आपल्या देशात अनेक भाषा बोलणारे लोक आहेत. जिद्दीला आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षांची जोड दिली तर सर्वोच्च यश मिळवताना भाषेचा अडसर येत नाही हेच चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी दाखवून दिलंय. या जोडीने नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीत ऐतिहासिक विजेतेपद पटकावलं. या कामगिरीमुळे त्यांच्याकडून आगामी काळात अपेक्षा उंचावल्या आहेत.
बॅडमिंटनमधे जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंनी अनेक ऐतिहासिक पराक्रम केले असले तरी बॅडमिंटन आशियाई स्पर्धेत भारताला मर्यादितच यश मिळालंय. या स्पर्धेमधे पुरुषांच्या दुहेरीत प्रथमच भारताला गोल्ड मेडल मिळवून देण्याची किमयागार कामगिरी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रान्किरेड्डी यांनी केलीय.
यापूर्वी १९७१मधे दिपू घोष आणि रमण घोष यांनी या स्पर्धेतील दुहेरीत ब्राँझ मेडल पटकावलं होतं. १९५६मधे दिनेश खन्ना यांनी गोल्ड मेडल जिंकलं होतं. त्यानंतर भारताला सोनेरी यशाची किनार चिराग आणि सात्विक यांच्यामुळे आत्ता लाभलीय.
चिराग हा मुंबईतला खेळाडू आहे आणि तो हिंदी भाषिक युवक आहे तर सात्विक हा तेलंगणामधला तेलगू भाषा बोलणारा युवक. या दोन्ही खेळाडूंनी लहानपणापासून एकेरीच्या स्पर्धांमधे अनेक स्तरांवर कौतुकास्पद कामगिरी केलीय.
हे खेळाडू कधी एकत्र येऊन दुहेरीचे सामने गाजवतील अशी कधी कुणी अपेक्षाही केली नव्हती कारण दोघांची राज्य वेगवेगळी आणि दोघांचेही आदर्श खेळाडूही वेगवेगळे आहेत. चिरागसाठी ज्येष्ठ बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक प्रकाश पदुकोण हे आदर्श खेळाडू आहेत. सात्विक हा ज्येष्ठ खेळाडू आणि प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांच्या तालमीत तयार झालेला खेळाडू.
२०१५मधे राष्ट्रीय स्तरावरील सराव शिबिरात भारतीय टीमचे दुहेरीचे परदेशी प्रशिक्षक तान कीमहर यांनी चिराग आणि सात्विक या खेळाडूंना दुहेरीत एकत्र खेळण्याचा सल्ला दिला. सुरवातीला या दोघांना आपली जोडी कशी जमणार अशी शंका निर्माण झाली. त्यांच्याबरोबरच अनेक ज्येष्ठ खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटकही ताम कीनहर यांच्या सूचनेविषयी साशंक होते.
कारण या दोन्ही खेळाडूंची शैली आक्रमक होती आणि एकमेकांच्या शैलीला पूरकही नव्हती. पण कीमहर यांनी या खेळाडूंमधे दुहेरी चमकण्यासाठी आवश्यक असणारे नैपुण्य आहे हे ओळखलं होतं त्यामुळेच त्यांनी स्वतःहूनच आपली सूचना अंमलात आणली. त्यामुळेच भारताला पुरुषांच्या दुहेरीत चमकणारे हिरे मिळाले.
अवघ्या काही महिन्यांच्या सरावाच्या जोरावर या जोडीने २०१६मधे लागोपाठ चार आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधे दुहेरीच्या अजिंक्यपदावर आपली मोहोर उमटवली. तिथून त्यांनी मागे पाहिलंच नाही. सतत यशाची चढती कमान ठेवलीय. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघातर्फे आयोजित केल्या जाणार्या जागतिक स्पर्धांच्या मालिकेत पाच विजेतेपदे तर दोन वेळा उपविजेतेपद, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ब्राँझ मेडल अशी त्यांची भरीव कामगिरी झालीय.
गेल्यावर्षी त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधे सोनेरी यश मिळवलं पण त्याचबरोबर थॉमस कप स्पर्धेत ऐतिहासिक विजेतेपद मिळविणार्या भारतीय टीमच्या यशातही सिंहाचा वाटा उचलला. चिराग आणि सात्विक हे दोघेही आक्रमक स्मॅशिंग करण्याबाबत ख्यातनाम आहेत.
सुरवातीला हे दोन्ही खेळाडू बेसलाईनच्या जवळून परतीचे फटके मारण्यावर भर देत असत. दुहेरीमधे सर्वोत्तम यश मिळवायचं असेल तर जोडी पैकी एका खेळाडूने नेटजवळून प्लेसिंग आणि ड्रॉपशॉट्स करणे अपेक्षित असतं तर दुसर्याने बेसलाईनजवळील बाजू सांभाळायची असते. कीमहर यांनी या दोन्ही खेळाडूंकडून दुहेरीसाठी आवश्यक असणारं सर्व तंत्र विकसित करून घेतलं.
आपल्याला जर एकत्र खेळायचं असेल तर एकमेकांची भाषा, स्वभाव आणि देहबोली जाणून घेणं आवश्यक आहे हे ओळखूनच चिराग आणि सात्विक यांनी परगावी असताना हॉटेलमधल्या एकाच खोलीत राहण्यास प्राधान्य दिलं. तसंच त्यांनी एकमेकांच्या भाषांमधील सिनेमाही पाहिला आणि गाण्यांचाही आस्वाद घेतला.
त्यामुळे अल्पावधीतच या दोन्ही खेळाडूंनी एकमेकांच्या भाषा आत्मसात केल्या. एकमेकांच्या सवयी आणि स्वभावही त्यांनी जाणून घेतले. त्याचा फायदा त्यांना दुहेरीच्या सामन्यांच्या वेळी होऊ लागला. एकमेकांचे गुणदोष ओळखून त्यावर मात कशी करता येईल याचाही अभ्यास या दोन्ही खेळाडूंनी केला.
दुहेरीच्या सामन्यांसाठी असा गृहपाठ नेहमीच आवश्यक असतो. हे दोन्ही खेळाडू अतिशय जिगरबाज खेळाडू आहेत. सामन्यामधे पिछाडीवर असतानाही मनावर कोणतेही दडपण न घेता आणि आपला संयम ढळू न देता शांतचित्ताने पुन्हा खेळावर पकड मिळवण्यासाठी ते नेहमीच प्राधान्य देत असतात याचा प्रत्यय अनेक वेळेला आलाय.
या खेळामधे करिअर करता येतं हे ऑल इंग्लंड स्पर्धामधे एकेरीचं विजेतेपद जिंकणारे प्रकाश पदुकोण आणि गोपीचंद यांच्याबरोबरच साईना नेहवाल हिने मिळवलेल्या ऑलिंपिक ब्राँझ मेडलमुळे सिद्ध झालं. बॅडमिंटन मधील साईना युगाबरोबरच पी वी सिंधू हिने ऑलिंपिकमधेच सिल्वर मेडल आणि ब्राँझ मेडल अशी दोन मेडल जिंकतानाच बॅडमिंटनद्वारे अर्थार्जनाची हमी मिळवता येते हेही दाखवून दिलंय.
एकेरी बरोबरच दुहेरीच्या सामन्यांना महत्त्वाचं स्थान आहे यावर चिराग आणि सात्विक यांनी शिक्कामोर्तबच केलंय. ज्याप्रमाणे विजय आणि आनंद अमृतराज बंधू, लिएंडर पेस आणि महेश भूपती यांनी डेव्हीस कप टेनिस स्पर्धेत दुहेरीचा सामना निर्णायक ठरू शकतो हे दाखवून दिलं त्याप्रमाणेच अलीकडे बॅडमिंटनच्या सांघिक स्पर्धांमधेही दुहेरीच्या सामन्यांना अतिशय महत्त्वाचं स्थान लाभलंय.
अश्विनी पोनप्पा आणि ज्वाला गट्टा यांनी बॅडमिंटनच्या जागतिक स्पर्धेत ब्राँझ मेडल मिळवताना ऐतिहासिक कामगिरी केली. या जोडीने जागतिक स्तरावरील इतर स्पर्धांमधेही आपला ठसा उमटविला. ज्वाला हिने निवृत्ती स्वीकारून प्रशिक्षकाची भूमिका पत्करलीय. अश्विनी मात्र अजूनही अनेक युवा खेळाडूंबरोबर दुहेरीचे सामने गाजवत असते. पुण्याच्या अर्चना देवधर आणि मंजुषा पवनगडकर या जोडीनेही एकेरीबरोबरच दुहेरीच्या सामन्यांमधेही सातत्यपूर्ण कामगिरी केली होती.
सुदीरमन कप, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आशियाई क्रीडा स्पर्धा इत्यादी अनेक महत्त्वाच्या स्पर्धा यंदा आयोजित केल्या जातील. पुढील वर्षी आयोजित केल्या जाणार्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांसाठी अनेक परदेशी खेळाडूंनी यापूर्वीच तयारी सुरु केलीय. चिराग आणि सात्विक या जोडीकडून या सर्व स्पर्धांमधे अव्वल कामगिरीची अपेक्षा केली जातेय.
इतर भारतीय खेळाडूंनीही आत्तापासूनच त्यासाठी पायाभरणी केली पाहिजे. जिल्हास्तरावरील स्पर्धांपासूनच एकेरी बरोबरच दुहेरी सामन्यांमधे कसे यश मिळवता येईल याचा विचार खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांनीही केला पाहिजे. पूर्वीच्या तुलनेत हल्लीच्या खेळाडूंना स्थानिक स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत भरपूर स्पर्धा खेळण्याची संधी मिळू लागलीय.
चिराग आणि सात्विक हे वेगवेगळ्या राज्यातील खेळाडू एकत्र येऊ शकतात तर अर्चना आणि मंजुषा यांचा वारसा आपल्याला कसा पुढे नेता येईल याचा विचार महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी केला पाहिजे. एकेरीच्या सर्वोच्च यशाकरता नियोजनबद्ध सराव जसा आवश्यक असतो तसाच सराव दुहेरीच्या सामन्यांकरताही असतो हे बॅडमिंटन प्रशिक्षकांनी आणि संघटकांनी जाणून घेऊन त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.