पुतीन यांच्या 'कोल्ड ब्लडेड गेम'ची पुढली खेळी काय?

०४ सप्टेंबर २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


युक्रेनविरोधातील युद्ध अद्याप संपत नसताना, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याकडे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलंय. रशियातील बंडखोर खासगी लष्कराचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू, हा पुतीन यांनी घडविलेला 'कोल्ड ब्लडेड गेम' असल्याची शंका सर्वांनाच वाटतेय. पुतीन यांनी वॅगनरला शिक्षा होणार हे जाहीरपणे सांगितलं होतं. पण हा गेम इथेच संपेल की त्याला पुढे नवं वळण मिळेल?

शीतयुद्धानंतरच्या काळात आणि जागतिकीकरणानंतर वाढलेल्या परस्पर आर्थिक अवलंबित्वाच्या काळात प्रत्यक्ष युद्धाची संकल्पना मागे पडली आहे, अशी मांडणी आंतरराष्ट्रीय अभ्यासकांकडून करत होते. पण रशियाला गतवैभव मिळवून देण्याच्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेले रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी जवळपास दीड वर्षापूर्वी युक्रेनवर जोरदार आक्रमण करून, या मांडणीचं खोबरं केलं.

पुतीन यांच्या या चालीमुळे जगभरातून विशेषत: 'पश्‍चिमी देशांकडून पुतीन यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आणि अमेरिकेच्याबरोबरीने आर्थिक निर्बंधही टाकण्यात आले. त्याचबरोबर या युद्धादरम्यान रशियातील वॅगनर गटही चर्चेत आला होता. या खासगी सैन्याची स्थापना स्वतः पुतीन यांच्या सहमतीने करण्यात आली होती.  पण नंतर हाच गट पुतीन यांच्यावर उलटला. त्याच्या सुप्रीमोला अपघातात संपवून त्याचाही गेम केल्याची जोरदार चर्चा आहे.

खासगी सैन्य की दहशतवादी संघटना?

वॅगनर गटाचा सुप्रिमो असणारा येवगेनी प्रिगोझिन हा पुतीन यांचा निकटवर्तीय समजला जात असे. तुरुंगातील कैदी आणि कुख्यात गुन्हेगार यांचा समावेश करून 'वॅगनर आर्मी'ची स्थापना करण्यात आली. रशियन सरकारने तयार केलेल्या या खासगी सैन्यात रशियातील काही विशिष्ट रेजिमेंट आणि विशेष सशस्त्र दलाचे जवळपास ५० हजार जवान असल्याचे सांगितले गेले. 

विशेषत: युक्रेन युद्धादरम्यान डोनेट्स्क भागावर ताबा मिळवण्यात वॅगनर गटाने मोठी भूमिका पार पाडली होती. या खासगी सैन्यात युक्रेनमधेच ५० हजार जवान होते. वॅगनरने लिबियातील युद्धामधे मध्य आफ्रिकन देशात आपले सैन्य, विमान धाडले असल्याचे म्हटले जाते. नागरिकांच्या हत्या करणे,
वळ संयुक्‍त राष्ट्राच्या शांतता सैन्यावर हल्ला करणे, अत्याचार करणे आदी अनेक आरोप या गटावर लावण्यात आले होते. 

अमेरिकेने तर या वॅगनरला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक गुन्हेगारी संघटना असल्याचे जाहीर केले आहे. असा हा पुतीन यांच्या पालनपोषणावर वाढलेला गट असूनही, जून महिन्यामधे या गटाने थेट रशियातील राजसत्तेला आव्हान देत मॉस्कोमधे सैन्य आणि रणगाडे उतरवत जगभरात खळबळ उडवून दिली. त्यावेळी अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांनी पुतीनशाही अस्ताकडे, अशा आशयाची भाकिते वर्तवली होती. 

पुतीन यांनी सांगून ठेवलं होतं की...

हे सगळं सुरू असताना, वॅगनर गटाने बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रपती पुतीन यांनी देशाला संबोधित करताना असे म्हटले होते की, वॅनगर यांनी वाईट काळात रशियाला धोका दिला असून, रशियन सैन्यालाही आव्हान दिले आहे. रशियन सैन्याविरोधात शस्त्र उचलणारी प्रत्येक व्यक्‍ती देशद्रोही असून, आमचे प्रत्युत्तर आणखी कठोर असेल.

वास्तविक पाहता, सोव्हिएत संघ बरखास्त झाला, तेव्हा येवगेनी हा सुमारे दहा वर्षे तुरुंगात होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने एक हॉटेल सुरू केले आणि त्या माध्यमातून प्रचंड प्रगती केली. त्यादरम्यान पुतीन यांची नजर येवगेनीवर पडली. पुतीन यांनी येवगेनींच्या हॉटेल आणि केटरिंग कंपन्यांना मोठमोठी कंत्राटेही दिली. त्यामुळे येवगेनी यांना पुतीन यांचा शेफ, असेही म्हटले जात होते. पुढे येवगेनी हा पुतीन यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक मानला जात होता. इंटरनेट रिसर्च एजन्सी ही संस्था उभारण्यामागेही येवगेनी याचा हात असल्याचे बोलले गेले. 

२०१६ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीमधे या ट्रोलिंग फर्मने बराच हस्तक्षेप केल्याचा आरोपही करण्यात आला. पुतीन यांनी युक्रेममधील फुटीरतावाद्यांना मदत करण्यासाठी 'वॅगनर'चा वापर केला होता. साहजिकच, अशा व्यक्‍तीने पुतीन यांच्यासारख्या 'कोल्ड ब्लडेड' म्हणवल्या जाणार्‍या अध्यक्षाविरुद्ध बंड केल्याने जगभरातून आश्‍चर्य व्यक्‍त होत होते. पण नंतरच्या काही दिवसांत पुतीन यांनी आपली राजकीय मुत्सद्देगिरी आणि सैन्यताकद वापरून येवगेनी यांचे बंड 'शमवण्यात यश मिळवले. 

काटा काढणं, हा पुतीन यांचा स्वभाव

पुतीन हे कधीही देशद्रोह्यांना माफ करत नाहीत, असा त्यांचा इतिहास असल्यामुळे हे बंड शमवून प्रिगोझिनला बेलारूसला पाठवण्याचा मध्यममार्ग जरी रशियाने निवडला असला, तरी वॅगनर ग्रुपच्या सुप्रिमोच्या डोक्यावरील धोका टळला नव्हता. कारण त्याने वाघाच्या जबड्यात हात घातला होता, त्यानुसार, काही दिवसांपूर्वी प्रिगोझिन यांचे विमान अपघातात निधन झाल्याचे वृत्त येऊन धडकले. वॅगनरशी जोडलेल्या टेलिग्राम वाहिनीनेही प्रिगोझिनच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. 

साहजिकच, या घटनेनंतर व्लादिमीर पुतीन यांनी प्रिगोझिनचा काटा काढला का? असा सवाल जगभरातून उपस्थित होत आहे. व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात ज्या कोणी आवाज उठवला, त्याला शिक्षा झाल्याचा इतिहास आहे. पुतीन यांना विरोध करणारे अनेक लोक आज रशियाच्या तुरुंगात आहेत
किंवा विजनवासाचे जीवन जगत आहेत. 

याच वर्षी एप्रिल महिन्यामध्क्षे पुतीन यांचे वैचारिक विरोधक तसेच कार्यकर्ते व्लादिमीर कारा मुर्झा यांना देशद्रोह तसेच रशियन लष्कराची बदनामी केल्याप्रकरणी २५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पुतीन यांच्याकडे जगातील सर्वाधिक विषारी समजले जाणारे स्ट्रीकनीन हे विष असून, त्याचा वापर विरोधकांसाठी किंवा दुश्मनांसाठी केला जात असल्याचे दावे केले जातात. 

विरोध केला की गेम झालाच

७ ऑक्टोबर २००६ रोजी मानवाधिकार उल्लंघनाविरोधात वार्तांकन करणारी महिला पत्रकार अना पोलिटकोव्स्काया यांची हत्या करण्यात आली. अँना यांनी एक पुस्तक लिहिले होते, ज्यामधे पुतीन यांच्यावर जोरदार टीका केली होती. अँना सुपर मार्केटमधून घरी परतत असताना तिच्यावर गोळीबार झाला. दोन मुलांची आई असलेल्या ४८ वर्षीय पोलिटकोव्स्काया हिची मॉस्कोमधील घराबाहेर हत्या करण्यात आली होती. 

माजी केजीबी एजंट आणि पुतीन यांचे टीकाकार अलेक्झांडर लिटविनेन्को यांचाही संशयास्पद मृत्यू झाला होता. लिटविनेन्कोच्या शरीरात किरणोत्सर्गी पोलोनियम विष आढळले होते. लिटविनेन्को हे पुतीन चालवत असलेल्या 'एफएसबीचे संचालक होते. नंतर त्यांनी पुतीन यांच्यावर जोरदार टीका केली. लिटविनेन्को यांनी १९९१ च्या अपार्टमेंट बॉम्बस्फोटासाठी पुतीन यांना जबाबदार धरले होते. यामधे १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 

रशियन खासदार डेनिस वोरोनेन्कोव्ह यांची युक्रेनची राजधानी कीवमधे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. डेनिस यांनी पुतीन यांच्यावर टीका केली आणि वाद वाढत गेल्याने ते रशिया सोडून युक्रेनला गेले होते. २०१७ मधे एका हॉटेलमधे अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. हा सर्व इतिहास गाठीशी असल्याने प्रिगोझिनबाबत अशा प्रकारची अप्रिय वार्ता कानी येणार, याची अनेकांना कल्पना होती.

त्यांच्या मृत्यूबाबत किंवा प्लेन क्रॅशबाबत सखोल तपासाअंतीचे निरीक्षण समोर यायचे आहे; परंतु २०२४ मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुतीन यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी प्रिंगोझिन यांनी सुरू केल्याची चर्चा होती. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूचा संबंध पुतीन यांच्याशी जोडला जात आहे. त्यामध्ये तथ्य आहे की नाही, ही बाब जगापुढे येणारही नाही; पण प्रिंगोझिन यांच्या मृत्यूमुळे जगभरात चुकीचा संदेश गेला आहे. यानंतर रशियावर आणखी निर्बंध लादले जाऊ शकतात. 

रशियात राजकारणारे अतिकेंद्रीकरण

रशियाची देशांतर्गत राजकीय व्यवस्था संक्रमणकालीन टप्प्यातून जात असली, तरी पुढील निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा विजयही जवळपास निश्‍चित मानला जात आहे. याचे कारण रशियामध्ये राजकारणाचे अतिकेंद्रीकरण झाले आहे. वास्तविक, पुतीन हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत कमकुवत बनले आहेत. 

कर्करोगासह अन्य आजारांनी त्यांना ग्रासले आहे; परंतु राजसत्तेच्या सर्व नाड्या आपल्या हाताशी
ठेवत आणि त्या बळावर आपल्या विरोधातील प्रत्येक व्यक्तीचा बीमोड करत पुतीन यांनी रशियावरील आपली पकड मजबूत ठेवली आहे. प्रिगोझिनने त्यालाच आव्हान देण्याचे धाडस दाखवले खरे; पण त्याची परिणती व्हायची तीच झाली! 

वॅगनर गट पुन्हा पुतीन यांच्या माणसाकडे

प्रिगोझिन यांच्यासह या अपघातात अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांचाही मृत्यू झाल्याने युरोप, पश्‍चिम आशिया आणि आफ्रिकेत कारवायांत सक्रिय वॅगनर सैन्य निर्नायकी होणार काय? अशी शंका आहे. मात्र, पुतीन यांनी अन्य काही कंपन्यांमार्फत या सैन्यावर कन्जा करण्याचीही तयारी केल्याचे समोर येत आहे. 

प्रिगोझिनच्या मृत्यूनंतर वॅगनरच्या नेतृत्वासाठी आंद्रेई ट्रोशेव्ह यांचे नाव आघाडीवर आहे. प्रिगोझिन हयात असतानाच पुतीन यांनी आंद्रेई यांचे नाव पुढे केले होते. बॅगनर ग्रुपमध्ये सामील असलेल्या अनेक हायप्रोफाईल व्यक्तिमत्त्वांशी ट्रोशेव्ह यांचे चांगले संबंध आहेत. यात या गटाचे संस्थापक दिमित्री उत्किन यांचाही यात समावेश आहे. आंद्रेई हे पुतीन यांचेही आवडते असल्याचे बोलले जाते. 

अशा परिस्थितीत आंद्रेई यांना बँगनरची कमान मिळाल्यास ते पुतीन आणि रशियासाठीही फायदेशीर ठरू शकते. या सगळ्या परिस्थितीत रशिया-युक्रेन युद्धाला पुढे काय वळण मिळतं, आणि अमेरिका-चीन यांच्यासह जागतिक सत्तासंघर्ष कसा होतो, याकडे लक्ष ठेवून राहावं लागणार आहे.