बूक माय शो: ऑनलाईन तिकीट बुकिंगमधला असली किंग

०९ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


बूक माय शो अर्थात बीएमएस. आपल्या देशातली सगळ्यात लोकप्रिय ऑनलाईन तिकिटिंग वेबसाईट. २० वर्षांपूर्वी ऑगस्ट १९९९ मधे ही कंपनी सुरू झाली. सुरवातीला फक्त ५-६ सिनेमाची तिकिटं विकली गेली. आणि आता महिन्याला ५-५ कोटी तिकिटं विकली जातायत. म्हणूनच तर या क्षेत्रातली ही मोनोपोली कंपनी ठरलीय.

आज सिनेमाला जायचं का? असं एकमेकांना विचारत आपला सिनेमाला जाण्याचा प्लॅन अचानक कधी बनतो समजतही नाही. पण आता आपल्याला तिकिटं मिळतील की नाही याचं फार टेंशन नसतं. कारण आपल्या लाडक्या बीएमएसवर अर्थात बूक माय शोवर सहज तिकिटाची माहिती मिळते आणि तिकीट बुकसुद्धा होतं. यंदा आपल्या बीएमएसला २० वर्षं झाली. आणि सिनेमा, नाटक, इव्हेंटच्या ऑनलाईन तिकिटिंगच्या व्यवसायात या कंपनीने आपली मोनॉपॉली बनवली.

ऑनलाईन तिकिटिंग सुरु करण्याची घाई

१९९९ ला ही कंपनी सुरु झाली. पण ऑनलाईन तिकिटिंगची कंपनी सुरु करावी असं त्या काळात कोणाला, कसं सुचलं असेल. तर मुंबईचे तीन बेस्ट फ्रेंड्स साऊथ आफ्रिकेला फिरायला गेले. आणि तिथल्या एका रेडिओ शोवर त्यांना ‘जर सिनेमाची तिकिटं ऑनलाईन मिळाली तर...’ हे वाक्य कानावर पडलं. ते ऐकून त्या तिघांना अशी कंपनी सुरु करण्याचं सुचलं.

हे तीन मित्र म्हणजे सध्याचे बीएसएसचे सीईओ आशिष हेमराजानी, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख परीक्षित दार आणि वित्त विभागाचे प्रमुख राजेश बालपांडे. हे तिघे सिडनहॅम कॉलेजचे मित्र. तिथे त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटचे धडे घेतले. पुढे नोकरी केली. सहज सुट्टी काढून `जिंदगी ना मिलेगी दोबारा` या सिनेमासारखे फिरायला गेले. आणि एक बिझनेस प्लॅन डोक्यात घेऊन परत आले.

भारतात परतल्यावर त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. तो म्हणजे जॉब सोडण्याचा. मग तिघांनी बिझनेस डेवलपमेंट, फायनांस आणि टेक्निकल अशा जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. १९९९ ला बिग ट्री एंटरटेन्मेंट ही कंपनी सुरु केली. या कंपनीच्या अंतर्गतच बीएमएस चालतं. पण त्यावेळी सिनेमांची ऑनलाईन तिकिटं विकणं हे चक्क बेकायदेशीर होतं. त्यामुळे आपण ऑनलाईन तिकिटिंग सुरु करण्याची जास्तच घाई केली असं वाटल्याचं हेमराजानी `मिंट` वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.

हेही वाचा: अमिताभलाही न कळालेला अॅवेंजर समजून घेण्यासाठीचा क्रॅश कोर्स

सुरवात तोट्यातूनच झाली

२००० मधे त्यांनी सॉफ्टवेअर डेवलप केलं. पण तेव्हा बुक होणाऱ्या तिकिटांची घरपोच डिलिवरी केली जात होती. आणि कॅश ऑन डिलिवरी ही पद्धत होती. पहिल्या वर्षात फक्त ५-६ तिकिटं विकली गेली होती. आणि २०१५ मधे ५ कोटी तिकिटं महिन्याला विकली गेली. या मधल्या काळात यांचा व्यवसाय ना नफा ना तोटा तत्त्वावरसुद्धा चालला नाही. तर तोट्यातच चालत होता.

पण २००२ ते २००७ यादरम्यानची वर्ष बीएसएसला या क्षेत्रातलं किंग बनवण्यासाठी महत्त्वाची ठरली. यादरम्यान सर्वच गोष्टी अद्ययावत होत होत्या. त्याचा फायदा बीएमएसला झाला. त्यांनी थिएटर्सबरोबर टायअप केलं. पण ज्यावेळी इंटरनेट लोकांच्या घराघरात पोचलं तेव्हा मात्र त्यांनी थेट ग्राहकस्नेही कॅम्पेन राबवलं. आणि म्हणूनच नंतर मोबाईलमधेसुद्धा बीएसएसने जागा पटकावली. ज्यामुळे आज आपण सिनेमांचं ऑनलाईन तिकीट फक्त बीएमएसवरच बूक करतो.

हेही वाचा: एनईएफटी आणि आरटीजीएसवरचे चार्जेस रद्द झाले, मग आपल्याला काय फायदा?

बीएमएसचं पुढचं पाऊल

भारतात २००० पासूनच मल्टिप्लेक्स आलं. पण पुढच्या दोन-तीन वर्षांनंतर शहरांमधे त्याचं प्रमाण वाढू लागलं. मल्टिप्लेक्सचा बीएमएसला खूप फायदा झाला. सिनेपोलीस, पीवीआर, आयनॉक्स यांनी बीएमएसबरोबर पहिलं टायअप केलं. पुढे यांच्या देशातल्या वेगवेगळ्या शहरांत चेन सुरु झाली. बॉक्स ऑफिसही डिजिटलाइज झालं. आणि आज जवळपास ५० टक्के तिकिटं बीएएमएसवरच विकली जातायत. त्यामुळे सगळ्यांनीच या ऑनलाईन तिकिटिंग प्लॅटफॉर्मला स्वीकारलं.

आज जवळपास १० पेक्षा जास्त सिनेमाची ऑनलाईन तिकिटं विक्री करणाऱ्या वेबसाईट आणि अॅप आहेत. त्यात पीवीआर, इरॉस या थिएटरच्यासुद्धा वेबसाईट आहेत. तसंच तिकीट फॉर यू, इझी मुवी, तिकीट न्यू, जस्ट तिकीट, चल सिनेमा आणि पेटीएम अशा वेबसाईट्स आहेत. यातली बरीच नाव आपल्याला माहितीही नाहीत.

अशी कॉम्पिटिशन आल्यानंतर बीएमएसने तिकीट कॅन्सल केल्यावर १०० टक्के पैसे परत, कॉम्बो ज्यात थिएटरमधल्या खाऊचेही पैसे आधीच देऊन खाऊ बुक करता येतो. आणि तो खाऊ चक्क आपल्या जागेवरच आणून देतात. अशा सुविधांमुळे लोक खुश. तसंच गिफ्ट कार्ड, सिनेमाचा ट्रेलर, रिव्यू, पुढचे शोज इत्यादी माहिती लोकांना द्यायला सुरू केली. जे इतर कोणतंही ऑनलाईन तिकिटिंग साईट करत नाही.

हेही वाचा: अंधाधूनसारखा सिनेमा चीनमधे अंधाधुंद कमाई का करतो?

बीएमएसवर ७ लाखांचंही तिकीट

२०१६ पासून तर बीएमएसने ३६० डिग्री एंटरटेन्मेंटसाठी ऑनलाईन तिकिटिंग सुरु केलं. म्हणूनच आता बीएमएसची एकूणच ऑनलाईन तिकिटिंगवर मोनोपोली आहे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीएमएस देशातल्या सगळ्या राज्यांमधल्या सगळ्या शहारांसाठी उपलब्ध आहे. आणि ते मराठी, हिंदी, गुजराथी, दाक्षिणात्य भाषांमधेही उपलब्ध आहेत. त्यावर आपल्या प्रादेशिक भाषेतले सिनेमे, नाटकं, कार्यक्रमांचंही बुकिंग करता येतं.

सध्या तर आपण लाईव शोज, खेळाच्या स्पर्धांबरोबर आपण आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचंही बुकिंग करू शकतो. यात दुबई, सिंगापूर, श्रीलंका, इंडोनेशिया इत्यादी ठिकाणच्या ईवेंटची तिकिटं बुक करता येतात. आणि वेबसाईटवर इवेंटची माहिती सविस्तरपणे दिलेली असतेच. सध्या वेबसाईटवर १०० रुपयांच्या तिकिटापासून ते अगदी ७ लाखांच्या तिकिटापर्यंतची विक्री होतेय.

हेही वाचा: अमिताभप्रमाणे आपलं सोशल मीडिया अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून

बीएमएसचा चढता आलेख

फिक्की अर्थात ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ हे दरवर्षी देशाच्या मनोरंजन क्षेत्राचा अहवाल सादर करतात. त्यांच्या २०१८ च्या अहवालात, २०१५, २०१६, २०१७ आणि २०१८ मधे ऑनलाईन तिकिटिंगच्या व्यवसायात एकूण वार्षिक महसुलात साधारण १२ टक्क्यांची वाढ होतेय. यामागे नक्कीच वाढतं डिजिटलायझेशन हे कारण असल्याचंही म्हटलं.

बीएमएसचा २०१७-१८ वर्षातलं उत्पन्न ४०० कोटी होतं. तर २०१९ मधल्या मे महिन्यापर्यंत २०६ कोटी उत्पन्न झालंय, असं इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीत म्हटलंय. म्हणजेच बीएमएसचा लोकांवरचा प्रभावच वाढत नाही तर वापरही वाढतोय. ऑगस्ट १९९९ ला बीएमएसला सुरवात झाली. तेव्हा ही कंपनी काळाच्या पुढे होती. अनेक चढउतार बघितलेली ही कंपनी आज या ऑनलाईन तिकीट बुकिंग क्षेत्रातली असली किंग ठरलीय.

हेही वाचा: 

सुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एका शस्त्रासारखा वापर केला

रसुलन बीबी या वीरपत्नीने सैनिकांच्या सन्मानासाठी आयुष्य वेचलं

खरोखरचा फुन्सुक वांगडू सांगतोय, लडाखमधे बाहेरचे लोक नकोतच

आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारा १९४२ चा लढा नेमका होता कसा?