#बॉयकॉटदीपिका हॅशटॅगने छपाकचा गल्ला खाल्ला?

१६ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


दीपिका पादुकोनचा छपाक आणि अजय देवगणचा तान्हाजी शुक्रवारी रिलीज झाले. दीपिका जेएनयूतल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याविरोधात उभी झाली. त्यामुळे छपाकवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू झाली. दीपिकाचा छपाक बॉक्स ऑफीसवर फारसा चालला नाही. पण त्याचं कारण शोधण्यासाठी इतरही अनेक गोष्टींचा मागोवा घ्यावा लागेल.

गेल्या शुक्रवारी बॉलीवूडची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोनचा ‘छपाक’ रिलीज झाला. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारी दीपिका ‘छपाक’ सिनेमावेळी कुठंतरी मागं पडली असल्याची जाणीव झाली. बाजीराव मस्तानी, पद्मावत यासारखा हाही सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपलेच राज्य गाजवेल असं वाटलं होतं. पण हे एक अधुरं स्वप्न राहतं की काय अशी भीती मनात सतत वाटू लागली.

दीपिकाच्या छपाकसोबत अजय देवगणचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर' हा सिनेमाही रिलीज झाला. डायरेक्टर मेघना गुलजार यांचा छपाक सिनेमा अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनपटावर आधारित आहे. दुसरीकडे डायरेक्टर ओम राऊत यांचा 'तान्हाजी' ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित आहे.

‘छपाक’वर बंदी घालण्याची मागणी

दोन्ही सिनेमांचं प्रमोशन दमदार झालं. असं असलं तरी प्रमोशन काळात दीपिका चाहत्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसण्याऐवजी एका वेगळ्याच जाळ्यात फसली गेली. असं म्हणण्यामागचं कारणही तसंच आहे. कधीच, कोणत्याच राजकीय प्रकरणात सहभाग न घेणारी दीपिका अचानक जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यामुळे सगळीकडे छपाक सिनेमाची चर्चा न होता दीपिका आणि जेएनयू अशी चर्चा सुरू झाली.

मायानगरीतल्या अनेक सेलिब्रीटींनी विद्यार्थ्यांचं समर्थन करत आंदोलनात सहभाग घेतला होता. पण दीपिकाचा हा सहभाग अनेकांच्या पचनी पडला नाही. त्याचं कारण अद्याप समजलं नाही. बहुतांश लोकांचा समज असा झाला की ती छपाकच्या प्रमोशनसाठी तिथे गेलीय. तर काहींनी तिच्या जाण्याचा संबंध 'तुकडे तुकडे गँग'शी जोडला. इतकंच नाही तर ‘एक भारत तेरे तुकडे होंगे, इन्शा अल्लाह इन्शा अल्लाह’ अशा घोषणांना तुझा पाठिंबा आहे काय? असे प्रश्नसुद्धा तिला विचारण्यात आले.

जेएनयूमधल्या विद्यार्थ्यांवर हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनात सहभाग घेतल्यानं काही पक्षाच्या राजकीय नेत्यांनीही दीपिकावर तीव्र नाराजी व्यक्त केली. काहींनी तिचं कौतुकही केलं. तिच्या भूमिकेशी सहमत नसलेल्या काही मंडळींनी तर थेट 'छपाक'वर बंदी घालायचीच मागणी केली. त्यामुळे छपाक रिलिज होण्यापूर्वीच माजलेला गोंधळ पाहता बॉयकॉटदीपिका, बॉयकॉटदीपिकापदुकोन या हॅशटॅगचा परिणाम सिनेमावर होतो की काय, अशी भीती होती.

हेही वाचा : दीपिकाच्या मौनातही जय हिंदचा नारा घुमतो!

छपाकपेक्षा तान्हाजीला प्रेक्षकांची पसंती

दोन्ही सिनेमे रिलिज झाल्यानंतर सगळीकडे चर्चा पाहायला मिळाली ती केवळ तान्हाजीची. छपाकची चर्चा कुठंतरी पाण्यात साखर विरघळावी तशी प्रेक्षकांच्या तोंडातून चर्चा निवळली असल्याचं चित्र पाहायला मिळालं.

एका आठवड्याचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट बघितला तर 'तान्हाजी'च्या तुलनेत छपाक मागे पडला असल्याचं समोर आलं. छपाकचा आत्तापर्यंतचा ऑडियन्स रेटिंग स्कोर २.७ इतका तर तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमाचा ४.९ आहे. असं असलं तरी कलेक्शन आणि ऑडियन्स रेटिंगवर अनेक प्रश्न उपस्थित होतात.

भारतात छपाकला १७०० आणि परदेशात ४६० स्क्रीन्स मिळाल्यात. म्हणजेच छपाकला एकूण २१६० स्क्रीन्स मिळाल्यात. तर तान्हाजीला भारतामधे ३८८० आणि परदेशात ६६० स्क्रीन्स मिळाल्यात. म्हणजेच एकूण ४५४० स्क्रीन्स. यासोबतच हा सिनेमा दोन भाषांमधे म्हणजेच हिंदी आणि मराठीत रिलिज झालय. दोन्ही सिनेमांचं स्क्रीनींग पाहता स्क्रीनिंगच्या संख्येत मोठी तफावत असल्याचं दिसतं.

स्त्रीप्रधान सिनेमांना कोण जातं?

एवढंच नाही तर छपाक रिलिज झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो ऑनलाइन लीक झाला. तमिळ रॉकर्सने हा सिनेमा पहिल्याच दिवशी लीक केला. तमिळ रॉकर्सने पहिल्याच दिवशी सिनेमा लीक करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही मरजावाँ, ड्रीम गर्स, भारत, कबीर सिंह, केसरी यासारखे सिनेमे ऑनलाईन लीक झाल्यानं त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं.

यासोबतच, तान्हाजी मालुसरे या नावाचं वलय 'छपाक'वर भारी पडलं. ऐतिहासिक व्यक्तिरेखा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भारतीयांवर नेहमीच प्रभाव राहिलाय. त्यांच्या कथा आपल्याला प्रेरणा देतात. ४०० वर्षांपूर्वी कोंढाणा किल्ल्यावर पराक्रम गाजवणारे तान्हाजी हे देखील असंच प्रेरणादायी वलयांकित नाव आहे. आणि त्यांचं कर्तृत्व रुपेरी पडद्यावर पाहाण्यासाठी प्रेक्षक 'छपाक'च्या तुलनेत अधिक उत्सुक होते.

भारतीय प्रेक्षक महिलाप्रधान म्हणजेच महिला लीड रोलमधे असलेल्या सिनेमांच्या बाबतीत फारसे उत्साही दिसत नाहीत. कारण आपल्या देशात निर्माण होणाऱ्या जवळपास प्रत्येक सिनेमात महिला पात्रं केवळ सहाय्यक कलाकाराच्याच भूमिकेत झळकताना दिसतात. 'मदर इंडिया', 'बँडिट क्विन', 'मर्दानी' असे काही अपवादात्मक सिनेमे सोडले. तर इतर सर्व महिलाप्रधान सिनेमांना फारसं यश मिळालेलं नाही. 'छपाक' हादेखील एक महिलाप्रधान सिनेमा आहे. त्यामुळे बहुदा या सिनेमाबाबत प्रेक्षक फारसे उत्साही दिसत नाहीत.

हेही वाचा : कैफी आझमींचं कवितेतलं स्वप्न साकारणारी शबाना

तान्हाजी उत्तम व्यावसायिक सिनेमा

'छपाक' एक ड्रामा पॅटर्न सिनेमा आहे. दुसरीकडे तान्हाजी एक अॅक्शनपट आहे. अॅक्शनपटांना बॉलिवूडमधे नेहमीच चांगली डिमांड असते. आपल्याकडे बहुसंख्य प्रेक्षकांना झगमग गाणी, हायवोल्टेज ड्रामा, जोरदार अॅक्शन असे मसालेदार सिनेमे पाहायला आवडतात. तान्हाजीदेखील असाच एक अॅक्शन सीनने भरलेला ऐतिहासिकपट आहे. त्यामुळे अॅक्शन विरुद्ध ड्रामा या स्पर्धेत सध्या अॅक्शनपट बाजी मारताना दिसतंय.

या सर्व गोष्टींचा अभ्यास केला असता कलेक्शन आणि ऑडियन्स रेटिंग यांच्यात तुलना करणंच चुकीचं असल्याचं आपल्या लक्षात येतं. कारण दोन्ही सिनेमाचे जॉनर आणि प्रेक्षकवर्ग वेगळा आहे. डायरेक्टर मेघना गुलजार यांनी सत्यघटनेतला रिअलिस्टिक टच कायम ठेवण्यात मोलाचा वाटा उचललाय. दुसरीकडे नवखा डायरेक्टर ओम राऊत यांनी तानाजींचं शौर्य पडद्यावर दाखवताना ते पूर्णपणे भव्यदिव्य होईल, डोळे दिपवून जातील याची पुरेपूर खबरदारी घेतलीय. नाट्यमय संहिता, पहिल्या फ्रेमपासून खिळवून ठेवणारी मांडणी, प्रभावी 'वीएफएक्स' यामुळे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला 'तान्हाजी' एक उत्तम व्यावसायिक सिनेमा होतो.

गेल्या काही काळातल्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर एक नजर टाकली तर भारतीयांचा कल सामाजिक पटापेक्षा ऐतिहासिक गोष्टी उलगडण्याकडे  अधिक असल्याचं दिसतं. त्यामुळे ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर' आणि ‘छपाक’ या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर किती गल्ला जमवला हे पाहणं चुकीचं आहे असं म्हणायला हवं. यासोबत बॉयकॉटदीपिकापादुकोन या हॅशटॅगचा फारसा परिणाम छपाकच्या बॉक्स ऑफिसवर झाला असंही म्हणता येणार नाही.

हेही वाचा : 

सोनाली बेंद्रेः कॅन्सरशी पंगा घेणारी लढवय्यी

रात्रीस खेळ चालेः शेवंता हॉट म्हणून बदलला प्लॉट?

आंदोलनांमुळे सत्तेला लागलीय 'आर्ट अटॅक’ ची धास्ती

‘बॉम्बे सुपरस्टार’ म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामी