क्युबावरून अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांमधे झालेल्या वादामुळं जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या जवळ नेऊन सोडलं होतं. अमेरिका क्युबावर तर रशिया अमेरिकेवर नेम धरून सज्ज झाले होते. मध्यस्ती आणि वाटाघाटी करून १३ दिवसानंतर हे वादळ शांत झालं. त्या तेरा दिवसांत काय काय घडलं त्याची ही गोष्ट...
प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्टाईन यांनी म्हटलंय, तिसऱ्या महायुद्धात कोणती शस्त्रं वापरण्यात येतील हे मला माहीत नाही. पण चौथं महायुद्ध माणसाला दगडधोंडे आणि काठीनेच लढावं लागेल हे नक्की.
त्यांना सुचवायचं होतं की तिसरं महायुद्ध हे अणुयुद्धच असेल आणि कदाचित संपूर्ण मनुष्यजातच यामधे नष्ट होण्याची शक्यता असेल. १९४५ मधे संपलेल्या दुसऱ्या महायुद्धाने जाता-जाता जगाला अणुयुद्धाची झलक दाखवली.
अणुयुद्धाच्या संभाव्य परिणामाने अजून तरी जगाचा कल मोठी युद्ध टाळण्याकडेच आहे. पण आजपासून बरोबर ५७ वर्षांपूर्वी ऑक्टोबर १९६२मधे जग अणुयुद्धाच्या दारापर्यंत येऊन ठेपलं होतं.
क्युबामधे ऑक्टोबर १९६२ मधील आणीबाणीच्या त्या १३ दिवसांनी अख्ख्या जगावर युद्धाचं सावट पसरवलं होतं. ही घटना 'क्युबन मिसाईल क्रायसिस' किंवा क्युबा क्षेपणास्त्र पेचप्रसंग म्हणून ओळखली जाते.
दुसरं महायुद्ध संपल्यावर जग अमेरिकेच्या नेतृत्वाखालील भांडवलशाही गट आणि सोविएत रशियाच्या नेतृत्वाखाली साम्यवादी गटात विभागलं गेलं. या दोन्ही गटांत लष्करी स्पर्धा सुरू झाली. हा काळ शीतयुद्धाचा काळ म्हणून ओळखला जातो.
१९५९ मधे अमेरिकेच्या वर्चस्वाखाली असलेल्या क्युबामधे फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेराने साम्यवादी क्रांती घडवून सत्ता प्रस्थापित केली. शेजारीच असलेल्या एका छोट्या बेटाने अशाप्रकारे आव्हान देणं हे अमेरिकेला पटणारं नव्हतं.
१९६१ मधे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी सीआयए या गुप्तचर संघटनेच्या मदतीने क्युबामधे फिडेल कॅस्ट्रोची सत्ता उलथवून लावण्याचा प्रयत्न केला.
पण तो प्रयत्न सपशेल फेल गेला. हा प्रयत्न 'बे ऑफ पिग्ज इनवेंशन' या नावाने ओळखला जातो. या घटनेमुळे क्युबा आणि अमेरिकेचे संबंध कमालीचे बिघडले.
हेही वाचा : कणकवलीत राणेंच्या विजयाचं श्रेय भाजपचंच!
क्युबाला आता पुन्हा असं काही घडल्यास संरक्षणाची गरज होती. त्यामुळे त्यांनी सोविएत रशियाकडे मदत मागितली. सोविएत रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव या संधीची वाटच बघत होते.
कारण पूर्व जर्मनीमधे अमेरिकेच्या कारवाया वाढल्या होत्या. तसंच इटली आणि तुर्कस्तानमधे अमेरिकेनं अणवस्त्रं तैनात केली होती. त्यातून सोविएत रशिया अमेरिकेच्या अणवस्त्रांच्या टप्प्यात आला होता. या घडामोडी क्युबा क्षेपणास्त्र पेचप्रसंगाच्या मुळाशी होत्या.
निकिता क्रुश्चेव यांनी फिडेल कॅस्ट्रोशी गुप्त वाटाघाटी केल्या. क्युबाच्या संरक्षणाच्या नावाखाली क्युबामधे मध्यम पल्ल्याची आंतरखंडीय क्षेपणास्त्र तैनात करण्याची जोरदार तयारी सुरू केली.
ही क्षेपणास्त्र क्युबामधे नेण्यासाठी गुप्तपणे आवश्यक सामग्रीचं हस्तांतर होऊ लागलं. या कामासाठी सोविएत रशियाचे अनेक शास्त्रज्ञ क्युबामधे शेतीविषयक संशोधनाच्या नावाखाली आले.
१४ ऑक्टोबरला अमेरिकेच्या U-२ या हेरगिरी करणाऱ्या विमानाने क्युबामधे काही संशयास्पद हालचाली टिपल्या. त्या छायाचित्रांवरून सीआयएने क्युबामधे मध्यम पल्ल्याची आंतरखंडीय क्षेपणास्त्रं तैनात झाल्याचा खात्रीलायक अहवाल अध्यक्ष केनेडींना दिला. हा अहवाल अमेरिकेच्या पायाखालची वाळू सरकवणारा होता. कारण अमेरिकेपासून केवळ नव्वद मैलावर क्षेपणास्त्रं पोचली होती.
प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन केनेडींनी एक्झिक्युटिव कमिटीची तातडीची बैठक बोलावली. अमेरिकन लष्कराने केनेडींना क्युबावर तात्काळ हल्ल्याचा सल्ला दिला. बे ऑफ पिग्ज प्रकरण अंगावर शेकल्याने केनेडी घाईघाईने कोणताही निर्णय घेणार नव्हते. लष्करी तयारी करतानाच त्यांनी बॅक डोअर डिप्लोमसीच्या माध्यमातून क्रुश्चेव यांच्याशी गुप्तपणे वाटाघाटी सुरू केल्या.
हेही वाचा : शेतकऱ्याच्या पोराने मातब्बर कृषीमंत्र्याला हरवलं, त्याची गोष्ट
१६ ऑक्टोबरला केनेडींनी क्युबाचा 'नेवल ब्लॉकेड' चा निर्णय घेतला. त्यानुसार अमेरिकन युद्धनौकांनी क्युबाला चहूबाजूने वेढा घातला. क्युबाकडे येणाऱ्या सोविएत रशियाच्या सर्व जहाजांना तिथे येण्यापासून अटकाव केला.
अमेरिकेची ही कृती म्हणजे आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याचं आणि फ्रीडम ऑफ नेविगेशनचं उल्लंघन होती. ही युद्धाला प्रवृत्त करणारी कृती असल्याचा आरोप रशियाने केला आणि याला प्रत्युत्तर म्हणून रशियाच्या युद्धनौका अटलांटिक महासागराकडे रवाना झाल्या.
अध्यक्ष केनेडींनी दूरदर्शनवरून अमेरिकन नागरिकांना या संकटाची माहिती दिली. दरम्यानच्या काळात पुरेशा माहिती अभावी लोकांमधे गैरसमज पसरवणाऱ्या अनेक घटना घडत होत्या. मीडियाचा उतावळेपणा हा काही आजचा प्रश्न नाही.
त्यावेळीही केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वरवरच्या संदर्भावरून अमेरिकन वृत्तपत्रांमधे केनेडींनी लष्कराला क्युबावर आक्रमण करण्याचा आदेश दिला, अशा बातम्या छापून यायच्या. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण होऊन गोंधळात अधिकच भर पडायची.
युद्ध आता अटळ आहे, या समजातून लोकांनी जीवनावश्यक वस्तू आणि अन्नाची साठवणूक करण्यास सुरवात केली. अमेरिकन मीडियावर विश्वास ठेवून सोविएत रशियाने काही हालचाल केली असती तर महायुद्ध आधीच सुरू झालं असतं एवढं नक्की!
क्युबामधून सोविएत रशियानं अणवस्त्रं काढून घ्यावीत या अमेरिकेच्या आवाहनास रशियानं केराची टोपली दाखवली. म्हणून अमेरिकेनं युद्धाची सगळी तयारी केली.
हेही वाचा : सातारकरांनी गादीला मान देत राष्ट्रवादीला मत दिलं, कारण
२७ ऑक्टोबर हा दिवस या आणीबाणीच्या १३ दिवसातील 'ब्लॅक सॅटर्डे' म्हणून ओळखला जातो. सोविएत रशियाने क्युबामधे क्षेपणास्त्र डागण्याची सगळी तयारी पूर्ण केलीय, असा अहवाल सीआयएने दिला.
आता केवळ एक कळ दाबताच अवघ्या दहा मिनिटांमधे न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन नेस्तनाबूत होणार होतं. अमेरिकेनंही आपली क्षेपणास्त्र संरक्षण स्थिती DEFCON ४ डिफेन्स रेडिनेस कंडिशनवरून DEFCON २ वर आणून ठेवली होती.
अमेरिकेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच होत होतं. आता केवळ एक स्थिती वरती जाण्याचा अवकाश, अमेरिकेची शेकडो क्षेपणास्त्रं क्युबावर वर्षाव करण्यास सज्ज झाली होती.
त्याचवेळी अमेरिकेचं क्युबावर हेरगिरी करणारं U-२ विमान सोविएत रशियाने पाडले. त्यामधे त्यांचा पायलट मेजर रुडॉल्फ अँडरसन मृत्यूमुखी पडला. क्युबन क्षेपणास्त्र पेचप्रसंगातील हा एकमेव मृत्यू होता.
अशाही स्थितीत दुसऱ्या बाजूने गुप्तपणे अमेरिकेकडून अटॉर्नी जनरल रॉबर्ट एफ. केनेडी आणि सोविएत रशियाचे राजदूत अँनाटोली डॉब्रीनीन या मुत्सद्यांमधे वाटाघाटी सुरू होत्या.
दरम्यानच्या काळात सोविएत रशियाची न्यूक्लियर टॉरपिडो वाहून नेणारी पाणबुडी क्युबाकडे जात होती. हजारो मैलाच्या प्रवासामुळे तिची बॅटरी संपत आली होती. त्यातच समुद्रातील वादळामुळे तिचा बाहेर जमिनीशी संपर्क होऊ शकत नव्हता. अशा अनेक संकटांना तोंड देत ती मार्गक्रमण करत होती.
हेही वाचा : २२० पारचा नारा देणाऱ्या भाजपला अपयशाचं तोंड का बघावं लागलं?
सोनार तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं समुद्रतळाशी काहीतरी हालचालींचा सुगावा लागताच तिथे गस्तीवर असणाऱ्या अमेरिकन युद्धनौकेने त्या दिशेने डेप्थ चार्ज बॉम्ब हा पाणबुडीविरोधी बॉम्ब सोडला.
तो या पाणबुडीच्या दोनशे फूट लांब फुटला. जमिनीशी काही संबंध नसल्याने पाणबुडीच्या कॅप्टनला वाटले की आता युद्ध सुरू झाले. या गैरसमजातून त्याने पाणबुडीवर असलेलं न्यूक्लियर टॉरपिडो डागण्यासाठी ट्यूबमधे टाकलं.
रशियन नेवी प्रोटोकॉलनुसार न्यूक्लियर टॉरपिडो डागण्याचा निर्णय हा पाणबुडीवरील तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे घ्यायचा असतो. यावर मतदान झालं. कॅप्टन आणि पॉलिटिकल ऑफिसरनं यास होकार दिला. पण सेकंड इन कमांड ऑफिसरनं त्याला विरोध केला. त्यांच्यात प्रचंड खडाजंगी झाली. पण त्या ऑफिसरनं शेवटपर्यंत यास नकार दिला.
क्युबाच्या त्या १३ दिवसांच्या आणीबाणीतला हाच तो निर्णायक क्षण होता ज्यानं जगाला नष्ट करण्याची क्षमता असलेलं हे युद्ध रोखलं. केनेडी आणि क्रुश्चेव यांच्यापेक्षा त्या क्षणी तो सामान्य अधिकारी जगातला सर्वात शक्तिशाली मनुष्य होता.
कारण जगाचं भविष्य आता त्याच्या हातात होतं. त्या अधिकाऱ्याचे नाव होतं वासिली आर्खीपोव. त्याच्या जीवनावर आधारित एक अप्रतिम डॉक्युमेंटरी बनवण्यात आलीय. 'The Man Who Saved The World' असं या डॉक्युमेंटरीचं नाव आहे.
या नाट्यमय घडामोडी सुरू असतानाच तिकडे दोन्ही देशांतली गुप्त बैठक यशस्वी झाली. त्यानुसार सोविएत रशियानं क्युबामधली अणवस्त्रं संयुक्त राष्ट्राच्या खाली काढून घ्यायची आणि त्याबदल्यात अमेरिकेने क्युबावर भविष्यात आक्रमण करायचं नाही असं ठरलं. तसंच तुर्कस्तान आणि इटलीमधली आपली अणवस्त्रं अमेरिका गुप्तपणे हटवणार होता.
२८ ऑक्टोबरला दोन्ही देशांनी हा करार जाहीर केला आणि जगाला अणुयुद्धाच्या दारापर्यंत घेऊन जाणाऱ्या क्युबन मिसाईल क्रायसिसचा शेवट झाला. यापुढे भविष्यात असे प्रसंग पुन्हा टाळण्यासाठी १९६३ मधे दोन्ही देशांच्या अध्यक्षांमधे सरळ संवादासाठी टेलिफोन हॉटलाईन सुरू झाली. या घटनेचा आणखी एक परिणाम म्हणजे १९६८ मधे एनपीटी म्हणजेच अणवस्त्र प्रसारबंदी करार झाला.
१६ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर या १३ दिवसांनी अमेरिका आणि सोविएत रशियाच्या एकमेकांविरोधातल्या गुप्त कारवाया आणि गैरसमजामुळे जगाला श्वास रोखून धरायला लावलं. शत्रुराष्ट्राशी वाटाघाटी केल्यामुळे केनेडी आणि निकिता क्रुश्चेव यांना आपापल्या देशांत प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं. परंतु इतिहासकार मात्र या दोघांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचं कौतुक करतात.
या प्रसंगाचे साक्षीदार असलेले अमेरिकेचे तत्कालीन अटॉर्नी जनरल रॉबर्ट एफ. केनेडीनी या प्रसंगावर 'थर्टीन डेज' हे पुस्तक लिहलंय. या पुस्तकावरच आधारित २००० मधे 'थर्टीन डेज' नावाचा हॉलीवूडपटही आला होता. या सिनेमाची टॅग लाईन होती 'You'll never believe how close we came’ म्हणजेच आपण अणुयुद्धाच्या किती जवळ होतो याचा विचारही करू शकत नाही!
हेही वाचा :
बदललेल्या दिवाळी फराळाची गोष्ट
हा तर देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत पराभव
कोल्हापूरकरांनी आमचं ठरलंय म्हणत आठ आमदारांना घरी बसवलं!
स्वबळावर सत्तेसाठी भाजपने हा फॉर्म्युला वापरल्यास शिवसेनेला बसणार झटका