आई होण्याचं आदर्श वय सरकार कसं ठरवणार?

०५ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


मुलींसाठी आई होण्याचं वय निश्चित करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेट स्पीचवेळी केलीय. सरकारी आकडेवारीनुसार, आजही भारतातल्या बहुतांश मुलींच्या वाट्याला १९ वर्षांच्या आतच आईपण येतं. पण फार उशीरा मुल होणं हेदेखील आरोग्यासाठी घातक असतं. तेव्हा आई होण्याचं आदर्श वय काय यावर जगभरात अभ्यास सुरू आहे.

भारतातल्या दर ४ पैकी एका मुलीचं म्हणजे २६.८ टक्के मुलींचं १८ वर्षाच्या आत लग्न होतं. आणि ७.८ टक्के मुली १५ ते १९ या वयात गरोदर राहतात किंवा आई होतात.

ही आकडेवारी वाचून धक्का बसला ना? नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे म्हणजे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अर्थात एनएफएचएस २०१५-१६ च्या अहवालात ही आकडेवारी दिलीय. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ३३ टक्के लोक हे लहान वयात झालेल्या गरोदरपणातून जन्माला येतात. म्हणजे आपल्यापैकी अनेकजण हे आपल्या आईच वय १८ वर्षाहून कमी असताना जन्माला आलेत. यामुळेच मुलीचं आई होण्याचं वय निश्चित करण्याची गरज अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शनिवारी बजेट मांडताना अधोरेखित केली.

बायकांसाठी यंदाचं बजेट खास

'भारत आता अनेक पातळ्यांवर प्रगती करतोय. त्यामुळे महिलांना उच्च शिक्षणाच्या नव्या संधी खुल्या होतायत. महिलांच्या शरिरातली न्युट्रिशन पातळी वाढतेय, तसा मातामृत्यू दर म्हणजेच मॅटर्नल मॉर्टलिटी रेट कमी होतोय. याच पार्श्वभूमीवर मुलींच्या आई होण्याच्या वयाचा विचार केला जावा,’ असं सीतारामन म्हणाल्या. १९२९ च्या ‘शारदा अॅक्ट’नुसार मुलींचं लग्नाचं वय १४ वर्ष निश्चित करण्यात आलं होतं. त्यात १९७८ मधे दुरूस्ती करून मुलींचं लग्नाचं वय १८ वर्ष करण्यात आलं.

मुलींचं आई होण्याचं वय निश्चित करण्यासाठी एका खास टास्क फोर्सची नेमणूकही करणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. ही समिती येत्या ६ महिन्यांत आपला अहवाल सादर करेल. त्यानंतर आई होण्याचं वय केंद्र सरकारकडून निश्चित केलं जाईल. त्यांच्या या घोषणेमुळे यंदाचं बजेट बायकांसाठी खासच ठरलंय!

हेही वाचा : लिंगभेदाला छेद देत घरातल्या चुलीपासून गाडीच्या स्टेअरींगपर्यंत

लग्नाचं वयही वाढवण्याची मागणी

सीतारामन यांनी ज्याचा उल्लेख केला त्या १९२९ च्या ‘शारदा अॅक्ट’चं मूळ नाव बालविवाह प्रतिबंध कायदा असं आहे. हा कायदा तयार करणारे हरबिलास सारडा यांच्या नावावरून या कायद्याला नंतर शारदा अॅक्ट असं म्हटलं जाऊ लागलं. १ एप्रिल १९३० पासून हा कायदा देशभर लागू झाला. भारतात कुठंही बाल विवाह होणार नाही आणि कोणताही भारतीय माणूस दुसऱ्या देशात जाऊन बाल विवाह करू शकणार नाही, असा त्याचा अर्थ होतो.

१८ हून कमी वय असलेला मुलगा आणि १४ हून कमी वय असलेली मुलगी म्हणजे बाल अशी व्याख्या या कायद्यात करण्यात आली. १९७८ मधे जनता पार्टीचं सरकार सत्तेवर आलं आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्यानंतर १९७८ मधे या कायद्यात बदल करण्यात आला. मुलगी १८ वर्षांची आणि मुलगा २१ वर्षांची होण्यापूर्वी दोघंही बाल्यावस्थेत आहेत, असं या कायद्याने स्पष्ट केलं.

एखाद्या लग्नात फक्त वधू किंवा वधू आणि वर दोघंही या कायद्याप्रमाणे बाल्यावस्थेत असतील तर असं लग्न करणं या कायद्याने गुन्हा ठरवलं. त्यासाठी लग्न करणाऱ्या वरासकट वधू आणि वराच्या पालकांनाही काय शिक्षा द्यायची याची तरतूदही या कायद्यात करण्यात आलीय.

गेल्या अनेक वर्षांपासून या कायद्यातल्या मुलीच्या वयात अजून बदल करण्याची मागणी केली जात होती. १८ व्या वर्षीही मुली तितक्याशा समजूतदार नसतात म्हणून हे वय वाढवून २० वर्ष केलं जावं असं म्हटलं जातंय. पण एनएफएचएसचा २०१५-१६ चा अहवाल पाहता मुलींचं लग्नाचं वय वाढवण्याबरोबरच आई होण्याचं वयही निश्चित करायची गरज आहे.

लहान वयात मुल म्हणजे रोगांना आमंत्रण

एनएफएचएसचा हा अहवाल दर दहा वर्षांनी येतो. दहा वर्षांपूर्वी १८ वर्षाच्या आत लग्न करणाऱ्या आणि गरोदर राहणाऱ्या मुलींची टक्केवारी आत्तापेक्षा दुप्पट होती. २००५-०६ मधे आलेल्या अहवालानुसार १८ वर्षांच्या आत लग्न होणाऱ्या मुलींची टक्केवारी ४७.४ होती. तर लहान वयात गरोदर राहणाऱ्या मुलींचं प्रमाण १६ टक्के होतं. आता २०१५-१६ च्या अहवालानुसार, १८ वर्षांच्या आत लग्न होणाऱ्या मुलींचं प्रमाण २६ टक्के आणि लहान वयात गरोदर राहणाऱ्या मुलींचं प्रमाण ७ टक्के होतं. नव्या अहवालात प्रगती दिसत असली तरी हा अहवालही  चिंताजनकच आहे.

एनएफएचएसच्या २०१५ - १६ च्या अहवालानुसार, लहान वयात गरोदर राहणाऱ्या मुलींमधे बहुतांश मुली या खेडेगावात राहणाऱ्या आणि मागास कुटुंबातल्या आहेत. शहरात, विशेषतः मेट्रोपॉलिटन सिटीमधे राहणाऱ्या बायका करिअर आणि कुटुंबनियोजनाच्या बाबतीत जास्त जागरूक असतात. लहान कुटुंब, नोकरी आणि आर्थिक खर्चाचा विचार करता या बायकांचं पहिलं मूल साधारण वयाच्या ३० व्या वर्षी होतं. याउलट छोट्या शहरातल्या किंवा खेडेगावात बालविवाहाचा आणि लहान वयातल्या गरोदरपणाचा प्रश्न अजूनही फार जटील आहे.

या जटील प्रश्नाचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम हा बायकांवरच दिसून येतो. ‘फिट’ या वेबपोर्टलला दिलेल्या एका मुलाखतीत स्त्रीरोग आणि प्रसुतीतज्ञ डॉ. हेमा दिवाकर सांगतात, ‘लहान वयातल्या गरोदरपणात एनिमिया, ब्लड प्रेशर, बाळांतपणात अतिरिक्त रक्तस्राव अशा समस्या हमखास उद्भवतात. शिवाय कुपोषण, लिंग सांसर्गिक आजार, गर्भाशयाचा कॅन्सर आणि मानसिक आजार अशा गंभीर आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात. यामुळेच लहान वयातला गरोदरपणा हा जगातला महत्त्वाचा आरोग्यप्रश्न आहे.’

हेही वाचा : लोक आपापल्या सोयीपुरता स्त्रीवाद का मांडतात?

लहान वयात मुल होण्याची कारणं काय?

अनेकदा मुलगी एखाद्याबरोबर ‘लफडं’ करून घराण्याच्या असल्यानसलेल्या इभ्रतीला काळीमा फासेल म्हणून १८ वर्ष पूर्ण होण्याच्या आतच तिला उजवून टाकलं जातं. घरची आर्थिक परिस्थिती हे तर बालविवाहामागचा महत्त्वाचं कारण आहे. मुलीचं वय जास्त असेल तर त्यासाठी हुंडा जास्त द्यावा लागेल आणि जास्त शिकली तर तिला साजेसा नवरा मिळणार नाही या भीतीनेही मुलींचं लवकर लग्न लावून दिलं जातं.

एकापेक्षा जास्त मुली असणाऱ्या कुटुंबांना तर जास्तीची चिंता असते. दोन दोन मुलींच्या लग्नावर पैसा खर्च करण्यापेक्षा दोन्ही मुलींची लग्न एकाच मांडवात लावून देणं बरं पडतं. त्यासाठी मोठी बरोबर छोटीलाही उजवलं जातं. एकदा का मुलीचं लग्न झालं की सामाजिक दबावानं लगेचच गरोदरपण लादलं जातं.

भारतातली लहान वयात गरोदर होणाऱ्या मुलींची ही टक्केवारी आणि त्याचे दुष्परिणाम पाहता सध्या आई होण्याचं वय निश्चित करण्याची गरज आहेच. यंदाच्या बजेटमधे आई होण्याचं वय निश्चित करणार अशी घोषणा सीतारामन यांनी केली. त्यामुळे मुलींना आणि मुलींच्या पालकांना दिलासा मिळाला असेलच. पण आई होण्याचं नेमकं वय काय असावं याबाबतीत मात्र मतभेद आहेत. त्यामुळे सरकारने यातून एखादा मध्यममार्ग काढण्यासाठी समिती नेमलीय.

आई होण्यासाठी आदर्श वय नाहीच

अनेक अभ्यासकांच्या मते, टीनएजमधे म्हणजे १३ ते २९ या वयातच मुलींची फर्टिलिटि सगळ्यात जास्त असते. त्यामुळे आई होण्यासाठी जैविकदृष्ट्या हेच वय योग्य आहे. पण आई होण्यासाठी फक्त शरीराची नाही तर मनाचीही तयारी लागते. त्यामुळे पंचविशी नंतरचा काळ हा आई होण्यासाठी सगळ्यात जास्त चांगला असतो.

ह्युमन रिप्रॉडक्शन जनरल या मासिकात छापून आलेल्या एका लेखानुसार, ३० व्या वर्षानंतर बाईची फर्टिलिटी कमी होऊ लागते. पण करिअर, लग्न आणि घरातली आर्थिक परिस्थिती यांचा विचार करता अनेक बायकांना तिशीनंतरच मूल जन्माला घालणं योग्य वाटतं. वयाच्या ३० व्या वर्षापर्यंत बाई स्वतः अनेक बाजुंनी शहाणी म्हणजे मॅच्युअर झालेली असते. तेव्हा या वयात जन्मणाऱ्या मुलात आनुवंशिक शहाणपण येतं. या वयात जन्मलेली मुलं जास्त बुद्धिवान होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे मुल जन्माला घालण्यासाठी आदर्श वय असं काहीही असत नाही असं हा अहवाल सांगतो.

अमेरिकेत असा काही कायदा नसला तरी तिथल्या बायकांचं आई होण्याचं सरासरी वय २७ वर्ष इतकं नोंदवलं गेलंय. एनएफएचएसच्या अहवालानुसार सध्या भारतात हे वय २० वर्ष इतकं आहे. त्यामुळे अमक्या वर्षानंतर कधीही गरोदर राहण्याचा अधिकार मुलींना असेल, असा काहीसा कायदा भारतात अगदी नजीकच्याच भविष्यात केला जाईल. पण १८ वर्षाच्या आत मुलीचं लग्न लावून देणं हा गुन्हा आहे असा कायदा गेल्या ४२ वर्षांपासून भारतात आहे. असं असतानाही अजूनही बालविवाह सुरूच आहेत. अशावेळी हा नवा कायदा आणून सरकार त्याची अमंलबजावणी कशी करणार हा मोठा प्रश्न आहे.

हेही वाचा : 

मुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना!

निर्मला सीतारामन यांच्या अडीच तासाच्या भाषणातल्या १० कामाच्या गोष्टी

बायकांचा अकलेशी संबंध काय, असं म्हणणाऱ्यांना बबिता ताडेंची चपराक

बजेट२०२०ः इन्कम टॅक्स सवलतीने भलं कुणाचं, सरकारचं की करदात्यांचं?