लिहित्या राजकारण्यांनी देश घडवलाय

२२ मार्च २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांच्या 'श्री बाहुबली अहिंसादिग्विजयम' या महाकाव्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालाय. हे राजकारण्यांच्या नेहमीच्या इमेजपेक्षा वेगळं वाटतं. पण आपल्या देशात लिहित्या नेत्यांची एक मोठी परंपरा आहे. त्यांनी आपल्या देशातल्या पिढ्या घडवल्यात.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते वीरप्पा मोईली यांना भगवान बाहुबली यांच्या जीवनचरित्रावर आधारीत 'श्री बाहुबली अहिंसादिग्विजयम' या महाकाव्याच्या निर्मितीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार नुकताच मिळालाय. 

वीरप्पा मोईली यांनी आजपर्यंत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री, पर्यावरण मंत्री, विधी आणि न्याय मंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्यात. लोकप्रिय नेत्याने आपल्या राजकारणाच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत लेखन आणि संशोधन करत हा ग्रंथ लिहलाय ही विशेष कौतुकाची गोष्ट आहे.

जैन तीर्थंकर वृषभनाथ यांचे चिरंजीव बाहुबली यांना जैन धर्मात खूप मानाचं स्थान आहे. चक्रवर्ती भरताला पराभूत करणाऱ्या बाहुबलीचा विजय अहिंसेच्या माध्यमातूनच कसा होतो हे भारतीयांनाच नाही तर जगभरातल्या वाचकांना मोईलींच्या लेखनातून समजू शकेल. भारतात आज हिंसेला प्रतिष्ठा मिळत असताना प्रत्यक्ष भगवान बाहुबलीचा 'अहिंसा दिग्विजय' मार्गदर्शक ठरेल. यापुर्वीही मोईली यांना रामायणावरच्या संशोधनात्मक लेखनासाठी सरस्वती भूषण सन्मान मिळाला होता, हे अनेक रामभक्तांना माहीतही नसेल.

पिढ्यांचा विचार करणारे स्टेटसमन 

काँग्रेसी नेते २४ तास राजकारण करत नाहीत, म्हणून मोदीकाळात त्यांच्यावर सतत टीका होते. फक्त निवडणुका जिंकण्याचं ध्येय मनात बाळगणं म्हणजेच यशस्वी राजकारण, म्हणजेच चाणक्यगिरी, असं ठरवलेल्या काळात पुस्तक लिहणारा राजकारणी, अयोग्य वाटणं स्वाभाविक आहे! पण निवडणुकीपुरता विचार करणारे निव्वळ राजकारणी असतात. तर लेखनाच्या माध्यमातून पिढ्यांचा विचार करणारे स्टेट्समन असतात!

स्वातंत्र्य आंदोलन आणि आधुनिक भारताच्या उभारणीत ज्यांनी भारत घडवला असे बहुतांश नेते हे उच्च विद्याविभूषित होते. वाचन, चिंतन आणि मनन यातून त्यांचं सामाजिक राजकीय जीवन सुसंस्कृत झालं होतं. त्यांचा व्यासंग दांडगा होता आणि पुस्तकांबद्दलचं त्यांचं प्रेम तर सर्वश्रुतच आहे. या नेत्यांचं लेखन हे प्रामुख्याने इंग्रजी भाषेत आहे. त्यामुळे आपसुकच त्यांच्या लेखनाला आंतरराष्ट्रीय महत्व आहे.

हेही वाचा : गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह

पुस्तकांसाठी घर करणारा नेता

स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, सी. राजगोपालचारी, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नेत्यांनी त्यांचं राजकीय तत्त्वज्ञान पुस्तक रूपात मांडलंय. महात्मा गांधी आणि नेहरू यांचे लेख सगळीकडे प्रसिद्ध आहेत. नेहरू घराण्यातले तर अनेक सदस्य लेखक होते.

डॉ. आंबेडकरांचं तर संपूर्ण जीवनच पुस्तकांनी व्यापलं होतं. त्यांचा व्यासंग खूप मोठा होताच. पण  खास पुस्तकांसाठी घर घेणारा नेता म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल.

पुस्तकातलं भारताचं विस्तृत वर्णन

सरदार पटेलांचं लेखन, त्यांनी लिहिलेले लेख, पत्रं आणि त्यांची भाषणं यांचं संपादन पुस्तक रूपात प्रसिद्ध झालंय. त्यात त्यांनी लिहिलेली 'भारत विभाजन', ‘गांधी, नेहरू और सुभाष', 'काश्मीर और हैद्राबाद' ही पुस्तकं महत्त्वाची आहेत. 

स्वातंत्र्योत्तर कालखंडातही अनेक काँग्रेसी नेत्यांनी आपलं राजकीय तत्त्वज्ञान तसंच त्यांना आलेले अनुभव पुस्तक रूपात मांडलेत. त्यात माजी पंतप्रधान पी. वी. नरसिंहराव यांनी 'इन्सायडर' हे त्यांचं आत्मचरित्र लिहिलं असून त्याचं भाषांतर 'अंतस्थ' या नावाने मराठीत झालंय. यात देश स्वतंत्र झाल्यापासून ते इंदिरा गांधी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्या तो कालखंड आणि १९८० ते १९८४ या काळातल्या भारताचं विस्तृत वर्णन आहे. 

त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या काळात घडलेल्या बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेबद्दल आणि या घटनेच्या अनुषंगाने 'अयोध्या : ६ डिसेबर १९९२'  हे पुस्तक लिहिलंय. ते अतिशय महत्त्वाचंय. 

हेही वाचा : इश्क मजहब, इश्क मेरी जात बन गई

मनमोहनसिंगांचं ५ खंडांचं पुस्तक

नरसिंहराव यांच्यानंतर पंतप्रधान झालेले अटलबिहारी वाजपेयी हे तर कवी आणि साहित्यिकच. त्यांच्या राजकीय भाषणावर पुस्तिका आणि त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झालेत. विश्वनाथ प्रताप सिंग हेदेखील कवी आणि चित्रकार. त्यांच्या हिंदी कविता गाजल्या आणि विविध भाषांत अनुवादित झाल्या. आय. के. गुजराल यांचंही राजकीय लेखन गाजलं. 

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ. जगातल्या अनेक युनिवर्सिटीत त्यांचं लेखन अभ्यासक्रमात आहे. शिवाय त्यांच्या लेखनावर संशोधकांनी विपुल लेखन केलंय. अभ्यासक्रमाशिवाय त्यांनी जे आर्थिक राजकीय आणि सामाजिक विषयावरील लेखन केलंय, त्यात प्रमुख आहे 'चेजिंग इंडिया : १९५०-२०१४' हे पाच खंडाचं पुस्तक. 

यात डॉ. सिंग यांनी १९५० पासून २०१४ पर्यंतचा प्रत्येक दशकाचा आढावा घेत या कालखंडातल्या भारताची आर्थिक सामाजिक आणि राजकीय जडणघडण आणि त्यातील बदल याबद्दल मांडणी केली आहे. याशिवाय त्यांनी 'गुरु ग्रंथसाहिब' या ग्रंथावरही भाष्य करणारं स्वतःचं आकलन मांडलंय. 

भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांनी 'द ड्रामॅटिक डिकेड – द इंदिरा गांधी इअर्स' या पुस्तकात १९७१ ते १९८१ या कालखंडातल्या राजकीय घडामोडींची माहिती दिलीय.

शैलीदार भाषेतली आत्मचरित्रं

माजी गृहमंत्री दिवंगत अर्जुन सिंग यांचं आत्मचरित्र हे खूपच विशेष म्हणावं लागेल. याचं कारण म्हणजे त्या आत्मचरित्राचं नाव, 'अ ग्रेन ऑफ सॅण्ड इन द अवरग्लास ऑफ टाइम'. म्हणजे त्यांनी स्वतःचं वर्णन 'काळ मोजणाऱ्या वाळूच्या घड्याळातला लहानसा वाळूचा कण' असं केलंय. हे आत्मचरित्र १९६० पासून भारतीय राजकारणातल्या अनेक घटनांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देतं.

माजी परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंग यांना 'ऑईल फॉर फुड' या सद्दाम हुसेन याने केलेल्या कथित स्कॅममधे नाव आल्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या 'वन लाईन इज नॉट इनफ' या आत्मचरित्राचं खूप सूचक असं नाव असून यात त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल आणि अनेक राजकीय घडामोडींबद्दल अगदी मनमोकळेपणाने मांडणी केलीय.

विशेष म्हणजे पुस्तकातली इंग्रजी भाषा खूप शैलीदार आहे. त्यांचं व्यक्तिमत्वही त्यांच्या नटवर या नावाला साजेसं होतं. तसं हे पुस्तकही!

हेही वाचा : कोरोनाकाळाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटलंय?

निडर विरोधकाची भूमिका

दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणजे शीला दीक्षित. त्यांचं 'सिटिझन दिल्ली - माय टाइम्स, माय लाईफ' हे आत्मचरित्र खूपच सुंदर आहे. विशेष म्हणजे हे लेखन राजकीय अनुभवकथन नसून त्याला एक साहित्यिक मूल्य आहे. शालेय आणि महाविद्यालयीन जीवन, शिक्षण, प्रेम, लग्न आणि लग्नात घडलेल्या गमतीशीर घटना खूप छान मांडल्यात. दुसऱ्यांदा गरोदर असताना सिनेमा पहायला गेल्यावर अचानकपणे थिएटरमधूनच दवाखान्यात जावं लागलं. म्हणून झालेल्या मुलीचं नाव लतिका ठेवलं म्हणे. असं हलकंफुलकं वर्णनही यात आहे.

पी. चिदंबरम हे भारताचे माजी गृहमंत्री तसेच माजी अर्थमंत्री.ते व्यवसायाने वकील आणि त्याचबरोबर अर्थकारण आणि कायदा यांचे अभ्यासक. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. त्यापैकी 'स्टँडिंग गार्ड – अ इअर इन अपोझिशन' आणि 'स्पिकिंग ट्रुथ टू पॉवर -  माय अलर्टनेटिव व्हुव ' ही पुस्तकं विशेष महत्त्वाची आहेत. 

मुळात यात राजकारण, अर्थकारण, जीएसटी, भूमी अधिग्रहण सुधारणा, आस्फा हा कायदा आणि २०१५ची बिहार निवडणूक याबद्दल लिहिलंय. त्यानंतर त्यांची 'फिअरलेस इन अपोझिशन' आणि 'सेविंग द आयडिया ऑफ इंडिया' ही पुस्तकंही महत्त्वाची आहेत.

भारतीय ‘जुगाड’ची अभ्यासू मांडणी

जयराम रमेश हेही काँग्रेस पक्षातलं एक विद्वान आणि उच्चशिक्षित नाव. बॉम्बे आयआयटीचे इंजिनियर असलेल्या रमेश यांनी इंदिरा गांधी यांचं चरित्र लिहिलंय. हे चरित्र इतर चरित्रापेक्षा खूप वेगळं आहे. यात त्यांनी प्रामुख्याने इंदिरा गांधी यांचा पर्यावरण विषयक दृष्टिकोन मांडलाय. त्याचबरोबर त्यांनी भारतातल्या उदारीकरणानंतर झालेल्या बदलांविषयी 'ब्रिन्क अँड ब्लॅक – इंडियाज १९९१ स्टोरी' हे पुस्तक लिहिलंय. 

सॅम पित्रोदा हेही असंच एक नाव. यांनी 'ड्रिमिंग बिग' या त्यांच्या आत्मकथनामधून प्रामुख्याने राजीव गांधी यांनी केलेल्या दूरसंचार आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातल्या क्रांतिकारक कामाचा आढावा घेत आपला जीवनपटही शब्दबद्ध केलाय.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आपलं आत्मकथन 'इंडियाज सेन्चुरी' या पुस्तकात मांडलंय. भारतीयांची परंपरागत उद्योजकता आणि त्याला मिळालेली आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यातून भारतीय माणूस 'जुगाड' कसा करतो याची अनेक उदाहरणं यात आहेत. भारत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यावर अभ्यासू मांडणी आहे. तंत्रज्ञानाने दिलेल्या दैनंदिन जीवनातील अनेक उपकरणांची उपयुक्तता भारतीय कसे वाढवतात याबद्दल खूप रंजक माहिती यात आहे.

हेही वाचा : ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

भारतीय राजकारणाचा पट

काँग्रेस नेते शशी थरूर हे मुळातच एक प्रख्यात लेखक आहेत. तर माजी गृहमंत्री शिवराज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, मणिशंकर अय्यर असे काँग्रेस नेते इंग्रज पेपरमधे कॉलम लिहित असतात. भाजपमधे मागच्या पिढीत लालकृष्ण अडवाणी, के. आर मलकानी, जसवंतसिंग हे चांगले लेखक होते. आता मात्र कुणी दिसत नाही.  

जुन्या पिढीतले कम्युनिस्ट नेते एम. एन. रॉय, एस. ए. डांगे, बी. टी. रणदीवे, समाजवादी नेते राम मनोहर लोहिया, आचार्य नरेंद्र देव, कृपलानी अशा नेत्यांनी विपुल राजकीय लेखन केलंय. मधु लिमये यांनी 'सौहार्द' सारख्या पुस्तकातून अनुभव कथन मांडलेत.

तर कम्युनिस्ट नेते मोहित सेन यांचे 'द ट्रॅवलर' हे पुस्तक निव्वळ त्यांचं मेमॉयर नसून तो भारतीय राजकारणाचा पट सांगणारा दस्ताऐवज आहे. सोमनाथ चटर्जी यांच्या 'किपिंग द फेथ – मेमरीज ऑफ पार्लियामेंटेरियन' या पुस्तकाचे मूल्यही याच स्वरूपाचं आहे. तृणमुल काँग्रेसचे नेते डॉ. सुगता बोस यांचे 'द नेशन ऍज मदर' हे पुस्तक भारतीय राष्ट्रवादावर वेगळा विचार करायला लावणारे आहे. 

महाराष्ट्राचा विचार केला तर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं वेगवेगळ्या राजकीय आणि सामाजिक विषयावर विपुल लेखन आहे. ही परंपरा पुढे महाराष्ट्रात भाई वैद्य, सदानंद वर्दे, शरद पवार यांनीही पुढे चालवली. शिवसेना नेते प्रमोद नवलकर हे तर एक सिद्धहस्त लेखक होते.

विराट आणि विशाल जनसभांमधे लोकांवर प्रभाव टाकणाऱ्या निवडणूक उमेदवार नेत्यांचा हा काळ आहे. पण वक्ता काही काळच राहतो. अमोघ वाणीसाठी प्रसिद्ध असणारा डेमॉस्थनिस खूप कमी लोकांच्या स्मरणात राहिला पण प्लेटो, अरिस्टॉटल आर्किमिडीज, थिओफ्रेसिटसचे नाव लेखनामुळे आजही अजरामर आहे.

हेही वाचा : 

'लाल श्याम शाह' हे पुस्तक मी का लिहिलं?

व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!

मराठीला ज्ञान विज्ञानाची भाषा बनवावी लागेल : रंगनाथ पठारे

मराठी जगात दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असताना संपेल कशी?