पुण्यातले चितळे तुर्कस्थानचा ‘बकलावा’ बनवतात तेव्हा...

०५ मार्च २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज चिकन टिक्का ही इंग्लंडची ‘नॅशनल डिश’ म्हणून ओळखली जाते. तर मध्यपूर्वेतला मांस भरलेला सम्बुसा आणि पोर्तुगिजांचा बटाटा एकत्र होऊन, भारताचा फेवरीट समोसा बनतो. जगभर हे कायमच होत आलंय. हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच की, तुर्कस्थानची किंवा मध्यपूर्वेची सिग्नेचर स्वीट डिश असलेली ‘बकलावा’ ही मिठाई, चक्क पुण्यातल्या चितळे बंधूंनी बाजारात आणलीय.

खाद्यपदार्थांचा इतिहास हा भन्नाट विस्मयकारक असतो. कारण एखाद्या पदार्थाची मुळे कुठं सापडतील याचा थांगपत्ता लागत नाही. तसंच इतिहासाच्या पुस्तकात खोलखोल गेलो तर वादाला तोंड फुटतं. बरं एखादा पदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोचतो खरा, पण त्याच्या सामग्रीपासून दिसण्यापर्यंत अनेक गोष्टी बदललेल्याही असतात.

मुद्दा इतकाच की, जीभेतून पोटाकडं जाणारा रस्ता हा धर्म, भाषा, देश ओलांडून जात असतो. ‘बकलावा’ ही मध्य आशियातली मिठाई आज अशीच जगभर पसरतेय. भारतात काही निवडक दुकानांमधे मिळणारी ही मिठाई ‘हल्दीराम’ने काही काळापूर्वी बॉक्सपॅक करून बाजारात आणली.

आता तर चक्क पुण्यातल्या चितळे बंधूंनी तुर्कस्थानचं हे फेमस डेझर्ट महाराष्ट्रातल्या घराघरात न्यायचं ठरवलंय. व्यापाराच्या गणितानं सांस्कृतिक देवाणघेवाण होते आणि जग जवळ येतं ते असं!

काय आहे ‘बकलावा’चा इतिहास

मध्य आशियातल्या चौदाव्या शतकात ऑटोमन साम्राज्यापर्यंत बकलावाची मुळे सापडतात. मुळात हा तुर्की टोळ्यांच्या जेवणातला एक पदार्थ ऑटोमन साम्राज्याचा रॉयल पदार्थ बनला. खरं तर आज बकलावा म्हटलं की मध्य आशिया, मध्यपूर्व, बाल्कन राष्ट्रेही त्यावर आपला दावा सांगतात. अगदी ग्रीक, बल्गेरियन, आर्मेनियन, यहुदी आणि अरबही बकलावा हा त्यांचा गोड पदार्थ आहे, असं अभिमानानं सांगतात.

पण आज तुर्कस्थानचा बकलावा ही लोकमान्य संकल्पना आहे. अगदी युरोपियन युनियन कमिशनने ८ ऑगस्ट २०१३मधे केलेल्या नोंदणीनुसारही बकलावा हे तुर्की मिष्टान्न आहे. त्यामुळे आपल्याकडं रसगुल्ल्यावरून जसं ओरिसा आणि पश्चिम बंगाल भांडत असतात, तसंच बकलावावरूनही वाद आहेत. पण जगभर आजही बकलावा म्हटलं की तुर्की मिठाई ही ओळख, लोकप्रिय आहे.

मुळात ही राजेशाही मिठाई आहे, ऑटोमन साम्राज्याच्या शिष्टाचाराचा ती भाग होती, असेही संदर्भ सापडतात. बकलावा हा शब्द जुन्या तुर्की भाषेतून आलाय, असं सांगितलं जातं. मंगोलियन शब्द ‘बकला’ला तुर्की क्रियापद प्रत्यय ‘वा’ जोडून बकलावा हे नाव आलं असावं, ज्याचा अर्थ बांधणं, गुंडाळणं असा होतो.

तथापि, मंगोलियनमधे बकला हे क्रियापदही जुन्या तुर्कीचं अवतरण आहे, असं मानलं जातं. आता ही उत्पती किती खरी किती खोटी हे सांगता येत नसलं, तरी बकलावा हा जवळपास गेली साडेसहाशे वर्ष मध्य आशिया गाजवतोय एवढं मात्र नक्की.

हेही वाचा: आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?

कसा बनतो बकलावा

बकलावा या मिठाईबद्दल एवढं कौतुक आहे की, प्रत्येक ठिकाणी तो बनविताना अनेक प्रयोग केलेत. त्याची श्रीमंती वाढवण्यासाठी अनेकांनी त्यातले घटकही बदललेत. पण मुळात बकलावा हा मैद्याच्या खुसखुशीत पदरांमधे मधाचं अस्तर पेरून त्यात पिस्ता, अक्रोडसारख्या सुकामेव्याची खैरात असलेला पदार्थ आहे.

त्याच्या पट्ट्या, ज्याला आजच्या पाकक्रियेच्या भाषेत फिलो शिट्स म्हणतात त्या अत्यंत पातळ, नाजूक असतात. अगदी कागदासारखे असलेले हे पदर तोंडात विरघळायला हवेत, म्हणजे बकलावा जमलाय, असं मानलं जातं. हे कागदासारखे मैद्याचे पदर बटर लावून एकावर एक रचले जातात. त्यात सुक्या मेव्याची विविध राजस सुगंध घालून केलेलं सारण त्यात पेरलं जातं.

त्यावर पुन्हा पदर, पुन्हा सुकामेवा, पुन्हा पदर असे थर रचले जातात. हे थर लावलेला ट्रे मग भट्टीत सोनेरी रंग येईपर्यंत भाजला जातो. या बेकिंगसाठी बराच वेळ जातो. भाजलेले थर नंतर चौकोनी आकारात कापले जातात. काही ठिकाणी ते रोलसारखेही केले जातात.

त्यानंतर मध, पाणी, लिंबाचा रस आणि सुगंधित द्रव्ये यांचा पाक केला जातो. तो पाक या भाजलेल्या तुकड्यांमधे हळूहळू जिरवला जातो. त्यावर वर्ख वगैरे लावण्याचे सोपस्कार पूर्ण होऊन ही राजेशाही मिठाई सज्ज होते. साधारणतः अशी रेसिपी आढळत असली तरी त्यात अनेक ठिकाणी बदल झालेलाही दिसतो.

जनतेचा बकलावा राजवाड्यात

खरं तर तुर्की टोळ्यांचा हा पदार्थ नटून थटून राजवाड्यात गेला आणि नंतर पुन्हा त्याला राजमान्यता मिळून जगभर पोहचला. ऑटोमन राज्यात अत्यंत कुशल आाचाऱ्यालाच बकलावा बनवण्याचं काम दिलं जायचं. बुरहान ओगुझ यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात एका मेजवानीसाठी शंभर पातळ थर असलेला  बकलावा बनवल्याची नोंद आहे. 

बरं अशा शंभर थरांचा बकलावा केल्यानंतर तो उत्तम झालाय का, त्याची कसोटीही भारी होती. तो बकलावा ट्रेमधून राजासमोर आणला जायचा. राजा हातातली सोन्याची वस्तू त्या ट्रेवर टाकायचा. जर ती वस्तू थेट खाली ट्रेच्या तळापर्यंत गेली तर ते सोनं हे त्या आचाऱ्याचं बक्षीस. नाहीतर तो बकलावा पुन्हा स्वयंपाकघरात पाठवला जायचा.

अनेकदा असा बकलावा बनवण्याच्या स्पर्धा लावल्या जायच्या. तसंच कोणी पाहुणा आला तर त्याच्या सन्मानार्थ हे बकलावा बनवण्याच्या कौशल्याचं प्रदर्शन करणारे विशेष कार्यक्रम आयोजित केले जायचे. त्यामुळे तुर्की खाद्यसंस्कृतीमधे बकलावा बनवणं हे पाककौशल्याचं प्रमाण म्हणून ओळखलं जायचं. आजही त्याचं महत्त्व कमी झालेलं नाही.

हेही वाचा: मॅकडोनल्ड खाऊच्या ठेल्यापासून फास्टफूड इंडस्ट्रीचा बादशाह कसा बनला?

कतरिनाच्या लग्नातही बकलावाची चर्चा

शाही मिठाई असलेल्या बकलावाची चर्चा कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नातही झाली होती. त्यावेळी राजस्थानमधल्या जनता जोधपूर स्वीट होमने बकलावा बनविला होता. त्यासाठी सवाई माधवपूरला मिळणारं मधू घी हे तूप वापरलं होतं. तसंच तो शुगर फ्री होता. त्यात मधाचा वापर केला होता. त्यात बदाम, काजू, पिस्ता हा सुकामेवा भाजून वेलची पावडरचा वापर केला होता.

अत्यंत कौशल्यानं आणि निगुतीनं बनवलेला हा बकलावा अनेक पदरांचा, तोंडात घातल्याबरोबर विरघळणारा शाही चवीचा होता. कतरिना-विकी यांच्या लग्नातला बकलावा करताना त्यांनी त्यांच्या रेसिपीमधे बदल केले होते. साधारणतः सध्या साखरेचा वापर केला जातो. पण कतरिनाला शुगरलेस बकलावा हवा होता. त्यामुळे त्यांनी साखर वापरली नव्हती. त्यात फक्त शुध्द मधाचा उपयोग केला होता. तसंच कॅलरी वाचवण्यासाठी बटरऐवजी खास तुपाचा वापर केलेला होता.

तर, असा हा बकलावा भारतातही काही निवडक हलवाईच बनवत होते. मुंबईतल्या भेंडी बाजारच्या इराणी स्वीट शॉपमधे नवरोजच्या काळात बकलावा विकला जायचा. आज तो अनेक मिठाईच्या दुकानात मिळत असला तरी काही दुकानं ही आजही त्यांच्या खास बकलावासाठी ओळखली जातात. कोलकातामधलं कांकुरगाचीचं ‘बकलावा बॉक्स’ नावाचं एक अख्खं दुकानच या बकलावासाठी समर्पित केलंय.

आहारासोबत विचारांचंही आदानप्रदान

जगभर पसरलेल्या खाद्यसंस्कृतीत अशी ही इकडली तिकडली मिसळ ही कायमच होत आलीय. ती खुल्या दिलानं स्वीकारण्यातच खरी गंमत आहे. आज बटाटा, टॉमेटो, मिरची, पनीर अशा अनेक घटकांसह जिलेबी, समोसा, बिर्याणीपर्यंतचे अनेक पदार्थ इकडून तिकडं आणि तिकडून इकडं आलेत. ही देवाणघेवाण समृद्ध करणारी आहे. फक्त जीभेचीच नाही, तर मेंदूचीही दारं उघडणारी आहे.

चितळेंनी, हल्दीरामनं बकलावा ही मिठाई करणं, हे यासाठी महत्त्वाचं आहे. हा केवळ खाद्यपदार्थांचा स्वीकार नाही, तर जगभर पसरलेल्या मानवी मुल्यांचा स्वीकार आहे. आज धर्म, पंथ, वर्ण, देश या सीमांवरून वादावादी सुरू असताना, पोटाला लागलेली भूक ही सर्वांचीच सारखी असते, याचं भान आपण विसरत चाललोय.

खाद्यसंस्कृतीतली ही मिसळ समजून घेणं, तिच्या इतिहासातल्या स्थानाविषयी समजून घेणं ही एक समृद्ध करणारी प्रक्रिया आहे. फक्त आपलं तेवढंच ग्रेट असं म्हणण्याची गरज नाही. त्यावरून रसगुल्ल्यासारखं वाद घालणंही गरजेचं नाही. जे आहे ते सर्वांचं आहे, असं म्हणून हवाहवासा ‘बकलावा’ आपला म्हटला की, थोड्या दिवसांनी तो जिलेबीसारखा भारतीयही होऊन जाईल.

हेही वाचा: 

दोनवेळा जेवायचं की दोन तासांनी?

वर्ल्ड व्हिस्की डेः बसण्याआधी हे वाचायलाच हवं

आयोडीनयुक्त मिठामुळे आपण आजारी पडतोय का?

श्रीखंड पुरी खाताय, पण तुम्हाला त्याविषयी काय माहितीय?