चियान विक्रमला नावाने ओळखणारे प्रेक्षक तसे कमीच. पण ‘आंबी-रेमो-अपरिचित’ म्हणलं की डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. यापलीकडे विक्रमची खरी ओळख म्हणजे त्याचा अभिनय. प्रयोगशाळेतल्या उंदरावर केले जातात तसे एकेका भूमिकेसाठी स्वतःवर असंख्य प्रयोग करण्याची जोखीम उचलत त्याने जगभरातल्या मोजक्या मेथड अभिनेत्यांच्या पंगतीत त्याला मानाचं पान मिळवलंय. आज त्याचा वाढदिवस आहे.
१७ एप्रिल १९६६ रोजी जन्मलेल्या विक्रमचं खरं नाव केनडी जॉन विक्टर. बाप जॉन विक्टरसुद्धा अभिनेता होता पण त्याला सहाय्यक पात्रांच्या भूमिकांशिवाय इतर संधी मिळत नव्हत्या पण पोराला मात्र मोठा सिनेस्टारच बनवायचा हे त्याने मनोमन ठरवलं होतं. त्याची आई आणि दिग्दर्शक त्यागराजनची बहिण, राजेश्वरी सब-कलेक्टरच्या हुद्द्यावर होती.
आईबापाने लाडाने ठेवलेलं केनडी हे नाव कधी विक्रमला रुचलंच नाही. त्याने बापाच्या नावातून ‘वि’, केनेडीचा ‘क’, आईचा ‘र’ घेतला आणि त्याच्या मेष राशीचा ‘रॅम’ म्हणजेच मेंढा घेऊन ‘विक्रम’ असं आपलं नाव बनवलं. शाळकरी वयात घोडेस्वारी, कराटे आणि पोहायचा भरपूर सराव केलेल्या विक्रममधे आत्मविश्वास ठासून भरला होता.
आपल्या बापाकडे पाहून विक्रमनेही सिनेसृष्टीत कारकीर्द करायचा चंग बांधला होता. बापासारखं मागं राहू नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्यकलांचं प्रशिक्षणही त्याने घेतलं होतं. त्याचबरोबर शाळा-कॉलेजमधे नाटकांच्या क्लबमधे त्याचा वावरही होताच. पहिली काही वर्षं विक्रमने कॉलेजतर्फे नाट्यस्पर्धा गाजवल्या. मद्रास आयआयटीतल्या एका इवेंटमधे त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता.
हा पुरस्कार घरी घेऊन येत असतानाच त्याच्या बाईकचा अपघात झाला. या अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीतून सावरेपर्यंत पुढची सलग ३ वर्षं तो हॉस्पिटलमधेच पडून राहिला. जवळपास तेवीसेक शस्त्रक्रिया झाल्यावर त्याचा पाय बरा झाला पण त्यानंतरही काही काळ त्याला कुबड्यांचा आधार घ्यावा लागला होता.
हेही वाचाः शाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला
अपघातातून सावरत असताना विक्रमने जाहिरातींमधे, छोट्या टीवी मालिकांमधे पडेल ते काम केलं. लॉयला कॉलेजला एमबीएच्या शेवटच्या वर्षाला असतानाच सुप्रसिद्ध दिग्दर्शक सी. वी. श्रीधर यांची नजर त्याच्यावर पडली. त्यांनी विक्रमला त्यांच्या एका सिनेमात प्रमुख भूमिकाही देऊ केली. पण विक्रमचं पदार्पण झालं ते मात्र ‘एन कादल कन्मनी’ या टी. जे. जॉय दिग्दर्शित सिनेमातून.
त्यानंतर तो श्रीधर यांच्या ‘दंदुविट्टेन एन्नाई’मधे झळकला. पाठोपाठ प्रख्यात सिनेमेटोग्राफर पी. सी. श्रीराम यांचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या ‘मीरा’मधेही विक्रमला मध्यवर्ती भूमिका साकारायची संधी मिळाली. पण त्याच्या या पहिल्या तिन्ही सिनेमांना तिकीटबारीवर यश आलं नाही. पण विक्रमच्या अभिनयाने मात्र भल्याभल्यांना प्रभावित केलं होतं. त्यातलंच एक नाव म्हणजे दिग्दर्शक मणिरत्नम.
मणिरत्नमचा ‘रोजा’ बराच गाजला होता. त्याने आपल्या आगामी ‘बॉम्बे’साठी विक्रम आणि मनिषा कोईरालाचं एक तात्पुरतं फोटोशूटही करून घेतलं. विक्रम त्यावेळी विक्रमन या नवख्या दिग्दर्शकाच्या ‘पुदिय मन्नर्गळ’मधे प्रमुख भूमिका साकारत होता. या सिनेमासाठी विक्रमने आपले केस वाढवले होते आणि दाढीही ठेवली होती.
पण ‘बॉम्बे’साठी विक्रमने दाढी काढावी असं मणिरत्नमचं मत होतं. इकडे विक्रमनला दिलेल्या शब्दानुसार विक्रमला दाढी ठेवणं गरजेचं होतं. मग काय, प्राण जाये पर वचन न जाये! विक्रमने हा रोल नाकारला. ए. आर. रेहमानचं जादुई संगीत असूनही ‘पुदिय मन्नर्गळ’ फ्लॉप ठरला तर ‘बॉम्बे’ने मात्र यशाचे वेगळे मापदंड प्रस्थापित केले.
त्यानंतर विक्रम बारीकसारीक सहायक भूमिका करत राहिला पण सिनेसृष्टीत ज्याला यश समजलं जातं त्यापासून मात्र वंचितच राहिला. तमिळ आणि तेलुगू, दोन्हीकडे अपयश मिळाल्यावर त्याने निदान कमाई व्हावी म्हणून मल्याळम सिनेसृष्टीत नशीब आजमावलं. हा संघर्ष करत असतानाच विक्रम डबिंगची कामंही करू लागला. प्रभुदेवा, अजितकुमारसाठीही त्यानं डबिंग केलं.
त्याने कधीही डबिंगला हलक्या दर्जाचं काम मानलं नाही. डबिंग तर डबिंग, पण आता सहायक भूमिका साकारायच्या नाहीत असं त्याने मनोमन ठरवलं होतं. त्याचं एक नक्की ठरलं होतं कि आता भलेही एंट्री लेट झाली तरी चालेल, पण ती लीड हिरोसारखी ग्रेटच असायला हवी. तो टीवी मालिका, सिनेमाचे वेगवेगळे इवेंट, सगळं सगळं नाकारत गेला. शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आलं.
हेही वाचाः बूक माय शो: ऑनलाईन तिकीट बुकिंगमधला असली किंग
१९९७मधे दिग्दर्शक बालाने त्याला ‘सेतू’मधे प्रमुख भूमिका देऊ केली. विक्रमने ती स्वीकारली आणि त्यासाठी पूर्ण टक्कल करून, नखं वाढवून तब्बल २१ किलो वजनही कमी केलं. पण अचानक तो सिनेमाही आर्थिक विवंचनेत आला. ‘सेतू’चा लूक कायम ठेवण्यासाठी विक्रमने बऱ्याच चांगल्या संधी नाकारल्या होत्या. सिनेमा शेवटी रिलीज झालाच नाही आणि विक्रम अजूनच खचला.
आधीच मणिरत्नमच्या ‘बॉम्बे’ला नकार देऊन त्याने पश्चात्तापाचे चटके सहन केले होते. बालाचा तर हा पहिलाच सिनेमा होता. पुन्हा एकदा नवख्या दिग्दर्शकावर विक्रमने विश्वास टाकला होता. ‘सेतू’चं चित्रीकरण रखडलेला काळ आपल्या करियरचा सर्वात वाईट काळ होता असं विक्रम आजही म्हणतो. त्याने शेवटी एका मालिकेसाठी दिग्दर्शन करायचं ठरवलं.
१९९९मधे ‘सेतू’ एका कुठल्यातरी छोट्या थियेटरमधे रिलीज झाला आणि पुढले काही दिवस फक्त दुपारच्या एकाच शोवर चालू होता. पण माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर नंतर ‘सेतू’ने बराच गल्ला खेचला. तब्बल १०० दिवस हा सिनेमा चेन्नईमधल्या विविध थियेटरमधे प्रचंड गर्दी खेचत होता. तमिळ सिनेसृष्टीतली मरगळ झटकणारा सिनेमा म्हणून ‘सेतू’कडे पाहिलं जातं. ‘सेतू’ने विक्रमला स्टार बनवलं.
‘सेतू’मधे पूर्वार्धात एका डॅशिंग युवकाची तर उत्तरार्धात मानसिक संतुलन गमावलेल्या रुग्णाची भूमिका विक्रमने साकारली होती. ज्या सिनेमामुळे विक्रम हलाखीच्या परिस्थितीत अडकला होता, त्याच सिनेमाचे विक्रम आजही पदोपदी आभार मानतो आणि त्या सिनेमाने बहाल केलेलं ‘चियान’ हे नाव स्वतःच्या नावाआधी जोडतो. ‘सेतू’च्या हिंदी रिमेकमधे सलमान खान प्रमुख भूमिकेत होता आणि त्या सुपरहिट सिनेमाचं नाव होतं - ‘तेरे नाम’.
विक्रमने आपल्या अभिनयकौशल्याच्या जोरावर ‘सेतू’, ‘पितामगन’, ‘अन्नियन’ आणि ‘दैवतिरुमगल’मधल्या मानसिक रुग्णांच्या भूमिकांना वेगळी उंची दिली. त्यासाठी त्याने स्वतःवर वेगवेगळे प्रयोग केले. भूमिकेला वाहून घेणं म्हणजे नक्की काय याचा प्रत्यय विक्रमने साकारलेल्या या पात्रांकडे बघून येतो. ‘तेरे नाम’ येण्याआधी आणि नंतरही सलमानच्या इतर सिनेमांमधल्या ‘प्रेम’ या पात्राचं जितकं कौतुक झालं होतं, त्याहून कैकपट प्रसिद्धी ‘तेरे नाम’च्या एकट्या ‘राधे’ने कमावली, यातच सगळं आलं.
त्यानंतर सलमानने बाला दिग्दर्शित ‘पितामगन’मधल्या विक्रमच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्याच्याही हिंदी रिमेकमधे काम करायचं ठरवलं होतं, पण तो सिनेमा कधी बनलाच नाही. ‘पितामगन’मधे विक्रमने स्मशानातल्या सिद्दन या अनाथ चांडाळाची भूमिका साकारली होती. अंत्यसंस्कारांपुरताच मानवी संबंध लाभलेला सिद्दन एका जनावरासारखा मानवी भाषेपासून, भावभावनांपासून अलिप्त असतो. केवळ देहबोलीच्या जोरावर विक्रमने या भूमिकेला अजरामर केलं.
‘दैवतिरुमगल’मधे विक्रमने कृष्णा हा बौद्धिक अपंगत्व आलेला बाप साकारला होता. आपल्या दिवंगत बायकोनंतर आपल्या लहान मुलीची काळजी घेणारा कृष्णा डोक्याने मात्र लहानच होता. विक्रमच्या मते, ‘दैवतिरुमगल’मधली कृष्णा ही त्याच्या कारकिर्दीतली सर्वोत्तम भूमिका आहे. ‘अन्नियन’च्या ‘अपरिचीतुडु’ या तेलुगू डब आणि ‘अपरिचित’ या हिंदी डब सिनेमांनी विक्रमला केरळ, आंध्रप्रदेश आणि इतरत्र मोठ्ठा फॅनबेस मिळवून दिला.
‘अन्नियन’मधे विक्रमने साधाभोळा आंबी, रोडरोमियो रेमो आणि खुनशी अपरिचित ही भूत-भविष्य-वर्तमानाशी सांगड घालणारी तिहेरी भूमिका साकारलीय. आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी विक्रमला ‘सेतू’, ‘पितामगन’साठी राष्ट्रीय पुरस्कार तर ‘अन्नियन’, ‘दैवतिरुमगल’साठी फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरवलं गेलं. मानसिक संतुलन गमावलेली ही पात्रं साकारताना विक्रमने कुठेही एकसुरीपणा येणार नाही, ही त्याची खासियत आहे.
हेही वाचाः ट्रोलबडव्यांनो, कलावंतांना तरी सोडा
एखाद्या भूमिकेसाठी विक्रम स्वतःला पूर्णपणे समर्पित करतो. मणिरत्नमचाच ‘रावणन’ हा तमिळ आणि ‘रावण’ हा हिंदी सिनेमा याचं उत्तम उदाहरण आहे. दोन्ही सिनेमांचं शुटींग एकाचवेळी करण्यात आलं होतं. ‘रावणन’मधे विक्रम वीरैय्याच्या भूमिकेत आहे तर ‘रावण’मधे इन्स्पेक्टर वीरप्रताप शर्माच्या. दोन्ही टोकाच्या भूमिका त्याने वेगवेगळ्या देहबोलीच्या जोरावर अगदी लीलया पेलल्या.
‘आय’मधे विक्रमच्या राक्षस, सुपरमॉडेल बॉडीबिल्डर आणि पाठीला कुबड असलेला जख्खड म्हतारा अशा तीन भूमिका होत्या. विक्रमने या तिन्ही भूमिकांसाठी घेतलेली मेहनत दिसून येते. त्याचा कुबडा कूनन प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरला. कूनन साकारण्यासाठी विक्रमने स्वतःचं तब्बल पन्नास किलो वजन घटवलं होतं. बॉडीबिल्डरच्या भुमिकेसाठी आर्नॉल्डसारखी केशभूषा करणाऱ्या विक्रमने कुननचा प्रोस्थेटिक मेकप करण्यासाठी टक्कलही केलं.
‘काशी’ सिनेमात विक्रमने आंधळ्या लोकगायकाची भूमिका साकारली. आपल्या शरीराचा रंग रापलेला दिसावा यासाठी भर उन्हात विक्रम तासन्तास बसून राहिला. इतकंच नाही, तर सिनेमातलं आंधळेपण खरं वाटावं यासाठी बुब्बुळं वरच्या पापण्यांच्या आड लपवून तो दिवसभर सेटवर वावरायचा. दृष्टीदोष होऊ नये म्हणून शुटींग संपल्यावर डोळ्यांचे व्यायाम करायचा पण शेवटी त्याला चष्मा लागायचा तो लागलाच.
स्वतःला जखमा करून घेणं, वजन कमी करणं, पुन्हा ते झपाट्याने वाढवणं, आपल्या पीळदार शरीरयष्टीचा हवा तसा फायदा करून घेणं, केशभूषेपासून रंगभूषेपर्यंत निरनिराळे प्रयोग करणं हा अभिनयाच्या प्रयोगशाळेतला सगळा वेडेपणा चियानने केला. कधी भूमिकेची गरज म्हणून तर कधी हौस म्हणून. पण स्वतःवर केलेला एकही प्रयोग या उंदराने फसू दिला नाही. म्हणूनच जगभरातल्या सर्वोत्तम मेथड ऍक्टरच्या यादीत विक्रमचं नावही घ्यावंच लागतं.
विक्रमच्या काही सिनेमांना तिकीटबारीवर चांगला प्रतिसाद मिळाला, तर काहींना एकदोन आठवड्यांतच गाशा गुंडाळावा लागला. कुठलाही प्रसिद्ध अभिनेता करणार नाही, अशा भूमिका विक्रमने अगदी सहज साकारल्या आहेत. तो जितका रावडी बेदरकार ‘जेमिनी’, ‘समुराई’, ‘तूळ’, ‘भीमा’, ‘स्केच’, ‘पत्तं एन्रादुकुला’सारख्या सिनेमांमधे वाटतो, तितकीच त्याची हळवी बाजू ‘किंग’, ‘काशी’, ‘दैवतिरुमगल’, ‘पितामगन’मधेही दिसते.
‘रावणन’मधे तो रावणाशी साधर्म्य असलेला वीरैय्या असतो, तर ‘रावण’मधे तो रामाचं रूपक असलेला वीरप्रताप शर्मा असतो. ‘कांतास्वामी’ या सिनेमातून त्याने तमिळ सिनेसृष्टीला आपला पहिलावहिला सुपरहिरो दिलाय. ‘पोन्नियीन सेल्वन’मधला त्याने साकारलेला आदित्य करीकालन हा कधी अरुलमोळी आणि कुंदवैचा जबाबदार भाऊ असतो, कधी राष्ट्रकुटांना हरवणारा शूर राजपुत्र असतो तर कधी नंदिनीचा अपयशी प्रियकर असतो.
‘महान’मधे विक्रम आणि ध्रुव ही बापलेकाची जोडी आमनेसामने झळकली. कथेच्या दृष्टीने यात ध्रुव नायक आणि विक्रम खलनायक होता. साठीच्या उंबरठ्यावर आलेल्या विक्रमचं ‘हिरो’पण पंचविशीतल्या लेकासमोरही तितकंच दिमाखात उभं असलेलं या सिनेमात दिसतं. ‘सामी’तला विक्रमचा पोलीस ऑफिसर जितका रुबाबदार, तितकेच बेरकी खलनायक त्याने ‘इरुमुगन’, ‘कोब्रा’ आणि ‘कडारम कुंडान’मधे साकारलेत.
तब्बल सात फिल्मफेअर पुरस्कारांचा मानकरी असलेला विक्रम तमिळ सिनेमा इंडस्ट्रीतल्या सर्वाधिक सिनेपुरस्कार मिळवलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याला कुठल्याही भूमिकेचं वावगं नाही. ‘पोन्नियीन सेल्वन’च्या यावर्षी रिलीज होणाऱ्या दुसऱ्या भागात तो चोळ राजपुत्र साकारतोय तर आगामी ‘तंगलान’मधे तो अठराव्या शतकातल्या एका खाणकाम मजुराच्या भूमिकेत दिसणार आहे. या वेगवेगळ्या भूमिकांची गर्दी पाहता, विक्रमसाठी वय हा फक्त एक आकडा आहे, हेच पुन्हापुन्हा अधोरेखित होत राहतं.
हेही वाचाः
रजनीकांतचं पॉलिटिक्स सिनेमातून बोलतंय
सेन्सॉर नावाचं मांजर आपल्या आडवं का येतं?