चीनसोबतच हाँगकाँग, विएतनाम आणि दक्षिण कोरियामधे कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढतेय. चीनमधल्या दहा शहरांमधे कडक लॉकडाऊन लावलाय. जवळपास १० कोटी लोकसंख्या घरात बसली असल्याचा अंदाज आहे. कोरोनावॅक ही चिनी लस कोरोनावर पुरेशी परिणामकारक ठरली नव्हती, असा युरोपियन आणि अमेरिकन आरोग्य यंत्रणेचा दावा होता. तो खरा ठरताना दिसतोय.
रशिया-युक्रेन युद्ध, पाच राज्यांच्या निवडणुका, 'झुंड', 'काश्मीर फाईल्स'मुळे झालेले वादविवाद या सर्व गदारोळात दोन बातम्या मात्र दुर्लक्षित झाल्या. यातली पहिली बातमी म्हणजे ‘लवकरच पुन्हा एकदा जगात कोरोनापेक्षा वेगळी महामारी येण्याची शक्यता आहे.’ हे सुप्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांचं एक विधान. दुसरी बातमी म्हणजे पुन्हा एकदा चीनमधे वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या.
साधारणपणे डिसेंबर २०१९मधे चीनमधे कोरोना संसर्गाची सुरवात झाली होती. पण जगाला याची खबर लागेपर्यंत फेब्रुवारी २०२० उजाडलं. याचं मुख्य कारण म्हणजे चीनमधे असणारी यंत्रणा. ही यंत्रणा माहिती जाहीर करण्याची आणि फक्त ठराविक लोकांपर्यंतच ती पोचवण्याची काळजी घेते.
भारत, अमेरिका किंवा छोट्या युरोपियन देशांत पहिल्या, दुसर्या लाटेत रोज लाखो रुग्ण सापडत असताना चीनमधे संपूर्ण दोन वर्षांत फक्त सव्वा लाखच रुग्णांची नोंद केलीय; तर मृत्यू पाच हजारच्या आसपास दाखवलेत. त्यामुळे चीनमधली कोरोनाची खात्रीलायक माहिती मिळवणं किती अवघड आहे, हे दिसून येतं. यावेळी मात्र मार्च महिन्यात पुन्हा चीनमधे कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येतेय.
१५ मार्चला तिथं ५,२८० रुग्ण सापडले आणि ही संख्या रोज दुपटीने वाढतेय. यातल्या बहुसंख्य केस ईशान्य चीनच्या जिलिन प्रांतात आहेत. पण दोन कोटी लोकसंख्या असलेल्या दक्षिणेकडच्या टेक हब शेन्झेनसह देशभरातल्या इतर शहरांमधे कडक लॉकडाऊन लावलाय. तिथल्या प्रत्येक सोसायटीला कुलूपबंद केलंय. रहिवाशांना फक्त पीसीआर चाचणीसाठी जाण्याची परवानगी आहे. व्यवसाय बंद करण्याचे किंवा घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत.
चीनशेजारच्या हाँगकाँग, विएतनाम आणि दक्षिण कोरियामधेही रुग्णसंख्या वाढतेय. दक्षिण कोरियामधे १५ मार्चला एका दिवसात २४० रुग्ण ओमायक्रॉनमुळे दगावल्याचं दिसून आलंय. आश्चर्य म्हणजे दक्षिण कोरियामधे लसीकरणाला फारच कमी प्रतिसाद मिळाला होता. या उलट परिणाम आता दिसून येऊ लागलाय. या देशांतल्या रुग्ण वाढीमागे स्टील्थ ओमायक्रॉन म्हणजेच ओमायक्रॉनचा इ-२ हा वेरियंट असल्याचा दावा तिथल्या सरकारी यंत्रणांनी केलाय.
आज चीनमधल्या दहा शहरांमधे कडक लॉकडाऊन लावलाय. आता जवळपास १० कोटी लोकसंख्या घरात बसली असल्याचा अंदाज आहे. या वाढणार्या रुग्णांमधे गंभीर आणि अतिगंभीर केस आता अपरिहार्यपणे वाढतायत. तरीही या शहरांत ३० टक्क्यांहून अधिक आयसीयू उपलब्ध आहेत. इथल्या संपूर्ण विश्लेषण केलेल्या केसपैकी २६.३ टक्के ओमायक्रॉनच्या इ-२ प्रकारातल्या आहेत.
हा वेरियंट अधिक संक्रमणीय असून, तो या देशांना पुन्हा महामारीच्या शिखरावर घेऊन जाऊ शकतो. सध्या एक ते दोन आठवड्यांच्या आत पुन्हा तिथं कोरोना शिखरावर जाण्याचा अंदाज वर्तवला गेलाय. १४ मार्चपर्यंत मुख्य चीनमधे खात्रीलायक लक्षणांसह १२०,५०४ केस नोंदवल्या गेल्यात, ज्यात स्थानिक आणि मुख्य भूमीच्या बाहेरून आलेले दोन्ही समाविष्ट आहेत.
हेही वाचा: कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत
चीनमधे कोरिया, हाँगकाँगच्या तुलनेत सर्वात जास्त लसीकरण झालंय. तिथं लस न घेणार्या लोकांचं प्रमाण खूपच कमीय. चीनमधे २०० कोटींपेक्षा अधिक लसीचे डोस दिले असून, ही लस चीनमधेच बनवली गेलीय. चीनच्या ९९ टक्के प्रौढ लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळालेत. याउलट कोरियामधे हेच प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमीय. या देशांमधे पुन्हा सक्तीचं लसीकरण सुरु झालं असून, चीनमधे बूस्टर डोस देण्याचं नियोजन सुरु झालंय.
कोरोनावॅक ही चिनी लस कोरोनावर पुरेशी परिणामकारक ठरली नव्हती, असा युरोपियन आणि अमेरिकन आरोग्य यंत्रणेचा दावा होता. तो खरा होताना दिसून येतोय. हीच लस ओमायक्रॉनवरही कमी परिणामकारक असेल, असं सध्या तरी दिसून येतंय. त्यामुळे तिथं पुन्हा बूस्टर डोसची गरज लागणार आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू होणार्या लोकांमधे वृद्ध लोकांचं प्रमाण अधिक आहे आणि जवळपास या सर्व लोकांनी लस घेतलेली नाही.
जगातले इतर देश आणि भारताचा विचार केला, तर सध्यातरी याचा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता नाही. युरोप, अमेरिका, भारत, ब्राझील आणि आफ्रिकन देशांमधे कोरोनाच्या दोन ते तीन मोठ्या लाटा येऊन गेल्या आहेत. या देशांमधे लसीकरणाचं प्रमाण अधिक आहे. ओमायक्रॉनच्या लाटेनंतर आफ्रिकन देशांमधेही लसीकरणाचा वेग वाढलाय.
युरोप-अमेरिकेत लसीचे तीन डोस बहुतांश लोकसंख्येला मिळालेत. लसीबरोबर करोडो लोकांना कोरोनाचा संसर्गही होऊन गेल्याने प्रतिकारशक्तीचं दुहेरी कवच लोकांना मिळालंय. त्यामुळे भारत आणि इतर युरोपियन देशांमधे पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल, याची अजिबात शक्यता नाही. जरी या देशांमधे रुग्णांची संख्या वाढली तरी मृत्यूदर मात्र कमीच राहील. त्यामुळे लोकांनी आणि सरकारी यंत्रणेने लगेच घाबरून जाण्याची गरज नाही.
हेही वाचा: कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
अर्थव्यवस्थेचा विचार केला, तर चीनमधल्या काही भागात लावलेल्या लॉकडाऊनमुळे बर्याच वस्तूंचा पुरवठा थांबण्याची शक्यता दिसून येतेय. यात विशेषतः इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश असेल. त्याचबरोबर मोबाईलचेही अनेक छोटे छोटे पार्ट महाग होण्याची शक्यता दिसून येतेय. सुमारे एक तृतीयांश जागतिक उत्पादनाचं घर असलेल्या चीनमधल्या लॉकडाऊनमुळे टोयोटा, फोक्सवॅगन, अॅप्पल तसंच सर्किट बोर्ड आणि संगणक केबलसारख्या घटकांच्या उत्पादनात व्यत्यय येतोय.
लॉकडाऊनमुळे दक्षिण चीनच्या इलेक्ट्रॉनिक कारखान्यांचं आणि मध्य चीनमधल्या औद्योगिक कंपन्यांचं कामही थांबवलं गेलंय. शांघायजवळच्या शहरांनी महामार्गावर प्रत्येक ड्रायव्हरने निगेटिव पीसीआर चाचणी रिपोर्ट दाखवण्याची मागणी केलीय. अनेक कारखान्यांमधे महत्त्वाचा कच्चा माल पुरवणार्या ट्रकच्या मैलोन् मैल लांब रांगा लागल्या आहेत.
यातली दिलासादायक गोष्ट म्हणजे खनिज तेलाच्या किमती. चीनमधल्या लॉकडाऊनमुळे तिथल्या तेलाची मागणी कमी झाल्याने जागतिक बाजारात तेलाच्या किमती मागील दोन आठवड्यांतल्या सर्वात कमी किमतीवर आहेत. पण याचा फायदा भारताला कितपत होईल हे आपल्या सरकारी धोरणावर अवलंबून असेल. तसेच या किमती कमी वेळासाठीच खाली राहतील आणि पुन्हा उसळी घेतील, अशी शक्यता आहे.
चीन आणि आसपासच्या देशातली कोरोना रुग्णांची वाढती संख्या प्रवासावरही निर्बंध आणू शकते. सध्या भारतामधून या देशात फारच कमी आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक होत असली, तरी युरोपियन देशांमधे इथून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरुय. एप्रिल २०२०मधे इटलीत कोरोनाची लाट येण्यामागे चीनमधून आलेले प्रवासी कारणीभूत होते, तशाच प्रकारची स्थिती होऊ शकते. पण आताच्या आणि त्यावेळच्या परिस्थितीमधे खूप मोठा फरक आहे.
जर युरोपियन देशांमधे पुन्हा प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आले, तर त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम भारतातल्या आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर होईल. याचबरोबर तेल आणि इतर वस्तूंची ने-आण करणार्या जहाजांचीही वाहतूक मंदावलीय. चीनमधल्या निर्बंधामुळे जगातल्या अनेक बंदरांवर जहाजांची ने-आण १२ तास विलंबाने होताना दिसून येतेय. त्यामुळे चीनमधल्या सध्या वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे इतर देशातल्या आरोग्य यंत्रणेपेक्षा त्या देशातल्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
जिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू!
नाहीतर आपल्या अर्थव्यवस्थेचं खरं नाही!
बेरोजगारी कमी करण्यासाठी शेतीक्षेत्र खुलं करायला हवं!
बेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र