हिंदुत्ववाद्यांचा विरोध असूनही ‘ब्रम्हास्त्र’ची कमाई कशी वाढली?

१४ सप्टेंबर २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


अयान मुखर्जी लिखित-दिग्दर्शित ‘ब्रम्हास्त्र’ ९ सप्टेंबरला देशभर रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई करणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. प्रादेशिक सिनेमांची वाढती क्रेझ आणि बॉयकॉट गँगसारख्या अडथळ्यांवर मात केलेल्या ‘ब्रम्हास्त्र’ची कमाई बॉलीवूडसाठी दिलासादायक ठरलीय.

कोरोनाआधी आणि नंतरही अपेक्षित यशासाठी बॉलीवूड झगडताना दिसतंय. काही मोजक्या सिनेमांचा अपवाद वगळता, लॉकडाऊननंतर थियेटरमधे रिलीज झालेल्या बऱ्याचशा बॉलीवूड सिनेमांना प्रेक्षकांनी अतिशय थंड प्रतिसाद दिल्याचं दिसून येतं. त्यामुळे कित्येक बॉलीवूड सिताऱ्यांनी आपला सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरच रिलीज करण्यात धन्यता मानली.

अनेक बिग बजेट सिनेमांना गेल्या काही महिन्यात बॉक्स ऑफिसवर तोंडघशी पडावं लागलं. कित्येकांची तर गुंतवणूकही वसूल झालेली नाही. मनोरंजनाची भरघोस आश्वासनं देत तिकीटबारी जिंकायची स्वप्न बघणाऱ्या कित्येक सिनेमांना प्रेक्षकांनी आस्मान दाखवलं. या सगळ्यात प्रादेशिक सिनेमांची वाढती क्रेझ आणि बॉयकॉट गँगसारख्या मोठ्या अडथळ्यांना पार करत उभा राहिलेला ‘ब्रम्हास्त्र’ बॉलीवूडसाठी आशेचा किरण ठरलाय.

पौराणिक कथांमधलं ‘अस्त्रावर्स’

रणबीर कपूर, आलिया भट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉयसारखी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात शाहरुख खानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारलीय. ‘ब्रम्हास्त्र भाग १: शिवा’ नावाने रिलीज झालेल्या या सिनेमाचे आणखी दोन भाग येत्या काळात पाहायला मिळणार आहेत. ‘ब्रम्हास्त्र’ ही सिनेत्रयी ‘अस्त्रावर्स’ या आगामी काळातल्या मोठ्या प्रकल्पाचाच एक भाग आहे.

देव-दानवांच्या युद्धावर आधारित असलेल्या अनेक पौराणिक कथांमधे आपल्याला अस्त्रांबद्दल माहिती मिळते. त्यात ब्रम्हास्त्र हे शक्तिशाली अस्त्रांपैकी एक मानलं जातं. या सिनेमाचा लेखक-दिग्दर्शक अयान मुखर्जीने याच संकल्पनेचा आधार घेत ‘अस्त्रावर्स’ म्हणजेच अस्त्रांच्या युनिवर्सची मांडणी केलीय. भारतात मार्वल आणि डीसीच्या तोडीस तोड सिनेमॅटीक युनिवर्स उभारण्याची महत्त्वाकांक्षा या प्रकल्पामधे आहे. 

मार्वल आणि डीसीच्या सिनेमॅटीक युनिवर्समधे एकेका सुपरहिरोवर सिनेमे बनवले जातात. त्याच धर्तीवर, दिग्दर्शक अयान मुखर्जी एकेका अस्त्रावर सिनेमा बनवू पाहतोय. ‘अस्त्रावर्स’च्या माध्यमातून उत्तमोत्तम गुणवत्तेचं वीएफएक्स भारतीय प्रेक्षकांना पाहता येईल, असा अयानचा विश्वास आहे. २०११पासून अयान या अस्त्रांच्या मालिकेसाठी संशोधन आणि लेखन करतोय. त्याची ही मेहनत अकरा वर्षांनी ‘ब्रम्हास्त्र’च्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर आलीय. 

प्रदर्शनापूर्वीच मोडला रेकॉर्ड

खरं तर हा सिनेमा डिसेंबर २०१६ला रिलीज होणार होता पण आर्थिक अडचणी आणि कोरोनामुळे रिलीज लांबत गेलं. शेवटी डिसेंबर २०२१मधे ९ सप्टेंबर २०२२ ही तारीख निश्चित केली गेली. साधारणतः २ सप्टेंबर २०२२पासून पीवीआर आणि मोठ्या मल्टिप्लेक्समधे ‘ब्रम्हास्त्र’ची थ्रीडी वर्जनसाठी तिकिटांच्या आगाऊ विक्रीची प्रक्रिया सुरु झाली.

बघताबघता, आगाऊ विक्रीचे आकडे फुगतच गेले. केवळ तीन दिवसांतच २.३० कोटींचं आगाऊ बुकिंग मिळवत ‘ब्रम्हास्त्र’ने यावर्षी आलेल्या ‘आरआरआर’ आणि ‘भुलभुलैय्या २’च्या आगाऊ बुकिंगचे आकडे मागे टाकले.

आगाऊ बुकिंगचा उच्चांक गाठणाऱ्या सर्वकालीन सिनेमांच्या यादीत ‘ब्रम्हास्त्र’ २८ कोटींच्या कमाईसह चौथ्या स्थानावर आहे. यावर्षी ‘केजीएफ: चाप्टर २’ नंतर सर्वाधिक आगाऊ बुकिंग मिळवणारा ‘ब्रम्हास्त्र’ हा दुसराच सिनेमा ठरलाय. रिलीज होण्यापूर्वीच एवढा प्रतिसाद मिळवणं ही ‘ब्रम्हास्त्र’ आणि त्यातल्या त्यात बॉलीवूडसाठी कधीच सोपी गोष्ट नव्हती.

हेही वाचा: इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

प्रादेशिक सिनेमांची लाट

गेल्या डिसेंबरमधे देशभर रिलीज झालेल्या ‘पुष्पा’ या तेलुगू सिनेमानंतर प्रादेशिक, विशेषतः दक्षिणेकडून येणाऱ्या सिनेमांचं जंगी स्वागत होऊ लागलं. ‘पुष्पा’नंतर आलेल्या ‘वलिमाई’, ‘आरआरआर’, ‘विक्रम’ आणि ‘केजीएफ चाप्टर २’सारख्या सिनेमांना मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद तर बॉलीवूडच्या उरात धडकी भरवणाराच होता. या सर्वच सिनेमांनी कोट्यावधींची कमाई करत अनेक विक्रम नोंदवले.

‘आरआरआर’ हा १२०० कोटींची कमाई करणारा तेलुगू सिनेमा तर चक्क ‘द ग्लोरी ऑफ इंडियन सिनेमा’ म्हणजेच भारतीय सिनेमाचं वैभव म्हणून सादर केला जात होता. एकेकाळी जागतिक पातळीवर भारतीय सिनेमाच्या नावाखाली निव्वळ हिंदी सिनेमांचा भडीमार करणाऱ्या बॉलीवूडपुढे प्रादेशिक सिनेमांचं मोठं आव्हान निर्माण झालं होतं.

फसलेल्या रिमेकची गोष्ट

या प्रादेशिक सिनेमांची ताकद काय आहे हे बॉलीवूडला बऱ्याच आधी कळलं होतं. पण रिमेकचं अस्त्र वापरून प्रादेशिक सिनेमांचा प्रभाव कमी करण्यात बॉलीवूड तेव्हा यशस्वी ठरला होता. २०१०नंतर हिंदीत डब झालेल्या तेलुगू, कन्नड आणि तमिळ सिनेमांचा टक्का जसजसा वाढू लागला, तसतसं बॉलीवूडचं रिमेकास्त्र प्रेक्षकांना कंटाळवाणं वाटू लागलं. पण यावरून काही धडा न घेता लॉकडाऊननंतर पुन्हा रिमेकच्या नादी लागणं बॉलीवूडला चांगलंच भोवलंय.

यात मुळच्या तमिळ ‘कंचना’चा रिमेक ‘लक्ष्मी बाँब’ आणि ‘जिगरथंडा’चा रिमेक ‘बच्चन पांडे’ या अभिनेता अक्षय कुमारच्या सिनेमांचा समावेश होता. शरद केळकरचा उत्तम अभिनय वगळता ‘लक्ष्मी’च्या वाट्याला टीकाच जास्त आली. ‘बच्चन पांडे’ तर आपली निम्मी गुंतवणूकही वसूल करू शकला नाही. तेलुगू ‘जर्सी’चा रिमेक असलेल्या ‘जर्सी’ला बॉक्स ऑफिसवर गटांगळ्या खाण्यापासून शाहीद कपूरचा अभिनयही वाचवू शकला नाही.

इतकं होऊनही, येत्या ३० सप्टेंबरला ‘विक्रम वेधा’च्या निमित्ताने बॉलीवूड आणखी एक रिमेक बाजारात आणतंय. मूळ तमिळ ‘विक्रम वेदा’चा रिमेक असलेल्या या सिनेमात हृतिक रोशन आणि सैफ अली खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘ब्रम्हास्त्र’च्या कमाईमुळे सध्या बॉलीवूडच्या वातावरणात दिलासा असला तरी बॉयकॉट गँगची टांगती तलवार अजूनही बॉलीवूडच्या डोक्यावर आहेच.

हेही वाचा: जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

त्रासदायक बॉयकॉट गँग

गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूड हिंदूविरोधी विचारसरणी पसरवत असल्याच्या अपप्रचाराला जोर आलाय. त्यामुळे बॉलीवूडला रोखण्यासाठी बॉयकॉट म्हणजेच बहिष्कार तंत्राचा अवलंब हिंदुत्ववादी जनतेकडून केला जातोय. सिनेमात दिसणारी छोट्यातली छोटी गोष्ट, कलाकारांची जुनी वक्तव्यं कशी हिंदूविरोधी आहेत याचा विखारी प्रचार सोशल मीडियावर केला जातोय. अप्रत्यक्षपणे मिळणारा राजकीय वरदहस्त ही या बॉयकॉट गँगची विशेष ताकद ठरलीय.

याच राजकीय वरदहस्ताच्या जोरावर यावर्षी आलेला ‘द काश्मीर फाईल्स’सारखा सत्य घटनेच्या नावाखाली धार्मिक द्वेषाची पेरणी करणारा सिनेमा हिट ठरला. बॉलीवूडच्या यावर्षीच्या बॉक्स ऑफिसवर यश मिळवणाऱ्या सिनेमांच्या यादीत हाही सिनेमा आहे. पण हा सिनेमा प्रमोट न केल्यानं अनेकांवर बॉयकॉट गँग नाराज आहे आणि ती नाराजी गेल्या काही महिन्यांत तिकीटबारीवर उघडपणे दिसलीय.

आमीर खानचा ‘लाल सिंग चढ्ढा’ असेल किंवा विजय देवरकोंडाचा ‘लायगर’, दोन्हीकडे बॉयकॉट गँगने आपली दहशत दाखवली. २०१५मधे आमीरने देशातल्या वाढत्या असहिष्णुतेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याच्या या विधानाचा परिणाम ‘लाल सिंग चढ्ढा’वर झाला. या बॉयकॉट गँगला आपण फारसं महत्त्व देत नाही म्हणणाऱ्या विजयच्या ‘लायगर’लाही सरतेशेवटी मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं.

‘बॉयकॉट ब्रम्हास्त्र’चा ट्रेंड

बॉयकॉट गँगची दहशत अनुभवलेला असाच एक सिनेमा म्हणजे यावर्षी आलेला ‘शमशेरा’. ‘ब्रम्हास्त्र’मधे प्रमुख भूमिका साकारणाऱ्या रणबीरने पहिल्यांदाच या सिनेमात दुहेरी भूमिका साकारली होती. यावर्षी आलेला ‘यश राज फिल्म्स’ची निर्मिती असलेल्या अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ बॉक्स ऑफिसवर दणकून आपटल्यामुळे ‘शमशेरा’कडे ‘यश राज फिल्म्स’सह सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं.

या सिनेमात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. कपाळावर भस्म लावलेला हिंदू खलनायक आणि समोर दलित नायक हे चित्र अर्थातच बॉयकॉट गँगच्या पचनी पडणारं नव्हतं. त्यामुळे ‘शमशेरा’ला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं. त्यानंतर गव्हासंगे रगडल्या जाणाऱ्या किड्यासारखा रणबीर आणि त्याचा ‘ब्रम्हास्त्र’ही बॉयकॉट गँगच्या हिटलिस्टवर आला. ‘ब्रम्हास्त्र’ फ्लॉप करण्यासाठी बॉयकॉट गँग मोठ्या जोमाने तयारीला लागली.

हेही वाचा: ओटीटी प्लॅटफॉर्म थेटरचे बाप बनणार का?

 

संघाच्या मुखपत्रातली गरळ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’च्या शर्मी अधिकारी यांनी तर ‘ब्रम्हास्त्र’ फ्लॉप करणं ही हिंदूंसाठी एक सत्वपरीक्षा असल्याच्या थाटात त्यावर टीका केली होती. त्या लेखात रणबीरच्या ‘रॉकस्टार’ या सिनेमाला फुटीरतावादाचा प्रचारक म्हटलंय. त्याचबरोबर आलिया भटचे वडील दिग्दर्शक महेश भट यांनी २६/११च्या हल्ल्यासाठी संघाला कसं जबाबदार ठरवलं होतं, हेही पुन्हा एकदा ठसवून सांगायचा प्रयत्न केलाय.

‘ब्रम्हास्त्र’चा निर्माता असलेल्या करण जोहरने आजवर हिंदू संस्कृतीची खिल्लीच उडवलीय. त्यामुळे एक ‘ब्रम्हास्त्र’ त्याच्या आजवरच्या सर्व चुकांवर पांघरूण घालेल असं अधिकारी यांचं म्हणणं आहे. मुळात ‘ब्रम्हास्त्र’ची कथाच हिंदू पुराणकथांवर आधारित असल्याने कथेची गरज म्हणून त्यात हिंदू दैवतांचं उदात्तीकरण केलं गेलंय. भरीस भर म्हणून नायकाचं नाव शिवा आणि नायिकेचं नाव पार्वती दाखवलंय. हे सगळं चित्र अर्थातच बॉयकॉट गँगला सुखावणारं आहे.

पण अधिकारी यांनी ‘ब्रम्हास्त्र’ऐवजी त्यातल्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर, त्यांच्या हितसंबंधांवर ओढूनताणून टीका करत बॉयकॉट गँगला आणखीच भडकवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळेच, हिंदूंनी आत्तापर्यंतची बॉयकॉट मोहीम यशस्वीपणे पार पाडली असून करण जोहरच्या ‘ब्रम्हास्त्र’ला भुलू नये, असं आवाहनही त्यांनी आपल्या लेखात केलं होतं. पण या सगळ्याच्या नाकावर टिच्चून ‘ब्रम्हास्त्र’ अजूनही तिकीटबारीवर गर्दी खेचताना दिसतोय.

‘ब्रम्हास्त्र’चं दिलासादायक यश

लॉकडाऊननंतर बॉलीवूड तिकीटबारीवर आपली जागा पुन्हा मिळवण्यासाठी प्रचंड धडपड करताना दिसतंय. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वरचष्म्यामुळे प्रेक्षकांची बदललेली चव, प्रादेशिक सिनेमांच्या परड्यात सिनेरसिकांनी टाकलेलं झुकतं माप आणि बॉयकॉट गँगचा उपद्रव अशा एक ना दोन अडथळ्यांना तोंड देता देता बॉलीवूडची चांगलीच दमछाक झालीय. त्यामुळे ‘ब्रम्हास्त्र’ने केलेली २६५ कोटींहून अधिकची कमाई बॉलीवूडसाठी नवसंजीवनी ठरलीय.

फेब्रुवारीतल्या ‘गंगूबाई काठियावाडी’, मार्चमधे आलेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ आणि मेमधल्या ‘भुलभुलैय्या २’चा अपवाद वगळता यावर्षी आलेले बरेचसे बिग बजेट बॉलीवूड सिनेमे २०० कोटींचा आकडा पार करण्यात असमर्थ ठरलेत. प्रादेशिक सिनेमांचा पूर ओसरल्यानंतर ‘जुग जुग जियो’ला मिळालेलं अनपेक्षित यश सोडलं तर ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘लाल सिंग चढ्ढा’, ‘झुंड’, ‘लायगर’सारख्या महत्त्वाच्या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर अपयशाचा सामना करावा लागलाय.

‘ब्रम्हास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जीने याआधी ‘वेक अप सिद’ आणि ‘ये जवानी है दिवानी’सारखे हिट सिनेमे दिलेत. या सिनेमांचा प्रमुख प्रेक्षकवर्ग हा तरुण आहे. आत्ताच्या तरुणाईला अगदी आपलीशी वाटतील अशी पात्रं आणि सर्वसामान्यांच्या जवळच्या कथा त्याच्या सिनेमांमधून समोर येतात. ‘ब्रम्हास्त्र’च्या निमित्ताने डीसी आणि मार्वलकडे खेचला गेलेला तरुण प्रेक्षकवर्ग पुन्हा बॉलीवूडकडे वळवण्याचा कौतुकास्पद प्रयत्न अयानने केलाय.

यासोबतच ‘ब्रम्हास्त्र’ने केलेलं प्रमोशन आणि मार्केटींग प्रभावी ठरल्याचं बॉक्स ऑफिसच्या आकड्यांनी दाखवून दिलंय. त्याचबरोबर बॉयकॉट गँगच्या टांगत्या तलवारीची धार बोथट झाल्याचंही या कमाईतून सिद्ध झालंय. सिनेमाच्या आशय आणि वीएफएक्सबद्दल प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येतायत. पण ‘ब्रम्हास्त्र’च्या निमित्ताने, गेला काही काळ कंटाळवाण्या वाटणाऱ्या बॉलीवूडकडून अपेक्षित असलेल्या मनोरंजनाची भूक भागवली जातेय, हेही तितकंच खरं.

 

हेही वाचा: 

ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

ओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य