क्रिकेटची पिढी घडवणाऱ्या आचरेकर स्कूलची स्टोरी

०३ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


हाफ शर्ट आणि देवानंदच्या ‘ज्वेल थीप’ सिनेमातली मार्का टोपी घालत क्रिकेटच्या मैदानावर वावरणारे आचरेकर सर काल गेले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचे कोच म्हणून सर आपल्याला ओळखीचे आहेत. त्यांनी क्रिकेटची एक पिढीही घडवली. फर्स्ट क्लास क्रिकेटमधे एकच मॅच खेळलेल्या सरांनी दर्जेदार खेळाडू घडवण्यात आपली हयात घालवली.

इंग्लंडमधे १९९९ सालचं वर्ल्डकप झालं. त्यात २३ मेला ब्रिस्टॉलच्या ग्राऊंडवर केनियाविरुद्धची मॅच भारताने जिंकली. पण लक्षात राहिली, सचिन तेंडूलकरने झळकावलेली सेंच्यूरी. ही सेंच्युरी भारतीय क्रिकेट रसिक कधीच विसरणार नाहीत. कारण या शतकाला एक भावनिकतेची किनार होती. आपले वडील गमावल्यानंतर अवघ्या चारच दिवसांनी अडचणीत सापडलेल्या भारतीय टीमच्या मदतीसाठी सचिन धावून आला होता.

सचिनचा ती खेळी अविस्मरणीय

एवढ्या भावनिक कल्लोळाच्या मनस्थितीत अडकलेलं असतानाही सचिन मदतीला धावून आला. आणि नॉट आउट १४० रन्सच्या इनिंगने वर्ल्डकपमधे भारताच्या विजयाची गाडी रुळावर आणली. क्रिकेटप्रती असलेल्या सचिनच्या या अत्युच्च टोकाच्या निष्ठेचं आणि समर्पित भावनेचं दर्शन देशासह जागतिक क्रिकेटलाही याचवेळी पहिल्यांदा झालं. सचिन रमेश तेंडूलकर या महान खेळाडूची ‘क्रिकेटचा देव’ बनण्याच्या प्रवासाची सुरवात देखील या प्रसंगापासुनचीच.

या प्रसंगाची आज आठवण काढण्याचं औचित्य म्हणजे क्रिकेटला सचिन तेंडूलकर नावाचं रत्न देणाऱ्या रमाकांत आचरेकर सरांचं काल वयाच्या ८७ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने झालेलं निधन. सचिनकडे आलेली क्रिकेटबद्दलची ही समर्पण वृत्ती त्याला आचरेकर सरांकडूनच मिळालेली देणगी होती. स्वतः सचिन तेंडूलकरनेच हा किस्सा सांगितला होता. कुणाल पुरंदरे लिखित मास्टर ब्लास्टर्स मास्टर या रमाकांत आचरेकर सरांवरील पुस्तकाविषयी बोलताना सचिनने आचरेकर सरांच्या क्रिकेटप्रती असलेल्या निष्ठेबद्दल सांगितलं. 

तो आचरेकर सरांचाच वारसा

सचिन म्हणतो, की सरांची क्रिकेटबद्दलची निष्ठा ही आम्हा विद्यार्थ्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक होती. आपल्या सिनिअर खेळाडूंकडून ऐकलेला एक किस्सा सांगताना सचिन म्हणतो, ‘मी जेव्हा आचरेकर सरांकडे प्रशिक्षणासाठी दाखलही झालो नव्हतो, त्यावेळी सरांनी आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती गमावली होती. बहुधा तो त्यांचा मुलगा असावा. सकाळी ही दुःखद घटना घडली आणि दुपारच्या वेळी सर आपल्या विद्यार्थ्यांसह ग्राऊंडवर क्रिकेटचा सराव करत होते. ही बातमी विद्यार्थ्यांना समजली. त्यानंतर काहीजण सांत्वनासाठी सरांच्या घरी पोचले. त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की सर मैदानात प्रॅक्टिस करताहेत. जा आणि प्रॅक्टिसमध्ये सहभागी व्हा.

सचिनने सांगितल्यासारखं त्याने क्रिकेटची बाराखडी आचरेकर सरांच्या शिकवणीत गिरवली. तसंच क्रिकेटबद्दलच्या समर्पणाचा हा वसादेखील त्याने बालवयात याच प्रसंगातून तर घेतला नसेल?

आचरेकर स्कूलचे दिग्गज खेळाडू

हाफ शर्ट आणि देवानंदच्या ‘ज्वेल थीप’ सिनेमातली मार्का टोपी घालणारे सर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे झालेत. तसंच आचरेकर सर म्हटलं, की आपल्या डोळ्यापुढे सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी हे दोघं येतात. पण त्यांनी टीम इंडियाला या दोघांशिवायही अनेक उत्तम क्रिकेटर दिलेत, याकडे दुर्लक्ष होतं. बऱ्याचदा याची आपल्या कल्पनाही नसते.

सरांच्या काही शिष्यांची यादीच बनवायची झाल्यास त्यात प्रवीण आमरे, अजित आगरकर, चंद्रकांत पंडित, बलविंदर सिंग संधू, लालचंद राजपूत, संजय बांगर, पारस म्हाम्ब्रे, समीर दिघे, रमेश पोवार यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या नावाचा समावेश करावा लागतो. खेळाडू म्हणून स्वतः आचरेकर सरांनी एकच मॅच तीही फर्स्ट क्लास क्रिकेटमधे खेळलीय. पण दादरच्या शिवाजी पार्कच्या मैदानात ‘कामत मेमोरिअल क्रिकेट क्लब’मध्ये भारतीय क्रिकेटची एक अख्खीच्या अख्खी पिढी घडवलीय.

वाद नको, निव्वळ खेळ हवा

खेळाचं म्हणून एक मानसशास्त्र असतं. याची आचरेकर सरांना नीट जाण होती. त्याची जाण असणारा सरांइतका महत्वाचा माणूस भारतीय क्रिकेट विश्वात अपवादानेच सापडेल. त्यामुळेच ‘आचरेकर स्कूल’चे हे सगळे खेळाडू नजरेसमोर आणल्यावर एक गोष्ट ध्यानात येते. ती म्हणजे, हे सर्वजण अगदी सभ्येतेने खेळले. आपला संपूर्ण फोकस फक्त खेळावरच राहील आणि खेळाव्यतिरिक्त इतर कुठल्याही वादामध्ये आपण अडकणार नाहीत, याची पुरेपुर काळजी घेतली.

या सगळ्यांमागे आचरेकर सर आणि त्यांची शिस्तच कारणीभूत होती. त्यांच्या कडव्या शिस्तीच्या तालमीत तयार झालेल्या बहुतेक खेळाडूंनी भारतीय क्रिकेटविश्वात आपल्या कामगिरीने आपल्या सरांचं नाव मोठं केलं. आचरेकर स्कूलमधला विनोद कांबळी वादात सापडला. पण तेही एका मर्यादेपर्यंतच.

आचरेकर सरांच्या शिष्यांनी खेळाडू म्हणून भारतीय क्रिकेट विश्वावर आपली स्वतःची वेगळी छाप सोडली. तसंच अनेकांनी क्रिकेट कोच म्हणूनदेखील तितकीच दर्जेदार कामगिरी करत आपल्या गुरूचा नावलौकिक वाढवला. लालचंद राजपूत, संजय बांगर ही काही त्याची उदाहरणं आहेत.

प्रशिक्षकांची फळी घडवली

टीम इंडियाने २००७ मध्ये टी-२०चा वर्ल्डकप जिंकला त्यावेळी टीमचे मॅनेजर होते लालचंद राजपूत. पुढे राजपूत यांच्याच कोचिंगच्या कारकिर्दीत अफगाणिस्तानच्या टीमने आपल्या खळबळजनक खेळीने जागतिक क्रिकेटला आपली दखल घ्यायला भाग पाडलं. आणि पुढे अफगाणिस्तानच्या या टीमला आयसीसीची मेंबरशीपही मिळाली. 

संजय बांगरच्या कोचिंगमधे टीम इंडियाची दमदार कामगिरी तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. इंग्लंडविरुद्धच्या सिरीजमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर ऑगस्ट २०१४ मधे संजय बांगरला टीम इंडियाचा बॅटिंग कोच म्हणून नेमण्यात आलं. आणि तेव्हापासून भारताच्या बॅटिंगमधे खूप सुधारणा झाली. टीम इंडियाच्या बॅटिंग लाईनवर त्यांचा प्रभाव बघायला मिळतो.

शिवाय चंद्रकांत पंडित आणि प्रवीण आमरे यांनीही फर्स्ट क्लास क्रिकेटमधे भारतातल्या सर्वोत्तम कोचपैकी एक म्हणून नाव कमावलंय. क्रिकेट प्रशिक्षक म्हणून ही माणसं आपल्या गुरूचा वारसा समर्थपणे पुढे चालवतायंत.

विव रिचर्डस न घडवल्याची खंत

आचरेकर सरांच्या दोन शिष्यांनी मात्र आपल्या एकूणच क्रिकेटबाह्य गोष्टींमुळे त्यांना नाराज केलं. ज्याची त्यांनाही शेवटपर्यंत खंत राहिली. त्यातला एक म्हणजे सचिनसोबतच क्रिकेटमधे आलेला आणि कदाचित सचिनच्या तोडीस तोड गुणवत्ता असणारा विनोद कांबळी. ज्याच्याविषयी आपल्यापैकी बहुतेकांना माहितेय. गुगलबाबाही त्याच्याबद्दलची खूप मसालेदार माहिती देतो.

आणि दुसरं नाव म्हणजे अनिल गुरव. कधीकाळी सचिन आणि कांबळीच्या उदयापूर्वी अनिल गुरवने मुंबई क्रिकेट गाजवलं. पण आता त्यांच्यावर मुंबईतल्या नालासोपारा भागात अतिशय गरिबीत आयुष्य घालवण्याची वेळ ओढवलीय.

अनिल गुरवबाबतीत तर असं सांगितलं जायचं, की आचरेकर सर त्याला मुंबईचा ‘विव रिचर्डस’ म्हणायचे. सचिनने ज्यावेळी नुकतंच प्रशिक्षण घ्यायला सुरवात केली होती, त्यावेळी आचरेकर सर त्याला अनिल गुरवचा खेळ बघायला सांगायचे. हा एकदिवशी टीम इंडियासाठी खेळेल, असा त्यांना विश्वास होता. परंतु अनिल गुरव आपला शार्प शुटर भाऊ अजितच्या नादाला लागला आणि क्रिकेटपासून कायमचाच दुरावला.

नंतरच्या काळातही आचरेकर सरांनी त्याला क्रिकेटमध्ये आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. प्रोत्साहन दिलं. पण त्यांचे सगळे प्रयत्न फेल गेले. आपल्याला विव रिचर्डस घडवता आला नाही, ही खंत सरांना अखेरपर्यंत राहिली.

स्लेजिंगच्या काळात आता रोज आठवणार

क्रिकेटमध्ये आजघडीला स्लेजिंगचं प्रस्थ दिवसेंदिवस वाढतंय. आणि क्रिकेट व्यतिरिक्त अन्य गोष्टींसाठी ‘ब्रेकिंग न्यूज’मध्ये येणारे भारतीय खेळाडू बघितले की आचरेकर सर नेहमी आठवतात. नजीकच्या भविष्यकाळात ते अजून आठवत राहतील. सचिनने म्हटलं तसं आता स्वर्गातही आचरेकर सरांच्या तालमीत क्रिकेट अजून समृद्ध होईल. अजून सभ्य होईल. क्रिकेटसाठी आयुष्य वेचलेला हा माणूस इथली एक बेस्ट इनिंग खेळून परतलाय. वेल प्लेड सर, वी विल मिस यू फॉर फॉरेवर.