दिल्लीतल्या धर्म प्रचाराच्या मेळ्यानं तबलिगी जमात ही संघटना, संस्था चर्चेत आलीय. ९० वर्षांच्या संस्थेचं दीडेकशे देशांत नेटवर्क आहे. भारतातले पाचेक कोटी मुसलमान या संघटनेचे अनुयायी आहेत. पाचवार साडीतल्या भारतीय मुस्लिम बाईला जमातनं बुरख्यात नेलं. स्वतःला गैरराजकीय म्हणणाऱ्या तबलिगी जमातचं पॉलिटिक्स पत्रकार समर खडस यांनी उदाहरणासह उलगडून दाखवलंय.
तबलीग जमात हा शब्द मी साधारणतः पंचवीसेक वर्षांपूर्वी ऐकला असेन. आमच्या कोकणातील गावात मोहर्रमला ताजिया काढून त्याच्या भोवती फेर धरून नाचतात. रोठ आणि मलिदा करतात आणि दिवाळीतल्या फराळासारखा नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांना वाटतात, नगारा-ताशा वाजवतात.
या सगळ्याला गावातील संख्येने मोजक्याच असलेल्या काही तबलीगींनी विरोध केला होता. इस्लाममधे या गोष्टी हराम असल्याचं ते सांगत होते. त्याचे लिखित दाखले देत होते. याला गावातल्या काही ज्येष्ठांनी विरोध केला. ही आपल्या वाडवडलांची प्रथा परंपरा आहे, असं या ज्येष्ठांचं म्हणणं होतं. तेव्हा या जमातीच्या लोकांचं फारसं काही चाललं नाही. मात्र कालांतराने तबलीगचं वर्चस्व वाढत गेलं.
एकतर मुस्लिम समाजातले अनेक तरुण नोकरी निमित्ताने आखाती देशांमधे जाऊ लागले. तिथला सांस्कृतिक वर्चस्ववाद त्यांच्या नेणिवेत हळूहळू रूजायला सुरवात झाली. भारतीय मुसलमानांच्या परंपरा कशा अयोग्य आहेत, याचे तर्क त्यांना सांगितले जाऊ लागले आणि ते हळूहळू त्यांच्या गळी उतरू लागले. इथले ज्येष्ठ वयानुसार जगातून वजा व्हायला लागले आणि उरलेल्यांचं काही चालेनासंही झालं.
पुढे इस्लामवर पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने अनेक पुस्तकं वाचावी लागली. त्यात तबलीगचे संदर्भ अनेक ठिकाणी आले. विशेषतः माहमूद मामदानी आणि रेझा असलान यांनी यावर प्रकाश टाकलाय. जॉन कूली हे विविध इस्लामी गट, त्यांच्या चळवळी, त्यांच्यातील अंतर्विरोध आदींचे अभ्यासक आहेत. त्यांचं एक २००० साली प्रकाशित झालेलं अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे, अनहोली वॉर. त्यात त्यांनी या तबलीग जमातविषयी विस्तृत लिहिलंय.
कूली हे अमेरिकी भांडवली विचारांचे असल्याचे दाखले काहीजण देऊ शकतील कदाचित. पण माहमूद मामदानी किंवा रेझा अस्लान यांच्याविषयी ते देता येणं कठीण आहे. त्यात मामदानी हे तर डाव्या विचारांचे अमेरिकास्थित मुसलमान आहेत. त्यांच्याविषयी मुस्लिम कट्टरपंथीयांचा राग हा वेगळ्या प्रकारचा असू शकेल.
हेही वाचा : दिल्लीच्या तबलिगी प्रकरणात नेमकं खरं काय आणि खोटं काय?
या सगळ्यातून जी माहिती मिळते ती अशी की, मौलाना मुहंमद इलियास यांनी दिल्लीपासून जवळच असलेल्या मेवात इथं या तबलीग जमातची स्थापना १९२६ मधे केली. उत्तर प्रदेशातील देवबंदच्या दारूल उलमच्या धर्तीवर आणि विचारधारेवरच काम करणारी ही संघटना. मुसलमान हे आपल्या मुख्य विचारांपासून दूर जाताहेत. इस्लामी परंपरांना फाटा देत आहेत. त्यांना खऱ्या इस्लामी परंपरा शिकवल्यासच जगात खऱ्या अर्थाने खुशाली येईल वगैरे प्रकारचा हा मूळ विचार होता.
आता या मूळ परंपरा म्हणजे यांच्या दृष्टीने अरबी परंपरा हे सांगायला नकोच. वास्तवात स्वतः पैगंबरांनी याबाबतची कट्टरता फारशी दाखवल्याचं कुठेही इतिहासात नमूद नाही. दुसरी गोष्ट पैगंबरांच्या पश्चात जेव्हा इस्लाम विविध सांस्कृतिक पट्ट्यांमधे पसरायला लागला. कारण त्या काळात राष्ट्र किंवा देश ही संकल्पना जन्माला आलेली नव्हती. तेव्हाही पहिल्या चार खलिफांपैकी कुणीही त्या नव्या प्रदेशांतील संस्कृतींशी द्रोह केल्याचंही दिसत नाही. उदाहरणार्थ पर्शिया जिंकल्यानंतर तिथल्या अनेक रूढी, चालीरिती तशाच सुरू ठेवण्यात आल्या. काही कर वसुलीसारख्या नव्या गोष्टी अरबांनी शिकून घेतल्या अशा अनेक गोष्टी सांगता येतील, असो.
तर दक्षिण आशियातील मुसलमानांना शुद्ध इस्लामी चालीरिती शिकवण्याच्या हेतूने या संघटनेची सुरवात झाली. शुद्ध हा शब्दच खरंतर फार प्रतिगामी वाटावा असाच आहे. शुद्ध शाकाहारी, शुद्ध भाषा. त्यात शुद्ध धर्म आला की विचारायलाच नको.
मग यांनी मुसलमानांना सुफी परंपरा कशा चुकीच्या आहेत. पिराच्या कबरीसमोर काही मागणं कसं चूक आहे, त्याच्या समोर माथा टेकणं कसं चूक आहे, याचे धडे द्यायला सुरवात केली. भारतीय परंपरेला साजेशी येथील सुफी परंपरा होती. लोक देवळात मूर्तीसमोर हात जोडत होते, तेच दर्ग्यात येऊन पिराच्या समोर हात फैलावत होते. याला विरोध करायला सुरवात झाली. ती इतक्या खालच्या पातळीवर गेली की आठ-दहा वर्षांपूर्वी मुंबईतील एका जमाती मौलानाने ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांना आपल्या भाषणात शिवागाळ केली होती. त्यातून सुफी परंपरा मानणारे आणि जमाती यांच्यात काही ठिकाणी छोटे दंगेही उसळले होते. पुढे पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळवलं.
कूली आणि मामदानी यांच्या म्हणण्याप्रमाणे तबलीगचं मुख्यालय हे पाकिस्तानात आहे. तबलीग स्वतःला अभिमानाने अराजकीय संघटना म्हणवून घेत असते. आम्ही केवळ धर्माचं पालन कसं करावं, इस्लामी परंपरा, दररोजच्या जीवनात कसं राहावं, कसं वागावं, कसं खावं, कसं बसावं (अगदी शौचासदेखील) या बाबीच मुस्लिमांना शिकवतो, असं ते सांगतात.
मात्र अफगाणिस्तानातील कम्युनिस्ट सरकार पाडण्यासाठी अमेरिकेने आणि पाकिस्तानने जे प्रयत्न केले त्यातही तबलीगची त्यांना मोठी मदत झाली. सोविएत युनियनने अफगाणिस्तानात लाल सेना पाठवली होती. त्याला विरोध करण्यासाठी या तबलीग जमातमधूनच मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात आल्याचे दाखले कूली आणि मामदानी यांनी दिले आहेत.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोतः युवाल नोवा हरारी
संजय राऊत लिहितातः कोरोना हा निसर्गाने देवधर्माचा केलेला पराभव
१९८८ मधे लाहौर इथे जगभरातल्या ९० हून अधिक देशांतून दहा लाखांपेक्षाही जास्त स्वयंसेवकांचा त्यांनी मेळावा घेतला आणि जगभरातल्या अनेकांचं त्यांच्याकडे पहिल्यांदाच लक्ष गेलं.
अफगाणिस्तानातील `देव-धर्मरहित’ संकटाचा सामना करण्यासाठी सीआयएने तबलिगची मदत घेतली होती. देव-धर्मरहित म्हणजे सेक्युलर किंवा हल्ली ज्याला ट्रोलर्स सिक्युलर म्हणून हिणवतात, तशाच हिणकस भावनेने ओतप्रोत अशा मानसिकतेतून या शब्दाचा तबलिगी काढत असलेला अर्थ समजून घ्यावा लागेल. ट्युनिशियामधून १६० जण लाहौर इथे धार्मिक अभ्यासक्रमासाठी तेव्हा पाठवण्यात आले होते. त्यातील ७० जणांनी लष्करी प्रशिक्षण पूर्ण केल्याचे आणि त्यातील १५-२० जणांनी प्रत्यक्ष लढाईत भाग घेतल्याची माहिती मामदानी आणि कूली देतात.
अल्जेरिया १९६२ पर्यंत फ्रेंचांची आणि मोरक्को १९५६ पर्यंत स्पेन आणि फ्रेंचांची वसाहत होता. या देशांमधे यांच्या वेगळ्या मशिदी आहेत. या मशिदींमधून तयार होणारे यांचे धर्म प्रसारक तिथल्या नागरिकांवर अरबी संस्कृती थोपवण्याचा प्रसार जोरात करत असतात. महिलांनी डोक्यावर पदर घ्यावा इथून सुरू झालेला यांचा प्रचार आता महिलांनी बुरख्याशिवाय राहणं हे गैरइस्लामी आहे, इथपर्यंत आलाय.
हे मुद्दामून उद्धृत करण्याचं कारण की, महाराष्ट्रात कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या महिला २०-२५ वर्षांपूर्वी बुरखा वापरत नसत. एका विशिष्ट पद्धतीने पाच वारी साडी नेसण्याचीच परंपरा इथे होती. लग्नात बाकी काही देणंघेणं नसलं तरी चालेल परंतु नवऱ्याकडून बायकोला काळे मणी आणि सोन्याची छोटी वाटी असलेलं एक गंठण हे कंपलसरी होतं. या सगळ्या परंपरा गैर इस्लामी असल्याचा प्रचार जमातींनी मोठ्या प्रमाणावर केला आणि आज ज्यांच्या आया-आजा साड्या घालत होत्या, त्या घरातील मुली नाती नखशिखांत बुरख्यात वावरताना जागोजागी दिसत असतात.
सांगण्याचा मुद्दा असा की, आम्ही राजकारण करत नाही, म्हणणारे प्रत्यक्षात काय करत असतात हे भारतातल्या लोकांना वेगळं सांगण्याची गरज नाही. नागपूर ते दिल्ली व्हाया अयोध्या हा प्रवास सगळ्यांनाच नीट माहिती आहे.
तर अशा या तबलीग जमातचा भारतीय परंपरेतल्या मुस्लिमांना फार कड आहे, अशातला भाग नाही. किंबहुना बहुतांश मुस्लिमांचे यांच्याशी गावागावात पंगेच आहेत. ते दर्ग्यावर जाण्याच्या मुद्द्यावरून आहेत, ते मोहरमला ताजिया काढून नाचण्याच्या मुद्द्यावर आहेत, ते रमझान ईदेला बिगर मुस्लिमांना घरी बोलावून शिरखुर्मा किंवा मटण खायला घालण्यावरून आहेत.
परंतु यांच्यामागे उभ्या असलेल्या प्रचंड आर्थिक ताकदीपुढे विस्कळित गरीब भारतीय मुसलमान हवालदिल आहे. एखाद्याला भरती करून त्याला आखाती देशात विशेषतः सौदीसारख्या देशात सहज नोकरी लावणं किंवा त्याला एखादा छोटासा व्यवसाय उभारून देणं यांच्यासाठी सहज शक्य होतं. जगाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे, या वाक्याचा अनेकदा विसर पडणाऱ्या डाव्यांनाही या मागचं अर्थकारण समजत नाही किंवा समजून घेण्याची इच्छा दिसत नाही. त्यातूनच हा विषाणू खूप वेगाने फैलावलाय.
कोरोनाच्या सोबतीने या विषाणूचा प्रसार रोखायचा असेल, तर पुरोगामी शक्तींनी या देशातील मुस्लिम परंपरांबद्दल जाणून घ्यावं लागेल. मुख्य म्हणजे मुस्लिमांबद्दल जाणून घ्यावं लागेल. त्यांचे प्रश्न हे मदरसा आणि कबरस्तानाच्या पलिकडचे आहेत, हे समजून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सुदैवाने या देशात तुकाराम, चोखामेळा ते बुल्लेशहा, कबीर या गंगा-जमनी परंपरांची घट्ट वीण ना तबलीग काय किंवा संघ काय उखडून फेकू शकलेला नाही. त्या पुरोगामी परंपरा आणि आधुनिक विचार यांची सांगड घालून हा विषाणू नक्कीच रोखता येऊ शकतो.
कबीर आपल्या एका दोह्यात म्हणतात,
हिन्दू तुरक के बीच में मेरा नाम कबीर
जीव मुक्तवन कारने अबिकत धरा सरीर।
हिंदू आणि मुसलमानांच्या मधे माझं नाव कबीर आहे. लोकांना अज्ञान आणि पापापासून मुक्त करण्यासाठी मी हे शरीर धारण केलंय!
हेही वाचा :
छत्तीसगडमधे पुन्हा नक्षलवादी हल्ला होऊ शकतो
महाराष्ट्राचे एक मंत्री कोरोना संशयित बनतात तेव्हा
कोरोनाशी धर्माचा संबंध लावणाऱ्यांचं काय करायचं बरं?
गांधीजींचा राम आपल्याला आज समजून घ्यावाच लागेल
लोकांचा विज्ञानावरचा विश्वास कमी व्हावा यासाठीच धडपडताहेत आपले राजकारणी
( लेखक हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. समर खडस यांच्या फेसबूक पोस्टचा हा संपादित अंश आहे.)