नर्मदेत बुडणारं गाव बघत गांधी शांत बसलेत!

०२ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


मध्य प्रदेशातलं चिखलदा गाव म्हणजे महात्मा गांधीजींच्या रामराज्याचंच एक उदाहरण. पण सरकारी बेजबाबदारपणा आणि नर्मदा धरणाच्या पाण्यानं आज हे सुंदर गाव बुडालं. गावातली गांधीजींची मूर्ती जीवघेण्या पाण्याच्या प्रवाहातही धन्यमग्न बसलीय. यानिमित्ताने नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांचा लेखाचा हा संपादित अंश.

महात्मा गांधी यांच्या अहिंसावादी सत्याग्रही मार्गाचा वापर करत मेधा पाटकर यांचा मध्य प्रदेश, गुजरात मधल्या हजारो धरणग्रस्तांसाठीचा लढा सुरू आहे. धरण झालं, पण पुनर्वसन झालं नाही. लढा अजूनही चालूच आहे.

धरणाच्या पाण्यानं गावच्या गावं बुडतायत. चिखलदा या मध्य प्रदेशातल्या गावाचंही हेच झालं. हे गाव पाण्याखाली गेल्यावर मेधा पाटकरांनी गावाची कहाणी सांगणारा एक लेख हिंदीत लिहिलाय. त्या लेखाचा हा मराठी अनुवाद इथे देत आहोत.

गांधीजींच्या रामराज्यातलं गाव

आशिया खंडातल्या पहिल्या शेतकऱ्याचा जन्म चिखलदा गावातलाच!  हा शोध पुरातत्त्व शास्त्राकडून लावला गेलाय. या शोधामुळं इतिहासात सुवर्ण अक्षरानं ज्याचं नाव कोरलं जावं असं चिखलदा गाव. गावात हिंदू आणि मुस्लिमांचं प्रमाण सारखंच आहे. असं असलं तरी सध्याच्या असहिष्णु वातावरणातही गाव फार शांतताप्रिय राहिलंय.

चिखलदाच्या अति सुपिक जमिनीवर गहू, कापूस आणि मक्याची कणसं लोंबायची तेव्हा शेत काय बहरून दिसायचं! गावातल्या सगळ्या शेतांमधलं उत्पन्न इथल्या बाजार समितीच्या गोदामात येऊन पडायचं. गांधींच्या रामराज्यातली ही आदर्श आर्थिक व्यवस्था!

सागवानची झाडं, केळीची शेती, पपईच्या बागा यांनी चिखलदा सजून जायचं. इथले मच्छिमार नर्मदेत वेळीअवेळी फेरफटका मारत असत. मासे विकून जगणारी ही मंडळी नर्मदेच्या किनाऱ्यावरच मोहल्ला करून राहात. तर दुसरीकडे दलित समाजाची १०० पेक्षा जास्त कुटुंबं इथे राहत होती.

हेही वाचाः बाप एकच असतो, तो कसा बदलणार?

धार्मिक एकोप्याचा आदर्श

चिखलद्यात एकूण ३६ धार्मिक स्थळं होती. यातली काही मंदिरं तर १०व्या, १२व्या शतकात बांधलेली होती. नीलकंठेश्वर, नरसिंह, राम यांची ती मंदिरं. ए-पीर-दरगाह ही मशीद तर गावाचे लाडके सरपंच दिवंगत निर्मल कुमार पाटोदी यांच्या कुटुंबाच्या मालकीचं जैन मंदिर होतं.

गावात शासकीय भवनं, प्राथमिक, माध्यमिक शाळाही होत्या. गावातली मुलं इथंच तर शिकत होती. इथल्या डॉक्टरांना पगार सरकारी मिळत होता. पण तरीही इतर डॉक्टरांबरोबर स्पर्धा करत सर्वोत्तम औषधोपचार ते करत होते. सरकारी बस गावात येतजात असे. काही वेळ थांबत असे. तेव्हा चढणाऱ्या, उतरणाऱ्या, प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांची चौकातले दहावीस दुकानदार मनापासुन सेवा करत.

चिखलदातल्या धनगरांच्या गुरांचं दूध आसपासच्या गावांसोबतच फार दूरदूर पोचायचं. आणि भागीरथ धनगरानं तर मिठाईचा व्यवसाय करून नर्मदा खोऱ्यातल्या सगळ्याच धनगरांना विकासाचा मार्ग दाखवून दिला होता.

हेही वाचाः महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहे?

नर्मदेच्या खोऱ्याचा इतिहास

गेहेलगावचंही तसंच! ते तर चिखलदाच्या जुळ्या भावासारखंच होतं. इथं नदीच्या किनाऱ्यावर सकूभाई दरबारच्या कुटुंबाचं सुंदर संगमरवरी मंदिर होतं. केळीच्या व्यवसायावरून या कुटुंबाचंच तर नाव नंतर उजागर असं झालेलं. शेवटपर्यंत कच्च्या घरात राहणारे गेहेलचे दलित आदिवासी या केळी बागायतदारांसमोर रोजीरोटी कमवायचे.

चिखलदापासून दोन किलोमीटरवर खापरखेडा गाव आहे. तेही असंच शेतकरी आणि भरपूर मजूर आणि बकऱ्या शेळ्यांसोबत गावोगावी फिरणाऱ्या कुटुंबांमुळं गजबजलेलं असायचं. देवराम भाई कनेरा, नर्मदा आंदोलनाचे वरिष्ठ कार्यकर्ते इथेच राहत होते. नर्मदेच्या खोऱ्यात येणारा प्रत्येक समर्थक त्यांच्याकडेच मुक्कामाला असे. पुरातत्त्व शास्त्रज्ञ एस बी ओरा संशोधन करायला आलेले तेव्हा त्यांनीही देवराम भाईंकडेच तंबू ठोकला होता.

त्यांनी चिखलदाची जमीन खोदली तेव्हा हजारो वर्षांपूर्वीची चिमण्यांची घरटी, वेगवेगळी भांडी आणि कित्ती काही सामान सापडलं होतं. काही दिवसांसाठी पेपरा-पेपरातून प्रसिद्धी पावलेलं आणि आता काळाच्या विस्मृतीत गेललं हे नर्मदेचं खोरं. ही जागा म्हणजे खरंतर अश्मयुगापासुन आजपर्यंतचा मानवी इतिहास आपल्या आपल्या पोटात लपवलेली एकमेव जागा आहे.

चिखलदामधे झालेलं १७ दिवसांचं उपोषण

पुढची १०० वर्ष खोदत राहिलं तरी हा इतिहास सापडणार नाही, असं प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर म्हणाल्या होत्या. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, भारतीय मानववंशविज्ञान सर्वेक्षण विभाग आणि भारतीय भूशास्त्रीय सर्वेक्षण विभाग यासारख्या शासकीय संस्था नर्मदेकडे फार गांभीर्याने पहायच्या. आता मात्र मानवी इतिहासाचं काहीही ज्ञान नसलेली गुजरात आणि केंद्र सरकारची अज्ञानी मंत्रालयं आणि त्यातले मंत्रीच या संस्थांच्या रिसर्च जर्नल्समधे काम करतात. हवं ते छापतात.

चिखलदाने याआधी भरपूर संघर्ष केलाय. नर्मदेचं पाणी, बुडणारी जमीन आणि लोकं वाचवण्यासाठी हा सगळा संघर्ष होता. सगळ्यात अविस्मरणीय संघर्ष झाला तो २०१७ ला. चिखलदा गावातले सगळे रहिवासी, घाटावर राहणाऱ्या सगळ्या लोकांनी हा संघर्ष एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. हजारो साथी दिवसरात्र आंदोलन करत होते.

आंदोलनातल्या आम्हा प्रतिनिधींचा १७ दिवसांचं उपोषण आणि नंतर १५ दिवसांचा कारावास. या दरम्यान भरपूर कार्यक्रम, रॅली यासोबतच जलसत्याग्रह अहिंसक मार्गांनी होत राहिला. पोलिसांसोबतच गावातली झाडं, शेती हे सगळे या संघर्षाचे साक्षीदार होते. देशभरातल्या आंदोलन समर्थकांनी या संघर्षाला बळ दिलं आणि हा संघर्ष देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं महत्वाचं काम केलं.

हेही वाचाः तीन वर्षंच राहणार स्टॅच्यू ऑफ युनिटीचा विक्रम

गांधींची ध्यानमग्न मूर्ती

आज चिखलदा अस्तित्वात नाही! नर्मदेच्या पाण्यानं सगळा परिसर जलमय झालाय. त्यातली घरं, शेती काहीही उरलेलं नाही. सगळं भंगारात विकण्याच्या लायकीचं झालंय. पाणी आलं तेव्हा लोक सैरभर झाले. प्राणी पळून गेले. पण गावातले गांधींजी तसंच बसून राहिले!

मोहनभाईंच्या नेतृत्वाखाली सगळ्या साथींनी मिळून काय दिव्य झेलून गांधींची ती मूर्ती पाण्यातून बाहेर काढली याचे आम्ही साक्षीदार आहोत. ही मूर्ती राजस्थानातल्या रांका चॅरिटेबल ट्रस्टने दान केली होती. गेल्यावर्षी राजस्थानचे सवाई सिंग, उत्तराखंडसाठी संघर्ष करणारे विमल भाई आणि भोपाळच्या गांधी भवनाचे नामदेव या तिघांनी मिळून मूर्तीचं उद्घाटन केलं होतं. मात्र, त्या मूर्तीखालचा संकल्प स्तंभ १९९६ ला बाबा आमटे कसरावदमधे आले होते तेव्हा स्थापन केलेला. हा संकल्प स्तंभच तर गावाने केलेल्या संघर्षाचं प्रतिक होता.

नर्मदेच्या पाण्यानं आज कसरावदमधली बाबांची झोपडी 'निजबल'सुद्धा बुडाली. या झोपडीनं नर्मदेच्या संघर्षाच्या काळात खोऱ्यालाच नाही तर मला व्यक्तिगत फार मोठं बळ आणि आधार दिला होता. ताई आणि बाबांचा प्रेमाचा आशिर्वाद आणि बाहेर जाऊन आल्यावर प्रत्येकवेळी बाबांनी ऐकवलेली त्यांची लहानशी पण गहन कविता आजही सुन्न करते.

हेही वाचाः गांधीजी पुन्हा वायरल झालेत

पाण्यामुळे मुके प्राणीही बेहाल

आज चिखलदाची हत्या झालीय. आणि गांधींची मूर्ती पाण्यातून बाहेर काढताना त्याच्या आसपासच्या वेगवेगळ्या पाट्या नजरेस पडताहेत. शाळेत लावलेली सर्व शिक्षा अभियानाची पाटी, कित्तीतरी ओळखीच्या दुकानांच्या पाट्या, मंदिरांच्या पाट्या आणि सगळीकडे फक्त पाणी-पाणी.

परवाच चिखलदामधे बोटीतून नावाड्यांसोबत जात असताना एक भिंत एक मजली इमारतीवर पडल्याचा आवाज ऐकू आला. गावात पाणी शिरल्यामुळे घरांच्या छपरांचा आधार घेत तहानभूकेने व्याकुळ झालेली ४०-५० कुत्री आणि १०-१२ डुक्करांचा कळप दिसला. नावेतून जात असताना आम्ही त्यांच्या दिशेनं पोळी भिरकावली तेव्हा हे मुके जीव अक्षरशः रडू लागले.

नावेतला लहानगा हरी, मच्छिमार आणि सुनीता यांचा आपल्या गल्लीतल्या कुत्र्यांना पाहुन जीव कासावीस होत होता. मोठमोठी वडाची झाडं, पिंपळ आणि सागवान अशा जीवघेण्या पाण्यातही आज छाती ताणून उभी आहेत.

सत्याग्रही असावा तर गांधींसारखा!

पण उद्याचं काय? चिखलदा जलमग्न झालाय आणि लोकांची शेतंही पाण्यात अडकली आहेत. तिकडे शहरात कित्तीतरी सुंदर फ्लॅट रोज आकार घेतायत. पण इथं गरीबांवार फार मोठा अन्याय होतोय.

पाण्यानं सगळं जमीनदोस्त केलंय. पण गांधी मात्र ध्यानमग्न होऊन या अन्यायाविरूद्ध त्या जलमंचावर विचार करत शांत बसले होते. सत्याग्रही असावा तर असा!

हेही वाचाः 

खऱ्या गांधींच्या विसरत चाललेल्या आठवणी

गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल

प्लॅस्टिकमुक्त भारताचं स्वप्न कसं शक्य होणार?

७० वर्षांपासून भरणाऱ्या गांधीबाबांच्या यात्रेला जायचंय?

अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?

 

(अनुवाद : रेणुका कल्पना)