‘वलिमाई’ या तमिळ सिनेमाची एवढी चर्चा का होतेय?

०२ मार्च २०२२

वाचन वेळ : ८ मिनिटं


बोनी कपूरची निर्मिती असलेला ‘वलिमाई’ २४ फेब्रुवारीला रिलीज झाला. गेल्या आठवड्याभरात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. जास्तीत जास्त प्रेक्षकांना हा सिनेमा बघता यावा म्हणून चक्क पहाटे चार वाजल्यापासून ‘वलिमाई’चे शो लावले जातायत. ‘वलिमाई’च्या या उत्सवीकरणाचं कारण एकच, अजित कुमार!

‘माझं तुम्हा सगळ्यांना एकच सांगणं आहे. पुढचा आठवडाभर डोळ्यात तेल घालून पहारा द्या. आणखी लोकं तैनात करा. आळीपाळीने काम करा पण पहारा ढिला सोडू नका.’

नाही, नाही, ‘पावनखिंड’चा डायलॉग नाहीय हा! एका फेसबुक पोस्टमधून आठवड्याभरापूर्वी केलेलं आवाहन आहे. तमिळनाडूतल्या तमाम दूधविक्रेत्यांना केलेलं आवाहन. दुधाची चोरी होऊ नये म्हणून. पण महाशिवरात्रीच्या उत्सवाला अजून आठवडा बाकी असताना, अचानक दुधाची मागणी का वाढली असावी? आणि त्यासाठी दुकानाभोवती चक्क पहारा! नक्की कोणता सण तमिळनाडू साजरा करतंय, याचा शोध घेतला तर एकच नाव कानी पडलं, ‘वलिमाई’!

दूध विक्रेते हाय अलर्टवर

‘वलिमाई’ हा कुठलाही सण वगैरे नाहीय. बघायला गेलं तर तो एक साधा सिनेमा आहे. पण राज्यभरातल्या दूधविक्रेत्यांना हाय अलर्टवर ठेवणारा हा सिनेमा खरंच साधारण असेल का? तर नाही. या सिनेमात तमिळ सिनेरसिकांचा लाडका सुपरस्टार अजित कुमार झळकणार आहे आणि तेही तब्बल अडीच वर्षांनी! मग त्याचं स्वागत तर जंगी व्हायलाच हवं आणि याच जल्लोषाचा धसका तमिळनाडूमधल्या दूध विक्रेत्यांनी घेतलाय.

तमिळ किंवा तेलुगू सिनेमातले हिरो म्हणजे इथल्या जनतेसाठी देवच! आपल्या आवडत्या अभिनेत्याचे कटआऊट बनवून त्याला दुधाने अंघोळ घालायची परंपरा इथल्या चाहत्यांनी प्राणपणाने जपलीय. सिनेमा रिलीज व्हायच्या एक दिवस अगोदरच त्यातल्या हिरोचे मोठमोठे कटआऊट थियेटरबाहेर लावले जातात. त्याला हार घातला जातो. तिथून पुढं आठवडाभर शोच्या आधी त्या कटआऊटला दुधाने अंघोळ घातली जाते.

चाहत्यांचं हे प्रेम भारावून टाकणारं असलं तरी दूधविक्रेत्यांसाठी हे प्रेम डोकेदुखी ठरलंय. अनेक दुकानांमधून अशावेळी दुधाच्या पिशव्या पळवल्या जातात. वेळप्रसंगी दुधाचे टँकरही अडवून दूध लुटलं जातं. त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होतं. चेन्नईत चार दिवसांपूर्वी दूध समजून चक्क दह्याच्या पिशव्या पळवल्या गेल्यात. आता मात्र राज्यभरातल्या पोलिसांसकट झाडून सगळे दूधविक्रेते हाय अलर्टवर आहेत, त्याला कारण आहे ‘अजित’ नावाचं हे वादळ!

हेही वाचा: ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?

मॅकेनिक बनला ‘ताला’!

अजितचा जन्म १९७१चा. एमजीआर आणि शिवाजी गणेशन् यांचा तो सुवर्णकाळ. त्यावेळी रजनीकांतचा उदय व्हायचा बाकी होता आणि कमल हासन चाचपडत होता. अजित या दोघांना बघतच मोठा झाला. बाईकप्रेमी आणि रेसिंगची आवड असलेला अजित दहावीतच भावाच्या ओळखीने एन्फील्ड मोटर्समधे मॅकेनिक म्हणून काम करू लागला. पण त्याच्या वडलांना आपल्या मुलानं कुठलातरी पांढरपेशा जॉब बघावा असं वाटत होतं.

त्यामुळे अजित एका कापड कारखान्यात कामाला लागला. इथल्या कामाच्या निमित्ताने भारतभर दौरे केल्यावर लवकरच त्याने स्वतःचाही व्यवसाय सुरू केला. पण नफातोट्याचं गणित त्याला झेपलंच नाही. कापड कारखान्यात कामाला असताना त्याच्या देखणापणामुळे अजितला मॉडेलिंगची संधी मिळाली. त्यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक पी. सी. श्रीराम यांनी त्याला सिनेमात हिरोचं काम करण्याचा सल्ला दिलं होता. प्रत्यक्षात सिनेमा मिळायला अजितला आणखी काही वर्षं वाट बघावी लागली.

१९९३चा ‘अमरावती’ हा अजितचा पहिला सिनेमा होता. सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर असतानाच अजितचा एका कार रेसमधे अपघात झाला. दीड वर्षं त्याला अंथरुणावर पडून रहावं लागलं. त्यानंतर त्याने बऱ्याच लहानसहान भूमिका केल्या. १९९५चा ‘आसई’ हा त्याचा पहिला हिट सिनेमा होता. तमिळ सिनेसृष्टीत आणखी एका हिरोची भर पडल्याचं या सिनेमाच्या कमाईने सिद्ध केलं. त्या दशकात कमल हासन आणि रजनीकांत एकापाठोपाठ एक हिट सिनेमे देत चालले होते.

अजितचा ‘दीना’ हा २००१चा सिनेमा खऱ्या अर्थाने ट्रेंडसेटर ठरला. या सिनेमाने ए. आर. मुरुगादासला दिग्दर्शक आणि युवन शंकर राजाला संगीत दिग्दर्शक म्हणून मान्यता मिळवून दिली. त्याहीपेक्षा हा सिनेमा सर्वार्थाने अजितच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. या सिनेमात त्याने साकारलेलं ‘ताला’ हे पात्रच त्याची ओळख बनलं. ताला म्हणजे नेता किंवा म्होरक्या. या सिनेमानंतर अजितचा उल्लेख ‘ताला’ अजित असा केला जाऊ लागला.

तमिळनाडू बाहेरचा ‘ताला’

अजितचा त्याच्या कारकिर्दीत ‘अशोका’ वगळता बॉलीवूडशी कधी संबंध आलाच नाही. ‘वलिमाई’ हा त्याचा दुसरा हिंदी सिनेमा. ‘अशोका’मधे शाहरुख खान मुख्य भूमिकेत झळकला होता तर अजितने ‘सुशिम’ ही अशोकाच्या भावाची खलनायकी भूमिका साकारली होती. अजितचा ‘दीना’ही त्याच वर्षी आला होता आणि त्यामुळे या पहिल्याच हिंदी सिनेमाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होती.

बॉलीवूडच्या किंग खानसमोर खलनायकी भूमिकेतही आपला चार्म टिकवून ठेवण्यात अजित यशस्वी ठरला असला तरी ‘अशोका’ची कमाई काही खास झाली नव्हती. त्यानंतर अजितला पुन्हा हिंदी-मराठी प्रेक्षकांच्या समोर आणलं ते २०१७च्या ‘विवेगम’ने. हा विवेक ओबेरॉयचा पहिलाच तमिळ सिनेमा होता. २०१८मधे याचा हिंदी डब रिलीज झाला आणि अजित पुन्हा चर्चेत आला.

इतर तमिळ अभिनेत्यांच्या तुलनेत अजितच्या हिंदी डब सिनेमांची संख्या कमीच आहे पण तरीही अजित आपली दखल घ्यायला भाग पाडतोच. या तमिळ आणि तेलुगू अभिनेत्यांच्या हिरोगिरीला चिरतारुण्याचं वरदान लाभलंय, हे अजितकडे बघून कळतं. आपले पांढरेशुभ्र केस, दाढी आणि वय न लपवता, कुणाच्याही मदतीशिवाय पंचविशीच्या तरुणालाही लाजवतील असले जिगरबाज स्टंट करणाऱ्या ‘ताला’वर त्याचे चाहते आजही जीव ओवाळून टाकत असतात.

अजितचा एक डोळा दुसऱ्यापेक्षा किंचित लहान आहे पण त्याचा अडथळा कधीही त्याला जाणवला नाही. त्याची ग्रेसफुल चाल हे एक त्याचं खास वैशिष्ट्य आहे. निव्वळ आपल्या चालीच्या जोरावर थियेटर दणाणून सोडणारा रजनीकांतनंतर तो एकमेव हिरो असल्याचं त्याचे चाहते आवर्जून सांगतात. त्यामुळे प्रेक्षकवर्ग हिंदी असो, मराठी असो किंवा तमिळ, अजितची हिरोगिरी त्यांना भाषेचं बंधन उधळून लावायला भाग पाडते.

हेही वाचा: इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

‘वलिमाई’ला एवढी गर्दी का?

‘दीना’नंतर अजितने गेल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत पन्नासहून अधिक सिनेमे केलेत. एक जिगरबाज अॅक्शन स्टार म्हणून तो आपल्या चाहत्यांमधे लोकप्रिय आहे. त्याच्या बऱ्याचशा भूमिका या बंडखोर लोकनायकाच्या स्वरूपाच्या आहेत. अजितच्या सिनेमांमधे शक्यतो सध्याच्या राजकारणावर बोललं जात नाही. सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्नही विरळाच! त्याचा सिनेमा बघावा तो फक्त टाळ्या आणि शिट्ट्या वसूल करणाऱ्या अॅक्शन आणि डायलॉगच्या कलगीतुऱ्यासाठी! 

अजित जितका त्याच्या कमी हिट आणि जास्त फ्लॉप झालेल्या सिनेमांसाठी ओळखला जातो, तितकाच तो त्याने सोडून दिलेल्या सिनेमांसाठीही कायम चर्चेत असतो. अजितने नाकारलेले अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेत. इतकंच नाही, तर त्याच्या जागी ज्यांची निवड झाली, त्या अभिनेत्यांसाठी हे सिनेमे त्यांच्या कारकिर्दीतल्या सर्वोत्तम सिनेमांपैकी एक मानले जातात. यात सूर्याचा ‘गजनी’ ‘काक्कं काक्कं’, ‘नांदा’, विक्रमचा ‘जेमिनी’ आणि आणखी बऱ्याच सिनेमांचा समावेश होतो.

जर अजितने नाकारलेले सिनेमे इतका धंदा करत असतील, तर त्याने काम केलेल्या सिनेमाला गर्दी होणं स्वाभाविकच ठरतं. पण अजितचा प्रत्येकच सिनेमा हिट होईलच असं नाही. पण तरीही प्रत्येक सिनेमाला सुरवातीला तुफान गर्दी होते. तीन वर्षांपूर्वी आलेला ‘विश्वासम’ हा त्याचा शेवटचा हिट सिनेमा. त्यानंतर आलेल्या 'नीरकोंडा पार्वई'या 'पिंक'च्या रिमेकने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असली, तरी चाहत्यांना त्यात अजितची हिरोगिरी अपेक्षित होती. म्हणूनच तब्बल अडीच वर्षं चाहते ‘वलिमाई’कडे टक लावून बघत होते.

मी ‘ताला’ नाही!

साधारण दहा वर्षांपूर्वी अजितचा पन्नासावा सिनेमा ‘मंगात्ता’ प्रदर्शनाच्या वाटेवर असताना त्याने आपला फॅन क्लब बरखास्त केला. त्याला यातल्या राजकारणाचा उबग आला होता. आपल्या उमेदीच्या वयात माझ्यासाठी जीव धोक्यात घालून, घरदार वाऱ्यावर टाकून फॅन क्लब चालवणं मला पटणार नाही असं म्हणत त्याने आपल्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधीच फॅन क्लब बरखास्त केला. अजितच्या चाहत्यांसाठीच नाही तर संपूर्ण तमिळ सिनेसृष्टीसाठी हा एक अनपेक्षित धक्का होता.

२००१च्या ‘दीना’मुळे अजितला ‘ताला’ ही पदवी मिळाली. एखाद्या कलाकाराला अशी पदवी देणं आणि त्याच नावाने त्याचा उल्लेख करणं हे तमिळ सिनेसृष्टीत पूर्वापार चालत आलंय. ‘तलैवा’ रजनीकांत, ‘दलपती’ विजय, ‘चियान’ विक्रम हेही त्याचंच एक उदाहरण. यात विजय आणि अजितपैकी कुणाची पदवी मोठी यावरून या अभिनेत्यांचा चाहतावर्ग कायमच भांडत असतो.

पण गेल्या डिसेंबरमधे अजितने एक भावनिक पत्र त्याच्या चाहत्यांना लिहलं. त्यात त्याने इथून पुढे आपला उल्लेख ‘ताला’ असा केला जाऊ नये अशी विनंती केली होती. त्याऐवजी अजित, अजितकुमार किंवा ‘ए. के.’ असा आपला उल्लेख व्हावा, अशी त्याची इच्छा होती. अडीच वर्षांनी प्रदर्शित होणाऱ्या ‘वलिमाई’ची क्रेझ आणि दलपती विजयच्या आगामी ‘बीस्ट’ची वाढती उत्सुकता पाहता, चाहत्यांमधला वाद टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचा अंदाज आहे.

अजितचे हे निर्णय चाहत्यांना दुखावणारे असले तरी त्यांचं अजितवरचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. फ्लॉप सिनेमांची मालिका, अजितचं वाढतं वय आणि असे अनपेक्षित निर्णय पाहता, अजित इथून पुढं मुख्य भूमिका साकारण्यापासून फारकत घेतो की काय अशी एक अनामिक हुरहूर त्याच्या चाहत्यांच्या मनात आहे. त्यामुळे ‘वलिमाई’ला गर्दी होण्याचं आणखी एक कारण हेही आहेच. 

हेही वाचा: जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

प्रदर्शनापूर्वीच घेतली दखल

‘वलिमाई’च्या प्रदर्शनाची तारीख कळावी यासाठी अजितच्या चाहत्यांनी ट्वीटरवर ‘#वलिमाईअपडेट’ हा हॅशटॅग चालवला होता. जगभरातल्या घडामोडी लोकांना कळणं सोपं जावं यासाठी हे हॅशटॅग असतात. पण भारतात ‘#वलिमाईअपडेट’ने अशा बऱ्याच घडामोडींना मागे टाकलं. दलपती विजयच्या ‘मास्टर’नंतर सर्वाधिक ट्वीट मिळवणारा ‘वलिमाई’ हा दुसरा भारतीय सिनेमा ठरला.

फक्त ट्वीटरच नाही तर अजितच्या चाहत्यांनी भल्याभल्यांना ‘वलिमाई’बद्दल विचारून फेफरं आणलं. यात आयपीएलमधे ‘चेन्नई सुपर किंग्ज’कडून खेळणाऱ्या क्रिकेटपटू आर. आश्विन आणि मोईन अली यांचाही समावेश आहे. भर सामन्यात एका चाहत्याने ‘वलिमाई’ कधी रिलीज होणार असं विचारत दोघांची दांडी उडवली होती. अजितच्या क्रेझबद्दल माजी क्रिकेटपटू के. श्रीकांत एकदा म्हणाले होते, ‘फ्लॉप कामगिरी करूनही ज्यांचा चाहतावर्ग आजतागायत अबाधित आहे, असे फक्त दोघेच आहेत. एक आहे सौरव गांगुली आणि दुसरा अजित!’

‘वलिमाई’ कधी रिलीज होणार हा प्रश्न चाहत्यांनी असा काही वायरल केला की राजकारण्यांनाही त्याला तोंड द्यावं लागलं. प्रचारसभेत तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना ‘वलिमाई’चा अपडेट विचारणाऱ्यांनी पंतप्रधानांनाही त्यांच्या तमिळनाडू दौऱ्यात हाच प्रश्न विचारला होता. निवडणूक आयोगाने तर मतदानाबद्दल जागृती व्हावी, यासाठी आपल्या पोस्टरमधे ‘वलिमाई’ शब्द वापरला होता.

हे पोस्टर एका कलेक्टरने ट्वीट करत त्यात मुद्दाम ‘#वलिमाईअपडेट’ असा हॅशटॅग वापरला होता, ज्याला तब्बल १६ हजारांहून अधिक लाईक मिळालेत! निर्माते बोनी कपूर यांनी ‘द हिंदू’शी बोलताना आपण अजितची क्रेझ पाहून थक्क झाल्याचं सांगितलं होतं. प्रदर्शनाच्या तारखेबद्दल चाहत्यांना कसलीही चुकीची माहिती मिळू नये याकडे ते जातीने लक्ष देत होते.

अजितच्या चाहत्यांसाठीच बनलाय ‘वलिमाई’

एच. विनोद दिग्दर्शित ‘वलिमाई’ हा अजितचा साठावा सिनेमा. लॉकडाऊन असतानाही रजनीकांत, धनुष, दलपती विजय, सूर्या आणि विजय सेतुपतीसारख्या बड्या कलाकारांचे सिनेमे येऊन गेले. पण ‘वलिमाई’ मात्र गेली अडीच वर्षं रखडला होता. तो आता २४ फेब्रुवारीला तमिळसोबतच तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीतही रिलीज झालाय. तिसऱ्या दिवशीच ‘वलिमाई’ने शंभर कोटींचा टप्पा पार केलाय.

‘वलिमाई’च्या कमाईमागे दिग्दर्शक आणि इतरांची मेहनत असली, तरी अजितचा यात सिंहाचा वाटा आहे हे कबूल करावंच लागेल. सिनेमाची कथा अगदी साधारण धाटणीची असली तरी त्यातली फ्रेम न् फ्रेम फक्त अजितच्या चाहत्यांसाठी बनवल्याचं सहज कळून येतं. या सिनेमात अजित एका पोलिसाचं पात्र साकारतोय. चाहत्यांनी त्याला आधीही या रुपात भरभरून प्रेम दिलंय. त्याशिवाय, या पात्राचं नाव अर्जुन आहे. योगायोग हा की, अजितने त्याच्या पहिल्या सिनेमातही अर्जुन हेच नाव धारण केलं होतं!

अजितचं बाईक आणि रेसिंगप्रेम लपून राहिलेलं नाही. या सिनेमात तर खास त्याभोवतीच कथा गुंफलेली असल्याने चाहत्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाहीय. बाईक आणि कारमधून पाठलागाचे श्वास रोखून ठेवणारे थरारक प्रसंग या सिनेमाचं बलस्थान आहे. यात भावनिक प्रसंगही आहेत. आई आणि भाऊ या दोन नातेसंबंधांना केंद्रस्थानी ठेवून बनवलेले हे भावनिक प्रसंग म्हणजे अजितच्या सिनेमांची खासियतच आहे.

ओटीटीवर रमलेल्या प्रेक्षकाला थियेटरमधे ओढून आणायचं म्हणल्यावर तसा जबरदस्त कंटेंट पाहिजे. ‘मास’ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चेहरा पाहिजे. चोखंदळ झालेल्या सिनेरसिकाला बेभान होऊन टाळ्या-शिट्ट्या वाजवणारा हौशी चाहता बनवण्याची धमक त्या सिनेमात हवी. तर आणि तरच, त्याच्यावर सुपरडुपर हिटचा शिक्का बसतो. ‘वलिमाई’मधे हे सगळं तर आहेच पण त्याचसोबत अजित निवृत्तीपासून बराच लांब असल्याचा संकेतही स्पष्टपणे मिळतोय.

हेही वाचा: 

ओटीटी प्लॅटफॉर्म थेटरचे बाप बनणार का?

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

ओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य