क्रांतिसिंह नाना पाटीलः गळ्यात तुळशीची माळ घालणारा कम्युनिस्ट

०३ ऑगस्ट २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


आज ३ ऑगस्ट. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन. महाराष्ट्रात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व समर्थपणे केलं. इंग्रज शासनाला सळो की पळो करुन सोडणाऱ्या नानांनी प्रतिसरकार अर्थात समांतर सरकार स्थापन केलं. प्रामुख्याने सातारा आणि सांगलीत हे काम मोठ्या प्रमाणात चालत होतं. हा सगळा संघर्ष लोकांसाठी होता. या संघर्षाला महात्मा गांधींनीही पाठिंबा दिला होता.

क्रांतीसिंह नाना पाटलांनी प्रतिसरकारची स्थापना करून ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडलं. समांतर न्यायालयं, बाजार व्यवस्था उभी करण्यात आली. सावकार-पाटील, आणि पिळवणूक करणाऱ्या दरोडेखोरांना शिक्षा करण्यात यायच्या. सांगली, साताऱ्यातल्या जवळपास १५०० गावांमधे हे प्रतिसरकार काम करत होतं. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट सेवांना नामोहरम करण्यात काम अगदी पद्धतशीरपणे करण्यात येत होतं. हा सगळा संघर्ष लोकांसाठी होता. या संघर्षातच नाना पाटील हे क्रांतिसिंह नाना पाटील झाले. नानांचा इथपर्यंतचा प्रवास समजून घेण्यासारखा आहे.

चरित्र आणि चारित्र्य घडवणाऱ्या घटना

साताऱ्यातल्या वाळवे तालुक्यातलं मच्छिंद्र हे छोटंसं खेडं. याच खेड्यात ३ ऑगस्ट १९०० मधे नानांचा जन्म झाला. याचा काळात आजूबाजूला अनेक ऐतिहासिक गोष्टी घडत होत्या. १९०२ मधे राजर्षी शाहु महाराजांनी पुढारलेल्या जात-धर्मांना मागे टाकून इतर सर्वांसाठी राखीव जागांची घोषणा केली. ती अमलातही आणली. नाना पाटील ऐन तारुण्यात असताना १९१९ ते १९२१ यादरम्यान साताऱ्यात कूळ शेतकरी आणि बलुतेदारांचा संप झाला.

मुकुंदराव पाटील, श्रीपतराव शिंदे, दिनकरराव जवळकर अशा सत्यशोधक ब्राम्हणेत्तर नेतृत्वानं काढलेली नियतकालिकही या काळात येत होती. सोबत महात्मा गांधींचं नेतृत्वही उभं राहत होतं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यावर चांगले संस्कार घडवणाऱ्या होत्या. महाराष्ट्रात जी काही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक उपथापालथ होत होती. त्या सगळ्या गोष्टींचा परिणामही नानांच्या आयुष्यावर होतं होता. या काळात ते २०, ३० वर्षांचे होते.

हेही वाचा : कम्युनिस्ट झालो, म्हणून अस्पृश्यांसाठी अस्पृश्य झालो

सरंजामदारी पिळवणूक आणि जातीयतेचे चटके

नानांचा जिथं जन्म झाला ते मच्छिंद्र गाव कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं. हा भाग तसा डोंगराळ. गावा शेजारीचं मच्छिंद्र हा गड आहे. नाथ पंथातल्या मच्छिंद्रनाथांचं ठाणंसुद्धा या गडावर होतं. हा पंथ महाराष्ट्रातल्या जातिव्यवस्थाविरोधी पंथातला होता. गावाजवळ कृष्णा नदी होती. पण तिचं पाणी शेतीसाठी आणायला उपयोगी पडत नव्हतं. नानांचा जन्म कष्टकरी शेतकरी कुटुंबात झाला. ब्राम्हणी व्यवस्था पाटील आडनाव असणाऱ्यांना कुणबी कुरवाडीच म्हणायची.

१८८१ च्या बॉम्बे प्रेसिडेंसींच्या गॅझेटरमधे सातारा जिल्ह्याची लोकसंख्या १०,६२,३५० होती. त्यात कुणबी समाजाची संख्या ही ५,८३,५६९ होती. असं नमूद करण्यात आलंय. याचाच अर्थ हा समाज ५४.९ टक्के होता. १८८१ च्या गॅझेटमधे मराठा म्हणुन वेगळी जात नमूद नाही. क्रांतिसिंह हे राबणाऱ्या वर्ग जातीत जन्माला आले होते. पण या जातीला त्या काळात शूद्र समजलं जात होतं. सरंजामदारी पिळवणूक आणि ब्राम्हण्यवादी जातीय पिळवणूक या दोन्हींचे अनुभव त्यांना या परिसरात येत होते.

पुरोगामी विचारवंतांचा प्रभाव

नाना पाटलांवर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता. अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण प्रसार, व्यसनमुक्ति या विषय हा याचा गाभा होता. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारासोबत राजर्षी शाहूंच्या सामाजिक क्रांतिकारक व्यवहारांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. राजर्षींच्या आरक्षण धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणीचा प्रभाव त्यांनी अनुभवला होता.

१९१९ ते १९२१ या काळात असहकार चळवळीतून महात्मा गांधी हे राष्ट्रीय काँग्रेसचे देशपातळीवरचे नेते झालेले होते. टिळकांच्या नेतृत्वातल्या अनेकांनी गांधीच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण केले. याच काळात  गांधीजी मात्र महाराष्ट्रातल्या ब्राम्हणेत्तर धुरीणांना भेटत होते. अण्णासाहेब लठ्ठे, कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेधे यांचा यात समावेश होता. यात नाना पाटीलही होते. गांधीजींचा स्वातंत्र्याचा संदेश त्यांनी जनतेपर्यंत पोचवला. भाषणात ते महात्मा गांधी की जय अशा घोषणाही द्यायचे.

असं उभं झालं प्रतिसरकार

इंग्रजांना नानाचं प्रतिसरकार शेवटपर्यंत मोडीत काढता आलं नाही. आजच्या सांगली जिल्ह्याचा बहुतांश भाग आणि आजचा सातारा जिल्हा मिळून त्या वेळचा सातारा जिल्हा बनलेला होता. प्रतिसरकारची उभारणी होण्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या घटना कारणीभूत ठरल्या. १९४२ मधे इस्लामपूर आणि वडूज या दोन तहसील कचेऱ्यांवर मोर्चे काढण्यात आले. त्या मोर्चांवर तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांनी गोळीबार केला. याचा राग लोकांच्या मनात होता.

या विरोधात नाना पाटलांनी मोर्चे काढले. त्याला लोकांनी पाठिंबा दिला. लोकांचं शोषण इंग्रजांकडून चालू होतं. दडपशाही आणि धरपकडही व्हायची. याच काळात नाना हे भूमिगत राहून काम करत होते. सशस्त्र प्रतिसरकार उभं राहिलेलं होतं. तरुणांची एक फळी यासाठी तयार करण्यात आली होती. वेगवेगळ्या गावांमधे गट स्थापन करण्यात आले. अगदी पद्धतशीरपणे या गटांचं काम चालू होतं. अन्यायाविरोधात थेट भूमिका घेतली जात होती.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

प्रतिसरकारबद्दल गांधीजी काय म्हणाले?

प्रतिसरकारचं काम हे हिंसक आहे. महात्मा गांधींना हे मान्य नाही असा प्रचार शहरातल्या काँग्रेसवाल्यांनी सुरु केला. तसा आक्षेप नोंदवण्यासाठी पुढारीही थेट साताऱ्यात आले. प्रतिसरकारविरोधात प्रचाराचं व्यासपीठ तयार करण्यात आलं. त्यासाठी एक संघ स्थापन करण्यात आला. उलटसूलट प्रचार करण्यात आला. काँग्रेसचे पुढारी त्यात आघाडीवर होते.

मे १९४४ मधे गांधीजी पाचगणीत आले होते. त्यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या. नान पाटील आणि सहकाऱ्यांनी आपली बाजू मांडली. त्यावर गांधीजी म्हणाले, ‘नाना पाटील, तुमची चळवळ माझ्या तत्वात बसते न बसते यापेक्षा तुम्ही ४२ ची स्वातंत्र्य चळवळ जिवंत ठेवली. साताऱ्याने या चळवळीचं नाव राखलं हे महत्त्वाचं. नाना तुम्ही बहादूर आहात. भ्याडाच्या अहिंसेपेक्षा शूराची हिंसा परवडेल असं मानणारा मी आहे.’ प्रतिसरकारच्या आणि महात्मा गांधीच्या इतिहासातली ही महत्त्वाची घटना आहे.

राजकीय बदलांचा परिणाम

नाना पाटील १७ ते २० वर्षांचे असतानाच सत्यशोधक, ब्राम्हणेत्तर विचारांना अनुकूल अशा अनेक घटना घडत होत्या. १९३० पर्यंत ब्राम्हणेत्तर बहुजन जाती-जमाती या काँग्रेसापसून दूर राहिल्या होत्या. त्या आधी सत्यशोधक समाज, ब्राम्हणेत्तर पक्ष, डेक्कन रयत असोसिएशन, मराठा राष्ट्रीय संघ, मराठी लीग, डेक्कन ब्राम्हणेत्तर संघ अशा संघटना १९१७ ते १९२० या काळात संघटित झाल्या होत्या. राजकीय क्षेत्रात होणाऱ्या बदलांचे परिणाम त्यांच्यावर होत होते.

नाना पाटलांचं व्यक्तिमत्व घडत असताना स्पृश्य ब्राम्हणेत्तर आणि अस्पृश्य समाज यांनी ब्राम्हणवाद आणि सनातनी ब्राम्हणांविरोधातली आघाडीही त्यांच्यावर परिणाम करणारी होती.१९३० ते १९४२ हा काळ नानांना क्रांतिसिंह म्हणून घडणारा होता. याच काळात त्यांनी जनतेला क्रांतीप्रवण केलं आणि पुढच्या संघर्षासाठी घडवलं.

१९३० मधे ते सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी झाले. इथुनच त्यांचं स्वातंत्र्य चळवळीतलं कृतिशील सहभागाचं काम सुरु झालं. गावोगावी ते अगदी धूमधडाक्यात प्रचारसभा घ्यायचे. १९३२ ते १९४२ या दहा वर्षात अण्णांना आठ वेळा तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. १९३२ मधे त्यांना पहिल्यांदा पोलिसांनी अटक केली. सक्तमजुरीची शिक्षा झाली.

कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील

नाना पाटलांचे चळवळीतले सहकारी हे कष्टकरी आणि बहुजन जातिजमातींतून होते. हे सगळे सहकारी स्वातंत्र्य चळवळीसाठी, राबणाऱ्या जनतेसाठी जीवावर उदार होऊन लढलेले होते. याच काळात शेतकरी कामगार पक्ष आणि नव जीवन संघटना हे गट एकाच पक्षात समाविष्ट करण्याची बोलणी सुरु झाली. या सगळ्या चर्चांतून कम्युनिस्ट विचारांचं जग त्यांना उलगडू लागलं. रशिया, चीनमधल्या कम्युनिस्ट क्रांत्या यांचा जास्त व्यापक आणि सखोल परिचय त्यांना होऊ लागला.

क्रांतिसिंह नाना पाटील हे कामगार किसान पक्षात सामील झाले. १९५२ च्या निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आणि कामगार किसान पक्ष, डावा समाजवादी पक्ष यांच्या सगळ्या आघाड्या मैदानात उतरल्या. डाव्या पक्षांतले पुढारी एकमेकांविरुद्ध उभे राहिले आणि नाना पाटलांसह सगळे पराभूत झाले. शेकापचे केशवराव जेधे काँग्रेसमधे आले. या सगळ्या पार्श्वभूमीवर नाना पाटील हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद झाले.

आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी पक्ष बदलला नाही. त्यांचा सत्यशोधकी बाणा मात्र कायम ठेवला. त्यांची तुळशीची गळ्यातली माळही कायम राहिली. ते पूर्णवेळ पक्ष कार्याला वाहणारे क्रांतिकारक कम्युनिस्ट झाले. पुढे क्रांतिसिंहांना १९५७ च्या निवडणुकांमधे जनतेने कम्युनिस्ट पक्ष आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघांतून प्रचंड बहुमताने निवडून आले. खासदार झाल्यानंतर त्यांनी लोकसभेतलं पहिलं भाषण मराठीत केलं. हे भाषणही संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीविषयी होतं.

हेही वाचा : विचारवंतांचं लेटर वॉर हे लोकशाहीचं विदारक वास्तव

पक्षाचा पाठिंबा पण नानांचा आणीबाणीला विरोध

१९६७ मधे नाना बीड मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेत गेले. कम्युनिस्टांमधे फूट पडली होती. नक्षलवादी म्हणून ओळखली जाणारी नवी कम्युनिस्ट फळी उदयाला आली होती. याच काळात अनेक राज्यांमधे काँग्रेसची सरकारं गडगडत होती. काँग्रेसनं बँका, खाणी, तेल उद्योगांचं राष्ट्रीयकरण करुन समाजवादी चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला. १९७३-७४ मधे मोठ्या प्रमाणात आंदोलनांचं प्रमाण देशभर वाढतं होतं. या काळात कामगारांचे लढे चिरडण्यात आले.

१९७२ मधे मधुमेहाच्या आजारामुळे नानांच्या पायाला जखम झाली. आणि गॅंग्रीन झाल्यामुळे पाय काढावा लागला. तरीही ते स्वस्थ बसलेले नव्हते. २१ सप्टेंबर १९७६ मधे सांगलीत त्यांचं एक प्रदीर्घ भाषण झालं. त्यात त्यांनी आणीबाणीच्या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. महत्त्वाचं म्हणजे नाना पाटील यांच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आणीबाणीला पाठिंबा दिला होता. विकलांग झालेले असताना, मृत्यूच्या उंबरठ्यावरही त्यांचा क्रांतिकारी बाणा कायम होता.

वाळव्याच्या हुतात्मा भूमीवर दहन

२३ नोव्हेंबर १९७६ ला विटा इथं त्यांचा अमृत महोत्सवी सोहळा झाला. एक छोटेखानी भाषणही झालं. याही भाषणात त्यांनी आणीबाणीवर टीका केली. पुढे त्यांच भाषण होऊ शकलं नाही. ते बेशुद्ध अवस्थेत गेले. त्यांना शरीराची साथ मिळाली असती तर जसं ब्रिटीश सत्तेच्या काळात प्रतिसरकारचं नेतृत्व केलं तसचं आणीबाणीविरोधात आंदोलन उभं केलं असतं. या प्रतिसरकारचा पराभव आणीबाणीच्या अखेरपर्यंत केंद्र सरकारला करता आला नाही.

६ डिसेंबर १९७६ मधे नानांचं मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमधे निधन झालं. क्रांतिसिंह नाना पाटलांनी ज्या ठिकाणी आपलं अखेरचं जीवन घालवलं त्या वाळव्याच्या हुतात्मा भूमीवर त्यांचं दहन झालं. क्रांतिकारी विचारांची आणि व्यवहारांची पेरणी हा माणूस शेवटपर्यंत करत राहिला. कधीही न वाढणारी अशी ही विचारांची संपत्ती होती. ती पुढच्या पिढ्यांसाठी देऊन क्रांतिसिंह नाना पाटील हे कायमचे पडद्याआड गेले.

हेही वाचा : 

बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं

नलिनी पंडितः दलित, बहुजनांच्या वकील

किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?

तू देवमाणूस आहेस, की खराखुरा देवच?

संत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ

बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती तीनवेळा का जाळली?

डावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं!

ब्राह्मणी अरेरावी आणि मुसलमानी धर्मवेड यांना आव्हान देणारे संत नामदेव

(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ‘क्रांतिसिंह नाना पाटील: एक अखंड क्रांतिकारक’ हे पुस्तक प्रकाशित केलंय. डॉ. प्रकाश पाटणकर लिखित या चरित्र ग्रंथाचा या लेखासाठी आधार घेण्यात आलाय.)