चीनला आतापर्यंत सगळ्यात मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागतोय. मागच्या ६७ दिवसांपासून उष्णतेच्या भीषण लाटेमुळे प्रमुख नद्या कोरड्या पडल्यात. त्यामुळे चीननं १९ ऑगस्टला राष्ट्रीय दुष्काळाची घोषणा केली. उष्णतेची तीव्र लाट सलग दहाव्या दिवशी कायम राहिल्यामुळे २२ ऑगस्टला देशभर 'रेड अलर्ट' जाहीर करण्यात आला. आताची उष्णतेची लाट आणि दुष्काळामुळे मागच्या ६० वर्षातले चीनमधले सगळे रेकॉर्ड मोडलेत.
१३ जून २०२२पासून चीनमधे उष्णतेची लाट सुरू झाली होती. ही लाट कायम राहिल्यामुळे चीनला सध्या भीषण दुष्काळाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे १९ ऑगस्टला राष्ट्रीय दुष्काळाची घोषणा करावी लागली. उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन २२ ऑगस्टला देशभर 'रेड अलर्ट' जाहीर करण्यात आलाय. ही लाट सप्टेंबरपर्यंत कायम राहील असा अंदाज वर्तवला जातोय. २०१३ला चीनमधे उष्णतेची लाट आली होती. ती सलग ६२ दिवस होती. आताच्या लाटेनं हा रेकॉर्ड मोडलाय.
पोयांग हा चीनमधला सगळ्यात मोठा गोड्या पाण्याचा तलाव आहे. ३,५०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेला हा तलाव एरवी पूर्णपणे भरून जायचा. यावेळी मात्र दुष्काळामुळे त्याला मिळणाऱ्या गन, झिन आणि शिऊ अशा प्रमुख नद्या आटल्यात. त्यामुळे तलावाचं ७३७ चौरस किलोमीटरचं क्षेत्रच भरलंय. १९५१नंतर पहिल्यांदाच अशी वेळ आलीय. उष्णतेची लाट इतकी भीषण आहे की, इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर रात्रीच्या अंधारात काम करायची वेळ आलीय. त्यावरून उष्णतेची तीव्रता लक्षात येते.
शेती आणि इतर वापरासाठी हा तलाव मोठं वरदान आहे. त्यामुळेच पोयांगला 'चीनची किडनी' असंही म्हटलं जातं. तसंच हिवाळ्यात दक्षिणेकडून जाणाऱ्या लाखो स्थलांतरित पक्षांसाठी हा महत्वाचा थांबा आहे. सायबेरीयन सारस ज्याला क्रौंच पक्षीही म्हणतात हे क्रौंच हिवाळ्यात इथं आपली घरं बनवतात. पोयांगच्या काठी काहीकाळ विसावा घेऊन पुढं मार्गस्थ होतात. पण चीनमधली उष्णतेची लाट आणि त्यामुळे आलेल्या दुष्काळानं पोयांगवर अवलंबून असलेल्या वन्यजीवांचं अस्तित्वही धोक्यात आणलंय.
बदललेल्या हवामानामुळे इथं नियोजित वेळेआधीच कोरडा हंगाम सुरू झालाय. दक्षिण-पश्चिम चीन मधल्या ६६ नद्या पूर्णपणे कोरड्या पडल्यात. तर पोयांग तलावाला मिळणाऱ्या प्रमुख नद्या २० ते २५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. या तलावापर्यंत जाणाऱ्या नद्यांची साखळीच आता मोडून पडलीय. या तलावाचं क्षेत्रफळ दिवसेंदिवस घटत चाललं होतं. मासेमारीसाठी होत असलेला उपसा त्यादृष्टीने कायम कळीचा मुद्दा राहिला होता. पर्यावरणीय महत्व लक्षात घेऊन २०२०ला या तलावावरच्या मासेमारीवर बंदी घालण्यात आली.
हेही वाचा: एका झाडाची किंमत शोधली कशी?
खराब हवामानामुळे चीनचं कृषी क्षेत्र संकटात आहे. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दक्षिणेकडच्या भागांमधे पिकवला जाणारा तांदूळ आणि मक्याच्या पिकावरही याचा गंभीर परिणाम झालाय. रॉयटर न्यूज एजन्सीच्या एका रिपोर्टनुसार, चीनच्या हेनान भागातली जवळपास १० लाख हेक्टरपेक्षा अधिक तर यांगत्झी नदीच्या खोऱ्यातली लाखो हेक्टरची जमीनही दुष्काळानं प्रभावित झालीय. त्याचा परिणाम इथल्या शेतकऱ्यांच्या रोजीरोटीवर झालाय. कृषी संकट विचारात घेऊन चीनमधे कृत्रिम पाऊस पाडला जातोय.
तसंच उष्णतेच्या लाटेमुळे चीनच्या दक्षिणेकडच्या अनेक भागांमधे हाहाकार माजलाय. पश्चिम आणि मध्य चीनमधे तर या लाटा ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदवल्या गेल्यात. चीनच्या राष्ट्रीय हवामान खात्याने २० ऑगस्टला जाहीर केलेल्या निवेदनाप्रमाणे, नैऋत्येकडच्या सिचुआनपासून ते आग्नेय किनाऱ्यावरच्या फुजियानपर्यंत ६२ हवामान केंद्रांवर विक्रमी तापमानाची नोंद करण्यात झालीय. त्याचा सगळ्यात जास्त फटका चीनच्या चांगक्सिंग, झेजियांग अशा भागांना बसलाय.
चीनची यांगत्से ही आशियातली सर्वात लांब आणि जगातली तिसऱ्या क्रमांकाची मोठी नदी म्हणून ओळखली जाते. १९६१नंतर इथं पहिल्यांदा कमी पाऊस पडल्याचं चीनच्या जलसंसाधन खात्याने म्हटलंय. जगातलं सगळ्यात मोठं जलविद्युत निर्मिती करणारं धरण 'थ्री गॉर्जेस डॅम' हे याच नदीवर बांधलं गेलंय. चीनच्या ४०० मिलियन लोकांना इथून पाणीपुरवठा होतो. उष्णतेचा परिणाम इथल्या विजेच्या उत्पादनावर झालाय. त्यामुळे गॉर्जेस डॅमच्या विजेच्या उत्पादनात ४० टक्क्यांची घट झालीय. तर यांगत्सेच्या खोऱ्यातल्या गवताळ भाग आणि जंगलांमधे आगीच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जाहीर करण्यात आलाय.
देशभरातले जलविद्युत प्रकल्पही आजच्या घडीला ठप्प पडलेत. कारखान्यांना उत्पादन कमी करण्याचे आदेश दिले जातायत. त्यामुळे मालवाहतूकही विस्कळीत झालीय. सिचुआन, चोगकिंग भागातले महत्वाचे प्लांट बंद करायची वेळ आलीय. त्यामुळे देशाची वीजनिर्मितीही ५० टक्क्यांवर आलीय. बॅटरीच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम होतोय. घरगुती विजेचं संकटही उभं राहिलंय. त्यामुळे चीनचं ४०० मिलियन डॉलर इतकं आर्थिक नुकसान झालंय. तर ५.५ मिलियनपेक्षा अधिक लोकांवर त्याचा थेट परिणाम झाल्याचं हिंदुस्थान टाइम्सच्या एका रिपोर्टमधे म्हटलंय.
माणसाकडून हव्यासापोटी जीवाश्म इंधनं जाळली जातायत. कार्बनची साठवणूक करणारी परिसंस्था नष्ट केली जातेय. त्यामुळे हवामानचं स्वरूप नियंत्रित करणारे वातावरणातले वायुप्रवाह झपाट्याने बदलत आहेत. चीन हा कार्बन उत्सर्जन करणारा जगातला सगळ्यात मोठा देश आहे. विकासाच्या नावाखाली मोडीत काढल्या गेलेल्या शाश्वत पर्यावरणाच्या धोरणांकडे डोळेझाक करणं चीन आणि जगाच्या अंगलट येतंय. आज जगाचं तापमान हे १.१-१.३ अंशानी वाढलीय. ही वाढ धडकी भरवणारी आहे.
पूर्ण जगभर हे पर्यावरणीय संकट उभं राहिलंय. इराक देश मागचे तीन वर्ष या संकटाशी लढतोय. सलग तीन वर्ष तिथं दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे देशाच्या कृषी उत्पादनातही १७ टक्क्यांची घट झालीय. इराकचं वाळवंट होतंय की काय अशी परिस्थिती आहे. तर युरोपमधलाही ६३ टक्के भूभाग हा आज दुष्काळाचा सामना करत असल्याचं पर्यावरणविषयक वेबसाईटच्या एका अहवालात म्हटलंय. त्याचा सर्वाधिक फटका फ्रांस, स्पेन आणि इटलीसारख्या देशांना बसलाय. नद्यांचं पाणी आटल्यामुळे फ्रांसमधले १२ न्यूक्लिअर पावर प्लांट बंद करावे लागलेत.
अमेरिका, इंग्लंडसारख्या देशांचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. अमेरिका आज मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टंचाईचा अनुभव घेतंय. इथली कोलोराडो नदी मागच्या १ हजार वर्षांमधे पाहिल्यांदाच दुष्काळाचा सामना करतेय. तिकडे इंग्लंडनं उष्णतेच्या जबरदस्त लाटेमुळे १९३५नंतर पहिल्यांदाच जुलै महिना कोरडा महिना म्हणून अनुभवला. तर दक्षिण आफ्रिकेतली अनेक शहरं आज पाण्यासाठी वणवण करतायत. त्यामुळे आज चीनवर आलेल्या संकटाने उद्या आपल्या घराचा उंबरठा ओलांडला तर नवल वाटायला नको. इतकं आपण दिवसेंदिवस पर्यावरणाला धक्का पोचवायचा प्रयत्न करतोय.
भारतही त्यातून सुटलेला नाही. आज बिहार राज्यातल्या ३६ जिल्ह्यांमधे पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलीय. तीच परिस्थिती झारखंडची आहे. तिकडे उत्तराखंडमधे ढगफुटी आल्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालंय. महाराष्ट्रातही अचानक आलेल्या संकटामुळे शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करायची मागणी करतायत.
हेही वाचा:
डळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग १)
रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली
इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट
एका शिक्षकाला बियरने चीनमधला सर्वात श्रीमंत माणूस बनवलं, त्याची गोष्ट