जगाच्या डोक्यावर चीनी सुपर सोल्जर्सची टांगती तलवार

२८ डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


जगाची महासत्ता बनण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या चीनने नीतीमूल्यं कधीचीच पायदळी तुडवली आहेत. चीन आता सुपर सोल्जर्स बनवण्यासाठी वेगाने प्रयत्न करत असल्याचं समोर आलंय. मानवी गुणसूत्रांमधे बदल करुन अवतरणारे हे सुपर सोल्जर्स अन्नपाण्याशिवाय प्रदीर्घ काळ रणांगणावर लढायला सक्षम असणार आहेत. अर्थातच हा अत्यंत घातकी प्रयोग असून यामुळे जगाची चिंता वाढलीय.

अलीकडेच समोर आलेल्या बातमीनुसार, चीन आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांच्या सैनिकांच्या डीएनएमधे फेरफार करून सुपर सोल्जर्स बनवण्याचा प्रयत्न करतोय. अशा प्रकारचे सोल्जर्स विकसित करण्याचा चीनचा प्रकल्प यशस्वी झाल्यास चीनी सैनिकांना अनेक दिवस न झोपता, न खाता पिता लढता येण्याची क्षमता प्राप्त होणार आहे.

थोडक्यात, चीन त्यांच्या लष्करी जवानांची जैविक क्षमता वाढवणार आहे. यासाठी अनेक जैविक चाचण्या चीनने केल्या आहेत. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सचे संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी दोन वर्षांपूर्वीच ही माहिती दिली होती. ती अमेरिकेच्या वॉलस्ट्रीट जर्नल या प्रख्यात पत्रिकेत प्रकाशित झाली होती.  इंग्लंडनेही अशा प्रकारचा दावा केलाय. अनेक शास्रज्ञांकडूनही याला पुष्टी मिळतेय.

हेही वाचा: चीनी स्वप्नपूर्तीच्या नावाखाली चालतो इंटरनेटबंदीचा अजेंडा

नैसर्गिक रचनेत बदल

साहजिकच, ही जगासाठी आणि खास करुन भारतासाठी अत्यंत धोक्याची आणि चिंतेची गोष्ट आहे. पण चीनकडून सध्या सुरू असलेला कथित प्रयोग हा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत असून तो थेट निसर्गाच्या रचनेतच हस्तक्षेप करणारा आहे. मानवी जनुकांचा समूह असणार्‍या गुणसूत्रांमधे बदल करणार्‍या तंत्रज्ञानाला जीन एडिटिंग किंवा जिनोम एडिटिंग असं म्हटलं जातं.

या तंत्रज्ञानामुळे डीएनएमधे बदल केला जाऊ शकतो. तो करताना डीएनएमधल्या काही गोष्टी काढून टाकल्या जाऊ शकतात किंवा आवश्यक गोष्टी त्यामधे वाढवल्या जाऊ शकतात. या तंत्रज्ञानाचा वापर करुन चीन युद्धामधे इतर देशांवर वरचढ ठरू शकतो.

‘क्रिश-3’ या सिनेमामधे या तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो याचं चित्रण दाखवण्यात आलं होतं. त्यानुसार मानवाचे आणि प्राण्याचे डीएनए एकत्र करुन एक संकरीत प्रजाती तयार केलेली दाखवण्यात आली होती. आता चीन या तंत्रज्ञानाचा वापर करुन आपली युद्धक्षमता अमर्याद करण्याच्या प्रयत्नात आहे.

चीनी सैनिकांच्या उणिवा

चीन हे का करतोय? याचं मुख्य कारण म्हणजे अत्यंत उंच जागांवर चीनी सैनिकांची लढण्याची ताकद किंवा क्षमता कमी पडू शकते. कारण या भागात ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं. तसंच तापमानाचा पारा शून्याहून किती तरी खाली गेलेला असतो. सामान्यतः असं मानलं जातं की, कोणत्याही सैनिकाचं जितकं वजन असतं त्याच्या निम्म्या वजनापेक्षा अधिक सामान त्याच्या पाठीवर नसावं.

एका सैनिकाचं वजन ६० ते ६५ किलो असल्यास त्याला त्याच्या पाठीवर ३० ते ३५ किलो इतक्या वजनाचं सामान दिलं जातं. यामधे त्याची रायफल, अ‍ॅम्ब्युशन, जेवण आणि हँडग्रेनेडसारखा दारुगोळा यांचा समावेश असतो. अतीउंच भागात सैनिकांची क्षमता कमी झालेली असते. म्हणजेच समुद्रसपाटीवर एखादा सैनिक ३५ किलो वजनाचं साहित्य वाहून नेत असेल तर अतीउंच भागात तो १० ते १५ किलोपेक्षा कमी वजनाचा भाग पेलवू शकतो किंवा वाहून नेऊ शकतो.

याशिवाय अतिशीत हवामानामुळे या भागात सतत वास्तव्यास असणार्‍या सैनिकांना उच्च रक्तदाब, हृदयविकारासारखे आजार जडण्याची तसंच लवकर आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. तसंच या वातावरणामुळे सैनिकांचं आयुष्यही कमी होतं, असं मानलं जातं. या सार्‍या मर्यादा, उणिवा लक्षात घेऊन चीनने सुपर सोल्जर्स बनवण्याचा प्रकल्प हाती घेतलाय.

हेही वाचा: तिसऱ्या जगाचं नेतृत्व करायची संधी भारताने गमावलीय?

महासत्ता बनायची महत्त्वाकांक्षा

असे सुपर सोल्जर्स रात्रीच्या वेळी जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतील, त्यांची ताकद, दमसास खूप वाढलेला असेल आणि सर्वसाधारण सैनिकांच्या तुलनेत पुष्कळ अधिक वेळ या कठीण सीमेवर ते चांगल्या पद्धतीने काम करून शत्रूचा पराभव करू शकतील, असं चीनला वाटतं. यासाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून चीनने त्यांच्या लष्करामधे चाचण्या सुरू केल्या आहेत.

यामागचं आणखी एक कारण म्हणजे चीनच्या पीएलएमधल्या सैनिकांमधे बहुतांश जवान हे शहरी भागातले आहेत. त्यामुळे ते उंच हिमशिखरांवर प्रतिकूल वातावरणात राहण्यास तयार नाहीत. त्यामुळेही चीनने सुपर सोल्जर्स बनवण्याचा घाट घातलाय. चीनकडून केला जाणारा हा प्रकार अर्थातच नीतीशास्राला धरुन नाही. पण जागतिक महासत्ता बनण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या चीनने कधीच नैतिकेचे पालन केलेले नाही.

ज्याप्रकारे त्यांनी वुहानच्या प्रयोग शाळेमधे कोरोना विषाणूची निर्मिती करून जगाचं कंबरडं मोडलंय, तशाच प्रकारे जैविक संशोधन करून जगावर राज्य करण्याची त्यांची लालसा आहे. याचा जगाने फारच गांभीर्याने विचार केला पाहिजे.

इतिहास काय सांगतो?

आता प्रश्न उरतो तो सुपर सोल्जर्स बनवणं खरोखरच शक्य आहे का? इतिहासात डोकावल्यास जगामधे अशा प्रकारचे प्रयोग नेहमीच सुरू असतात. विशेषतः क्रीडा क्षेत्रात अशा प्रकारचे सुपर अ‍ॅथलिट जगाने पाहिलेत. ते क्षमता वाढवण्यासाठी अनेकदा हार्मोन्सची इंजेक्शने घेतात, स्टेरॉईडचं सेवन करतात, जेणेकरून ठराविक काळापुरती त्यांची क्षमता वाढते. जागतिक विक्रम करण्यात त्यांना मदत होते.

पण यामुळे अगदी जागतिक दर्जाचे खेळाडूही अडचणीत आलेले आपण पाहिलंय. काही वर्षांपूर्वी ज्यो ग्रिफिक जॉयनर नावाच्या अमेरिकेन महिला खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेत दोनदा जागतिक स्तरावर सुवर्ण पदक जिंकलं होतं. १० सेकंदाहून कमी काळात १०० मीटर पार करणारी ती इतिहासातली पहिली महिला खेळाडू ठरली होती. तिच्या या जागतिक विक्रमाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं.

आजवर एकाही महिलेला जे जमलं नाही ते जॉयनरने करुन दाखवल्यामुळे अनेकांनी संशयही व्यक्त केला होता. ती कोणत्यातरी अमली पदार्थांचा वापर करत असावी, अशी चर्चाही सुरू झाली. हा संशय खरा ठरला आणि जागतिक विक्रम मोडीत काढल्यानंतर ४ वर्षातच तिचा मृत्यूही झाला. तिच्या शरीरामधे वेगवेगळी उत्तेजक औषधं गेल्यामुळे मैदानावर तिला सुपर परफॉर्मन्स देता आला; पण काही काळातच तिचा मृत्यू झाला.

आपल्यापैकी अनेक जण डब्ल्यूडब्ल्यूएफसारख्या कुस्तीस्पर्धा पहात असतील. त्यामधे सहभागी असणारे मल्ल एकमेकांना खुर्चीने मारतात, दंडुक्याने मारतात, लोखंडी रॉडने मारतात; पण तरीही त्यांना काहीही होत नाही असं दाखवलं जातं; पण त्यांनाही स्टेरॉईड दिले जातात. त्यामुळे त्यांचाही मृत्यू लवकर होतो.

हेही वाचा: साना मारिन: जगातल्या सगळ्यात तरुण पंतप्रधान पाच पक्षांचं सरकार चालवतात

अनैतिक आणि धोकादायक संशोधन

याचाच अर्थ जैविक संशोधनाचा वापर करून आपली शारिरीक क्षमता प्रचंड प्रमाणात वाढवता येत असली तरी त्याचा मानवी शरीरावर होणारा दुष्परिणाम प्राणघातक ठरू शकतो. खरं म्हणजे, जगामधे चालणार्‍या शास्रज्ञांच्या संशोधनाबद्दल एक नियम बनवण्यात आलेला असून त्यानुसार अनैतिक किंवा निसर्गाच्या रचनेला बाधा आणणारं तंत्रज्ञान शोधण्यास प्रतिबंध करण्यात आलाय.

विविध दुर्धर आजारांवरच्या औषधांच्या शोधासाठी संशोधनं करता येऊ शकतात. पण मानवाच्या गुणसूत्रांमधे बदल करण्यासारख्या संशोधनांवर बंदी घालण्यात आलीय. पण चीनला महाशक्ती बनण्याची घाई झालीय. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय कायदे-नियम पायदळी तुडवून चीन अनेक विघातक गोष्टी करतोय.

याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोविड महामारी. वुहानमधल्या प्रयोगशाळेमधून तो विषाणू बाहेर पडला आणि संपूर्ण जगामधे हाहाःकार माजला. दोन-अडीच वर्षे चीनच्या या जैविक अस्राशी लढता लढता जागतिक अर्थकारण, अर्थव्यवस्था, आरोग्यव्यवस्था कोलमडून पडल्या.

आता तर खुद्द चीनवरच हा भस्मासूर उलटलेला दिसतोय. संपूर्ण जग या महामारीतून बाहेर पडून मोकळा श्वास घेत असताना चीनमधे कोविडचा उद्रेक झालाय. निसर्गाच्या विरोधात केले जाणारे प्रयोग हे मानवजातीसाठी धोकायक असतात आणि त्यातून मानवी समूहांची अपरिमित हानी होते.

सुपर सोल्जर्सचा धोका कुणाला?

या पार्श्वभूमीवर चीनी शासनाच्या या घातक प्रयोगाविषयी, संशोधनाविषयी तिथल्या सैनिकांनीच आवाज उठवण्याची गरज आहे. चीनमधे निवृत्त सैनिकांची संख्या ८० ते ९० लाख इतकी आहे. त्यांनी याविरोधात पुढे आलं पाहिजे. तसंच संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार समितीने याबद्दल चीनवर दबाव आणलाय. पण चीन या दबावाला भीक घालणार का हा प्रश्न उरतोच.

मग पर्याय काय? यासाठी आपल्याला एक मानसिक युद्ध करावं लागेल. त्यानुसार चीनी नागरिकांना हे सांगावं लागेल की चिनी सरकार विघातक प्रयोग करुन त्यांचं आरोग्य धोक्यात आणतंय. तसंच चीनवर बारीक लक्ष ठेवून गरज भासली तर जगाची मदत घेऊन चीनचं घातकी संशोधन थांबवण्याची गरज आहे.

इस्त्राईलने अनेकदा अशा प्रकारच्या जगाच्या विरोधातल्या संशोधनाबद्दल कठोर भूमिका घेतलीय. अशा संशोधन प्रकल्पांवर संशोधन करणार्‍या संशोधकांवर हल्लेही केलेत. मध्यंतरी इराणचे अणुशास्त्रज्ञ जे इराणसाठी अणुबॉम्ब तयार करत होते त्यांना ठार मारण्यात आलं होतं. त्यामुळे इराणचा आण्विक कार्यक्रम १० वर्ष मागं पडलाय.

अशा प्रकारच्या कारवाया इतर युरोपियन राष्ट्रे चीनविरूद्ध करू शकतील का यावर सुद्धा विचार करणे गरजेचं आहे. कारण चीनच्या या सुपर सोल्जर्सचा धोका केवळ भारताला नसून तो जगालाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणाने आहेच, हे नाकारता येणार नाही.

हेही वाचा: 

लसीचे साईड इफेक्ट अच्छे हैं

मांग महारांच्या दुःखाविषयी, सांगतेय मुक्ता साळवे

चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण

अहिल्याबाई होळकर : फक्त साध्वी नाहीत तर राष्ट्रनिर्मात्या!

बहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज

(लेख दैनिक पुढारीकडून साभार)