बायडन आघाडीवर असतानाही ट्रम्प जिंकू शकतील का अमेरिकेची निवडणूक?

०७ नोव्हेंबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


अमेरिकेन निवडणुकीच्या निकालाची संपूर्ण जग वाट पाहतंय. ट्रम्प आणि बायडन यांच्यातला मतांचा फरक आता कमी झाला असला तरी अजूनही बायडन आघाडीवर आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना फक्त ६ इलेक्टोरल मतांची आवश्यता आहे. त्यामुळे आता बायडनच जिंकणार अशी सगळ्यांची खात्री झालीय. मात्र, सध्याचा निकाल पाहता कधीही डाव पलटून ट्रम्प विजयी होऊ शकतात?

सगळ्या जगाच्या तोंडी एकच विषय आहे तो म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचा. जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प असे दोन महत्त्वाचे उमेदवार. या दोघांपैकी व्हाईट हाऊस कोण काबीज करणार, यावर जगाचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळेच जगातले सगळेच लोक गेल्या दोन दिवसांपासून मतांच्या आकड्यांकडे डोळे लावून बसलेत.

अमेरिकेत इलेक्टोरल वोटिंग पद्धतीने मतदान केलं जातं. त्यानंतर ४ तारखेला सुरू झालेल्या मतमोजणीत जो बायडेन हे आघाडीवर होते. तेव्हा बायडन २०३ तर ट्रम्प ११२ एवढा मतांचा फरक होता. संध्याकाळपर्यंत हा फरक बराच कमी झाला आणि जो बायडन २३८ तर डोनाल्ड ट्रम्प २१३ अशी आकडेवारी स्थिरावली. भारतात ५ तारखेची सकाळी उजाडली तेव्हा हा फरक पुन्हा वाढला. तेव्हापासून बायडन यांनी २६४ तर ट्रम्प यांनी २१४ मतं पदरात पाडून घेतलीयत.

काल सकाळपासून ही आकडेवारी इथेच थांबलीय. व्हाईट हाऊस काबीज करण्यासाठी दोन्ही पैकी एका उमेदवाराला २७० मतं मिळवावी लागतात. बायडन या मॅजिकल नंबरपासून फक्त ६ मतं लांब आहेत. त्यामुळे यंदाची अमेरिकेची निवडणूक बायडन जिंकणार, अमेरिकेच्या सत्तेचं हस्तांतरण होणार असं वाटू लागलंय. पण खरं म्हणजे, जो बायडन आघाडीवर असले, अगदी त्यांना २७० मतं मिळाली तरी अमेरिकेची निवडणूक पद्धत पाहता डाव उलटून पुन्हा ट्रम्पच सत्तेवर येऊ शकतात.

सर्वाधिक मतं महत्त्वाची नाहीत?

आता अमेरिकेच्या राजकारणात कमी मार्क पडणारा विद्यार्थी पहिला कसा येऊ शकतो हे समजून घेण्यासाठी आधी तिथली निवडणूक पद्धत समजून घ्यायला हवी. मघाशी म्हटलं त्याप्रमाणे अमेरिकेत इलेक्टोरल वोटिंग पद्धत वापरली जाते.

अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोनच पक्ष राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आपला प्रतिनिधी उभा करतात. कधी कधी लिबर्टेरियन तिसरा तर क्वचित ग्रीन पार्टी किंवा इंडिपेंडण्ट पार्टी चौथा उमेदवार उभा करतात. उमेदवार म्हणून कुणाला उभं करायचं यासाठी आधी पक्षात अंतर्गत निवडणुका होतात. त्यातून एक राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष उमेदवार नक्की केला जातो. यंदा ट्रम्प हे रिपल्बिकन पक्षाचे तर बायडन हे डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार होते.

या दोघांपैकी पॉप्युलर वोट म्हणजेच म्हणजे सर्वाधिक मतं कुणाला मिळाली यावरून विजयी कोण ते ठरत नाही. ते ठरतं ते इलेक्टोरल वोटमधून. म्हणजेच ५३८ पैकी २७० किंवा त्यापेक्षा जास्त मतं कुणाला मिळाली आणि या मतांमधे कोणत्या राज्यांचा समावेश आहे यावरून.

हेही वाचा : हत्ती आणि गाढव अमेरिकेच्या राजकारणात आले कसे?

असं ठरतं पक्षाचं संख्याबळ

राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष उमेदवार ठरले, जोरदार प्रचार झाला की अमेरिकेची सार्वत्रिक निवडणूक घेतली जाते. अमेरिकेचे नागरिक असणारी सामान्य माणसं आपापल्या निवडणूक केंद्रावर जाऊन मतदान करतात. ते मतदान करतात ते आपल्यालासारखं नगसेवक, आमदार, खासदाराला नाही. तर लोकांच्या एका गटाला.

या गटाला इलेक्टर्स असं म्हटलं जातं. प्रत्येक राज्याला मिळणाऱ्या इलेक्टर्सची संख्या म्हणजेच त्या राज्याचं सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवमधे प्रतिनिधत्व करणाऱ्यांचं एकूण संख्याबळ असतं. सिनेट म्हणजे अमेरिकन संसदेचं वरिष्ठ सभागृह आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव म्हणजे कनिष्ठ सभागृह.

कनिष्ठ सभागृहाच्या प्रतिनिधींची संख्या ही राज्याच्या लोकसंख्येनुसार ठरते. तर राज्याची लोकसंख्या कितीही असली तरी प्रत्येक राज्याचे दोन सिनेटर असतात. अशा इलेक्टोर्सचा एक गट असतो. प्रत्येक राज्यात मतदान होतं आणि ते राज्य आपले सगळे इलेक्टोर्स त्या राज्यांत जिंकणाऱ्या पक्षाला देतं. आणि यावरून पक्षाचं संख्याबळ ठरतं.

तर ट्रम्प जिंकू शकतील

अमेरिकेत आहेत ५० राज्य आणि एक कोलंबिया. या सगळ्या राज्यांचे मिळून होतात ५३८ इलेक्टोर्स. त्याच्या निम्मी संख्या म्हणजे २६९. त्यामुळेच २७० किंवा त्यापेक्षा जास्त इलेक्टोर्स जिंकणारा पक्ष अमेरिकेची निवडणूक जिंकतो आणि त्यांचा उमेदवार अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनतो.

आता अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियाची लोकसंख्या सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास ४ कोटी आहे. त्यांच्याकडे ५५ इलेक्टोर्स आहेत. त्यांच्यासोबतच ३८ इलेक्टोर्सचं टेक्सास, २९ इलेक्टोर्सची न्यूयॉर्क आणि फ्लोरिडा आणि २० इलेक्टोर्सची इल्यनॉय आणि पेनिसेल्विया ही सहा राज्य निवडणूक जिंकण्यासाठी फार महत्त्वाची मानली जातात.

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, फ्लोरिडा आणि टेक्सास ही भरपूर इलेक्टोर्सची राज्य ट्रम्प यांनी जिंकलीयत. तर कॅलिफोर्नियाचा वजीर बायडन यांच्याक़डे आहे. अजून महत्त्वाच्या राज्यांपैकी न्यूयॉर्क आणि पेनिसेल्विया या दोन राज्यांचा निकाल येणं बाकी आहे. शिवाय, जॉर्जिया, नेवाडा आणि नॉर्थ कॅलिफोर्निया अशी काही कमी इलेक्टोर्सची राज्यही बाकी आहेत.

या कमी इलेक्टोर्सपैकी दोन राज्य किंवा एकटं पेनिसेल्विया बायडन यांनी जिंकलं तर डेमोक्रेटिक पक्ष व्हाईट हाऊसची सत्ता मिळवेल. पण उलट, यापैकी तीन राज्य किंवा एकटं पेनिसेल्विया ट्रम्प यांनी जिंकलं तर सगळी खेळी उलटेल. ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील.

हेही वाचा : अमेरिकन राजकारणाचा किस पाडणारी निवडणूक

पेनिसेल्विया ठरवणार प्रेसिडण्ट

बीबीसी इंग्रजीच्या एका लेखानुसार, याआधी झालेल्या निवडणुकांनुसार कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क आणि इल्यनॉय ही राज्य पूर्णपणे डेमोक्रॅटिक पक्षाच्या ताब्यात असतात. टेक्सास हा रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. तर ओहियो, फ्लोरिडा, ऍरिझोना, पेनिसेल्विया आणि विस्कॉन्सिन ही राज्या स्विंग स्टेट म्हणून ओळखली जातात. म्हणजेच उमेदवार कोण आहे हे पाहून ही राज्य कोणत्या पक्षाला मत द्यायचं ते ठरवतात. 

या अंदाजाप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क ही राज्य खरोखरच बायडन यांनी जिंकलीयत. टेक्सासने ट्रम्पच्या बाजुने कौल दिलाय. स्विंग स्टेटपैकी ओहियो, फ्लोरिडा ही राज्य ट्रम्पकडे झुकलीयत. तर ऍरिझोना आणि विस्कॉन्सिनने बायडनला पसंती दिलीय. त्यामुळे आता प्रामुख्याने पेनिसेल्विया कुणाला निवडतं यावर ट्रम्प जिंकणार की बायडन हे अवलंबून आहे.

हेही वाचा : 

नेशन वॉन्ट्स टू नो अर्णब, ये जबां किसकी हैं?

अर्णब घाबरू नकोस, जेएनयू तुझ्या सोबत आहे!

आंखी दास यांच्या फेसबूक राजीनाम्याच्या निमित्ताने

अमेरिकेतल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाचं काळंगोरं वास्तव

अमेरिकेत ट्रम्प निवडून येणं हीच असेल जगासाठी मोठी दुःखद बातमी