चीन आणि भारतीय सैन्यात झालेला गलवान संघर्ष आणि त्यानंतर चार महिन्यांनी मुंबईचा वीज पुरवठा थांबणं या दोन गोष्टींचा संबंध असल्याचं म्हटलं जातंय. चीनने केलेल्या सायबर हल्ल्यामुळेच मुंबईतली लाईट गेली होती असं न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालात सांगितलं गेलंय. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही यात इंग्लंड आणि चीनचा हात असल्याचं मान्य केलंय.
मागच्या वर्षी मुंबईत लाईट गेले होते. तो दिवस तुम्हाला आठवतोय? खरंतर लाईट जाणं हे भारतातल्या गावांना आणि काही शहरांनाही नवीन नाही. पण लोडशेडिंगमधेच दिवस रात्र काढणाऱ्या लोकांसाठी मुंबईमधे लाईट जाणं ही गोष्ट फार धक्कादायक होती. मुंबईमधे सहसा कधीही लाईट जात नाही. पण १२ ऑक्टोबर २०२० या दिवशी संपूर्ण मुंबईतली लाईट गेली. ठाणे, नवी मुंबईमधली उपनगरंही लाईटविना ठप्प झाली होती. लोकल जिथल्या तिथं थांबून राहिल्या. अनेक लोक लिफ्टमधे अडकले होते. कामं धंदे तर सगळं बंदच होतं. न्यूज चॅनेलचे स्टुडिओही अंधारले होते. तशाच परिस्थितीत लाईट कधी येणार याच्या बातम्या देणं सुरू होतं.
कोविडचा संसर्ग झालेले अनेक पेशंट वेटिंलेटरवर होते. त्यांच्या वेटिंलेटरसाठी हॉस्पिटलने आपले इमजन्सी जनरेटर चालू केले. दिवस पालटला तरी मुंबईतल्या अनेक ठिकाणची लाईट आली नव्हती. वीज पुरवठा करणाऱ्या बेस्टला स्पष्टीकरणं देता देता नाकीनऊ आले.
याच घटनेच्या चार महिने आधी मुंबईपासून १५०० मैल लांब असणाऱ्या गलवान व्हॅली खोऱ्यात चीनच्या सैनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन्ही बाजूचे सैनिक मारले गेले. या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध असल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटलंय.
हेही वाचा : चीनी स्वप्नपूर्तीच्या नावाखाली चालतो इंटरनेटबंदीचा अजेंडा
मुंबईतले लाईट गेल्यानंतर मुंबईतल्या कळवा पडघा जीआयएस केंद्रात सर्किट १ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. त्यामुळे सगळा भार सर्किट २ वर पडला. त्यात सर्किट २ मधे अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई आणि ठाण्यातल्या बहुतांश टिकाणची लाईट गेली असं स्पष्टीकरण देण्यात येत होतं. पण रात्री सगळं सुरळीत झाल्यानंतर हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता उर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली होती आणि चौकशीचे आदेश दिले.
आता जवळपास ५ महिन्यांनंतर न्यूयॉर्क टाइम्स आणि द वॉल स्ट्रिट जरनल या अमेरिकेतल्या दोन पेपरनी मुंबईत वीज यंत्रणेत झालेल्या बिघाडामागे चीन आणि इतर काही देशांनी केलेला सायबर हल्ला होता अशी बातमी १ मार्चला प्रसिद्ध केली.
चीनने केलेल्या सायबर हल्ल्यामुळे भारतातल्या या सगळ्यात प्रमुख शहरातले लाइट गेले असल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं आपल्या रिपोर्टमधे म्हटलंय. आम्ही भारताच्या पॉवर ग्रीडला टार्गेट केलंय. त्यामुळे आम्हाला जास्त विरोध केलात तर आम्ही संपूर्ण भारताचे लाईट घालवू शकतो, असा इशारा देण्यासाठी चीनने मुंबईतले लाईट घालवले होते असंही हा रिपोर्ट सांगतो.
हेही वाचा : इंटरनेटच्या समुद्रात गळ टाकून बसलेल्या हॅकर्सचं काय करायचं?
या अहवालात सांगितल्याप्रमाणे, दोन्ही देशांमधे सीमेवर वाद चालला होता तेव्हा चीन सायबर हल्ला करण्याच्या तयारीत गुंतलं होतं. सॉफ्टवेअरला हॅक करणारं चायनिज मालवेअरला वीज पुरवणाऱ्या कंट्रोल सिस्टिममधे टाकलं गेलं. यामुळे संपूर्ण भारतातल्या वीजपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणं शक्य झालं. इतकंच नाही तर या मालवेअरच्या नियंत्रणाखाली हाय वोल्टेज ट्रान्समिशनचे सबस्टेशन आणि कोळश्यावर चालणारे पॉवर प्लांटही होते.
न्यूयॉर्क टाइम्सनं सांगितल्याप्रमाणे, भारतातल्या या वीज पुरवठा सिस्टिममधे चिनी मालवेअरमुळे अडथळे निर्माण झाले असल्याचा दावा रेकॉर्डेड फ्यूचर नावाच्या एका कंपनीने केलाय. जगभरातल्या देशांना नुकसान पोचवणाऱ्या मालवेअर्सवर नजर ठेवणारी ही कंपनी आहे. ही कंपनी म्हणते, की चीनने एकापेक्षा जास्त मालवेअर सिस्टीममधे टाकलेत. पण त्यातले अनेक मार्लवेअर ऍक्टिव केलेले नाहीत. हे मालवेअर किती धोकायदायक आहेत त्याबद्दल काही सांगता येणार नाही, असंही या कंपनीने म्हटलंय. पण भारतातल्या अधिकाऱ्यांना या मालवेअरची माहिती आम्ही दिलीय असं त्यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा : फेसबुक झालंय 'बुक्ड'!
चिनी सरकारच्या रेड एको नावाच्या एका कंपनीने सिस्टिममधे हे मालवेअर टाकण्याचं काम केलंय, असं रेकॉर्डेड फ्यूचरचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर स्टुअर्ट सॉलोमन यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितलंय. खास सायबर टेक्निकचा वापर करत भारतातले पॉवर जनरेशन आणि ट्रन्समिशन ग्रिडमधल्या जवळपास डझनभर महत्त्वाच्या नॉड्समधे हस्तक्षेप केलाय, असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर १२ ऑक्टोबरला मुंबईत लाईट गेले होते त्यामागे भारताला इशारा द्यायचा होता का अशी शंका घेतली जातेय.
महाराष्ट्राच्या उर्जामंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर सायबर सेलनेही याची चौकशी सुरू केली होती. त्याचाही अहवाल १ मार्चला न्यूयॉर्क टाइम्समधे ही बातमी आल्यानंतर गृहमंत्र्यांनी उर्जा विभागाकडे सुपूर्त केला. ‘आयपी म्हणजे इंटरनेट प्रोटेकॉल ऍड्रेस यामाध्यमातून महावितरणामधे लॉग इनचे प्रयत्न झाल्याची शक्यता असू शकते असा पद्धतीचं म्हणणं या रिपोर्टमधे मांडण्यात आलंय,’ असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्या दिवशी पत्रकार परिषदेत सांगितलं.
अमेरिकन मीडियाच्या माहितीनुसार हा प्रयत्न चीनने केलाय. पण महाराष्ट्राच्या अहवालात चीनचा उल्लेख केलेला नव्हता. तर काही ब्लॅकलिस्टेड आयटी कंपन्यांनी हे केलं असावं असं हा अहवाल म्हणतो. मात्र, दोन दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना नितीन राऊत यांनी यात चीन आणि युकेचाही हात असल्याचं म्हटलंय. ‘यंत्रणेत आढळलेल्या १४ ट्रोजन्सपैकी काही ट्रोजन इंग्लड आणि चीनचे आहेत. सिक्युरिटी वॉल तोडून ते आत घुसलेत,’ असं त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा : सैन्य मागे घेऊन भारत आणि चीनने काय कमावलं, काय गमावलं?
भारतीय वीज पुरवठा सिस्टिममधे असणाऱ्या या मालवेअरला ट्रोजन हॉर्स मालवेअर असं म्हटलं जातं. याला असं नाव पडण्यामागेही एक ग्रीक अख्यायिका आहे. ट्रॉय नावाच्या एका टर्कीमधल्या शहरावर ग्रीक सैनिकांनी हल्ला केला. तेव्हा आपल्या सैन्यासोबत ते एक मोठाच्या मोठा लाकडी घोडा घेऊन गेले. हल्ल्यामधे ग्रीक सैन्याची हार होऊ लागली तेव्हा त्यांनी तिथून पळ काढला. पण आपला लाकडी घोडा घेऊन ते गेले नाहीत.
तो लाकडी घोडा ट्रॉयच्या ट्रोजन सैनिकांनी मोठ्या अभिमानाने आपल्या राज्यात आणला. आणि त्यादिवशी रात्री सगळं राज्य झोपलं असताना त्या घोड्याचं पोट फाडून ग्रीक सैनिक बाहेर आले आणि त्यांनी ट्रॉयवर हल्ला करून तो प्रदेश जिंकून घेतला. या घोड्याला ग्रीक पुराणात ट्रोजन हॉर्स म्हटलं जातं. म्हणूनच शत्रूच्या डोळ्यासमोर छुपा वार करणाऱ्या मालवेअरलाही हेच नाव दिलं गेलं. दिसताना ते अगदी साधं वाटतं. त्यामुळेच तंत्रज्ञानातले तज्ञही त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाहीत. त्याला आपलंसं करतात. आणि त्यामुळेच हे मालवेअर त्याला हवं ते नुकसान सहज करू शकतं.
आता हा घोडा चीनने आणला असू दे किंवा महाराष्ट्राच्या अहवालात सांगितलंय तसं काही आयटी कंपन्यांनी आपल्या वीज पुरवठा यंत्रणेत तो आला आहे. त्यामुळेच आपल्याला निर्धास्त राहून चालणार नाही.
हेही वाचा :
मुलांना कोडिंगचं शिक्षण द्यावं का?
भल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी
आपलं सोशल मीडिया अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून
बहिरं व्हायचं नसेल तर डब्ल्यूएचओचा कानमंत्र आताच ऐकायला हवा
सरकारनं आपल्या मदतीला पाठवलेला 'आरोग्य सेतू' स्वतः सुरक्षित आहे का?