कोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात?

१६ सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


कोरोना वायरसचं संक्रमण सुरू झाल्यापासून आपल्यापैकी बहुतेकांचं जगणं बदललंय. याचा परिणाम झोपेत पडणाऱ्या स्वप्नांवरही होतोय. गेल्या काही दिवसांपासून विचित्र स्वप्नं पडत असल्याचं अनेकांनी नोंदवलंय. हसू यावं किंवा भीती वाटावी अशी ही स्वप्न साथरोगाबद्दलचं नवं वास्तव आपल्यासमोर आणतायत.

‘मी बसने प्रवास करत होतो. सगळ्यांनी तोंडावर मास्क घातला होता. खूप गर्दीची बस असूनही मी त्यात चढलो. चढताना बसच्या हॅण्डलला स्पर्श केला. पुढे सीटला हात लावला. खिडक्यांना हात लावला. या गोष्टींना हात लावल्याने मला कोरोनाची लागण होऊ शकते हे मला कळत होतं. तरीही हात लावण्यापासून मी स्वतःला थांबवू शकत नव्हतो, असं मला स्वप्नात दिसलं.’

‘मी माझ्या आवडत्या मसाज पार्लरमधे गेलीय असं स्वप्न मला पडलं होतं. कोरोना नंतर पहिल्यांदाच ते उघडलं होतं आणि पहिल्यांदा मीच गेले होते. कोरोनासाठी घालतात तसा हॅझमेट पीपीई सूट आणि गॅस मास्क घातला तरच मला मसाज केला जाईल असं तिथे कळालं. स्वच्छता आणि सुरक्षेसाठी अशा आणखी अनेक गोष्टी तिथे करायला लागत होत्या. तिथे काम करणारे सगळे कर्मचारी खूप उदास दिसत होते.’

अशी विचित्र, भडक, रानटी स्वप्नं. आठवल्यावर भीती वाटावी किंवा हसू यावं अशी ही स्वप्नं आपल्याला अनेकदा पडतात. त्यात कधी कुणाचा तरी मृत्यू झालाय, असंही आपल्याला दिसतं. आपले दात पडतायत, आपण कुरूप होतोय, जंगलातला वाघ, सिंह, बिबट्या असा एखादा रानटी प्राणी आपल्या मागे लागलाय, कुणीतरी आपला पाठलाग करतंय आणि आपल्याला पळता येत नाहीय, असं काहीही या स्वप्नात दिसतं. वास्तवाशी याचा काहीही संबंध नसतो.

अशी भयानक, विचित्रं स्वप्न दिसणारे आपण एकटे नाही. साथरोगाच्या काळात आपल्या देशातल्याच नाही तर जगातल्या बहुतांश लोकांना अशी विचित्र स्वप्नं पडतात असं समोर आलंय. गेल्या काही महिन्यांपासून ‘मला आजकाल विचित्र स्वप्नं का पडतात?’ हा प्रश्न गुगलवर सर्वाधिक विचारला जातोय. अनेक माणसं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांना पडणारी ही विचित्र स्वप्नं त्यांच्या मित्र मैत्रिणींशी शेअर करतायत. त्यावर चर्चा होतेय. कमेंट सेक्शन अशाच विचित्र स्वप्नांच्या गोष्टींनी भरभरून वाहतोय. साथरोगाचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय. ही स्वप्नं त्याचाच एक भाग आहेत.

हेही वाचा : कोविड साथीचा हाहाकार अचानक का वाढला?

स्वप्नं का पडतात?

स्वप्नं म्हणजे झोपेत होणारे भ्रम. आपण साधारण ७-८ तासांची झोप घेतो. या ८ तासात आपण दोन प्रकारची झोप घेत असतो. एक आरईएम म्हणजे रॅपिड आय मुव्हमेंट आणि दुसरी नॉन आरईएम. आरईएम प्रकारात आपल्या डोळ्यांची अतिशय पटापट हालचाल होत राहते. तर नॉन आरईएम प्रकारात आपले स्नायू मोकळे होतात, नवीन पेशी तयार होतात. आपण झोपल्यावर पहिल्यांदा नॉन आरईएम स्टेजमधे असतो, नंतर आरईएम, नंतर पुन्हा नॉन आरईएम असं आलटून पालटून बदलत राहतं.

यापैकी आरईएम प्रकारात पडलेली स्वप्नं आपल्याला खूप स्पष्टपणे, व्यवस्थित आठवतात. काही मानसशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तर आपण झोपलो असलो तरी आपल्या मेंदूचे काही भाग चालू असतात. त्यामुळे आपल्याला रोज, सतत स्वप्नं पडतच असतं. पण आरईएम स्टेजमधे आपल्या मेंदूचे इतरवेळी निवांत असलेले भागही चालू होतात. त्यामुळे या स्टेजमधे पडलेली स्वप्नं आपल्या चांगली लक्षात राहतात, अशी माहिती सायकोलॉजी टुडे या वेबसाईटवर देण्यात आलीय.

स्वप्नं पाहिलेलं नाही असं या जगात कुणीही असणार नाही. अगदी लहानपणीही आपल्याला स्वप्नं पडत असतात. या स्वप्नांवर अनेक मानसशास्त्रांनी अनेक प्रकारे संशोधन केलंय. पण तरीही ‘आपल्याला स्वप्नं नेमकी पडतात तरी का?’ या प्रश्नाचं ठोस उत्तर आजही आपल्याला मिळालेलं नाही. काहींच्या म्हणण्यानुसार गुंतागुंतीच्या अवघड भावना आणि अनुभव व्यक्त कऱण्यासाठी मेंदू स्वप्नांचा वापर करत असतो. तर काहींच्या मते, आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी स्वप्नांचा उपयोग होतो.

आपल्या जीवनपद्धतीचा, आपल्या खाण्यापिण्याचा आणि जागेपणी असलेल्या आपल्या मेंदूच्या आरोग्याचा परिणाम स्वप्नांवर होत असतो. नैराश्य किंवा अतिकाळजीनं मन आजारी असेल तर भयानक स्वप्नं पडण्याचं प्रमाण वाढतं. एखादं संकट आलं किंवा भयानक काही झालं की आपण दिवसभर त्याचा विचार करतो आणि तिच गोष्ट रात्री अतिकाळजी बनून आपल्या स्वप्नात येते. कोरोना वायरसची लागण होऊ नये यासाठी सतत मास्क लाऊन, ६ फुटांचं अंतर ठेवून समाजात वावरणं हे आपल्या रोजच्या जगण्यापेक्षा थोडं भयानकच आहे.

धोक्याची उपमा कोणती?

अमेरिकेतल्या हार्वर्ड युनिवर्सिटीत काम करणाऱ्या मानसशास्त्रज्ञ डियर्ड्रे बॅरेट गेल्या अनेक वर्षांपासून स्वप्नं या विषयावर काम करतात. कोरोना काळात पडणाऱ्या स्वप्नांची माहिती गोळा करण्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी एक सर्वेक्षण केलं होतं. तुम्हाला पडणारी कोणती स्वप्न कोरोना वायरसशी संबंधित आहेत असं तुम्हाला वाटतं त्याबद्दल या सर्वेक्षणात माहिती विचारली होती. जगातल्या ३,७०० जणांनी त्यात सहभाग घेतला होता. त्यातून त्यांना ६ हजार स्वप्नांविषयी माहिती मिळाली.

‘माझ्याकडे जमा झालेल्या स्वप्नांमधे काही स्वप्नं ही थेट कोरोना वायरसची लागण झालीय असं सांगणारी होती. कोरोनाची लक्षणं म्हणून ज्याचा सर्वाधिक बोलबाला असतो ती लक्षणं आपल्याला दिसतायत, असं अनेकांना स्वप्नात दिसलं. श्वास घ्यायला त्रास होतोय, ताप आलाय असं काहींना दिसत होतं. एका बाईनं तर तिच्या पोटावर निळे पट्टे उठले असल्याचंही स्वप्नात पाहिलं. तर काही स्वप्नांमधे कोरोना वायरसला दुसरी कशाची तरी उपमा दिली गेली होती.’ असं त्यांनी हार्वर्ड मेडिकल गॅझेटला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलंय.

कोरोनासारख्या धोक्याची कल्पना करणं, त्याला काहीतरी रूप देणं अवघड असतं. धोका ही आकार, रंग, वास नसणारी अदृश्य गोष्ट आहे. अशा गोष्टींची काहीतरी उपमा वापरून कल्पना केली जाते. विषारी गॅसचा अटॅक, मोठी लाट येणं असं दिसतं. बहुतेकांना स्वप्नात किडा आल्याचं दिसतं. या सगळ्या धोक्याला दिलेल्या उपमा असतात, असंही त्यापुढे म्हणाल्यात.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोना वायरसच्या वेगवेगळ्या टेस्ट कोणत्या?

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

कोरोनाची लागण झालेल्याच्या संपर्कात आल्यावर काय करायचं?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

मानसिक धक्का बसणाऱ्यांची स्वप्न

या किडा दिसणाऱ्या स्वप्नांना बग ड्रीम असं म्हणतात. अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ ला झालेल्या एका मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतरही बॅरेट लोकांच्या स्वप्नांचा अभ्यास केला होता. हल्ल्याचा परिणाम अनेक लोकांच्या मनावर झाला होता. पण तेव्हाही बग ड्रीमचं परिणाम फारसं नव्हतं. कोरोनाच्या काळात मात्र जगात जितके किडे, किटक, अळ्या, असतील त्या सगळ्या लोकांच्या स्वप्नात येऊन गेल्या आहेत. 

ही सगळी स्वप्न आत्ताच का पडतायत याचंही एक वेगळं कारण बॅरेट यांच्या सर्वेक्षणातून पुढे आलंय. सध्या कोरोनामुळे बहुतांश लोक घरातून काम करतायत. डेडलाईन्, श्वास घ्यायलाही वेळ न देणारं नियोजन या सगळ्यातून त्यांना सुटका मिळालीय. ऑफिसला जायचा यायचा, त्यासाठी तयार होण्याचा वेळ वाचतोय. साहजिकच या वाचलेल्या वेळात लोक जास्त झोप घेतायत. झोप जास्त घेतल्यामुळे आरईएमचा काळही वाढतोय आणि म्हणूनच जास्तीत जास्त स्वप्नं लोकांच्या लक्षात राहतायत.

ही झाली सामान्य माणसांची स्वप्नं. पण आयसीयू किंवा हॉस्पिटलमधे कोरोना पेशंटसोबत काम करणाऱ्या नर्सेस, डॉक्टर यांना यापेक्षा फार वेगळी स्वप्नं पडतायत, असं बॅरेट म्हणतात. त्यांच्या स्वप्नात किडे वगैरे येत नाहीत तर आपण एखाद्या मरणाऱ्या पेशंटला वाचवण्याचा प्रयत्न करतोय, त्याला वेंटिलेटर लावतोय पण ते मशीन चालू होत नाहीय, अशा प्रकारची भयानक स्वप्नं दिसतात. दररोज आपल्यासमोर मरणारे पेशंट पाहून त्यांना मोठा मानसिक धक्का बसला असू शकतो. ही पोस्ट ट्रॉमॅटिक डिसीजची सुरूवात असू शकते, असं बॅरेट यांचं म्हणणं आहे.

भारतातल्या माणसांना झोपच नाही

बॅरेट यांच्यासारखं स्वप्नावरचं सर्वेक्षण भारतात आजपर्यंत झालेलं नाही. पण कोरोना वायरसच्या भीतीमुळे भारतात लोकांच्या स्वप्न बघण्याच्या नाही तर झोपण्याच्या पद्धतीतच बदल झाला असल्याचं समोर आलंय. पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेत रिसर्च असोसिएट म्हणून काम करणाऱ्या प्रणिता जगताप यांनी दुसरा लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा म्हणजे साधारण १५ एप्रिलनंतर लोकांच्या झोपेचा पॅटर्न तपासण्यासाठी एक सर्वेक्षण केलं होतं. या ऑनलाईन सर्वेक्षणानुसार, ४१ टक्के लोकांनी काळजीमुळे किंवा भीतीमुळे नीट झोप लागत नसल्याचं समोर आलंय. तर उरलेल्या ५९ टक्के लोकांना व्यवस्थित झोप मिळतेय, असं जगताप यांनी कोलाजशी बोलताना सांगितलं.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांपैकी अनेकांनी खूप ताण, भीती, असुरक्षितता, काळजी वाटत असल्याचं सांगितलं. यातून बाहेर पडण्यासाठी ते आपापल्या पातळीवर प्रयत्न करतायत. पण एकूणातच या लोकांनी आपल्या व्यवसाय, करियर, जॉब, कुटुंब याबाबतीत काळजी वाटत असल्याचं या सर्वेक्षणात सांगितलं होतं. त्यांचं सर्वेक्षण उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय लोकांपर्यंत मर्यादित होतं.

मात्र, सर्वच स्तरातल्या लोकांमधेही झोप नसल्याचं पुण्यातल्याच कमला नेहरू सरकारी हॉस्पिटलमधे मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करणारे डॉक्टर किरण चव्हाण सांगतात. ‘सरकारी हॉस्पिटल आणि लॉकडाऊनच्या सुरवातीला स्थलांतर करणाऱ्या मजुरांसाठी जी शेल्टर बांधली होती तिथे येणाऱ्या बहुतांश लोकांना खायचं काय, जगायचं कसं या प्रश्नानं ग्रासलेलं होतं. या प्रश्नापुढे त्यांना कोरोना काहीच वाटत नव्हता. पोटाच्या प्रश्नामुळे त्यांना व्यवस्थित झोपही लागत नव्हती,’ असं डॉक्टर चव्हाण म्हणाले.

हेही वाचा : कोरोनाची लागण झालेल्याच्या संपर्कात आल्यावर काय करायचं?

स्वप्नांवर नियंत्रण कसं ठेवायचं?

कोरोना वायरसनं सगळ्यावरच परिणाम केलेत. डबघाईला आलेली जागतिक अर्थव्यवस्था, बुडलेले व्यापार, थांबलेली शिक्षणव्यवस्था या सगळ्यामुळे आपल्या जागेपणीच्या स्वप्नांवर खोल आघात झाले आहेतच. आता निदान झोपल्यावर येणाऱ्या स्वप्नांवर कोरोना वायरसला परिणाम करून द्यायचा नसेल तर काही सोपे मानसिक व्यायाम करावे लागतील.

एक सोपा व्यायाम म्हणजे आपल्या स्वप्नांची डायरी लिहिणं. एखादी वही घालून त्यात झोपेतून उठल्यावर लगेचच पडलेलं स्वप्न लिहून ठेवता येईल. याने आपल्या मन मोकळं व्हायला मदत होतं. 

याशिवाय, आपल्याला झोपेत कोणतं स्वप्न पहायला आवडेल याचा विचार करून ते लिहून काढावं लागेल. आपण उडावं असं स्वप्न पडत असेल तर खरोखरच आपण उडत आहोत अशी कल्पना करायला हवी. विशेषतः झोपण्याच्या आधी या गोष्टीचा विचार खूप करायला हवा.

१९४० मधे युद्धात नाझी जर्मनीनं ब्रिटिशांचे काही सैनिक कैदी केले होते. त्यापैकी केनेथ हॉपकिन्स यांनी दोन वर्ष आपल्यासोबतच्या इतर कैद्यांची स्वप्नं लिहून ठेवली होती. या सगळ्या कैद्यांना जेवण, कपडेलत्ते मिळत होते. ज्यूंच्या कॅम्पपेक्षा त्यांची अवस्था फारच बरी होती. फक्त एकमेकांशी बोलण्यावर आणि हालचालींवर काही निर्बंध होती. तरीही दोन वर्षांत कोणत्याही कैद्याला आपण जेलमधून सुटण्याचा प्रयत्न करत आहोत, असं स्वप्न पडलं नव्हतं. फक्त दोन कैद्यांना दररोज हे स्वप्न पडत होतं. आणि खरोखरच त्यांना तिथून पळ काढण्यात यश आलं.

या कैद्यांसारखेच आज आपण घरात कैद झालो असलो, कैद्यांप्रमाणेच जेवण कमी मिळत असेल, हालचालींवर निर्बंध आले असतील, आपल्या मित्रमैत्रिणींना भेटता येत नसेल तरी त्या दोन कैद्यांप्रमाणे आपण कसं असावं याबद्दलचीच स्वप्न बघत राहिलो तर ते खरोखर मिळवू शकू.

हेही वाचा : 

सगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र?

आपल्याला अग्निवेश यांच्यासारखे 'स्वामी' का नको असतात?

कोणत्याही देशात असू नये 'भारताच्या' रॉबर्ट क्लाइवचा पुतळा!

ऑन ड्युटी ठाण्यात बसून पांडेजी नेमकी कुणाची शिट्टी वाजवतायत?

कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!

विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?