'घाशीराम कोतवाल' नाटकाला ब्राह्मणांचा विरोध का होता?

१६ डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


मराठी रंगभूमीला जागतिक पातळीवर नेणारं नाटक, काळाच्या कसोटीवर उतरलेलं नाटक असं वर्णन आज 'घाशीराम कोतवाल'चं केलं जातं. पण पन्नास वर्षांपूर्वी या नाटकाला त्यावेळच्या ब्राह्मण समाजाकडून प्रचंड विरोध झाला होता. या विरोधामुळे एकदा या नाटकातल्या कलाकारांना चक्क लपून प्रवास करावा लागला होता. या विरोधाचं कारण समजून घ्यायलाच हवं.

'श्रीगणराय नर्तन करी, आम्ही पुण्याचे बामण हरी'

या नांदीनं सुरवात होणारं घाशीराम कोतवाल हे नाटक, संपतंही याच कवनानं. फक्त सूरावटीतले भाव बदललेले असतात. घाशीराम रंगभूमीवर मरून पडलेला असतो. नाना फडणवीस त्याचा वध झाल्याचं जाहीर करतात. याचं प्रेत उचलेल त्याला कडक सजा होईल, असं सांगून पुण्यात तीन दिवस उत्सव साजरा करण्याची घोषणा करतात.

रंगमंचावरचे सगळे ब्राह्मण घाशीरामाच्या प्रेताला ओलांडून पुन्हा माणसांची भिंत उभी करतात आणि नानांसह नाच करत पुन्हा हेच कवन पुन्हा गायला लागतात. ‘श्रीगणराय नर्तन करी, आम्ही पुण्याचे बामण हरी.’ जिथून सुरवात तिथंच शेवट. काळाचं एक वर्तुळ पूर्ण. पुन्हा नव्यानं काळाच्या नव्या वर्तुळाची सुरवात असं रुपक मांडणाऱ्या घाशीराम कोतवाल या महान नाटकाला आज पन्नास वर्ष होतायत.

मानवी इतिहासातल्या कोणत्याही टप्प्यावर आढळणारं सत्ता, कौर्य आणि वासना यांच्यातलं त्रिकालबाधित सत्य मांडणारं नाटक म्हणजे 'घाशीराम कोतवाल'. द्रष्टे लेखक विजय तेंडुलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या या नाटकानं अक्षरशः इतिहास घडवला. या नाटकानं कालातीत सत्याला भिडल्याबद्दल जेवढं कौतुक मिळवलं, तेवढंच पेशवाई, ब्राह्मण समाज यावर भाष्य केलं म्हणून वादही ओढावून घेतला.

हेही वाचाः पेशवाईला वंदा किंवा निंदा, त्याआधी हे वाचा

नक्की काय होतं या वादाचं मूळ?

या नाटकाला विरोधाचं मूळ कारण होतं त्याच्या कथानकात. नाटकाची सुरुवात होते त्या नांदीच्या कवनापासून ब्राह्मण हा शब्द अधोरेखित होऊ लागतो. गोष्ट असते ती देखील घाशीराम सावळदास या उत्तर प्रदेशच्या कनोज इथल्या ब्राह्मणाची. पेशव्यांचे प्रधान श्रीमंत नाना फडणवीस यांच्या स्त्रीलंपटपणाचा फायदा पुण्यात उपरा असलेला घाशीराम सावळदास घेतो.

त्यासाठी नानांना तो आपली पोटची पोरगी देऊन त्या बदल्यात पुण्याची कोतवाली मिळवतो. कोतवाली मिळाल्यावर घाशीरामला सत्तेची ताकद कळत जाते. तो पुण्यावर वचक बसवतो आणि परवान्यांचं राज्य आणतो. नियम कडक झाल्यानं पुण्याच्या बावनखणीमधल्या रात्रीच्या मौजमजेवर गदा येते. घाशीरामला आधी उपरा म्हणून हिणवलं जातं. मग त्याची मुलगी दिसेनाशी होते आणि गर्भपातानं तिचा मृत्यू झाल्याचं घाशीरामला कळतं.

त्याचा बदला म्हणून तो पेशव्यांच्या बागेतली फळं चोरल्याच्या आरोपावरून दक्षिणेकडून आलेल्या बावीस ब्राह्मणांना कोठडीत टाकण्याचा हुकूम देतो. कोठडीत हवा न मिळाल्यामुळे घुसमटून हे सर्व ब्राह्मण त्या रात्रीत मरतात. शहरात गहजब होतो. पुण्यातले ब्राह्मण नानांकडे न्याय मागण्यासाठी जातात. जनता चालून आल्याने घाबरलेले नाना घाशीरामच्या वधाचा हुकूम देतात.

त्यांनाही घाशीराम डोईजड झालेलाच असतो. खवळलेले ब्राह्मण घाशीरामाला दगडांनी ठेचून मारतात. त्याचा वचक संपतो. नियम शिथिल होतात आणि पुण्यातलं बावनखणीवरलं ‘नाइट लाईफ’ पूर्ववत होतं. सत्तेची धुंदी आणि मानवी आकांक्षा, वासना यांचं हे न संपणारं चक्र मांडणाऱ्या या नाटकावर ब्राह्मणविरोधी असल्याचा शिक्का पडला आणि टीकेला सुरवात झाली.

विरोध, मोर्चे, खटला आणि बरंच काही

पुण्यातल्या पेशावाईच्या पार्श्वभूमीवर घडणारं हे नाटक नाना फडणवीस, घाशीराम कोतवाल अशा ऐतिहासिक नावांभोवती फिरतं. पण हे ऐतिहासिक आधार असलेलं अनैतिहासिक नाटक असल्याचं नाटकाच्या सुरवातीलाच सांगितलं जातं. तरीही त्यात पेशवाई, ब्राह्मण समाज यांची बदनामी केल्याबद्दल पुण्यात या नाटकाविरोधात मोर्चे निघाले. प्रयोग बंद पाडण्याचे प्रयत्न झाले. तसं म्हटलं तर या नाटकाशी संबंधित बहुतेकजण हे ब्राह्मणच होते. 

‘घाशीराम कोतवाल’ या नाटकामुळं महाराष्ट्राची सांस्कृतिक क्षेत्रात बदनामी होतेय, अतिशय विकृत पद्धतीनं इतिहासाचं विडंबन या नाटकात करण्यात आलंय. नाना फडणवीस, पेशवे यांचा उल्लेख असलेल्या या नाटकावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यावेळच्या वृत्तपत्रामधे मोठमोठ्या नावांचे लेखक काही या बाजूने तर काही त्या बाजूने लेख लिहित होते. 

नाटक बंद पाडावं यासाठी कोर्टात खटलाही भरण्यात आला. पण, या सगळ्यामुळे नाटकाच्या लोकप्रियतेत भरच पडली आणि काळाच्या कसोटीवर उतरलेलं सत्य लोकांपुढे मांडण्यात यश मिळालं. भाजपचा मूळ पक्ष असलेला त्यावेळचा जनसंघ, हिंदू महासभा, शिवसेना या राजकीय पक्षांनी या नाटकाला विरोध केला होता. हा विरोध एवढा वाढला की, एकदा कलाकारांना स्वतःच्या संस्थेचं नाव बदलून लपून प्रवास करावा लागला.

हेही वाचाः पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?

‘घाशीराम’च्या विरोधकांना ‘कात्रजचा घाट’

इकडं ‘घाशीराम’वरू गोंधळ सुरू असतानाच तिकडं जर्मनीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात सहभागी होण्याचं आमंत्रण या नाटकाला मिळालं. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री वसंत साठे म्हणाले की, ‘हे नाटक बर्लिनला पाठवणं म्हणजे देशाची प्रतिमा मलीन होण्यासारखं आहे’. मग या वादावर तोडगा काढण्यासाठी कमलादेवी चट्टोपाध्याय, पुपूला जयकर, कपिला वात्सायन अशी समिती नेमण्यात आली.

त्यांनी नाटकाबद्दल अनुकूल मत दिलं आणि घाशीराम बर्लिनला जाणार यावर शिक्कामोर्तब झालं. केंद्र सरकारकडून होकार आला तरीही, नाटकाविरुद्ध चळवळ करणाऱ्यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्याकडून हे नाटक बंद पाडण्यासाठी पाठिंबा मिळवला. आता हे कलाकार मुंबईहून विमानानं जर्मनीला जाणार होते, पण ते पुण्याहून मुंबईला बसने येणार होते.

त्यांच्या बस शिवसेनेची साथ घेऊन खंडाळ्याचा घाटात अडवून ठेवण्याचा डाव रचला गेला. त्यांच्या गाड्या खोपोलीच्या पुढं येणार नाहीत, अशा तऱ्हेनं हे लोक रस्ता अडवण्याच्या तयारीत घाटात थांबले होते. या तणावग्रस्त वातावरणात शरद पवार यांनी नाटकाची पाठराखण केली. त्यांनी ‘किर्लोस्कर समूहा’चे मालक चंद्रकांत किर्लोस्कर यांची मदत घेतली.

त्यांनी मोहन आगाशे यांच्या नावाचा उपयोग करून ‘ए. मोहन आणि कंपनी’ अशा नावानं पुणे ते मुंबई चार्टर फ्लाइट बुक केलं. अक्षरशः घरच्यांनाही न कळवता नाटकातल्या कलाकारांनी पुणे-मुंबई आणि मुंबई-बर्लिन असा विमानप्रवास करत बर्लिन गाठलं. इकडं घाटातल्या विरोधकांना कात्रजचा घाट आठवला आणि तिकडं या नाटकाची प्रचंड वाहवा झाली. जर्मनीतल्या रसिकांनी प्रयोग संपल्यावर ‘घाशीराम’च्या कलाकारांना ‘स्टॅंडिंग ओव्हेशन’ दिलं.

जग जिंकल्यावर मग विरोध मावळला

जर्मनीतल्या यशानंतर मात्र हळूहळू इकडचा विरोध मावळू लागला. जर्मनीतून भारतात परतलेल्या घाशीरामचं रेड कार्पेट घालून स्वागत करण्यात आलं. जगभरातल्या नाट्यरसिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यावर भारतातही नाटक तुफान गाजलं. जगभरातल्या विविध नाट्यमहोत्सवांत हे नाटक सादर करण्यासाठी आमंत्रण येत राहिली. अमेरिका, कॅनडा, रशिया, पूर्व जर्मनी, हंगेरी, युगोस्लाव्हिया या देशांमधे प्रयोग झाले. लंडनच्या हॅमरस्मिथमधे रिव्हरसाइड स्टुडिओ या नाट्यगृहात सलग आठ दिवस घाशीरामचे प्रयोग झाले.

हौशी नाट्य स्पर्धेसाठी आणि प्रायोगिक रंगभूमीवर प्रयोग म्हणून केल्या गेलेल्या या नाटकानं नाट्यइतिहासात नवा मैलाचा दगड रचला. नाट्यअभ्यासक्रमात या नाटकाचा समावेश केला गेला. राजेंद्रनाथ यांनी हिंदीत केलेलं रूपांतर राष्ट्रीय नाट्य महोत्सवात गौरवले गेले. पुढे जयंत कर्वे आणि एलिनॉर झिलिअट यांनी केलेलं इंग्रजी रूपांतरही गाजलं. ‘युरोपियन थिएटरलाही प्रेरणा देणारं नाटक भारतातून आलंय.’ अशा शब्दांत ‘गार्डियन’ने ‘घाशीराम’चा गौरव केला होता.

भारतातल्या लेखकांची आणि समीक्षकांची भाषाही नंतर बदलली. त्यावर पुस्तकं लिहिली गेली. आज पन्नास वर्षानंतरही नव्या संचामधे या नाटकाचे प्रयोग होतायत. नाटकाच्या शेवटी कोपऱ्यात एक ब्रिटीश अधिकारी हे सगळं पाहतोय, असं फक्त दाखवलंय. ते फार सूचक आहे आणि त्यासाठी तेंडुलकरांच्या प्रतिभेला दाद द्यावी तेवढी थोडी आहे.

१८१८ मधे पेशवाई संपली आणि इंग्रजांचं राज्य आलं. त्याच्या आधी आणि नंतर काय घडलं हे इतिहासानं नोंदवून ठेवलेलंच आहे. पण तेंडुलकरांच्या वाक्यात सांगायचं तर, ‘घाशीराम हे विशिष्ट समाज-स्थितीची निर्मिती असतात आणि ही समाज-स्थिती, घाशीराम स्थलकालातीत असतात. या दंतकथेमागील बोध, असलाच तर, वेगळा आहे.’

हेही वाचाः 

शनिवारवाडा १८१८:  पेशवाई बुडाली त्याची गोष्ट

पुण्याचे पेशवे: किती होते? कोण होते? कसे होते?

भीमा कोरेगावमधे २०१ वर्षांपूर्वी नेमकं घडलं काय?

पेशवाईच्या स्वैराचाराला 'फटका'वणारा तमासगीर कीर्तनकार