स्त्री जाणिवा आणि स्त्री संवेदना : स्त्रियांचं भावविश्व चितारणाऱ्या कविता

२४ जानेवारी २०२१

वाचन वेळ : ९ मिनिटं


‘स्त्री जाणिवा आणि स्त्री संवेदना: एक अभ्यास’ या समीक्षात्मक ग्रंथाचं साहित्याक्षर संस्थेकडून नुकतंच प्रकाशन झालंय. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतांतल्या समकालीन स्त्री कवयित्रींच्या निवडक १५ कवितांचा यात विचार केलाय. स्त्रीला ‘माणूस’ समजणाऱ्या विचारधारेला हा समीक्षाग्रंथ अर्पण करण्यात आलाय. स्त्रीयांच्या कवितांची समीक्षा करणाऱ्या ग्रंथाची ही तोंडओळख.

‘स्त्री जाणिवा आणि स्त्री संवेदना: एक अभ्यास’ या समीक्षात्मक ग्रंथाचं साहित्याक्षर संस्थेकडून नुकतंच प्रकाशन झालंय. या ग्रंथात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतांतल्या समकालीन स्त्री कवयित्रींच्या निवडक १५ कवितांचा आशय आणि अभिव्यक्ती या दोन अंगांनी स्त्री जाणिवा आणि स्त्री संवेदनांसंदर्भात विचार करण्यात आलाय. स्त्री जाणिवा समृध्द करणाऱ्या आशयसूत्रांचा शोध घेण्यासाठी समाजाशास्त्रीय, मानसशास्त्रीय आणि आदिबंधात्मक या समीक्षा पद्धतींचा अवलंब करण्याचा प्रयत्न रचना यांनी केलाय.

आपल्या समाजात स्त्रीला दुय्यम मानण्याच्या धारणेमुळे रूढ झालेल्या परंपरांनी स्त्रियांच्या अभिव्यक्तीला फारसा वाव नव्हता. किंबहुना संत कवितेच्या परंपरेतही पुरुषांच्या तुलनेने  कवयित्रींची संख्या फार कमी होती. तरीही तत्कालीन समाजाला पुरोगामी दृष्टीकोन बहाल करण्याचं काम या कवयित्रींनी केलं.

समीक्षा म्हणजे काय?

आधुनिक काळात मराठी कवितेत क्रांती झाली. केशवसुत ते मर्ढेकरी ते साठोत्तरी कविता ही वेधक वळणं आहेत. या वळणांवरही बोटावर मोजण्याइतक्याच कवयित्री पुढे आल्या. स्त्रीवादी चळवळीच्या प्रभावातून स्त्रिया स्त्री  जाणीवेच्या स्वतंत्र कविता लिहू लागल्या.

ऐंशीच्या दशकात कवयित्रींच्या संख्येत बरीच वाढ झाली. नव्वदोत्तर काळात स्त्री जाणिवांचं प्रकटीकरण करणाऱ्या कवयित्रींची संख्या लक्षणीय आहे. आपल्याच  काळात लिहिणाऱ्या प्रथितयश आणि नवोदित  कवयित्रींच्या कवितांची दखल घेऊन त्यावर साधक बाधक चिंतन करण्यातून प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती झालीय.

हा समीक्षाग्रंथ स्त्रीला ‘माणूस’ समजणाऱ्या विचारधारेला अर्पण करण्यात आलाय. म्हणजेच रचना यांची भूमिका ही माणूसकेन्द्री आहे. माणूस उभा करण्याचं, त्याच्या सृजनावर भाष्य करण्याचं, त्याला प्रेरित करून समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचं काम करणं म्हणजे समीक्षा करणं. हे ज्यांना कळालं त्या रचना यांचं लेखन अभिनंदनाला पात्र आहे.

या ग्रंथात एकूण १७ प्रकरणं असून सुमारे १५ कवयित्रींच्या प्रत्येकी १० निवडक कवितांचा म्हणजे सुमारे १५० कवितांचा विचार करण्यात आलाय. अभ्यासाला नव्वदोत्तर कालखंडाचे संदर्भ प्राप्त झालेत. स्त्रीवादी चळवळीमुळे पाश्चात्य जीवनव्यवहार आणि साहित्यव्यवहारात परिवर्तन घडून आल्याचं निरीक्षण रचना यांनी प्रास्ताविकात नोंदवलंय.

हेही वाचा : नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?

बाईपण हेच सहन करण्याचं मूळ

डॉ. भाग्यश्री यशवंत यांच्या कवितांचं नेटकं विवेचन करून रचना यांनी ठळक विशेष नोंदवलेत. १९९० नंतर वैद्यकीय उपचारांच्या क्षेत्रात नवीन शोध लागले. हे नवीन शोधच स्त्रीभ्रुण हत्येस कारणीभूत ठरले. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडलं. एकीकडे मुलगी जन्माला येऊ नये असं वाटणं आणि पुढे त्याच मुलीच्या पोटी वंशवेल वाढण्याची अपेक्षा करणं या दुटप्पी सामाजिक भूमिकेचा पर्दाफाश डॉ. भाग्यश्री यशवंत यांनी केलाय. हे वास्तव रचना यांनी उलगडून सांगितलं.

तसंच भाग्यश्रींच्या कवितांतून तारुण्यात सुखी संसाराची स्वप्नं रंगवणाऱ्या मुलीच्या विवाहानंतर झालेल्या अपेक्षाभंगाची दुखरी जाणीव सूचकतेने व्यक्त झालीय. स्त्रीच्या वाट्याला आलेले अनेक भोग तिच्या घालमेलीचे अनुभव, त्यातच तिचं तुटत जाणं. तरीही संसाराशी एकात्म होत त्यातच आपल्या जीवनाचं सार्थक शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न करणं.

चाळीशीनंतरच्या शरीर-मानसिक बदलांची होणारी घालमेल, सासू-सुनेचा संघर्ष आणि शेवटी सहन करणं ही बाईची प्रकृती आहे. तिच्या सहन करण्यात फक्त बाईपण हेच मूळ आहे या विचारसूत्राच्या आधारे त्यांच्या कवितांचे विश्लेषण नेमकेपणानं केलंय.

समकालीन प्रतिमासृष्टी

श्रीमती वैशाली मोहितेंच्या कवितांच्या आकलनासाठी रचना यांनी स्त्रीवादी समीक्षक सिमॉन दि बोव्हा यांच्या सिद्धांतातल्या संकल्पनेचं उपायोजन केलंय. वैशाली मोहिते यांच्या कवितांतील सिता, राधा आणि राम मिथकांची योजना करण्यामागील भूमिका आणि मिथकांचा आजच्या काळासंदर्भातील अन्वयार्थ लावला तर मोहितेंच्या कवितांचे वेगळेपण लक्षात येईल.

त्यांनी योजलेली प्रतिमासृष्टी खास समकालीन आहे. उदाहरणार्थ मन डाऊनलोड करणं, माणसांचा बाजार इत्यादी प्रतिमा वेधक आहेत. यादृष्टीने शोध घ्यायला वाव आहे.

हेही वाचा : अहिल्याबाई होळकर : फक्त साध्वी नाहीत तर राष्ट्रनिर्मात्या!

स्त्रियांच्या व्यथांचं व्यापक चित्रण

श्रावणी बोलगेंच्या कवितांत आत्मभान असून स्त्री पुरुष विषमतापूर्ण समाजव्यवस्थेतल्या अनेक दोषांचं सोदाहरण प्रतीकात्मक चित्रण येत असल्याची मांडणी रचना यांनी केलीय. पुरुषप्रधान संस्कृतीतला दुटप्पीपण स्त्रियांच्या शोषणाला कारणीभूत ठरत असल्याची तीव्र जाणीव बोलगेंच्या कवितांतून व्यक्त होते.

बलात्कारित स्त्रीचं दुःख आणि तृतीयपंथीयांच्या वेदनांशी तादात्मिकरण करून घेतल्याने त्यांच्याविषयीच्या तरल संवेदना व्यक्त करणारी अभिव्यक्ती वेधक आहे. श्रावणी बोलगे  यांनी अलक्षित विषय हाताळल्याने त्यांच्या कवितेतल्या आशयाचं नाविन्य चटकन लक्षात येतं, असं निरीक्षण रचना यांनी नोंदवलंय.

बोलगेंच्या कवितांतून स्त्रियांच्या व्यथांचं व्यापक चित्रण करण्यात आलं असल्याचा निष्कर्ष काढलाय. उत्तर आधुनिक जीवनव्यवहाराचे संदर्भ बोलगेंच्या कवितांना आहेत असं रचना म्हणतात. या अनुषंगाने सोदाहरण विश्लेषण करता आलं असतं. 

स्त्रियांची कविता कशी असावी?

श्रीमती स्वाती पाटील यांच्या कवितांतून स्त्रीच्या सोशिक वृत्तीचे अनेक दाखले आलेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनं ग्रामीण जीवनावर केलेल्या विदारक परिणामांचं चित्रण करण्यात आलंय. स्त्रियांतली सकारात्मक वृत्तीच त्यांचं आत्मबल वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याचा नवा काव्याशय यांनी घडलाय. उदाहरणार्थ, 

‘नवरा मेला सोडून गेला तरी
नसतंच कोणालाही सुतक
तिच्या एकटेपणाचं...
त्याच्या टायमाला
कावकावणारे कावळे
तिच्या वेळी मात्र
कुठं गायब होतात
कोण जाणे?
संस्कृती जतन का काय म्हणतात
ते हेच असेल का कदाचित?
तिच्या जीतात्म्याचा काकस्पर्श रोखणारं..!’

ताराबाई शिंदेंच्या लेखनशैलीची आठवण करून देणारी ही कविता प्रश्नार्थक शैलीत अवतरते तेव्हा आपल्या समाजातील विसंगतींवर नेमकेपणाने बोट ठेवते. स्त्रियांची कविता कशी असावी याची दिशा प्रस्तुत लेखनशैलीतून ध्वनित होते. या दृष्टीने स्वाती पाटील यांची कविता महत्त्वाची असल्याचे मत रचना यांनी नोंदवलंय.

घर, स्त्री आणि पुरुष यांचे आदिबंध

डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे यांच्या कविता सामाजिक जाणिवांचं चित्रण करणाऱ्या आणि विद्रोही प्रकृतीच्या आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला समर्थन देणारा काव्याशय घडवून त्यांनी विदर्भाच्या जनतेच्या हलाखीकडेही लक्ष वेधलंय. स्पष्ट राजकीय भूमिका आणि तत्त्वज्ञानाच्या बैठकीमुळे त्यांच्या कवितेतल्या वैचारिकता प्रगल्भ जीवनदृष्टीचा प्रत्यय देते. वानखेडे या कवितेच्या आशयाबरोबरच रूपदृष्ट्या सजगता असलेल्या कवयित्री आहेत.

रचना यांनी संगीता गुरव यांच्या कवितांतील घर, स्त्री आणि पुरुष हे आदिबंध उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. संसाराच्या नित्य रगाड्यात पिचलेल्या स्त्री मनाचे प्रातिनिधिक अनुभव मांडलेत. समई आणि नदी पारंपरिक प्रतीकांचं वाचन केलंय. संगीता गुरव या रुपदक्ष कवयित्री असल्याचा प्रत्यय त्यांच्या कवितांतून येतो. उदाहरणार्थ पहा,

‘घरानं बडवलं उंबऱ्यानं अडवलं
भिंतींनी कोंडलं, चुलिनी मांडलं
छपरानं झाकलं, अश्रूंनी सारावलं
भाजलं-कापलं, सललं, सोसलं
दुःख तिचं बोललं’

क्रियापदांच्या विशिष्ट योजनेतून निर्माण झालेल्या आवृत्तीमुळे कवितेत लयबद्धता निर्माण होते. अनुस्वारांच्या आवृत्तीतून लयबद्धतेला, अर्थाच्या सुचकतेला अधिक उठाव प्राप्त होतो. हे उत्तम काव्यसंहितेचं लक्षण आहे. यातून गुरव यांच्या अभिव्यक्तीचं वेगळेपण चटकन नजरेत भरते. रचना यांनी आशयविशेषांवर भर दिल्यामुळे अभिव्यक्ती वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकणं राहुन गेलंय.

हेही वाचा : राजस्थानातल्या पुष्करच्या वाळूत उमटलेल्या घोड्यांच्या टापांची गोष्ट

प्रेम, विरहाचं धीट वर्णन

अर्चना डावखर या धाडसी काव्याभिव्यक्ती असलेल्या कवयित्री असल्याचं मत रचना यांनी नोंदवलंय. समकालीन जीवनाचं आकलन करून घेण्यासाठी सीता आणि द्रौपदी या मिथकांना त्यांनी नवीन अर्थ देण्याचा प्रयत्न केलाय. विधवा स्त्रीच्या मनातल्या भावनांची आंदोलनं अत्यंत संवेदनशीलपणे व्यक्त केल्याने मराठी काव्यपरंपरेच्या आशयात्मक वाढीस त्यांनी हातभार लावलाय.

 विधवा स्त्रीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करण्याच्या सामाजिक मानसिकतेला त्यांच्या कवितेतून जाब विचारला जातो. प्रेम, विरहाचं धीट वर्णन केल्याने ही कविता स्त्रीवादी प्रकृतीची असल्याचा प्रत्यय येतो.

अर्चना डावखरांच्या कवितांतल्या आशयाचे नाविन्य प्रशंसनीय आहे. स्त्री विशिष्ट अनुभवांच्या मांडणीतून सूचकता प्रकट केल्याने समकालीन मराठी कवयत्रींत त्यांचं स्थान महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे वेगळेपण रचना यांनी नमूद केलंय.

संत कवितेशी नाळ

सावित्री जगदाळे या जेष्ठ कवयित्री आहेत. त्यांनी ‘विठ्ठल’ आणि ‘कविता’ ही दोन मिथकं मांडून स्वतंत्र काव्याभिव्यक्तीची चुणूक दाखवून दिलीय. मराठी कवितेच्या परंपरेशी अनुबंध साधणारी अभिव्यक्ती असल्याने त्यांच्या कवितेतील वैचारिकता संघर्षाऐवजी समन्वयाची भूमिका वठवते. त्यांनी योजलेल्या ‘विठ्ठल’ या मिथकाची सविस्तर चिकित्सा करणं उद्बोधक ठरेल.

आत्मनिष्ठेकडून आत्मशोधाकडे वाटचाल करणारी स्त्री प्रतिमा आत्मोद्धाराच्या दिशेने विचार करू लागते ही खास भारतीय स्त्री संवेदना सावित्री जगदाळेंच्या कवितांतून प्रत्ययाला येते. त्यांनी जीवनाचं तत्त्वज्ञान व्यावहारिक अनुभूतींतून तपासात संत कवितेशी नाळ जुळवून घेतल्याने अधिक प्रगल्भ स्त्री जाणिवा आणि संवेदनानुभूतींचे आविष्करण केलंय.

सौंदर्याच्या बेगडी संकल्पनेचा उपहास

मनीषा पाटील या गंभीर प्रकृतीच्या कवयित्री आहेत. विधवा स्त्रीला आलेल्या दुःखद अनुभवांचे धारदार कंगोरे त्यांच्या कवितांतील आशयाची व्यापक अर्थक्षमता दर्शवणारे आहेत. झोकून देऊन नातं जपण्याच्या स्त्रियांच्या नैसर्गिक स्थायीभावाकडे त्यांनी वाचकांचं लक्ष वेधलंय. 

पारंपरिक लोकोक्तींना नवीन अर्थ बहाल करण्याचं कसब म्हणून त्यांची ‘बायका’ ही कविता उल्लेखनीय आहे. पाटील यांच्या कवितांच्या आधारे संस्कृतीची निर्मिती, उभारणी आणि विकासातल्या स्त्रियांचं योगदान दुर्लक्षित केलं जातं. त्यामागे असलेली हेतुपूर्वकता रचना यांनी उलगडून दाखवलीय. त्यांची एक कविता पहा,

‘नसतेच सुंदर बाईपण
जाहिरातीत दाखवतात तसे
रापलेली बोटं, टाचेच्या भेगा
साक्षीलाच असतात तिच्या उन्हाळ्यांच्या’

प्रस्तुत कवितेतून माध्यमांतील आभासी स्त्री प्रतिमा आणि प्रत्यक्षातील स्त्री प्रतिमा यातला फरक दर्शवून सौंदर्याच्या बेगडी संकल्पनेचा उपहास करून सामाजिक धारणेच्या विसंगतींवर नेमके भाष्य केलंय. मनीषा पाटील यांच्या कवितेतील स्त्रीविषयक चिंतन वाचकांना नवदृष्टी देणारं आहे, असं रचना यांनी केलेल्या विश्लेषणातून स्पष्ट होतं.

हेही वाचा : सावित्रीआईचं एनजीओ नको करुया

आंबेडकरी विचारधारांच्या कविता

सुनंदा शिंगनाथ यांच्या कवितांतून व्यक्त झालेल्या स्त्री जाणीव आंबेडकरी विचारांनी प्रभावित आहेत. त्यामुळे त्या राजकीय भान असलेल्या कवयित्री ठरतात. रूपदृष्ट्या सजगता ठेवल्यास त्यांची कविता अधिक प्रभावी होईल, असं नोंदवावं वाटतं. त्यांच्या कवितेतली संवादात्मक शैली लक्षणीय आहे. दीर्घ कवितेतचा आशयबंध घडवण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. त्यांनी अशी काव्याभिव्यक्ती केल्यास हे त्यांचं वेगळेपण ठरेल असं मुद्दामहून नमूद करावंसं वाटतं. 

उषा हिंगोणेकरांच्या कवितेचा प्रेरणास्रोतही आंबेडकरी विचारधारा आहे. बंडखोर अभिव्यक्ती आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवणं ही त्यांच्या कवितेची खास वैशिष्ट्यं. त्यांच्या कवितेतल्या विद्रोहाची भाषा क्रांतीचं आवाहन करते. क्रांतीच्या फँटसीत रममाण होण्याचा सोस दलित कवितेची मर्यादा ठरतो. क्रांतीसाठी आवश्यक असणाऱ्या चळवळीचं थंडावणं, त्यातल्. स्वार्थी राजकारणामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला असलेली कुंठितावस्था आणि पैसाकेंद्री जीवनाचं आकर्षण क्रांतीला मारक ठरणारं आहे.

अशा कविता दलित वास्तवापासून दूर जातात आणि काव्याभिव्यक्तीच्या दृष्टीनेही एकसुरी बनतात. ही बाब लक्षात घेऊन हिंगोणेकारांनी लेखन केले तर त्या प्रभावी काव्यनिर्मिती करतील. प्रस्तुत प्रकरणात अशी  चिकित्सा अपेक्षित होती. 

स्त्रीच्या वेदनांनाही गृहीत धरणं

मनीषा घेवडे यांच्या कवितांतून प्रेमाच्या तरल स्त्री अनुभूतींच्या संवेदनांचा प्रत्यय येतो. धरती, आभाळ आणि सूर्य या पारंपरिक प्रतीकांची योजना करण्यात आलीय. दैहिक अनुभूतींचा धीट अविष्कार करणाऱ्या स्त्रीवादी काव्यपरंपरेत त्यांनी भर घातलीय. तसंच छाया बेले यांच्या कवितांतून स्त्री संवेदनांबरोबरच सामाजिक प्रश्न आणि समस्यांवर सूचक भाष्य येतं असं निरीक्षण रचना यांनी नोंदवलंय.

योगिनी सातारकर पांडे यांच्या कवितांतून प्रगल्भ स्त्री जाणीव आणि संवेदनांचा प्रत्यय येतो. समकालीन वास्तवाचे आकलन करून घेण्यासाठी मिथकांची योजना करून स्त्री पुरुष नात्याचा प्रभावी अर्थ उलगडण्याचा प्रयत्न हे त्यांच्या काव्यसंहितांचे ठळक वैशिष्ट्य. उदा. द्रौपदी आणि कृष्ण या मिथकांची मैत्रभावाचं प्रतिक म्हणून योजना करण्यात आलीय. त्यांच्या कवितांतली कमालीची सूचकता लक्षवेधक ठरते. उदाहरणार्थ,

‘फक्त दोन सीझर्सनी शिवलेलं पोट
आणि तीन गर्भपातांच्या  ओझ्याने मोडलेली कंबर
दिसत नाही कोणाला इतकंच !’

स्त्रीबरोबर तिच्या वेदनांनाही गृहीत धरणं अन्यायकारक आहे ही जाणीव उपहासाने करून देण्यात आलीय. कवितेतल्या संवादात्मक शैली काव्यगत अर्थाला अधिक उठाव प्राप्त करून देते. संस्कृती अभ्यासाचं पुनर्वाचन करून स्त्रियांच्या ऐतिहासिक योगदानाची पुनर्मांडणी करण्याचा विचार मौलिक आहे. त्यांनी चित्रित केलेली द्रौपदीची प्रतिमा मुळातून वाचण्यासारखी आहे.

गीतांजली वाबळे यांनी अभंग, गझल आणि हायकू बरोबरच मुक्तछंदातही कविता लिहिल्यात. स्त्रीवादी विचारांचा प्रभाव डोंबाऱ्याच्या मुलीचं प्रतीकात्मक रुपात चित्रण करून स्त्रीचं आयुष्य असंच टांगणीला लागलेलं, सतत पुरुषांच्या हातात नियंत्रणाचा दोर असल्यानं व्यवस्थेच्या तालावर नाचणंच तिला भाग पाडलं जातं, हा काव्याशय व्यापक जीवनदृष्टीचा प्रत्यय देणाराय.

समीक्षेत काय भर घालायला हवी?

उपसंहारात रचना यांनी पंधरा कवयित्रींच्या कवितांच्या वैशिष्ट्यांचा थोडक्यात धांडोळा घेतलाय. या सगळ्या कवयित्रींच्या कवितांतून कोणतं युगभान प्रकट होते? जागतिकीकरणाच्या भूलभूलैयाला स्त्री जाणिवा कशा प्रतिसाद करतात? स्त्री संवेदनेचं स्वरूप बदलतं का? प्रतिमा, प्रतीकं आणि मिथकं यांची नव्यानं योजना करण्यात आलीय का?

पाश्चात्य स्त्रीवाद आणि भारतीय स्त्रीवाद याविषयी मौलिक चिंतन असलेली वैचारिक भूमिका कोणत्या कवयित्रींच्या कवितांतून प्रकट होतं? आपल्या समाजातल्या अन्य भेदांकडे कवयित्री कशा पाहतात? पूर्वसुरींचा प्रभाव कुणी पचवला आहे? नव्या काव्यसंहिता घडवण्याचं सामर्थ्य कोणत्या कवयित्रीत आहे? स्त्रीवादी कवितेची सौंदर्यमुल्ये समकालीन मराठी कवयित्रींच्या कवितांतून प्रकट झाली आहे का?

अशा काही प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेतल्यास रचना यांच्या समीक्षा व्यवहारात भर घालण्यास पुरता वाव आहे. रचना यांच्या समीक्षा ग्रंथाचं वाचक, अभ्यासक स्वागत करतील. अभ्यासक संदर्भ म्हणून नोंद घेतील हा विश्वास वाटतो.

हेही वाचा : 

जुन्या इफ्फीच्या ताज्या आठवणी

मांग महारांच्या दुःखाविषयी, सांगतेय मुक्ता साळवे

बायकांच्या सणात पुरुषी विचारांची लुडबूड कशाला?

राष्ट्राध्यक्षाची कारकीर्द संपली तरी का चालवला जातोय ट्रम्पवर महाभियोग?

(लेखिका नाशिकमधल्या के. के. वाघ कला, वाणिज्य विज्ञान आणि संगणक विज्ञान कॉलेजच्या मराठी विभाग प्रमुख आहेत.)