बहुतांश भारतीय लांबच्या प्रवासासाठी रेल्वेलाच प्राधान्य देतात. आता या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे आणि तोही खिशाला परवडेल अशा किमतीत. कारण जगातल्या सर्वात कमी तिकिटात विमानासारख्या सुविधा देणारा भारतातला पहिला एसी थ्री टियर इकोनॉमिक डबा रेल्वेनं तयार केलाय. महत्त्वाचं म्हणजे, हे थ्रीई डब्बेच भारतीय रेल्वेचं भविष्य आहेत.
भारत म्हटलं की विविधतेनं नटलेला देश असंच डोळ्यासमोर येतं. भारतातल्या या वेगवेगळ्या संस्कृतीच्या, भाषेच्या राज्यांना, गावांना आणि शहरांना एकमेकांशी जोडून ठेवण्याचं काम इंटरनेटच्या आधीपासूनच खऱ्या अर्थाने रेल्वेने केलंय. ही भारतीय रेल्वे म्हणजे जगातलं एक अद्भुतच आहे. कधीही पहा, रेल्वेचे डबे ओसंडून वाहत असतात. रेल्वेयात्री डॉट इन या वेबसाईटवर २०१८ ला प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, देशातले ७६ टक्के नागरिक लांबच्या प्रवासासाठी बस किंवा विमानापेक्षा रेल्वेनेच जाणं पसंत करतात.
इथं टियर एसीचा पर्याय आहे. तसा अतिशय गैरसोयीचा पण स्वस्तातला जनरल क्लासचा डब्बाही आहे. त्यातल्या त्यात बऱ्यापैकी सोयीचा, जरासा महाग पण आरामदायी असा थ्री टियर एसीही असतो. आता या थ्री टियर एसीसारखा आणखी एक नवा एसीचा डबा रेल्वेला जोडला जाणार आहे.
थ्री टियर एसीचा एक खास नवा डब्बा रेल्वेनं तयार केला असल्याची घोषणा करण्यात आलीय. रेल्वे मंत्री पीयुष गोयल आणि इंडियन रेल्वे विभागाच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुनही १२ फेब्रुवारीला या नव्या डब्याची झलक दाखवणारा वीडियो टाकण्यात आलाय. ‘एसी थ्री टियर इकोनॉमी क्लास’ किंवा ‘थ्रीई’ असं या डब्याचं नाव असेल.
हेही वाचा : तयार होण्याआधीच का संपवण्यात येतेय पुतीन यांची गॅस पाईपलाईन?
साधारणपणे कोणत्याही लांब पल्ल्याच्या रेल्वेत सहा सात प्रकारचे कोच असतात. पहिला, फर्स्ट टियर एसी. याचं तिकीटही जास्त असतं आणि अगदी शाही थाटातल्या सुविधा या कोचमधे मिळतात. विमानात असतात तशी आपल्याला हवं नको ते पाहणारी माणसंही असतात. दुसरा सेकंड टियर एसी. फर्स्ट टियरपेक्षा कमी पण बऱ्याच चांगल्या सुविधा याही कोचमधे मिळतात. तिसरा थर्ड टियर एसी. त्यानंतर एसी नसलेला स्लीपर कोच. यात झोपाण्यासाठीचे बर्थ असतात. अनेकदा रिझर्वेशन न केलेले, वेटिंगवर असणारे असे सगळे याच डब्यात चढतात.
हे झाले अगदी लांबच्या प्रवासासाठीचे. पण काही तासांचा प्रवास असेल तर खुर्च्या असणारे कोचही रेल्वेत असतात. त्यातही एसी आणि नॉन एसी असे प्रकार आहेत. आणि सगळ्या शेवटी येतो तो जनरलचा डबा. आता यात आराम आणि पैसे यांचा विचार केला तर साधारणपणे उच्च मध्यमवर्गीय थर्ड टियर एसीचा पर्याय निवडतात. तर मध्यमवर्गीय लोक नॉन एसी स्लीपरशी तडतोड करतात. त्यामुळेच नॉन एसी स्लीपरमधे भरपूर गर्दी असते. सुट्टीच्या वगैरे दिवसात तर डबा खच्चून भरलेला असतो.
आता थ्री टियर एसीसारख्या सुविधा आणि स्लीपर कोचसारखं तिकीट असणारा थ्री टियर एसी इकोनॉमी क्लासचा पर्याय रेल्वे उपलब्ध करुन देतेय. प्रवाशांना ‘जगातली सगळ्यात स्वत आणि सगळ्यात दर्जेदार एसी प्रवास सुविधा’ असं रेल्वे खात्याने जाहीर केलेल्या स्टेटमेंटमधे म्हटलंय.
या डब्यांची निर्मिती पंजाबमधल्या कपूरथला या शहराजवळ असणाऱ्या रेल कोच फॅक्टरीमधून केली जाईल. ऑक्टोबर २०२० पासून या डब्याच्या डिझाईनचं काम तिथं सुरू झालं होतं. त्यानंतर या फॅक्टरीतच तयार झालेला एक प्रोटोटाईप म्हणजेच नमुना डबा १० फेब्रुवारी २०२१ ला लखनऊच्या रिसर्च डिझाईन अँड स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशनला पाठवण्यात आला. इथं या डब्याची चाचणी आणि प्रयोग झाला की रेल कोच फॅक्टरीमधून अशा आणखी २४८ डब्यांची निर्मिती होणार आहे.
यातला एक डबा साधारण २.८ ते ३ कोटी रुपयांना पडेल. थ्री टियर एसी कोचपेक्षा याची किंमत १० टक्के जास्त आहे. पण भविष्यातली या डब्यांची मागणी बघता यापेक्षा कितीतरी जास्त फायदा रेल्वेला यातून कमावता येणार आहे. शिवाय, थ्री टियर एसी डब्यांपेक्षा ११ बर्थ जास्त दिल्याने एका डब्यातून ८३ लोक प्रवास करू शकतील. सध्याच्या डब्यात बोर्डवरती बसवलेल्या हाय वोल्टेजच्या इलेक्ट्रिक स्वीचगिअरची जागा हलवून या डब्यात तो फ्रेमच्या खाली लावण्यात आलाय. त्यामुळे बर्थची संख्या वाढवणं शक्य झालंय.
हेही वाचा : मोदींच्या गुगलीवर फसले आहेत ‘आंदोलनजीवी’
पीयुष गोयल यांनी शेअर केलेल्या या डब्याची झलक दाखवणाऱ्या वीडियोत त्यात काय काय विशेष सुविधा केल्यात ते दाखवण्यात आलंय. यात दाखवल्याप्रमाणे स्लीपर कोच प्रमाणे एका खाली एक तीन बर्थ एका बाजूला आणि दुसऱ्या बाजुला तीन अशा सहा बर्थचा एक विभाग असेल. तर दुसऱ्या बाजूला वर खाली दोन बर्थ असतील. प्रत्येक प्रवाशासाठी वेगळा एसी असेल. आपल्या सोयीप्रमाणे त्याला तो चालू बंद किंवा ऍडजस्ट करता येईल. त्यासाठी संपूर्ण डब्यात एसीच्या वेगळ्या सिस्टिमचा वापर करण्यात आलाय.
याशिवाय, प्रत्येक बर्थसाठी स्वतंत्र चार्जिंग पॉईंट, पाण्याची बॉटल आणि मोबाईल ठेवायचा रकानाही देण्यात आलाय. मॅगझिन, पुस्तकं ठेवायची जागाही प्रत्येक बर्थला देण्यात आलीय. प्रत्येक प्रवाशाला जेवणं, नाष्टा करता यावं यासाठी एका टेबलचीही व्यवस्था करण्यात आलीय. रेल्वेतले लाईट बंद झाल्यावरही वाचन वगैर करता यावं यासाठी प्रत्येकाला स्वतंत्र छोटा लाईट देण्यात आलाय.
प्रत्येक बर्थचं डिझाईनही नव्या पद्धतीनं करण्यात आलंय. ट्रेन चालू असताना हालचाल करणाऱ्या माणसाला सोयीचं पडेल असं हे डिझाईन आहे. अशावेळी तोल न जाता व्यवस्थित उभं राहता यावं इतकी मोकळी जागाही ठेवलीय. वरच्या बर्थवर चढण्यासाठीचे पायऱ्या, बसण्याच्या जागा यांचीही नव्याने विचार करण्यात आलाय. त्याचं डिझाईन खास, आकर्षक आहे. सगळ्या खालच्या आणि मधल्या बर्थमधे माणसं बसतात तेव्हा त्यांची डोकी पुरत नाहीत. पण या नव्या डब्यात ही हेडरूमही मोठी करण्यात आलीय.
विमानात असतात तशा पाय ठेवला की आपोआप लागणाऱ्या लाईट्सची व्यवस्था संपूर्ण डब्यात केलीय. डब्याचे लाईट नसताना अंधारात कुणाला बाथरुमला जायचं असेल किंवा आपल्याला स्टेशनवर उतरायचं असेल तर त्यांच्यासाठी हे एकदम बेस्ट असेल. बर्थच्या नंबर्सवरही तसे लाईट वापरण्यात आलेत. त्यामुळे अंधारातही आपला बर्थ शोधणं प्रवाशांना सोपं जाईल. एसी असल्यामुळे तर खिडक्या बंदच राहतील. पण त्यावरही पडद्यासारखी व्यवस्था करण्यात आलीय.
डब्यात चढताना सोपं पडावं यासाठीही वेगळ्या प्रकारच्या पायऱ्या इथं ठेवण्यात येणारेत. स्वच्छतेचीही अतिशय चांगली व्यवस्था या डब्यात दिसतेय. वेस्टर्न आणि भारतीय अशा दोन्ही पद्धतीची स्वच्छतागृह या डब्यात दिलीयत. पायाने बटणं दाबून सिंकमधे पाणी येईल अशी सोय आहे. त्यामुळेही जास्त स्वच्छता राहिल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हे सगळं अपंग व्यक्तींसाठी सोयीचं असं आहे. त्यांना सहजपणे आत बाहेर करता यावं यासाठी दाराचा आकारही जरा मोठा ठेवण्यात आलाय.
प्रवास करताना उपयोगी पडतील असे हॉस्पिटल, पोलिस यांचे संपर्क आणि प्रवाशांची माहिती देणारी सिस्टमही यात बसवण्यात येणारे. याशिवाय, चांगली अशी आगीचा संकेत देणारी सिस्टमही यात दिलीय. असा हा परिपूर्ण डबा आहे.
हेही वाचा : उत्तर कोरिया आतून नेमका दिसतो कसा?
अगदी या सारखे असे नाही. पण स्वस्त दरात एसी सुविधा उपलब्ध करून देणारे थ्रीई क्लासचे डबे २००५ला नितिश कुमार यांच्या काळात सुरू झालेल्या गरिब रथ आणि २००९ ला लालू प्रसाद यादव यांच्या काळात सुरू झालेल्या दुरोंतो या दोन एक्सप्रेसमधेही बसवण्यात आलेत. आत्ताचा थ्रीई डब्यात या दोन्ही एक्सप्रेसमधल्या डब्यांपेक्षा जास्त सुविधा नक्कीच आहेत. पण असा प्रयत्न भारतीय रेल्वेच्या डब्यात याआधीही झालाय.
‘सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अशा किमतीत विमानासारखा अनुभव देणं या आमच्या स्वप्नाच्या आम्ही फार जवळ पोचलो आहोत, असं वाटतंय.’ असं कपूरथलामधल्या रेल कोच फॅक्टरीचे जनरल मॅनेजर रवींद्र गुप्ता इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगत होते. फेब्रुवारी अखेरपासून या डब्यांचं उत्पादन सुरू होईल, असंही ते म्हणाले.
या डब्याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे याचा वेग. साधे स्लीपर क्लासचे डबे ११० किलोमीटर प्रती तास यापेक्षा जास्त वेग धरू शकत नाहीत. पण, हे नवे थ्री टियर एसी इकोनॉमीक क्लासचे डबे १६० किलोमीटर प्रती तास या वेगाने पळतात. त्यामुळेच हळूहळू सगळ्या एक्सप्रेस आणि मेल रेल्वेंच्या इंजिनला या प्रकारचे डबे जोडायची रेल्वे विभागाची इछा आहे. त्यामुळे थ्री टियर एसी इकॉनॉमी क्लास हेच भारतीय रेल्वेचं भविष्य असेल.
हेही वाचा :
देशासाठी रोल मॉडेल नाशिकची मेट्रो
आज रेल्वेचा हॅपी बड्डे, तिला विश केलंय ना!
अली अख्तर : टेनिस हाच त्यांचा विश्वास होता