देशप्रेम दूर सारून पाकिस्तानची बॉलीवूडला पसंती

०२ मार्च २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


गेल्या महिन्यात पाकिस्तानातल्या लाहोर युनिवर्सिटीमधे ‘बॉलीवूड डे’ साजरा केला गेला. त्याचा वीडियो वायरल झाल्यावर युनिवर्सिटीवर कौतुक आणि टीकेचा एकत्रित भडीमारही केला गेला. भारताच्या बॉलीवूडचा पाकिस्तानी मनोरंजन जगतावर असलेला प्रभाव आणि पाकिस्तानी मनोरंजन जगताने भारतीयांवर पाडलेली छाप ही कितीही झालं तरी देशप्रेमाच्या तराजूत मोजता येत नाही.

लाहोर युनिवर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस म्हणजेच ‘लुम्स’. पाकिस्तानातल्या आघाडीच्या युनिवर्सिटींपैकी एक. इथं प्रवेश मिळावा यासाठी पाकिस्तानातले विद्यार्धी रात्रीचा दिवस करताना दिसतात. इथली प्रवेशप्रक्रिया ही पाकिस्तानातल्या इतर शैक्षणिक संस्थांपेक्षा अवघड मानली जाते. सध्या हीच युनिवर्सिटी इंटरनेटवर वायरल झालेल्या एका वीडियोमुळे चर्चेत आहे.

गेल्या महिन्यात युनिवर्सिटीमधे साजरा केला गेलेला ‘बॉलीवूड डे’ हे त्या वीडियोच्या वायरल होण्यामागचं कारण आहे. काही दिवसांपूर्वीच लाहोरमधे झालेल्या फैज महोत्सवात बॉलीवूडचे दिग्गज पटकथाकार जावेद अख्तर यांनी पाकने पोसलेल्या दहशतवादावर जळजळीत टीका केली होती. एका आठवड्याच्या फरकाने घडलेल्या या दोन्ही घटना दोन देशांमधल्या मनोरंजन क्षेत्राचं बोलकं वास्तव मांडतात.

सीमाभेद मिटवणारं ‘पंजाब कनेक्शन’

फाळणीच्या निमित्ताने पंजाबचे तुकडे झाले. पंजाब हा सुपीक जमिनींचा, कृषीप्रधान प्रांत असल्याने दोन्ही देशातले पंजाबी आर्थिकदृष्ट्या तसे सधनच आहेत. इतर व्यावसायिक क्षेत्रांमधे प्रवेश करण्यासाठी जो भांडवलाचा यक्षप्रश्न असतो, तो या पंजाबमधल्या सधन शेतकरी कुटुंबांना सहसा भेडसावत नाही. त्यामुळे फाळणीतल्या नुकसानानंतरही दोन्हीकडचे पंजाबी लवकरच कंबर कसून उभे राहू शकले.

पुढे दोन्ही देशातल्या पंजाबी लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करत आपलं दखलपात्र वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यातलंच एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे मनोरंजन व्यवसाय. दोन्हीकडच्या पंजाबी लोकांच्या मनोरंजन क्षेत्रावर असलेल्या वर्चस्वाची सगळ्यात मोठी उदाहरणं म्हणजे भारतातलं बॉलीवूड आणि पाकिस्तानातलं लॉलीवूड! जसं मुंबईत हिंदी-मराठी सिनेमांचं बॉलीवूड आहे, त्याचप्रकारे लाहोरमधेही पंजाबी-उर्दू सिनेमांचं लॉलीवूड आहे.

या दोन्ही सिनेसृष्टीतले सिनेकलाकार, निर्माते, दिग्दर्शक तर बहुतांशी पंजाबी आहेतच, त्याचबरोबर सिनेनिर्मितीच्या इतर तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या पंजाबी व्यावसायिक-तंत्रज्ञांचं प्रमाणही बरंच मोठं आहे. त्यामुळे सिनेमांच्या कथानकांमधे, मांडणीवर पंजाबी संस्कृतीचा मोठा प्रभाव दिसून येतो. या दोन्ही सिनेसृष्टीतलं हे ‘पंजाब कनेक्शन’ दोन्हीकडच्या प्रेक्षकांना आपलेपणाचा सिनेअनुभव देण्यात यशस्वी ठरतं.

हेही वाचा: इंग्रजांना हादरवणारे 'स्ये रा नरसिंह रेड्डी' कोण होते? 

सिनेमातला वाद आणि सलोखा

भारत-पाक संबंधांवर कोणत्या प्रकारचा सिनेमा बनला पाहिजे, यामागे याच ‘पंजाब कनेक्शन’चा दृश्य-अदृश्य हात असतो. एक तर तो सिनेमा हा युद्धपट असतो किंवा त्यात फाळणीची पार्श्वभूमी तरी वापरलेली असते. युद्धपट हा कधी पूर्णतः लष्करी कारवायांवर आधारित असतो, तर कधी ती हेरगिरीची गोष्ट असते. फाळणीपट हे प्रेम, विरह आणि कौटुंबिक पार्श्वभूमीच्या कथानकांशी जोडलेले असतात.

युद्धपट किंवा फाळणीपट हे सत्य घटनेवर आधारित असो किंवा काल्पनिक, यातले नायक मात्र उत्तर भारतीयच असतात. त्यातही ते एकतर हिंदू असतात किंवा शीख. इथं ‘पंजाब कनेक्शन’ महत्त्वाची भूमिका बजावतं. कारण शीख नायक असलेला युद्धपट किंवा ‘फाळणी’पट इतर सिनेमांपेक्षा जास्त लोकप्रिय ठरतो, हे ‘बॉर्डर’ आणि ‘गदर’सारख्या सिनेमांमधून याआधीही सोदाहरण स्पष्ट झालंय.

या पलीकडचे भारत-पाक संबंध आपल्याला सिनेमात क्वचितच दिसतात. कधी तो ‘बजरंगी भाईजान’सारखा नवी नाती जोडणारा सिनेमा असतो. कधी ‘साहसम्’सारख्या तेलुगू सिनेमात पाकिस्तानातल्या खजिन्याची चित्तरकथा सांगितली जाते. कधी ‘फिजा’ तर कधी ‘सरबजीत’मधून सलोख्याचं रक्षाबंधनही साजरं केलं जातं. ‘बंगीस्तान’ हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा दहशतवादी कारवायांमधे गुंतलेल्या तरुणाईवर भाष्य करतो.

पाकिस्तानी सिनेमा कुंपणावरच

दुसरीकडे, २०११ला आलेला ‘बोल’ हा शेवटचा पाकिस्तानी सिनेमा भारतात प्रदर्शित होऊन जवळपास एक तप उलटत आलंय. याच सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारी माहिरा खान २०१७ला आलेल्या ‘रईस’मधे शाहरुख खानची नायिका म्हणून झळकली होती. फवाद खान या गुणी पाकिस्तानी अभिनेत्यानंतर भारतीय सिनेमात दिसलेली माहिरा ही शेवटची पाकिस्तानी सिनेकलाकार ठरलीय.

माहिरा आणि फवाद यांची मध्यवर्ती भूमिका असलेला ‘द लिजंड ऑफ मौला जाट’ हा पाकिस्तानी सिनेमा ऑक्टोबर २०२२मधे रिलीज झाला. कोरोनानंतर आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या पाकिस्तानी सिनजगतासाठी हा सिनेमा एक वरदानच ठरलाय. या सिनेमाच्या जागतिक बॉक्स ऑफिस कमाईचा आकडा कधीच १०० कोटींच्या घरात पोचलाय. पण हा सिनेमा भारतात प्रदर्शित होण्यासाठी अजूनही मुहूर्तच शोधतोय.

पाकिस्तानने दहशतवाद्यांना दिलेला आश्रयचं पाकिस्तानी मनोरंजन क्षेत्राच्या मुळावर उठलाय. पाकिस्तानच्या या आत्मघातकी वृत्तीमुळे राष्ट्रवादाची झूल पांघरलेल्या हिंदुत्ववादी राजकीय पक्षांना आयतं कोलीत मिळालं. त्यांच्या दहशतीने पाकिस्तानी कलाकारांना भारतातून गाशा गुंडाळावा लागला. ‘द लिजंड ऑफ मौला जाट’ आणि असे कित्येक दर्जेदार पाकिस्तानी सिनेमांना इथं प्रदर्शनाची संधी न मिळण्यामागेही हेच कारण आहे.

भारताच्या पावलावर पाऊल ठेवत पाकिस्तानी सरकारही वेळप्रसंगी अनेक टीवी वाहिन्यांवर बंदी आणून बॉलीवूडला आळा घालायचा तोकडा प्रयत्न करतच असतं. पण बॉलीवूडवर नितांत प्रेम करणारे पाकिस्तानी सिनेरसिक सरकारच्या या प्रयत्नांना दाद देत नाहीत. भारतीयांना मात्र पाकिस्तानी सिनेमांना मुकावं लागतंय. पण पाकिस्तानी टीवी मालिकांच्या निमित्ताने, ते सध्या दुधाची तहान ताकावर भागवू पाहतायत.

हेही वाचा: ‘बॉम्बे सुपरस्टार’ म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामी

द्वेषाला फाट्यावर मारणारी ‘जिंदगी’

दोन्ही देशांमधल्या सततच्या वाढत्या तणावाची परिणीती ही नेहमी सांस्कृतिक देवाणघेवाण बंद करण्यातच होते. यात पहिला बळी जातो तो दोन्ही देशातल्या सिनेसंस्कृतीचा. पण ‘कायदे तितक्या पळवाटा’ या न्यायाने दोन्हीकडचे प्रेक्षक आपली भूक टीवी मालिकांच्या माध्यमातून भागवून घेतच असतात. या मालिकांमधे युद्धपटांसारखा, फाळणीपटांसारखा देशप्रेमाचा तडका नसूनही त्या लोकप्रिय ठरतात.

‘आपलं ठेवावं झाकून, दुसऱ्याचं बघावं वाकून’ ही म्हण या मालिकांच्या लोकप्रियतेला सार्थ ठरवते. भारतीय मालिकांमधली श्रीमंतीचा थाट आणि झगमगाट दाखवणारी दुनिया, झोपतानाही चेहऱ्यावर मेकअपचे थर थापणारी सून, किलोभर दागिने आणि त्यांच्या दसपट तोरा मिरवणारी सासू ही पात्रं, त्यांची भांडणं, छोट्यामोठ्या घटनांचं केलं जाणारं उत्सवीकरण हे सगळं पाकिस्तानी प्रेक्षकांना जास्त भावतं.

दुसरीकडे, अतिरंजित, नाट्यमय घडामोडींचा भडीमार नसलेल्या आणि श्रीमंतीचा बडेजाव नसलेल्या पाकिस्तानी टीवी मालिका भारतीय प्रेक्षक आवर्जून पाहतात. भारतीय मालिकांसारखं वरणात पाणी ओतावं तसं कथानक न वाढवता, त्याचं केलं जाणारं आटोपशीर सादरीकरण भारतीयांना पाकिस्तानी टीवी मालिकांच्या प्रेमात पाडतं. ‘झी’ने सुरु केलेल्या झी जिंदगी या चॅनलने तर अशा पाकिस्तानी मालिकांचा खजिनाच भारतीय प्रेक्षकांसमोर उलगडलाय.

‘जोडें दिलों को’ अशी टॅगलाईन असलेलं ‘झी जिंदगी’ खऱ्या अर्थाने दोन्हीकडच्या प्रेक्षकांचा सांस्कृतिक मिलाफ घडवू पाहतंय. भारत-पाक संबंधांचा जवळून अभ्यास केलेले पत्रकार जतीन देसाई यांच्या मते, पाकिस्तानी प्रेक्षक हे सिनेमा आणि टीवी मालिकांपेक्षा नाटकांना सर्वाधिक पसंती देतात. कराची आणि लाहोरमधल्या नाट्यगृहांमधे वीकेंडला नाट्यरसिकांची मोठी गर्दी आपल्याला दिसून येते. भारतातही चांगल्या नाटकांसाठी अशीच झुंबड उडालेली असते.

सांस्कृतिक देवाणघेवाण सुरळीत व्हावी

लाहोरच्या फैज महोत्सवात जावेद अख्तर यांनी पाकिस्तानने लता मंगेशकरांचा कार्यक्रम कधीही का आयोजित केला नाही, असा थेट प्रश्न विचारला. हे प्रश्नचिन्ह पाकिस्तानी जनतेच्या रसिकतेवर नसून पाकिस्तान सरकारच्या आडमुठ्या धोरणावर ठेवलं गेलं होतं. भारताने पाकिस्तानी सिनेमांवर बंदी आणली, म्हणून पाकिस्ताननेही तेच करण्याऐवजी आपली चूक मान्य का केली नाही, याकडे अख्तर यांचा रोख होता.

गेल्या काही काळात भारत-पाकिस्तान संबंधांवर बनलेल्या बॉलीवूडच्या सिनेमांवर नजर टाकली, तर त्यात युद्धपट आणि हेरगिरीच्या कथानकांचाच भरणा जास्त असल्याचा दिसून येतो. पाकिस्तान हे आपलं शत्रूराष्ट्र असल्याचं या सिनेमांमधून वारंवार रंगवलं जातंय खरं, पण ईशान्येकडून भारताची जमीन गिळून आग ओकत पुढे सरकणाऱ्या चिनी ड्रॅगनकडे मात्र व्यावसायिक फायद्यांमुळे सहज दुर्लक्ष केलं जातंय.

बॉलीवूडच्या सिनेमांची पाकिस्तानातली बॉक्स ऑफिस कमाई ही चीन, जपानसारख्या देशांच्या तुलनेत अतिशय नगण्य ठरते. त्यामुळे या देशांना शत्रूराष्ट्र म्हणून न रंगवणं हे व्यावसायिक नफेखोरीच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं. दुसरीकडे, ‘द लिजंड ऑफ मौला जाट’, ‘जॉयलँड’सारख्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमांचे दिग्दर्शक भारत पाकद्वेषातून कधी बाहेर निघतो आणि आपला सिनेमा भारतात कधी जातो, याचीच वाट बघतायत.

हेही वाचा: 

पन्नाशीतला आराधना आज आठवण्याचं कारण काय?

बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

द फॅमिली मॅनः गुप्तचर यंत्रणेची आतली गोष्ट सांगणारी वेब सिरीज 

शॉशांक रिडीम्पशन: कारागृहातल्या घुसमटीचं अस्वस्थ करणारं चित्रण

आकाश निळंच असतं असं वाटत असेल, तर 'द स्काय इज पिंक' बघाच