वाळवाण: प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची शोककथा

३१ मे २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


'वाळवाण' ही ग्रामीण लेखक रवी राजमाने यांची कादंबरी. साकेत प्रकाशनाने ती प्रकाशित केलीय. ही कादंबरी प्रकल्पग्रस्त अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबाची वाताहत आपल्या समोर मांडते. विकासाचा चेहरा मानवी नसतो. इथं सामान्य शेतकरी आणि कष्टकरी कायम भरडला जातो. लोकशाहीच्या बुरख्याआड ठोकशाही चालू असते. या सगळ्याचं दर्शन लेखक 'वाळवाण' कादंबरीत घडवतात.

पश्चिम महाराष्ट्रात ग्रामीण साहित्याची जोरकस परंपरा निर्माण झालेली आहे. अनेक छोट्या-मोठ्या संस्था साहित्य संमेलनं भरवतात. साहित्यविषयक उपक्रम राबवतात. त्यामुळे लिहित्या हातांना बळ मिळतं. अनेक चांगले कवी, कथाकार पुढे येतात.

सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यात अशा लेखक कवींची मांदियाळीच निर्माण झालीय. रवी राजमाने हे अशाच उपक्रमातून घडलेले एक ग्रामीण लेखक आहेत. त्यांचे 'हिरवं स्वप्न', 'बालवीरांच्या साहसी कथा' असे दोन कथासंग्रह प्रकाशित झालेत.

'वाळवाण' ही साकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेली  पुरस्कार प्राप्त कादंबरी आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर, आपटे वाचन मंदिर इचलकरंजी,  सूर्यांश साहित्य संघ चंद्रपूर या सोबत दहा पुरस्कार या कादंबरीत मिळालेत. ही कादंबरी प्रकल्पग्रस्त अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबाची झालेली वाताहत आपल्या समोर मांडते.

हेही वाचा :  रा. ना. : महाराष्ट्राच्या इतिहासाचा संगणक

अल्पभूधारक तुकाराम, अशोकचा संघर्ष

दुष्काळी भागातल्या तुकाराम वीर या अल्पभूधारक शेतकऱ्याची वाताहत आणि अशोक वीर या तरुणाचा संघर्ष या कादंबरीत आलाय. वर्षानुवर्षे पडीक असणाऱ्या जमिनीत सिंचन योजना पोचली तर त्या परिसराचा कायापालट होऊ शकतो, ही वस्तुस्थिती आहे. मात्र त्यासाठी कालवे, पोट कालवे बांधताना ते कुणाच्या जमिनीतून जाणार, यावर मोठं राजकारण गाव आणि तालुका पातळीवर चाललेलं असतं.

राजकीय वजन असणारे गाव पुढारी आपल्या शेतातून कॅनॉल जाऊ देत नाहीत. मात्र कॅनॉलचं पाणी आपल्याला मिळावं यासाठी मात्र दक्ष असतात. अशा शासकीय योजनांमधे बळी जातो तो अल्पभूधारक असंघटित शेतकऱ्यांचा. तुकाराम वीर यांची अडीच तीन एकर जमीन असते. तिथं नव्याने होऊ घातलेल्या कॅनॉलखाली त्याची जमीन जाते. त्या जमिनीचा पुरेसा मोबदलाही मिळत नाही.

उत्पन्नाचं साधन हातातून निसटल्यावर हा शेतकरी देशोधडीला लागतो. पण आपल्या आयुष्याचं वाळवण होऊ द्यायचं नाही, या जिद्दीने पेटलेला पोलिओग्रस्त अशोक हा त्याचा तरूण मुलगा अनेक पातळ्यांवर संघर्ष करत राहतो. चहूबाजूंनी कोंडी झाल्यावर शेवटी परिस्थिती समोर हतबल होऊन आत्महत्येचा पर्याय निवडतो, त्याची कहाणी या कादंबरीत येते.

कॅनॉलमधून शेतकऱ्यांचा बळी

तुकाराम आणि तारा या दांपत्याला झालेला गोरागोमटा मुलगा म्हणजे अशोक. हे दांपत्य कष्टाळू असतं, पण शिकलेलं नसतं. ते अज्ञानापोटी आपल्या मुलाला पोलिओचा डोस देत नाहीत आणि पुढे तापाने फणफणून अशोकला पोलिओ होतो. त्यात त्याचा एक पाय लुळा पडतो. तारा आणि तुकाराम यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो.

तुकाराम मात्र जिद्दीने आपल्या मुलाला शिकवतो. ते माळावर शेतात राहत असतात. तिथून शाळा चार-पाच किलोमीटरवर असते. तुकाराम कधी खांद्यावरून, कधी सायकलवरून पोराला शाळेत पोचवतात. अशोकही हुशार, चुणचुणीत असतो.  अनेक अडचणींवर मात करत तोही जिद्दीने शाळा शिकतो. पुढे बी.कॉम, एम. कॉम. पर्यंतचं शिक्षण घेतो.

याच दरम्यान त्यांच्या भागात कालवा काढण्याचं काम सुरू होतं. सर्वे होतो. मग नकाशा तयार होतो. हळूहळू गावभर चर्चा सुरू होते. हा कॅनॉल नेमका तुकाराम तात्याच्या शेतातून जातो. ज्यांची मोठी शेती आहे, अशा गाव पुढाऱ्यांच्या बांधाला धक्काही लागत नाही. पण अल्पभूधारकांचा कॅनॉलमधून बळी दिला जातो.  शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई देण्याचं आश्वासन सरकार, प्रशासन पातळीवर दिलं जातं.

हेही वाचा : नदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास

विकासाच्या नावाखाली कुटुंबाची अधोगती

उच्चशिक्षण घेतलेला अशोक अन्यायाविरुद्ध भांडण्याचं ठरवतो. प्रांत, तहसीलदार, कलेक्टर, मंत्री अशा सगळ्यांपर्यंत आपली बाजू मांडतो. पण त्याला यश येत नाही. त्याच्यासोबत भांडणाऱ्या सात शेतकऱ्यांना वेगवेगळं आमिष दाखवून फोडलं जातं. 

अशोकलाही शासकीय नोकरी देण्याचा शब्द दिला जातो. त्यामुळे तुकाराम वीर भूमी अधिग्रहण करायला संमती देतात. तिथून पुढे या कुटुंबाच्या आयुष्याची खऱ्या अर्थाने अधोगती सुरू होते. अल्पभूधारक शेतकरी असणारा तुकाराम तात्या आणि त्याचं सगळं कुटुंब दुसरीकडे मोलमजुरी करू लागतं.

अपंग आणि सुशिक्षित असणाऱ्या अशोकला कुठेही नोकरी मिळत नाही. तो एका किराणा दुकानात काम करतो आणि मिळणाऱ्या पैशात कसंबसं घर चालतं. पुढे आई-वडलांच्या आग्रहाने अशोकचं हाताने अधू असणाऱ्या पद्मिनीशी लग्न होतं. त्यांना लवकरच एक मुलगी आणि एक मुलगा होतो.

गावच्या पुढाऱ्यांकडून फसवणूक

एका बाजूला नोकरीसाठी धडपड चाललेली असते. दुसर्‍या बाजूला संसाराचा गाडा रेटायचं चाललेलं असतं. हळूहळू अशोकला लक्षात येतं की सरकारी अधिकारी आणि पुढाऱ्यांनी आपली फसवणूक केलीय.

मित्रांच्या सांगण्यावरून तो एक रिक्षा खरेदी करतो, पण त्यातही त्याला अडचणी येतात. तो अपंग असल्यामुळे पोलीस त्याला त्रास देतात. एकदा दिवसभर राबूनही पोरीच्या बर्थडेला एक ड्रेस आणि छोटा केक घ्यायची त्याची इच्छा पूर्ण होत नाही.

कॅनॉलचं काम गती घेतं. कॅनॉल जवळचा भाग मुरूम, दगड, मातीखाली गाडलं जातं. जवळ असणारं घर सुरुंग स्फोटातले दगड पडून दुभंगतं. रहायला घर नाही, गावात शेत नाही, अशी त्याची परवड होते. अशातच वडलांना अर्धांगवायूचा झटका येतो.

या सगळ्या परिस्थितीपुढे हतबल झालेला अशोक आत्महत्या करतो आणि अपंग पद्मिनीवर दोन मुलं, म्हातारे सासू-सासरे यांना सांभाळण्याची वेळ येते. शेतकरी आत्महत्येनंतर नुकसान भरपाई मिळत असते. पण अशोकच्या नावावर शेत नसल्यामुळे तेही मिळत नाही. विधवा आणि निराधार योजनेअंतर्गत पेन्शन मिळू शकेल, एवढीच सहानुभूती तिच्या वाट्याला येते.

हेही वाचा : जयंत नारळीकर म्हणजे फळांनी लगडलेलं एक सफरचंदाचं झाडच!

लोकशाहीच्या बुरख्याआड ठोकशाही

एकंदर कोणत्याही भागाचा विकास होत असताना त्यात सामान्य शेतकरी आणि कष्टकरी पहिल्यांदा भरडला जातो. विकासाचा चेहरा मानवी नसतो. त्यामुळे सामान्य माणसांना किडा-मुंगी सारखं चिरडलं जातं. अनेक शासकीय योजना तरतुदी या फक्त कागदावरच असतात. लोकशाहीचा बुरखा पांघरून ठोकशाही चालू असते. याचं दर्शन लेखक रवी राजमाने 'वाळवाण' कादंबरीत घडवतात.

निर्मितीच्या अंगाने विचार केला तर कादंबरीची बांधणी सैल झालीय. लेखकाने अनेक कच्चे दुवे लेखनात सोडलेत. पण सशक्त कथानक हे या कादंबरीचं बलस्थान आहे. चित्रकार अन्वर हुसेन यांनी काढलेलं सुरेख मुखपृष्ठ जेसीबीच्या माध्यमातून विकासाचा अक्राळविक्राळ चेहरा आपल्यासमोर उभं करतं. भविष्यकाळात लेखक रवी राजमाने यांच्याकडून अधिक सकस लेखन वाचायला मिळेल, अशी आपण अपेक्षा करूया.

पुस्तकाचे नाव - वाळवाण
लेखक - रवी राजमाने 
प्रकाशक - साकेत प्रकाशन
पानांची संख्या - १६०
किंमत - १७५ रुपये

हेही वाचा : 

मनोरंजन ब्यापारी: रिक्षा चालवत ते जगप्रसिद्ध लेखक बनलेत

डळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग १)

पाचवीला पुजलेल्या प्लेग लॉकडाऊनमुळेच जगाला शेक्सपिअर मिळाला!

करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस : मानसिक आरोग्य मोजण्याचा थर्मामीटर