सोफिया दिलीप सिंग : ब्रिटिश महिलांच्या मतदानाच्या हक्कासाठी लढणारी राजकुमारी

०९ ऑगस्ट २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


ब्रिटनच्या संसदेत सध्या एक निम भारतीय नाव गाजतंय. सोफिया दिलीप सिंग. शिखांचा शेवटचा राजा दिलीप सिंग याची ही मुलगी. राजघराण्याचे विशेषाधिकार, सुखसोयींवर पाणी सोडून राणी विक्टोरियाची ही मानसकन्या ब्रिटनमधल्या महिलांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी लढली. ब्रिटनच्या उभारणीत भारतीयांची काय भूमिका हेच सोफियाची गोष्ट सांगते. म्हणुनच ब्रिटनच्या आमदार प्रीत कौर तिचा पुतळा उभारण्याची मागणी करतायत.

आता डोक्यावरून पाणी गेलं होतं. १८६५ ला जॉन स्टुअर्ट मिल हा तत्त्वचिंतक ब्रिटनच्या संसदेत निवडून आल्यापासून स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी चळवळ सुरू झाली होती. १९१० मधला नोव्हेंबर उजाडला होता. ४० वर्ष संघर्ष करून, मागण्या करून, जनजागृती करूनही संसदेत स्त्रियांचा मतदानाचा हक्क मान्य होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नव्हती. अखेर हजारो, लाखोंच्या संख्येनं स्त्रिया रस्त्यावर उतरल्या. दररोज प्रदर्शनं चालली होती. 

१८ नोव्हेंबर १९१० ला सकाळी स्त्रियांनी पंतप्रधान विस्टन चर्चिल यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असणाऱ्या संसदेला गराडा घालायचं ठरवलं. त्याआधी आता ऐतिहासिक इमारतींच्या यादीत समाविष्ट झालेला कॅक्स्टोन हॉल बायकांनी खच्चून भरला होता. या सगळ्या गोऱ्या बायकांच्या गर्दीत एक कृष्णवर्णीय चेहरा होता. भारताच्या राजकुमारीचा. शिखांचा राजा दिलीप सिंग यांची मुलगी सोफिया दिलीप सिंग हिचा. या राजकुमारीचा पुतळा उभा रहावा अशी मागणी तिथल्या संसदेत ब्रिटनमधल्या भारतीय वंशाच्या आमदार प्रीत कौर गील यांनी केलीय.

आम्हीही घडवला ब्रिटन

१९०० च्या दशकात ब्रिटनमधे बायकांच्या मतदानाच्या हक्काच्या चळवळीत ज्या स्त्रिया लढल्या त्यांना सफ्रागेट म्हटलं जातं. या बायकांनी खरा ब्रिटन घडवला. पण आज ब्रिटनमधले बहुतेक सगळे पुतळे आहेत ते जगावर गुलामगिरी लादणाऱ्यांचे. युनायटेड किंगडम म्हणजे युकेमधे असणाऱ्या एकूण ऐतिहासिक पुतळ्यांपैकी फक्त ३ टक्के पुतळे हे राजघराण्याशी कोणताही संबंध नसलेल्या बायकांचे आहेत. या ३ टक्क्यांत अल्पसंख्यांक असणाऱ्यांचं तर प्रतिनिधित्व असण्याचा संबंधच येत नाही.

मागच्या वर्षी अमेरिकेत ब्लॅक लाइव्ज मॅटर ही वंशवादविरोधी चळवळ उसळली. त्यानंतर गुलामगिरीचं समर्थन करणाऱ्या ब्रिटनच्या रॉबर्ट क्लाइवचा पुतळा काढून टाकण्याची मागणी तिथल्या नागरिकांनीच पुढे आणली. जगात आजवर पुतळ्यांवरून अतिशय भयानक राजकारण झालंय. कुणाचा पुतळा काढायचा आणि कुणाचा ठेवायचा याची चर्चा, त्यावरून होणारी भांडणं, दंगली न संपणाऱ्या आहेत.

अशात जुने पुतळे काढून टाकण्याऐवजी इतिहासातल्या फारशा माहीत नसलेल्या पण अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेल्या लोकांचे नवे पुतळे, नवी स्मारकं बांधण्याचं शहाणपण ब्रिटनला सुचलंय. ‘वी टू बिल्ड ब्रिटन’ चळवळीच्या संस्थापक आणि ब्रिटनच्या संसदेतल्या सदस्या झेहरा झईदी यांनी ‘द हिडन हिरोज कॅम्पेन’ सुरू केलंय. ब्रिटनच्या उभारणीत योगदान देणाऱ्यांपैकी ज्याचा पुतळा उभारला जावा असं वाटतं त्यांना संसदेच्या सदस्यांनी आपापल्या मतदारसंघातून नामांकित करावं असं आव्हान झईदी यांनी केलंय. 

त्यांच्या या मोहिमेला पाठिंबा देताना प्रीत कौर गिल यांनी राजकुमारी सोफिया यांचं नाव सुचवलं. गिल या ब्रिटनमधल्या पहिल्या शीख महिला संसद सदस्य आहेत. ब्रिटनच्या विविधतेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सोफिया यांचा पुतळा गरजेचा असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सुखांवर पाणी सोडलं

राणी विक्टोरियानं या राजकुमारी सोफिया आणि तिच्या दोन्ही बहिणींना मानसकन्येचा दर्जा दिला होता. राज घरण्यातल्या मुली म्हणून त्यावेळेच्या ऍरिस्ट्रोकॅट समाजात म्हणजे अमीर उमरावांमधे या तिघींनाही स्थान मिळालं. पण या तिघीत सोफिया राणीची आवडती होती.

हॅम्पटन कोर्ट पॅलेस या राजमहालात सोफिया राहत होती. मोठ्या मोठ्या लोकांसोबत तिचं उठणं बसणं होतं. नव्या फ्रेंच फॅशनचे दिमाखदार कपडे तिच्या अंगावर असत. त्यावेळेच्या मासिकांमधे तीचे सुरेख फोटो असत. एकप्रकारे ती सेलिब्रेटीच होती. पण या सुखसोयींवर पाणी सोडून सोफिया बायकांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून लढू लागली. त्यासाठी तिनं अनेकांचा रोषही सहन केला. एवढी ताकद सोफियाला कुठून मिळाली?

हेही वाचा :  जागतिक कन्या दिनः स्त्री सन्मानासाठी दाढीमिशा लावून काम करणाऱ्या शास्त्रज्ञ

दहाव्या वर्षी आलेलं अनाथपण

सोफियाचे वडील म्हणजे शीख साम्राज्याचा शेवटचा राजा दिलीप सिंग. या दिलीप सिंग यांचे वडील होते महाराजा रणजित सिंग. शेर-ए-पंजाब म्हणजे पंजाबचा सिंह अशी पदवी महाराजा रणजित सिंगांना मिळाली होती. पंजाबपासून जवळपास अफगणिस्तानपर्यंतचा प्रदेश त्यांनी शीख साम्राज्याच्या अखत्यारित आणला होता. रणजित सिंग यांचा मृत्यू झाल्यानंतर वयाच्या पाचव्या वर्षी दिलीप सिंग गादीवर बसले. त्यांच्या वतीने त्यांची आई महाराणी जिंद कौर कारभार पाहत होती.

दिलीप सिंग १५ वर्षांचे असताना ब्रिटिशांसोबत युद्ध झालं. या युद्धात शीख हरले. दिलीप सिंग यांना आपलं राज्यच नाही तर देशही सोडावा लागला. आपल्या आईला मागे सोडत उरलेल्या कुटुंबासोबत दिलीप सिंग यांना ब्रिटनमधे हलवण्यात आलं. तिथे राणी विक्टोरियानं मैत्रीचा हात पुढे केला. तो स्वीकारूनही दिलीप सिंग आपलं गेलेलं राज्य परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. पण त्यांचे सगळे प्रयत्न हाणून पाडले.

दिलीप सिंगांनी दारू प्यारी केली. दिवसभर नशेत गुंग राहण्याऐवजी ते दुसरं काहीच करत नसत. शेवटी कंटाळून त्यांनी आपली इजिप्तिशयन बायको बाम्बा म्युलर हिला इंग्लंडमधेच सोडलं आणि दुसऱ्या बाईसोबत पॅरिसमधे संसार थाटला. ही बाम्बा म्युलर म्हणजे राजकुमारी सोफियाची आई. सोफिया १० वर्षांची असताना टायफॉईडने त्यांचा मृत्यू झाला. सोफियासोबत तीन सावत्र बहिणी आणि चार मुलांची जबाबदारी राणी विक्टोरियानं घेतली. काही वर्षांनी तिचे वडीलही गेले.

भारत भेट

काही बंडखोरी करून आपलं गेलेलं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करू नये यासाठी दिलीप सिंग आणि त्यांच्या सगळ्या मुलांवर कडक नजर ठेवण्यात आली होती. पण दिलीप सिंग यांचा मृत्यू झाल्यानंतर शामळू, शांत आणि दुःखात गढून गेलेल्या सोफियावरचा पहारा कमी करण्यात आला. सोफियानं याचा नेमका फायदा घेतला आणि कुणाच्याही नकळत ती तिच्या बहिणीसोबत भारतात आली.

ते वर्ष होतं १९०३. त्यावर्षी दिल्ली दरबार भरला होता. सातवा एडवर्ड यांना राजा म्हणून तर डेन्मार्कच्या अलेक्झांड्रा यांना राणी म्हणून वारसाहक्काने भारतातलं राज्य मिळालं होतं. त्यासाठी दिल्लीच्या कोरोनेशन पार्कमधे दिल्ली दरबार हा शाही कार्यक्रम भरवला होता. सोफिया सेलिब्रेटी असली तरी त्या कार्यक्रमात ती आहे हे कुणाच्याही लक्षात आलं नाही. म्हणूनच की काय प्रसिद्ध असण्याची फुटकळता तिच्या लक्षात आली आणि इंग्लंडमधे परत आल्यावर तिनं आपला मार्ग बदलायचं ठरवलं.

१९०७ ला ती पुन्हा भारतात गेली तेव्हा मात्र अमृतसर आणि लाहोरमधे जाऊन नातेवाईकांना भेटून आली. राणी विक्टोरियाला शरण जाऊन आपण भारतातलं नेमकं काय काय गमावलंय हे तर तिला कळालंच. शिवाय, तिनं गोपाळ कृष्ण गोखले आणि लाला लजपतराय यांचा भारताचा स्वातंत्र्य लढा समजून घेतला. लजपतराय तर तिला फारच भावले. त्यांच्याविरोधात ब्रिटिश सरकारने देशद्रोहाचे गुन्हे लावलेत हे कळाल्यापासून ब्रिटिश सत्तेविरोधी विचार तिच्या मनात घर करू लागले.

हेही वाचा :  ...तर मी नक्कीच नोबेल स्वीकारला असता

करविरोधी चळवळीचं नेतृत्व

१९०७ च्या या भेटीनंतर सोफिया इंग्लंडमधे परत आली तेव्हा ती पुरती बदलून गेली होती. ऊना डुगडेल या मैत्रिणीच्या विनंतीवरून ती ‘वुमन्स सोशल अँड पॉलिकल युनियन’मधे सामील झाली. सुरवातीला तिला पाच वाक्यही बोलता येत नव्हती. पण हळूहळू सोफिया तयार झाली.

पुढे ब्रिटनमधे स्त्रीवादाची चळवळ चालवणाऱ्या एमलीन पॅन्कहर्स्ट हिनं सोफियाला महिला कर प्रतिबंधक चळवळीची आघाडीची पुढारी बनवलं. महिलांचा मतदानाचा हक्क मान्य होत नाही तोपर्यंत कोणताही कर भरायचाच नाही असं या महिलांनी ठरवलेलं. चळवळीच्या घोषणा देताना तिला अटक झाली. कोर्टात खटला चालला असताना कर न भरण्याबद्दल तिला विचारलं गेलं. ‘संसदेत प्रतिधिनित्व नसताना आम्ही नुसता कर का भरायचा?’ असा प्रश्न सोफियानं कोर्टात विचारला.

कोर्टाने तिला दंड भरायची शिक्षा दिली. तिनं दंड भरायलाही नकार दिला तेव्हा तिच्या घरातून तिची हिऱ्याची अंगठी जप्त केली. पण गंमत म्हणजे, त्याचा लिलाव चालू असताना चळवळीतल्या इतर महिलांनी ती अंगठी विकत घेतली आणि सार्वजनिकरित्या सोफियाला परत केली. पोलिस आणि सरकारनं शरमेनं माना खाली घातल्या.

ब्लॅक फ्रायडेतलं धाडस

राणी विक्टोरियानं तिला रहायला जागा दिली होती त्या हॅम्पटन कोर्ट महालाच्या आवारातच सोफियानं स्त्रियांच्या मतदान हक्कांच्या चळवळीसाठी काढलेला ‘द सफ्रागेट’ हा पेपर विकताना दिसली. तिचा तो फोटोही खूप प्रसिद्ध आहे. 

एकदा तर तिला ब्रिटनचे तेव्हाचे पंतप्रधान एसक्विथ घरातून बाहेर पडताना दिसले. तिनं त्यांच्या गाडीवरच उडी मारली आणि चळवळीचं पोस्टर गाडीच्या खिडकीवर चिटकवलं. घोषणा दिल्या. पण राणी विक्टोरियाच्या या मानसकन्येला इतकं सहजासहजी अटक करता येणार नाही, हे त्यांना माहीत होतं. हे एसक्विथ, त्यानंतरचे पंतप्रधान विलियम चर्चिल, पाचवा जॉर्ज राजा या सगळ्या बड्या माणसांचा रोष तिनं ओढावून घेतला होता. 

तिनं पहिली चकमक पाहिली ती १८ नोव्हेंबर १९१० ला झालेल्या चळवळीत. कॅक्स्टोन हॉलमधे जमलेल्या ३०० बायका गटागटाने संसदेवर चालून जाऊ लागल्या. पोलिसांनी थेट मारहाण सुरू केली. अनेक महिला जखमी झाल्या. ब्रिटनच्या इतिहासात ही घटना ‘ब्लॅक फ्रायडे’ म्हणून ओळखली जाते. 

सोफियानं मात्र मार खाल्ला नाही आणि मार देणाऱ्या एका मोठ्या अधिकाऱ्याविरोधात तक्रार केली. तिनं इतका तगादा लावला की विलियम चर्चिल यांना या चळवळीत लढणाऱ्या बायकांचा तपास करायला सांगणाऱ्या नोटीसीवर गुपचूप सही करायला लागली होती.

हेही वाचा : आकाश निळंच असतं असं वाटत असेल, तर 'द स्काय इज पिंक' बघाच

महिलांच्या हक्कांचं मूळ

महिलांसोबतच सोफियानं निर्वासितांसाठीही लढा दिला. आशियातल्या कंगाल खलाशांना सोडवण्यासाठी तिनं काम केलं. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला तर तिचा पाठिंबा होताच. शिवाय, पहिल्या महायुद्धात जखमी झालेल्या शीख सैनिकांची सेवा करायलाही ती नर्स म्हणून गेली होती. त्यांना मायदेशात परत पाठवण्यासाठी तिनं पैसा जमा केला. ‘शेर-ए-पंजाब’ची नात शिखांच्या मदतीला धावून गेली.

इजिप्शियन आई आणि शीख बापाची ही मुलगी राजेशाही सुखसोयी उपभोगत वाढली आणि भारतीय स्वातंत्रलढ्याकडून बंडखोरी शिकली. ब्रिटनच्या लढ्यात ती सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय होती. न्याय आणि बदलासाठी ती न थकता लढली. राजघराण्यातल्या स्थानामुळे त्या काळात तिचा प्रचंड प्रभाव पडला. आज ब्रिटनमधल्या महिलांना उपभोगता येणाऱ्या हक्कांचं मूळ सोफियाच्या जगण्यात सापडतं.

भारताच्या जडणघडणीत ब्रिटिशांचं किती महत्त्व होतं चर्चा तर सतत होतच असते. पण आता ब्रिटनच्या उभारणीत भारतीयांची काय भूमिका होती हे सांगणारी सोफियाची गोष्टही आपल्याकडे आहे.

हेही वाचा : 

संत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती

संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न

पॉलिटिकल इस्लामप्रणित इस्लामी समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

ईश्वरी अवतारापलीकडे माणूस म्हणून कृष्णचरित्र समजून घेऊया