परकी माती बिलगत नाही

आमच्या लेखी धरणग्रस्त म्हणजे धरणग्रस्ताचं सर्टिफिकेट लावून सरकारी नोकरी मिळवलेला किंवा मिळवू इच्छिणारा असा तो किंवा ती. आत्ता आत्ता वर्तमानपत्रात वाचून, टीवीवर पाहून, त्यावर थोडंफार चर्वितचर्वन करून धरणग्रस्तांचे आंदोलन, धरणग्रस्तांचे पुनर्वसन, धरणग्रस्तांचे घरकुल, धरणग्रस्तांचे प्रश्न याबद्दल ‘अरेरेरे’ आणि ‘चूकचूकचूक’रुपी सहानुभूती  निर्माण झाली असली तरी एक गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं?

या सबंधी आतून बाहेरून गदगद हलवून टाकणाऱ्या संवेदनशील विचाराने आत्तापर्यंत मनाने कोंब फोडला नव्हता. या आणि अशा सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक इत्यादी इत्यादीच्या पार्श्वभूमीवर वावरत असताना संदीप जगदाळे यांच्या ‘एक गाव मरताना पाहिलंय’ या शीर्षकाखाली लिहिल्या गेलेल्या,

'मी गोदावरीच्या काठचं एक गाव सोडून 
येवून बसलोय तिच्याच काठावरच्या या गावात 
वर्षानुवर्ष चाललोय इथल्या प्राचीन रस्त्यांवर
पण ही परकी माती माझ्या पायांना बिलगत नाही...'

या पाच ओळींच्या ब्रह्द आख्यानी कवितेनं माझी 'ऐसी ऐसी जीवीं। चाड बहु' अशी मनोवस्था करून टाकली.

हेही वाचा : माणसाच्या उत्पत्तीची सोपी गोष्ट सांगणारं ‘ओरिजिन्स’!

शेतकऱ्याच्या हितासाठी झटणाऱ्याची कविता

साधारण दीडेक महिन्याखाली 'असो आता चाड' हा संदीप जगदाळे यांचा कवितासंग्रह हाती आला. आल्या आल्या उघडून त्यातली पहिली कविता वाचली आणि मग आठवडाभर त्यावरचं राजू बाविस्कराचं मुखपृष्ठ, त्यात सुरवातीला येणारा तुकाराम महाराजांचा ‘सेत आले सुगी सांभाळावे चारी कोण’ हा अभंग आणि आत्तापर्यंत ज्या वेगवेगळ्या अंकात यातल्या कविता प्रसिद्ध झाल्यात त्या मराठीतल्या सुप्रसिद्ध साहित्यअंकांची नावं वाचत होतो. तेही पहिल्या कवितेच्या पाच ओळीलाचं रवंथ करत करत.

‘एक गाव मरताना पाहिलंय’, ‘प्रार्थनेची ओळ’ आणि ‘जहाल पान लागलं’ या तीन शीर्षकांनी विभाजित केलेला, एकुण २५ कविता असलेला कवितेचा अनुक्रम पुन्हा पुन्हा पाहत होतो. माझं गाव पाण्यात राहतं, घर मरणार नाही कधीच, नदीनं पायखुटी ठोकलीय मला, धरणाच्या तळाशी असणाऱ्या उंबरठ्याकडे, वसवा पसरलाय गावभर, वाट पुसट झाली पावलांखालून, हजार पिढ्यांनी दिलेला शब्द, या कवितांची नावंच अख्ख्या कवितेची अनुभूती देतात.

नमनालाच वाचलेली प्राचीन रस्त्यांवर वर्षानुवर्ष चालूनसुद्धा तुझ्या पायांना लागणारी पण न बिलगणारी ‘परकी’ माती. वसुधैव कुटुंबकमवाल्या ‘मी’ला एकच नदी, एकच काठ असूनदेखील मुळापासून ‘परकी’ वाटणारी माती आपल्याला प्रचंड अस्वस्थ करते. पुस्तकाच्या काठाकाठानं फिरत आधी सगळं पुस्तक इमानानं चाळून घेतलं पाहिजे. असं करताना हा संग्रह ‘शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे झटणाऱ्या प्रत्येकाला’ अर्पण केलाय’ हे पाहून मनापासून आनंद होतो.

कविता वाचकाशी बोलते

घाई नं करता अगदी बत्तीस वेळेला एक एक शब्द चावत चावत या कविता वाचायला हव्यात. कवितेत वापरलेल्या उपरा उतरकरी, बुडीत घशाला, रंगीबिरंगी कुत्तरओढ, माहेरचा मुराळी, खंबीर खुटी,काळजीचा भुंगा या आणि अशा अनेक इमेज तर आयुष्यभर लक्षात राहतील, पुरतील अशा आहेत.

‘मी मातीसोबत माती झालोय’ असं वाचताना आपला कण कण होऊन चौमाळ उधळणं, ‘दर पिढीगणिक वाढत गेली वाळवी’ ही ओळ वाचताना त्या वाळविणं आपल्याही डोक्याचा भुगा भुगा होतोय हे अनुभवणं भन्नाट होतं. ‘पंढरपुरच्या वाटेतले सगळेच वारकरी नसतात’ ही तशी फारच साधी सरळ वाटणारी रोकडी ओळ. पण या शहाणपणाच्या ओळीबरोबर तसं का नसतं, तसं का नसतात ते? म्हणून आपलं स्वतःशीच तंडणं पुस्तकभर होत होतं.

‘पुस्तकबिस्तक ठीक ह्ये
कविताबिवीता अन्य धडेबिडेपन
उगळून झालेत सगळे
पण ह्या अख्ख्याच्या अख्या गचपनात
आम्ही कुठंच कसे नाही’

असा प्रश्न विचारत ही कविता कळकळीनं, पोटतिडकीने वाचकाशी बोलते आणि त्याच्या खोलपर्यंत पोचतेसुद्धा! धरणामुळे पायाला बिलगणारी किंवा बिलगू शकली असती अशी ‘आपली’ माती तिथली शेती, तो गाव वाहून दिसेनासा झालाय याची सल जावणते आपल्याला. उदरभरणाच्या तडजोडीत वहिवाट सांभाळता न आल्याचं दु:ख, रया सोडत चाललेली गावपांढरी सगळं सगळं दिसतं,खुपतं आणि खुपत राहतं.

हेही वाचा : ‘युगानयूगे तूच’: समग्र बाबासाहेबांकडे घेऊन जाणारी कविता

माती, नाती आणि भवताल हे भावविश्व

गवस सरांनी कवीची पाठराखण करताना म्हटल्याप्रमाणे माती, नाती आणि भवताल हे संदीप जगदाळे यांच्या कवितेचं भावविश्व आहे. मातीत जन्मणं, मातीपासून तुटणं आणि पुन्हा मातीत रुजणं या प्रवासातला वेदनादायी, दुःखदायक प्रवास म्हणजे ही कविता आहे. अनुभवातून जाताना आणि जगण्याला भट्टीत टाकून वितळवताना जी आंतरिक घालमेल, क्रियाप्रतिक्रियांच्या जंगलातून होणारं मन्वंतर म्हणजे ही कविता आहे. या मन्वंतराच्या प्रवासातल्या श्वासनि:श्वासांची आंदोलनं शब्दात पकडण्याचा प्रयत्न हा कवी करतो. 

संदीप जगदाळे यांची कविता मोठी आहे आणि त्यामानाने कवितेबद्दल बोलायची माझी पोच अगदीच बारकी. त्यामुळे थांबतो. असं कळकळीने लिहताय त्याबद्दल एक वाचक म्हणून संदीप जगदाळे यांचे मन:पूर्वक आभार.

कविता संग्रह : असो आता चाड
कवी : संदीप शिवाजीराव जगदाळे
प्रकाशक : लोकवाड:मय गृह
किंमत : १५० रुपये

हेही वाचा : 

आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

मी ‘अळणी मीठवाली’चा मुलगा होतोः राघवेंद्र भीमसेन जोशी

युगानुयुगे तूच : महामानवाच्या जीवनाचा ठाव घेणारी दीर्घकविता

‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

(प्रसाद कुमठेकर हे कथाकार, कादंबरीकार आहेत. तसंच कंटेन्ट रायटर म्हणून ते काम करतात.)