पंजाब: केजरीवालांच्या ट्रॅपमधे काँग्रेस कशी अडकली?

१२ मार्च २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात 'आप'मधे आपल्याला फारसं भवितव्य नाही म्हणत काही आमदारांनी काँग्रेसमधे प्रवेश केला. त्याच आपने चार महिन्यात धुव्वाधार कामगिरी करत ९२ जागा जिंकल्या. सुरवातीच्या टप्प्यात आम आदमी पक्षाला एवढं यश अपेक्षित नव्हतं. पण काँग्रेसमधले रुसवे-फुगवे, अंतर्गत दुफळी 'आप'च्या पथ्यावर पडली. यावर भाष्य करणारी पत्रकार आसिफ कुरणे यांची फेसबुक पोस्ट.

पंजाबमधे आम आदमी पक्षाला मिळालेलं घवघवीत यश हे त्यांच्या कष्टापेक्षा काँग्रेसच्या नेत्यांनी आंदण दिलेलं राज्य आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. पंजाबची निवडणूक गेली सहा महिने मी अगदी जवळून बघितली आणि अनुभवलीही. त्यामुळे एवढ्या धाडसानं हे विधान करतोय.

काँग्रेसला अंतर्गत दुफळीचा फटका

सप्टेंबर महिन्यात आपमधे आपल्याला फारसं भवितव्य नाही म्हणत काही आमदारांनी काँग्रेसमधे प्रवेश केला. त्याच आपने चार महिन्यात धुव्वाधार कामगिरी करत ९२ जागा जिंकल्या. सुरवातीच्या टप्प्यात 'आप'ला एवढं यश अपेक्षित नव्हतं.

नवज्योतसिंह सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि तिथून काँग्रेसची गाडी घसरणीला लागली. आधी पक्षात मालवा विरुद्ध दोअबा, मांझा अशी फाळणी त्यांनी केली. त्या भागातल्या आमदारांच्या आडून मुख्यमंत्रीपद मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण तो यशस्वी झाला नाही.

चरणजीत सिंह चन्नी हे मुख्यमंत्री झाले. पंजाबमधे ३५ टक्क्यांपेक्षा जास्त दलित मतदार आहेत आणि त्याचा पक्षाला फायदा होईल असा तर्क लावून ही निवड करण्यात आली होती. यामुळे आम आदमीला टार्गेट करणारी आम आदमी पार्टी काही प्रमाणात बॅक फूटवर पडली होती. पण ही निवड आणि सिद्धूंची नाराजी नंतर नंतर वाढत गेली.

हेही वाचा: सत्ता संघर्षाच्या पेचात देवेंद्र फडणवीस एकाकी

केजरीवालांच्या ट्रॅपमधे काँग्रेस

सुरवातीला काँग्रेस आपल्या पीचवर खेळत होती तोपर्यंत स्ट्रॉंग होती. निवडणूक जसजशी जवळ येवू लागली तसतशी ती आपच्या जाळ्यात अडकत गेली.  सुरवातीला आप आणि अरविंद केजरीवाल यांनी सर्वसामान्यांच्या दररोजच्या निगडीत गोष्टींवर बोलायला सुरवात केली.

वीज, शिक्षण, वाळू, वैद्यकीय सेवा आणि अंमली पदार्थ या विषयांवर आवाज उठवणं सुरू केलं. त्यात फसत मीच सामान्य माणूस आहे असं म्हणत चन्नी यांनी फक्त घोषणांचा पाऊसच सुरू केला. भरीस भर म्हणून शिक्षक, सरकारी कर्मचाऱ्यांनी पंजाब सरकारविरोधात आंदोलनं सुरू केली होती. त्याचा नकळत फायदा आपला मिळू लागला.

आपचं सोशल मीडिया प्लॅनिंग

आपची हवा तयार करण्यात सोशल मीडिया आणि स्थानिक, राष्ट्रीय माध्यमांनी मोठा हातभार लावला. काँग्रेस आणि आपच्या सोशल मीडिया टीममधे जमीन आसमानचा फरक होता. काँग्रेसने निवडलेली टीम नेमकं काय काम करत होती हे शेवटपर्यंत ना त्या पक्षाला कळलं ना टीममधल्या सदस्यांना. दुसरीकडे आपचे अरविंद केजरीवाल, अनमोल मान, राघव चढ्ढा, भगवंत मान दररोज वायरल होत होते.

आपकडून पंजाबमधल्या शाळांना भेटी, दिल्लीतल्या शाळांसोबतची तुलना, वीज बिलांची तुलना त्याला प्रतिउत्तर द्यायला कमी पडणारी काँग्रेस असं चित्र वाढत गेलं. राष्ट्रीय मीडियात केजरीवाल यांची मित्रमंडळी दररोज हवा तयार करण्याचं काम करत होती. त्या तुलनेत काँग्रेस मात्र सेल्फ गोलवर गोल करत होती.

काँग्रेसच्या टीमचा दररोजचा एककलमी कार्यक्रम सुरू होता, तो म्हणजे अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्यावर टीका करणं. त्यात ना ताळतंत्र होतं ना कसलं नियोजन. जुन्या क्लिप काढून त्या वायरल करणं एवढंच काम सोशल मीडियाचं आहे असा समज सोशल मीडियावरच्या नेत्यांचा झाला होता. त्यातल्या बहुतांश प्रमुखांचा सगळा वेळ फक्त ट्विटरवर जात होता. तर जनता खाली व्हाटसअपवर होती.

आपची एक मोका केजरीवाल ही थीम चांगली रुजत असताना काँग्रेसचे प्लॅनिंगकर्ते दररोज संकल्पना बदल होते. 'सरबत दा भला' ही कन्सेप्ट एकदम चांगली होती. पण ती राबवण्यात धरसोडपणा जास्त होता. एकजीनसीपणा नसणं हे त्यांचं फार मोठं अपयश होतं.

हेही वाचा: हा तर देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत पराभव

काँग्रेसच्या प्रचारातली मोठी चूक

काँग्रेसची सगळ्यात मोठी फसगत आपने मान यांना मुख्यमंत्री घोषित केल्यानंतर दबावापोटी चन्नी यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्यात झाली. पंजाबमधे दलित ३५ टक्के आहेत आणि ते आपल्यासोबत राहतील हा विचार करताना इतर ६५ टक्के लोक काय करतील याचा विचार काँग्रेस श्रेष्ठींनी केला असेल की नाही माहीत नाही. पण तो मात्र चांगलाच अंगलट आला हे निकालातून दिसतंय.

मतदानाला दोन दिवस राहिले असताना कवी कुमार विश्वास यांनी केलेल्या आरोपांवरून अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी समर्थक ठरवण्याचा केलेला प्रयत्न काँग्रेसच्या प्रचार मोहीमेतली मोठी चूक होती. ऐन निवडणुकीच्या काळात अशाप्रकारच्या आरोपांचा लोकांवर फारसा परिणाम होत नाही. उलट आरोप झालेल्याला सहानभूती मिळते हे अनेकवेळा सिद्ध झालंय. तरी काँग्रेसने हा डाव खेळला आणि हसं करून घेतलं.

मुळात चंदीगड महापालिकेचा निकाल लागला त्यावेळीच काँग्रेस पक्षाने आपली सगळी रणनिती बदलली पाहिजे होती. पण काँग्रेसमधले नेते अजूनही सरंजामशाही वृत्तीने वागतात. त्यांना एखाद्या सामान्य कार्यकर्त्याने सांगितलेली सूचना अपमान वाटते. पदावर बसलेली व्यक्ती सर्वज्ञानी आहे आणि तोच पक्षाला विजय मिळवून देवू शकतो अशा आविर्भावात राहतात आणि असले हादरवून टाकणारे निकाल पहावे लागतात.

काँग्रेसच्या वादात आपला संधी

प्रियांका गांधी यांच्या सभेत नवज्योतसिंह सिद्धू यांनी केलेलं नाटक ग्रामपंचायत सदस्य पण करणार नाही एवढ्या खालच्या पातळीचं होतं. लोकांना तिथंच कळून चुकलं की काँग्रेसचं यंदा काही खरं नाही. ते सत्तेत आले तरी पुढची पाच वर्ष आपल्या आपल्यातच भांडत बसणार आणि दररोज नवीन नवीन तमाशे पहावे लागणार. त्यापेक्षा आप एक चांगला पर्याय आहे. त्याला संधी देवून बघू. नाही तर एवढी वर्ष यांनी राज केलं आणखी पाच वर्षाने काय बिघडणार आहे.

आपनं काम चांगलं काम केलं नाही तर परत काँग्रेसला संधी देवू असा सर्वसामान्य विचार सर्वत्र दिसत होता. पण तरी काँग्रेसची एवढी वाताहत होईल असं वाटलं नव्हतं. शेवटी तेच झालं. आता काँग्रेसने सर्वात आधी पक्षाध्यक्ष नेमावा आणि पर्सेप्शन मेकिंगवर भर द्यावं. तोपर्यंत तुम्हाला कधी यश मिळणार नाही. कारण तुम्हाला आता कोणी सिरीयस घेत नाही. आणि जोपर्यंत पक्ष म्हणून तुम्हाला कोणी सिरीयस घेणार नाहीत तोपर्यंत असंही सुरू राहणार.

हेही वाचा: 

जिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू!

विधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली?

२२० पारचा नारा देणाऱ्या भाजपला अपयशाचं तोंड का बघावं लागलं?

१९९१ मधे भारताला कर्जही मिळत नव्हतं, पण आजचा भारत त्या संकटातून उभा झालाय