रिपब्लिक टीवीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी पालघरच्या मॉब लिंचिंगवरून सोनिया गांधींवर टीका केली. त्याच्यावर उलटसुलट खूप प्रतिक्रिया उमटल्या. हा लेख हीदेखील एक प्रतिक्रिया आहे. ती प्रतिक्रिया आहे, काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याची. सोशल मीडियामधे सोनिया गांधींवर वारंवार टोकाची टीका होत असताना, हे मनोगत दुसरी बाजू सांगतंय. म्हणून ते टीका करणाऱ्यांनीही वाचायला हवं.
राजकारण या शब्दाचा आणि माझा संबंधही आला नव्हता. सातवी, आठवीला असेन. गावातून एक ट्रक भरून माणसं निघाली. लातूर जिल्ह्यातल्या निवळी गावातल्या साखर कारखान्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सोनिया गांधी येणार होत्या. त्यांची सभा होणार होती.
माझे मामा कालिदास मोहिते मला ट्रकमधे घेऊन बसले. आयुष्यात पहिल्यांदाच इतकी गर्दी पाहिली. पिवळसर तांबड्या साडीचा पदर डोक्यावरून घेऊन कंबरेला खोचलेला, एक हात वर केलेला, चेहऱ्यावर हसू असलेल्या सोनिया गांधी यांचे कितीतरी कट्आऊट सभेच्या ठिकाणी होते. त्या कधी आल्या? काय बोलल्या? कधी गेल्या? काही कळलं नाही. आज आठवतही नाही.
पण सभेवरून गावाला परत येताना तासभर ट्रकमधे गावातली माणसं, बायामाणसं बोलत होती, ते आठवतंय. 'लय खमकी हाय.' 'आपल्या बायांसारखं लुगडं नेसती की.' 'हिंदी बोलती राव.' 'इंदरा गांधीची सून शोभतीया.' गावात आजही इंदिरा असा पूर्ण उल्लेख कोणी करत नाही.
माझा कालिदास मामा राजकारणाचा भलता नादिक माणूस. हाडाचा काँग्रेसी. आयुष्यभरात काँग्रेस कार्यकाळातल्या रोजगार हमी योजना, अन्न सुरक्षा कायदा, इंदिरा आवास योजनेचाच काय तो लाभार्थी. पण घराच्या भिंतीवर फक्त आणि फक्त इंदिरा गांधींचाच फोटो. आजही. सभेहून आल्यानंतर आठवडाभर त्यांच्या तोंडात सभेचं, सोनिया गांधींचंच कौतुक.
हेही वाचा : इंदिरा गांधीः गुंगी गुडिया ते देशाची दुर्गा
काल अर्णब गोस्वामी नामक तथाकथित पत्रकाराने केलेल्या टीकेच्या निमित्तानं सोनिया गांधींविषयी मनात विचारांची वावटळ सुरू झाली. आता मी त्यांच्या पक्षाचा छोटा पदाधिकारी आहे. काँग्रेस, भाजप, पक्षीय राजकारण, निवडणुका, आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे या सत्तरी ओलांडलेल्या महिलेकडे पाहताना मन कधी गलबलून येतं, कधी अभिमानानं छाती फुगते, तर कधी आदरानं माथा झुकतो.
काय शिकायचं या बाईकडून? प्रेम शिकावं. केम्ब्रिज युनिवर्सिटीत दोन विद्यार्थी एकमेकांच्या प्रेमात पडतात. आयुष्यभर सोबतीच्या आणाभाका. या इटलीच्या. राजीव गांधी भारताचे. काय साम्य दोन देशांत? भाषा? वेषभूषा? खाणंपिणं? चालीरिती? निसर्ग?, काही काही नाही. एकमेकांविषय़ी आकर्षण. त्यातून सहवास. त्याचं रूपांतर प्रेमात.
मग सहजीवन. एकमेकांचा आदर. एकमेकांच्या कुटुंबाचा, संस्कारांचा, परंपरांचा, देशाचासुद्धा स्वीकार. कशासाठी, तर जोडीदारासाठी. आपल्या आवडीचा जोडीदार निवडावा. तो निवडताना जात, धर्म, भाषा, देश या कशाचाही विचार न करता, विचार करावा फक्त आणि फक्त प्रेमाचा, निष्ठेचा, समर्पणाचा. हे शिकावं सोनिया गांधी यांच्याकडून!
काय शिकायचं या बाईकडून? संकटाचा सामना करायला शिकावं. या देशाच्या तळहातावरील भाग्यरेषा इंदिराजींच्या घरात सोनिया आल्या. पंतप्रधानांची सून सोनिया. राजकारणापासून दूर असलेले, विज्ञानाच्या वाटेवरचे वाटसरू राजीव हे जोडीदार. दुःख, टीका, धावपळ याचा स्पर्शही नसलेल्या सोनियांना कल्पनेतही नसलेला दिराचा जीवघेणा अपघात, सासूची हत्या, आणि मग राजीव गांधींचं राजकारणातलं पदार्पण. त्यानंतर राजकारणातले अनेक चढउतार आणि शेवटी ज्याच्यासाठी भारतबाई झाल्या त्या जीवाच्या तुकड्याची, नवरा राजीव गांधींचीही हत्या.
कल्पना करा त्यांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून. राजकारणाच्या साठमारीत सासूची हत्या होते. नवरा संपवला जातो. आजूबाजूला कोण आपला, कोण परका, कसं ओळखायचं? आपल्याशी नातं सांगणाऱ्या पाकिस्तान, बांगलादेशमधे विरोधातल्या पुढाऱ्यांची कुटुंबची कुटुंबं संपवल्याच्या घटना ताज्या. देशातल्या सर्वाधिक सत्ताधारी राहिलेल्या पक्षात पद, प्रतिष्ठेसाठी आसुसलेले अवतीभवती.
शिवाय विरोधी पक्षाच्या समाजवादी, हिंदुत्ववादी फळ्या अगदी जोरात. प्रत्येक राज्यात कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या कारणाने दुखावलेले प्रादेशिक पक्ष भरीस. नक्षलवाद, ईशान्य बंडखोर, काश्मिरातले फुटीर, खलिस्तानी आणि वाईटावर टपलेली चीन, पाकिस्तानसारखी शेजारी राष्ट्रं. दोन लहान पाडसं कवेत घेऊन ही हिरकणी भारतबाई म्हणून इथंच थांबली. पाय रोवून थांबली. डगमगली नाही. घाबरली नाही. धाडस शिकावं त्यांच्याकडून. संकटाचा सामना कसा करावा, हे शिकावं सोनिया गांधींकडून.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
बाहेरून आणलेलं सामान वायरस फ्री करण्याचं साधंसोप्पं प्रॅक्टिकल
कोरोना रोखण्यासाठी डिग्लोबलाइज होणं ही तर आपली घोडचूक ठरेल
काय शिकावं या बाईकडून? राजकारण शिकावं. तेव्हाचा काँग्रेस पक्ष म्हणजे दुढ्ढाचार्यांची बजबजपुरी, स्वार्थलोलुपांनी बळकावलेली पक्ष संघटना, सरंजामदारांनी व्यापलेल्या राज्य कमिट्या, दलाल खुशमस्कऱ्यांची रेलचेल. हेवेदावे, डाव-प्रतिडाव, वर्चस्ववादी नेतृत्व म्हणजेच कार्यक्षम नेतृत्व या अंधश्रद्धेत आकंठ बुडालेले जहागीरदार. स्वातंत्र्य चळवळीची शिकवण, लढाऊ वृत्ती विसरलेले आणि जनतेच्या आशा आकांक्षांची फिकीर नसलेले नेते सभोवती. अपवादासाठी काही जाणते वयोवृद्ध पण तेही हतबल. ही स्वतःच्या पक्षाची अवस्था.
तर समोर अटलजींसारखं सौम्य तर अडवाणींसारखं आक्रमक हिंदुत्ववादी नेतृत्व. वक्तृत्वावर पकड असलेल्या सुषमा स्वराज, हेकेखोर, विक्षिप्त पण लोकप्रिय असलेल्या उमा भारती. मॅनेजमेंटचं मूल्य राजकारणाच्या खेळात घेऊन आलेले प्रमोद महाजन यांच्यासारखे मातब्बर विरोधात. त्यांच्या जोडीला मुरली मनोहर जोशी, व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंग वगैरे हिंदुत्ववादी चेहरे विदेशी मुळाचा घंटानाद करत देशभर फिरत होते.
त्या वेळीच नेमकं जनमानसात लोकप्रिय असलेले शरद पवार, तारिक अन्वर आणि पीए संगमा ही तीन काँग्रेस कार्यकारिणीत वजन असलेल्या मंडळींना काँग्रेसच्याच निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन हवं होतं की जन्माने भारतीय असलेल्या व्यक्तीलाच संवैधानिक पदावर बसण्याचा अधिकार द्या. त्यासाठी त्यांना काँग्रेसच्या जाहीरनाम्यात राज्यघटनेत दुरुस्तीचं आश्वासन हवं होतं.
लालूप्रसाद यादव, शरद यादव, मुलायमसिंग यांचा सवतासुभा होताच. बंगाल, केरळात कम्युनिस्ट जोरावर होतेच. कारगिलचं युद्ध झालं होतं. भाजपच्या शायनिंग इंडिया कॅम्पेनला मिळणाऱ्या लोकांच्या प्रतिसादानं तर विरोधकांना धडकी भरवली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर १९९८ मधे सोनिया गांधी राजकारण्यात आल्या. त्यांनी संघटना समजून घेतली. नव्यानं बांधणी सुरू केली. पक्षावर निष्ठा असलेली, क्षमता असलेली पण आजवर दूर्लक्षित असलेली माणसं हेरून विश्वास टाकला. पदं देऊन जबाबदारीचं वाटप केलं. सबंध देश पिंजून काढला. एनडीए सरकारचं अपयश जनतेसमोर मांडलं. न थकता न डगमगता.नव्या उमेदीनं. नव्या जिद्दीनं.
हेही वाचा : गांधी घराण्यानं संन्यास घेणं हेच देशहिताचं ठरेल
भाजपशी वैचारिक मतभेद असलेले पक्ष हे पाहत होते. त्यांचं सोनियांच्या विषयीचं मत हळूहळू बदलत गेलं. ते जवळ आले. संवादातून विश्वास वाढला. संयुक्त पुरोगामी आघाडी आकार घेऊ लागली. इकडं काँग्रेस पक्षात उत्साह संचारला. एआयसीसी सदस्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांना सोनिया गांधींमुळे नवा जोश, नवा उत्साह आला. संघटना खडबडून जागी झाली. निवडणुकीला सामोरी गेली.
भाजपचे त्यावेळचे 'चाणक्य' प्रमोद महाजन देशात 'फिल गूड'चं वातावरण आहे, असं दूरदर्शनच्या, नव्या न्यूज चॅनलच्या स्टुडियोंमधून आत्मविश्वासाने सांगत होते. पंतप्रधान अटलजी कारगीलच्या युद्धात मिळवलेला विजय प्रचारसभांत अमोघ वक्तृत्वात मांडत होते. अडवाणी, जोशी, उमा भारती, सुषमा स्वराज, मुख्तार अब्बास नक्वी प्रचारसभांमधून सोनियाविरोधाची आग ओकत होते.
सोनिया गांधी शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्याचे प्रश्न न थकता प्रचार सभांमधून मांडत होत्या. दलित, आदिवाशी, अल्पसंख्यांक, महिला मतदारांना साद घालत होत्या. एका सभेत त्या म्हणाल्या, `प्रधानमंत्री का पद पाना मेरा लक्ष्य नहीं हैं. मेरा लक्ष्य हैं अपने देश की धर्मनिरपेक्ष बुनियाद को मजबूत कर देश के सर्वहारा वर्ग की सेवा करना. देश को तरक्की के रास्ते पर ले जाना. जिसके लिए श्रीमती इंदिरा गांधी और श्री राजीव गांधी जीवन की आखिरी सांस तक प्रतिबद्ध रहे.`
२००४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. सत्ताधारी भाजपाला धूळ चारत काँग्रेसनं सोनियांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला. सहा वर्षं सोनिया गांधींनी घेतलेल्या कष्टाचं चीज झालं. १६ पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. अवघ्या सहा वर्षात या सूनबाईंनी २००४चा ऐतिहासिक सत्तापालट करून दाखवला. इतर कुणी नाही, तर आजच्या आमच्यासारख्या काँग्रेस कार्यकर्त्यांनीही सोनिया गांधींकडून हे राजकारण शिकावंच शिकावं.
हेही वाचा : पालघरबद्दल मी गप्प नव्हतो, हिंदू-मुस्लिमवाली टोळी जास्त सक्रिय होती
त्याग शिकावा तर सोनिया गांधींकडूनच. लाख संकटांवर मात करत काँग्रेस उभी केली. अथक परिश्रमाने जनतेचा विश्वास संपादन केला. सत्ता मिळवली. मित्रपक्षांचा पाठिंबा मिळवला. विरोधकांचे दात घशात घातले. पण अंतरात्म्याचा आवाज ऐकून पंतप्रधानपद नाकारलं. उच्चविद्याविभूषित, सुसंस्कृत, मितभाषी पण खमका प्रशासक असलेल्या डॉ. मनमोहन सिंगांना पंतप्रधान केलं.
ही त्यागाची जातकुळी महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्याशीच जुळणारी होती. त्यांच्याकडे ती भारतीय संस्कृतीतला आदर्श राजकारणी भगवान श्रीकृष्णांकडून आली असावी. म्हणजे राज्य मिळवायचं, त्यासाठी लढायचं पण त्याचा रूबाब, लाभ, मानमरातब, पद घ्यायचं नाही. राज्य, सत्ता, अधिकार हे सेवेसाठी, या उदात्त भारतीय परंपरेचा सोनिया गांधींनी केलेला अंगिकार होता तो.
बाकी आज सोशल मीडियावरचा संघ परिवाराचे बगलबच्चे कितीही नाकं मुरडोत, तेव्हाच्या निवडणूक निकालाच्या अगोदरच सोनिया गांधींच्या नागरिकत्त्वाचा निवाडा थेट सर्वौच्च न्यायालयात झाला होता. तिथे कायदेशीर शिक्कामोर्तब झालं होतं आणि २००४च्या निवडणुकीत जनतेच्या न्यायालयातही झालं.
सोनिया गांधींकडून सत्तेचा वापर जनकल्याणासाठी कसा करावा, हेही शिकायला हवं. सलग दहा वर्षं सोनिया गांधींच्या मार्गदर्शनात केंद्र सरकार काम करत होतं. कोट्यवधी ग्रामीणांच्या हाताला काम देणारी मनरेगा, गरिबांच्या पोटाला दोन वेळचं खायला देणारी अन्नसुरक्षा, प्रशासनामधे पारदर्शकता देणारा माहितीचा अधिकार, प्रत्येकाला शिक्षणाचा कायदेशीर अधिकार देणारा शिक्षण हक्क, कोट्यवधी आदिवासींना आश्वस्त करणारा वनहक्क, शहरातील पायाभूत सुविधा वाढवणारं जवाहरलाल नगर पुनर्निमाण, वीजनिर्मितीला चालना देणारा अणुकरार, असे एक ना अनेक निर्णय सोनिया गांधींच्या दूरदृष्टीची उदाहरणं. २००८-०९ची जागतिक मंदी आपण याच काळात परतवून लावली.
सोनिया गांधींनी त्या त्या क्षेत्रातल्या अभ्यासक, विद्वानांना सरकारला मार्गदर्शन करण्याची व्यवस्था केली. सरकारला हे सल्ले ऐकून त्यावर काम करायला भाग पाडलं. हे सर्व करताना मित्रपक्षांना विश्वासात घेतलं. त्यांना सरकारमधे झुकतं माप दिलं. उत्तम प्रशासक, कुशल संघटकच आदर्श नेता असतो, असं म्हणतात. सोनिया गांधी या कसोटीवर तंतोतंत उतरतात.
हेही वाचा : राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही
राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना माफी द्यावी, अशी विनंती कोर्टाकडे करणाऱ्या सोनिया गांधी महात्मा गांधींच्या शिकवणीवरून चालताना दिसल्या. सुषमा स्वराज, उमा भारती, लालकृष्ण अडवाणी, आणि आता अमित शहा, खुद्द नरेंद्र मोदी अशा भाजपच्या दिग्गज नेत्यांपासून मनोज तिवारी, अवधूत वाघ, संबित पात्रा अशा फुटकळ नेत्यांपर्यंत सोनिया गांधींवर किती जहरी टीका, आरोप झालेत.
पण त्या कधी चिडल्या नाहीत. समोरच्या पक्षातल्या नेत्यांवर कधी वैयक्तिक टीका, आरोप केले नाहीत. परवापासून अर्णबच्या भयंकर टीकेचं वादळ उठलंय. मात्र सोनिया गांधी स्थिरचित्त. त्या काय बोलल्या, तर लॉकडाऊनमुळे १२ कोटी नोकऱ्या गेल्यात, मजुरांचे हाल होताहेत, कोरोना तपासणी किट्सचा दर्जा कसाय, वगैरे. क्षमा करणं शिकावं तर सोनिया गांधींकडूनच.
अर्णब गोस्वामी, तुम्हालाही भारत, भारतीय संस्कृती आणि परंपरा शिकायच्या असतील, तर त्या सोनिया गांधींकडूनच शिकाव्या लागतील. भगिनी निवेदिता, ऍनी बेझंट, द मदर, मीराबेन, मदर टेरेसा, सुभाष बाबूंच्या पत्नी एमिली, अशी खूप मोठी यादी आहे, भारताबाहेर जन्म घेतलेल्या पण भारतबाई झालेल्या तपस्विनीच. गांधी, विनोबा आणि विवेकानंदांचा आपला देश 'वसुधैव कुटुंबकम्' शिकवणारा आहे.
सोनिया गांधींनी देशप्रेम जगायला शिकवलं. निवडणुकांच्या प्रचारसभांत देशभक्ती किलो दोन किलोत नाही विकली त्यांनी. सोनिया गांधींनी नातं निभावायला शिकवलं. नाती तोडायला नाही शिकवलं. सोनिया गांधींनी गरिबांसाठी सत्तेचा सदुपयोग केला. धनिकांच्या तुंबड्या भरल्या नाहीत.
सोनियाजी आज अहिंसा, प्रेम, निष्ठा आणि त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण बनल्यात. म्हणूनच अर्णब सोनिया गांधींवर जहरी टीका करत होते, तेव्हा माझं काळीज रडत होतं.
हेही वाचा :
नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?
लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा
आज लेनिनचं भारताशी असलेलं नातं समजून घ्यावंच लागेल
आव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का?
कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की
पालघर झुंडबळी सत्य कळण्यासाठी सहा प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत
बेरोजगारीतही भारतातल्या मध्यमवर्गानं सांप्रदायिकतेला रोजगार बनवलं
न्यायमूर्तींनी संसदेत गेलं पाहिजे, पण गोगोईंसारखं नेमणुकीच्या दारानं नको!
(लेखक हनुमंत पवार हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रवक्ते आहेत.)