वस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय?

२६ मे २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


लॉकडाऊन चालू झाल्यापासून आपण भाजीपाला, खाद्यपदार्थांचे पॅकेट अशा गोष्टी बाहेरून घरी आणल्यावर पुसून घेतो, धुवून घेतो. तरीही यावर कोरोना वायरस नसेल ना ही भीती आपल्याला खात असते. यासंबंधी अमेरिकेतल्या सरकारी संस्थेनं यासंबंधी नागरिकांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्व जाहीर केलीत. वस्तूंना किंवा कुठल्याही सामानाला, जागेला हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याचा धोका किती असतो, यासंबंधीची ही माहिती आहे.

कोरोना वायरस काय करतो, काय खातो, काय पितो आणि कसा राहतो याचा विचार करण्यात आपले लॉकडाऊनमधला एक एक दिवस निघून जातोय. त्याच्या या प्रभावामुळे आता आपण खाताना, पिताना, राहताना दबकून राहतोय. बाहेरून आणलेल्या खाद्य पदार्थ्यांच्या पॅकेटवर तर कोरोना वायरस नसेल ना, भाज्यांवर नसेल ना, माझ्या अमेझॉनवरून आलेल्या पार्सलवर नसेल ना अशी भीती आपल्याला वाटत राहते. चहाचा कप तोंडाला लावताना मनात भीतीचं काहूर माजलेलं असतं.

कोरोना वायरस हा दोन मार्गांनी पसरतो असं म्हटलं जातं. एकतर, कोरोना वायरसची लागण झालेल्या माणसाच्या संपर्कात आल्यामुळे. आणि दुसरा मार्ग म्हणजे एखाद्या वस्तूवर किंवा जागेवर कोरोना वायरस असेल आणि त्या वस्तूला, जागेला आपला हात लागला तर आपल्या हातामार्फत ते नाक, डोळे, तोंड यांच्या माध्यमातून शरीरात जातात. संबंध जगाने हे दोन मार्ग मान्य केले.

त्यामुळेच, बाहेरून घरी आणलेल्या वस्तू धुवून घेणं, पुसून घेणं, भाज्या सोडा घातलेल्या पाण्यात धुणं अशी सगळी खबरदारी आपण घेत होतो. पण अमेरिकेतल्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल म्हणजे सीडीसी या संस्थेने २२ मेला नवी मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केलीत. यानुसार, वस्तू किंवा जागांमार्फत कोरोना वायरसची लागण होण्याची शक्यता अत्यंत कमी प्रमाणात आहे किंवा होतच नाही, असं सांगण्यात आलंय.

हेही वाचा : कोरोनाची जुनी-नवी लक्षणं कोणती? त्यांच्यापासून संरक्षण कसं करायचं?

काय म्हणालं सीडीसी?

सीडीसी ही अमेरिकतले रोग नियंत्रणाचं काम करणारी सर्वोच्च सरकारी संस्था आहे. कोरोनाच्या काळात सीडीएसच्या वेबसाईटवर जगभरातले लोक येऊन आज काय नव्या सूचना आहेत, हे शोधत असतात. वाचणाऱ्यांना लगेचच माहिती मिळावी म्हणून काही फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेशन्स म्हणजे सहसा सगळ्यांना पडणाऱ्या प्रश्नांची एफएक्यूची उत्तरं वेबसाईटवर दिलेली असतात. सीडीसीच्या वेबसाईटवरही असे काही एफएक्यू आहेत. कोरोना वायरस कसा पसरतो असा त्यातला एक प्रश्न होता. काही दिवसांपूर्वीपर्यंत याचं उत्तर म्हणून सीडीसीने वर सांगितलेले दोन्ही मार्ग लिहिले होते.

मात्र २१ मेच्या रात्री म्हणजे आपल्याकडे २२ मे चालू होता तेव्हा या उत्तरात थोडासा बदल करण्यात आला. कोरोना वायरस हा प्रामुख्याने माणसांकडून पसरतो. एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला याची सहज लागण होते, असं लिहिलं गेलं. तर त्याखाली दुसऱ्या मथळ्याखाली कोरोना वायरस वस्तू, जागा अशा पृष्ठभांगावरून सहज पसरत नाही, असं स्पष्ट करण्यात आलं.

'कोरोना वायरस असलेल्या पृष्ठभागाला किंवा वस्तूंना हात लागला आणि तसा हात आपण डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला लावला तर त्यामुळे वायरसची लागण होण्याची शक्यता आहे. पण हा वायरस पसरण्याचा मुख्य मार्ग नाही. आपण वायरसबद्दल अजून माहिती मिळवत आहोत,’ असं या वेबसाईटवर लिहिण्यात आलंय.

हेही वाचा : कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

एन्फ्लुएनझापेक्षा झटकन पसरतो कोरोना

कोणत्या प्रकारच्या गोष्टीवर वायरस किती काळ राहतो, याचं संशोधन खरंतर अजून पूर्ण झालेलं नाही. न्यू इंग्लंड जरनल ऑफ मेडिसिनमधे प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनातून कोरोना वायरस प्लॅस्टिक, स्टील अशा गोष्टींवर तीन दिवस आणि कार्डबोर्डवर २४ तास सक्रिय राहतो, असं सांगण्यात आलं.

पण जपानमधल्या एका जहाजावरून प्रवाशांना खाली उतरवल्यानंतर १७ दिवसांनी कोरोना वायरसचे काही जेनेटीक मटेरीअल किंवा एकप्रकारे त्याचे काही अवयव दिसून आल्याचा हवाला सीडीसीनंच दिला होता. पण दोन्हीपैकी कुठल्याही संशोधनातून कोरोना वायरस पृष्ठभागातून पसरतो हे पक्कं सांगण्यात आलं नव्हतं.

हीच भूमिका आता सीडीसीनं जगजाहीर केलीय. शिवाय, प्राण्यांकडून माणसांकडे पसरण्याचंही प्रमाण कमी झाल्याचं सीडीसीनं स्पष्ट केलंय. आता वायरस एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जाण्याची शक्यताच जास्त आहे, असं सीडीसीचं म्हणणं आहे.

‘कोरोना वायरसबद्दल आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीवरून हा वायरस एन्फ्लुएनझा वायरसपेक्षा जास्त वेगाने पसरतोय. गोवरचे वायरस सगळ्यात झटकन पसरतात. त्याच्याइतका कोरोना वायरस झटकन पसरत नाही,’ असंही सीडीसीच्या वेबसाईटवर सांगण्यात आलंय.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

आपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

आम्ही हेच तर सांगत होतो

प्लॅस्टिकच्या पिशवीवर कोरोना वायरस तीन दिवस जगतो. कापडावर १८ तास जगतो. लोखंडावर ४८ तास सक्रिय असतो वगैरे वॉट्सअप फॉरवर्ड मध्यंतरी फार गाजत होते. यावर आपल्यापैकी अनेकांनी विश्वासही ठेवला होता. हा वॉट्सअप फॉरवर्ड तर फेक होताच. मात्र, आपण घरी आणलेल्या भाज्यांवर, होम डिलिवरीच्या पॅकेटवर कोरोना वायरस असू शकतो, असं म्हटलं जात होतं. त्याला सीडीसीनेही दुजोरा दिला होता.

कोरोना वायरस बाहेरून घरात येणाऱ्या वस्तूंवर असू शकतो हे जवळपास सगळ्याच तज्ञांनी मान्य केलं होतं. मात्र आता सीडीसीनं अचानकपणे हे अमान्य केल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. पण खरंतर, सीडीसीची भूमिका पहिल्यापासूनच अशीच असल्याचं न्यूयॉर्क टाइम्सच्या एका बातमीत म्हटलं गेलंय. सीडीसीतल्या संशोधकांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या मुलाखतीत किंवा प्रतिक्रियांमधे कोरोना वायरस वस्तूंपेक्षा जास्त माणसांकडून पसरण्याचा धोका जास्त आहे, असं वारंवार सांगितलंय.

तसंच, विज्ञानात अनेकदा गोष्टींवर पूर्णपणे शिक्कामोर्तब होण्याआधीच गोष्टी जाहीर केल्या जातात. कोरोनाचे वायरस पसरतात की नाही याची चाचणी किंवा त्याबद्दलचं संशोधन पूर्ण होण्याची वाट पाहत बसलो असतो तर त्या माध्यमातून अनेकांना त्याची लागण झाली असती. त्यामुळेच शंका आल्याने संशोधकांनी लगेचच ती गोष्ट जाहीर केली. मात्र, आता व्यवस्थित संशोधन झाल्यावर वस्तूंवर किंवा एखाद्या जागेवर कोरोना वायरस इतका सक्रीय राहू शकत नाही हे स्पष्ट झालं.

हेही वाचा : कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

कोरोनाचा हायवे कोणता?

पृष्ठभागावरून वायरस पसरतच नाही, असं सीडीसीचं म्हणणं नाही. मात्र, त्याची शक्यता कमी असल्याचं सीडीसीनं मान्य केलंय. याउलट वायरसची लागण झालेल्या माणसाच्या संपर्कात येणं हे कोरोना पसरण्याचं महत्त्वाचं माध्यम आहे, असं सीडीसी सांगतंय. फॉक्स न्यूजवर आलेल्या एका लेखात साथरोगतज्ञ विल्यअम शॅफनर म्हणतात, ‘एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला होणारी लागण ही हायवे सारखी असते. तिथे मधलं ट्रॅफिक गाळलं जातं आणि सरळ आपल्या ध्येयाकडे पोचण्याचा वायरसचा मार्ग सोपा होतो. तर, पृष्ठभागाला हात लावल्यामुळे झालेला वायरस हा एखादी छोटी गल्ली पकडून जाण्यासारखा असतो. मधे खूप ट्रॅफिक लागतं. त्यामुळे वायरस त्याच्या ध्येयापर्यंत पोचायची शक्यता खूप कमी होते.’

कोरोना वायरस हवेतून पसरतो, असाही एक गैरसमज आहे. हवेतून तरंगत तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो किंवा कोरोना वायरसची लागण झालेली व्यक्ती एखाद्या जागेवरून गेली की त्यातून वायरस बाहेर पडून हवेत तरंगत राहतो असं काही जणांना वाटतं. पण हे अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारे हवेतून संक्रमण होण्याचा धोका फक्त ऑपरेशन थिएटर, आयसीयू अशाच ठिकाणी असतो, असं डब्लूएचओमधले डॉक्टर स्वामीनाथन यांनी स्पष्ट केलंय.

कोरोनाची लागण झालेला माणूस शिंकला किंवा खोकला तर त्यातून उडणाऱ्या तुषारांमुळे ही लागण होऊ शकते. किंवा लक्षणं न दाखवणारे पेशंट खूप जवळ उभे असले तरी त्यांच्यामुळे लागण होते. म्हणूनच माणसा माणसांत निदान सहा फुटांचं अंतर ठेवण्याची गरज आहे. याचसोबत, हातावरून कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी झाला असला तरी आपण आपले वारंवार हात धुण्याची सवय सोडायला नको, असं सीडीसीनंही सुचवलंय.

हेही वाचा : 

लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार का बनलाय?

कोविड टो म्हणजे काय? हे कोरोनाचं नवं लक्षण आहे का?

पाणी लावल्यावर कुराणातली आयात दिसणारी मशीद पाहिलीय?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

लॉकडाऊननंतर आपण महाराष्ट्रातल्या शाळा कसं सुरू करू शकतो?

कोरोनाः विटॅमिन डीची कमतरता वाढत्या मृत्यूदराला कारणीभूत आहे?

WHOनं सांगितलेल्या खाण्यापिण्याबद्दलच्या पाच टिप्स भिंतीवर चिकटवा

लग्नासाठीची जमापुंजी खर्चून रिक्षाचालक अक्षय भागवतोय रोज चारशे जणांची भूक

ज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी!