लग्नासाठी जातीचे बंध तुटताहेत, पण मजबुरीतून!

२९ ऑगस्ट २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


एक काळ असा होता की, पोरीचं लग्न म्हटलं की बापाच्या पोटात खड्डा पडायचा. हुंडा, सोनं, मानमरताब, लग्नाचा खर्चामुळे तो कर्जबाजारी व्हायचा. पण आता चित्र बदलतंय. बेरोजगारी, शेतीतली अनिश्चितता, बदललेल्या अपेक्षा, स्त्री-पुरुष गुणोत्तरातील गोंधळ यामुळे गावाकडच्या मुलग्यांची लग्नच जमेनाशी झालीत. त्यामुळे नवरी आपल्याच जातीतील पाहिजे, ही अट पाठी पडतेय. पण, स्वेच्छेनं नव्हे तर मजबुरीनं.

काही महिन्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यामधल्या एका शेतकऱ्याच्या मुलानं, डोक्याला मुंडावळ्या बांधून, ‘बागायतार आहे, बागायतदारीन पाहिजे' असा फलक हातात घेऊन पाचोऱ्यात आंदोलन केलं होतं. त्याच्या या लक्षवेधी आंदोलनामुळे शेतकऱ्याच्या उपवर मुलग्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही, हे अनेकांना कळलं. तसंच मध्यंतरी काही सामाजिक संघटनांनीही हा विषय उचलून धरला होता. 

या संघटनांनी वरात मोर्चा, नवरदेव मोर्चा अशा माध्यमातून त्यांनी या प्रश्नाकडं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. हे सगळं जरी होत असलं तरी गावाकडली परिस्थिती बिघडत चाललीय. कधीकाळी जातीच्या नावानं, मिशा पिळणारे आता कोणत्याही जातीतल्या पोरीला सून करून घ्यायला तयार झालेत. एका अर्थानं हा बदल चांगला असला, तरी तो स्वेच्छेने व्हायला हवा, जबरदस्तीने नाही.

पदर न जुुळणाऱ्यांचं आता कुठंही जुळतंय

मागील महिन्यात एका ओळखीच्या महिलेचा गावाकडून निरोप आला. आबा, माझ्या लेकरासाठी बायकू बघा एक. कोणत्याबी समाजाची चाललं, पण त्याचं लगीन करायचं तेवढं बघा. त्या बाई काकूळतीला येऊन सांगत होत्या. त्या मुलाचे वडील वारलेत. आई आणि लेक दोघच असतात. 

शेती आहे आणि हंगामी बागायत होईल एवढी पाण्याची सोय पण आहे. दोघेही शेतात राबून बऱ्यापैकी उत्पन्न काढताहेत. शेतातल्या कामासाठी ट्रॅक्टर आहे. खाऊन पिऊन सुखी आहेत मायलेक. पण त्यासाठी दररोज शेतात बारा-चौदा तास राबणं हेच त्या मायलेकांचं जीवन बनून गेलय.  

एक काळ असा होता की, हा निरोप देणाऱ्या महिलेच्या परिवारातले लोक स्वतःला खानदानी मानत आणि स्वतःच्या जातीतलं जरी एखादं स्थळ आलं तर अनेकदा, यांच्याशी आपला पदर जुळत नाही असं म्हणत सोयरिक नाकारत. 

हा फार लांबचा काळ नाही, अगदी मागील तीस-पस्तीस वर्षांच्या काळात हे घडत होतं. आता परिस्थिती इतकी बदललीय की, शेतीत राबणाऱ्या किंवा नोकरी नाही म्हणून इथे तिथे भटकणाऱ्या मुलग्यांची लग्नच जुळत नाहीयेत. या अडचणीमूळे  किमान काही घरातली मोठी माणसं घायकुतीला येत आहेत आणि जातीबाहेरील मुलगी सून म्हणून स्विकारायला तयार होत आहेत असं चित्र आहे.

हुंडा विसरा, आता पोरीच्या बापाला पैसे देताहेत

महाराष्ट्राच्या सर्वच भागात गेल्यावर मुलग्यांसाठी नवरी शोधून देणाऱ्या दलालांच्या कहाण्या ऐकायला मिळतात. तीन लाख, चार लाख रुपये घेऊन ही दलाल मंडळी अनोळखी मुलगी त्या घरात सून म्हणून पोहोचवतात. त्यासाठी उपवर मुलगी असलेल्या गरीब बापाच्या शोधात ते असतात. मुलीच्या बापाला काही पैसे देतात, काही स्वतःच्या खिशात घालतात. 

काही मुलग्यांचे हुशार बाप स्वतःचं गरीबाघरच्या चुणचुणीत आणि कामसू मुली हेरुन ठेवतात. वेळ येताच त्या मुलीच्या बापाला पैसे देवून ओळखीची असलेली मुलगी घरी आणून मुलाचा संसार मार्गी लावतात. पण हे सगळं पैसे देण्याची क्षमता असलेल्या घरांनाच शक्य होतं. अल्पभुधारक किंवा शेतमजूर घरातील मुलग्यांसाठी हा मार्गही उपलब्ध नाही. मुलींच्या बापाला द्यायला त्यांच्या जवळ पैसे कुठे असतात. 

मुलीच्या बापाला ज्या काळात नवरदेवाच्या घरच्यांना हुंडा द्यावा लागत होता त्या काळातही आणि आता मुलीच्या बापालाच मुलीच्या लग्नात पैसे मिळत असतानाच्या काळातही, गरीबाघरच्या व कमी शिकलेल्या मुलींना जोडीदार निवडीचा अधिकार असण्याचा विषयच नव्हता. आता इथे गरीबाघरच्या मुलग्यांनाही निवडीचा अधिकार उरलेला नाही.

लग्नासाठी फसवणूकही वाढलीय

अशी लग्ने जमवून घेताना अनेकदा दलालांकडून फसवणूकही पदरी पडतेय. महिन्याभरापूर्वी मालेगावला पोलीसांनी लग्न मंडपातून एका नवरीला अटक केली, त्याचं कारण मोठं धक्कादायक आहे. त्या मुलीने काही दिवसांपूर्वी पैशांच्या बदल्यात एका वेगळ्याच घरातील तरुणाशी लग्न केले होते. 

लग्नानंतर काही दिवसातच पैसे आणि दागिने घेऊन या तरुणीने त्या घरातून पळ काढला होता आणि पुन्हा तशाच पध्दतीनं दुसऱ्या लग्नासाठी ती उभी होती. पोलीसांनी तिला लग्न मंडपातूनच अटक केली. ही कहाणी धक्कादायक वाटली तरी अपवादात्मक नाहीये. फसवणुकीच्या अशा आणखी काही कहाण्या ग्रामीण भागात ऐकायला मिळतात.

जातीचा टेंभा मिरवणाऱ्या भाऊबंदांचं तोंड बंद

माझ्या माहितीच्या एका गावात महिनाभरापूर्वी सवर्ण मानल्या जाणाऱ्या जातीतील एका शेतकरी मुलाचं लग्न अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातीतील मुलीशी दोन्हीकडच्या घरच्यांच्या उपस्थितीत पार पडलं. दोन्हीकडच्या घरच्यांच्या मान्यतेनं ते लग्न झालं हे इथं विशेष आहे. गावात कुजबुज झाली. पण समोर येऊन असं कसं र? हा प्रश्न विचारणाऱ्या गावकऱ्यांना या तरुणाने चांगलच फैलावर घेतलं. 

चाळीसी जवळ आली तरी माझं लग्न होत नव्हतं तवा तुम्ही कुठं होतात? असं म्हणत त्यानं त्यांना गप्प बसवलं. प्रत्येक गावात तिशीच्या पुढचे, चाळीसी जवळ आलेले अनेक तरुण लग्न होत नाही म्हणून अस्वस्थ आहेत. वरील उदाहरणातील तरुणाने व त्याच्या घरच्याने जातीचे बंध तोडले याबद्दल त्यांच अभिनंदन करायलाच हवं. पण बेरोजगारी आणि शेतीतील पेचप्रसंगामूळं आलेली हतबलता यातून ते या मानसिकतेपर्यंत आलेत हे नक्कीच निराशाजनक आहे.

वय वाढूनही ज्यांची लग्न जमत नाहीयेत अशा तरुणांच्या लैंगिक उपासमारीचा एक नवाच सामाजिक प्रश्न यातून निर्माण होतोय. दररोज टीव्ही-मोबाईलवरून, समाजमाध्यमावरून लैंगिक, उत्तान दृष्यांचं प्रदर्शन ज्यांच्या समोर होतय अशा या तरुणांच्या न पूर्ण होणाऱ्या लैंगिक गरजांचं काय आणि त्यातून समाजात निर्माण होणारे ताणतणाव, गुन्हेगारीकरण हा आणखी एक यातूनच निर्माण होणारा प्रश्न आहे.

मुलींनाही हवा निवडीचा अधिकार

मुलीचे आईवडील आणि स्वतः मुलीही शेतकरी कुटुंबातील मुलगा जावई अथवा जोडीदार म्हणून स्विकारायला तयार होत नाहीत यावर खूप बोललं आणि लिहीलं गेलं आहे. पण मुलींनाही जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य असायला हवं हा पूरोगामी चळवळीनेच एकेकाळी पटलावर आणलेला मुद्दा आहे. 

आज मुली मोठ्या संख्येनं शिकायला लागल्यात. सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या अभियानाला आलेलं ते अभिमानास्पद फळ आहे. शिकणाऱ्या मुलींच्या जाणीवा विकसित व्हायला लागल्यात. त्यांना नवं आकाश दिसायला लागलय.

जोडीदारासोबतच्या सहजीवनाबद्दल त्यांच्या काही कल्पना असू शकतात. अशावेळी त्या जोडीदार निवडीचा स्वतःचा अधिकार वापरत असतील तर त्यांना दोष कसा देणार? पण उच्चशिक्षित मुलींना हवा तसा जोडीदार मिळत नाही कारण मुलग्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. अशाच काही कारणांनी शिकलेल्या मुलींचीही लग्नं लवकर जुळत नाहीयेत हा ही दुसऱ्या बाजूला तितकाच गंभीर प्रश्न आहे. 

काही लोक असं म्हणतात की, गर्भलिंग निदान आणि स्त्रीभृण हत्येमूळे स्त्रियांची संख्या कमी झाली, स्त्री-पुरूष गुणोत्तर बिघडले म्हणून मुलग्यांना बायको मिळण्याचे वांधे झाले. काही अंशी ते खरही आहे पण या प्रश्नाचं ते एकमेव कारण नाही. एकीकडे मुलग्यांची वाढती बेरोजगारी, शेतीतील पेचप्रसंग यामूळे लग्नाच्या बाजारातील त्यांची किंमत कमी झाली. 

गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं सोपी नसतात

दुसरीकडे शिक्षणामुळं, नवं आकाश उपलब्ध झाल्यामूळे मुलींच्या अपेक्षा वाढल्या, त्या आपला निर्णयाधिकार बजावू लागल्या हे ही एक कारण या परिस्थितीमागे आहे. आर्थिक परिस्थिती बदलली पाहिजे. रोजगार वाढवणारी तसेच शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारी आर्थिक धोरणे राबवली पाहिजेत. 

श्रमप्रतिष्ठेचं मूल्य समाजात रुजलं पाहिजे ही या प्रश्नाच्या उत्तराची एक दिशा आहे. ती दीर्घकालीन दिशा आहे. पण त्याच बरोबर लग्नाळू मुली-मुलांशी मोठा संवाद सुध्दा गरजेचा आहे. पालकांच्या खोट्या प्रतिष्ठेच्या संकल्पनेतून उभा राहिलेला "लग्नाचा बाजार" बंद व्हायला पाहिजे. लग्न म्हणजे विचारपूर्वक आखलेलं सहजीवन या संकल्पनेकडं या तरुणाईला यावं लागेल.

एकमेकाच्या व्यक्तीमत्वाचा आदर जपणारं, एकत्र राहूनही एकमेकाला स्वतंत्र वैयक्तिक अवकाश देणारं, सर्वात महत्वाचं म्हणजे आईबापांच्या पैशावर नव्हे तर दोघांच्या मेहनतीतून आपलं सुख निर्माण करणारं सहजीवन हे महत्वाचं आहे ही मानसिकता निर्माण करावी लागेल. अवघड आहे हे काम, पण चिवटपणे प्रबोधन करत राहिलं तर अशक्यही नाही. तसही गुंतागुंतीच्या प्रश्नांना सोपी उत्तरे कशी मिळणार?

(हा लेख दैनिक प्रजापत्रच्या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झाला होता)