क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट

०८ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


इंग्लंडचा भारत दौरा सुरूय.या दौऱ्यातल्या सिरिजमधे टी२० ला फार महत्त्व दिलंय. गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटच्या या छोट्या प्रकाराला प्रसिद्धी मिळतेय. अर्थशास्त्रात उद्योगांच्या अशा छोट्या प्रकाराला एमएसएमई म्हटलं जातं. तसंच कमी वेळात खेळले जाऊ शकतील असे क्रिकेटचे अनेक एमएसएमई प्रकार जन्म घेतायत. लांबलचक टेस्ट आणि वन डेच्या पांढऱ्या शुभ्र कॅनव्हासमधे गुलाबी रंग भरले जातायत.

भारताने २०२० मधला कोरोनाचा कठीण काळ मागे टाकत २०२१ मधे एका नवी आशा, उत्साहाने दमदार एन्ट्री केलीय. भारताला पुन्हा रुळावर आणायची मोहीम १६ जानेवारीला कोरोना लसीकरणानं झाली. याच दरम्यान, ‘अजिंक्य’वाल्या भारताने बोर्डर-गावस्कर ट्रॉफीसोबतचे सोशल डिस्टन्सिंग संपवत विजयाला गवसणी घातली. 

या विजयाचं देशानं भरभरून कौतुक केलं. भारताने ऑस्ट्रेलियात फक्त कसोटीच नाही, तर त्याआधी झालेली टी२० मालिकाही जिंकलीय. ऑस्ट्रेलियात टी२० आणि टेस्ट सिरीज जिंकलेला भारत इंग्लंडला मायदेशात पाणी पाजायला सज्ज झालाय. इंग्लंडचा भारत दौरा ५ फेब्रुवारीपासून सुरू झाला. या दौर्‍यात इंग्लंड भारतात पहिल्यांदा ४ टेस्ट आणि त्यानंतर तब्बल ५ टी२० आणि ३ वनडेही खेळणार आहे.

कोरोना काळात भारतात आयोजित होणारी ही पहिली इंटरनॅशनल क्रिकेट सिरीज आहे. इंग्लंडच्या या भारत दौर्‍याचा अभ्यास केला तर असं दिसतंय की  यात क्रिकेटच्या टी२० या लहान फॉरमॅटला चांगलंच महत्त्व दिलंय. तिन्ही प्रकारच्या क्रिकेट मॅच असलेल्या या सिरीजमधे भारत पहिल्यांदाच टी२० च्या तब्बल पाच मॅच खेळेल. यावरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटचा सर्वात छोटा प्रकार असलेल्या टी२०चं महत्त्व आणि स्थान वाढत चाललंय, हे दिसतं.

क्रिकेटमधे ‘एमएसएमई’ कशाला?

नव्या वर्षाचा पहिला महिना संपत असतानाच देशभरातलं वातावरण बजेटमय झालंय. एक शब्द सातत्याने कानावर पडतोय. तो म्हणजे ‘एमएसएमई’ अर्थात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग.

अनेक जाणकारांनी कोरोना काळात याच ‘एमएसएमई’ क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या मते, भारतीय अर्थव्यवस्थेत जोपर्यंत या क्षेत्राला दिलासा मिळत नाही, म्हणजे ‘एमएसएमई’ क्षेत्र उभारी घेत नाही, तोपर्यंत अर्थव्यवस्था रुळावर आणणं जिकिरीचं ठरेल. कारण, भारतीय अर्थव्यवस्थेत या ‘एमएसएमई’ क्षेत्राचा विस्तार मोठा आहे.

क्रिकेटच्या लेखात आता अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था का घुसडतंय, असा प्रश्न कदाचित पडेल. त्याचं कारण म्हणजे, क्रिकेटमधल्या सूक्ष्म आणि लघू क्षेत्राचा म्हणजेच शॉर्टेस्ट टी१०, टी२० फॉरमॅटचा वेगाने होत असलेला विकास.

हेही वाचा : त्यांच्या वर्णद्वेषाचा धिक्कार, आपल्या वर्णद्वेषाचा उदो उदो

किक्रेटचा सगळ्यात लहान प्रकार

क्रिकेटचा बायोलॉजिकल बाप असलेल्या इंग्लंडचं कसोटी प्रेम सर्वश्रुत आहे. इंग्लंडने २०१० मधे पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली ती टी२० प्रकारातच. त्यानंतर इंग्लंडने जाणीवपूर्वक लहान समजल्या जाणार्‍या या क्षेत्राकडे लक्ष दिलं. या क्षेत्राचा अभ्यास करत त्य़ांनी १०० बॉल नावाचा टी२० पेक्षा जास्त लहान क्रिकेट प्रकार जन्माला घातला.

इंग्लंडमधला कौंटी क्रिकेट जगभरातल्या टेस्ट खेळाडू तयार करण्याचा, त्यांचं तंत्र सुधारण्याचा कारखाना आहे. जगभरातले नावाजलेले क्रिकेटपटू या कारखान्यात वेळोवेळी आपलं सर्विसिंग करुन घेण्यासाठी जात असतात. पण काळाच्या ओघात त्यांनीही आपल्या कारखान्यात नावीन्यता आणायचा प्रयत्न केला.

जगाला मिळेल नवं क्रिकेट

नव्या क्रिकेट प्रकाराचा प्रस्ताव इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने सगळ्यात पहिल्यांदा २०१६ मधे ठेवला. त्यानंतर १८ फर्स्ट क्लास कौंटी टीमची 'प्रोफेशनल क्रिकेटर्स असोसिएशन' आणि 'मेलबर्न क्रिकेट क्लब' यांच्यात चर्चा झाली.

त्यावेळी या फॉरमॅटच्या समर्थनार्थ १६ आणि विरोधात ३ अशी मतं पडली होती. त्यानंतर ईसीबीने २०१८ ला आयपीएलच्या धर्तीवर ही १०० बॉल स्पर्धा घेण्यासाठी ट्रेंट वूडहिल यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली. त्यावेळी ८ शहरांच्या टीम तयार करत ९० खेळाडूंचा लिलाव करुन व्यावसायिक स्पर्धा खेळवण्यावर सहमती झाली.

२०१९ मधे १०० बॉल क्रिकेट स्पर्धेचे काही नियम बदलण्यात आले. त्यात १० बॉलची एक ओवर करण्यात आली. ईसीबी आता ही स्पर्धा २०२१ मधे व्यावसायिक स्वरुपात खेळवण्याच्या तयारीत आहे. त्यापूर्वी या फॉरमॅटनुसार, इंग्लंडमधले दोन क्लब मॅच खेळतायत. ही स्पर्धा यशस्वी झाली, तर क्रिकेट जगाला अजून एक नवा क्रिकेट प्रकार मिळेल.

हेही वाचा : कांगारुंच्या धूर्त खेळीनं भारताला वन डे सिरीजमधे चितपट केलं

यूएईमधला टी२०चा जलवा

यूएईमधली टी१० क्रिकेट स्पर्धा नुकताच चर्चेत आलेला विषय आहे. त्याने छोटं होण्यात १०० बॉललाही मागे टाकलंय. हा क्रिकेटचा अजून एक लहान फॉरमॅट लाईमलाईटमधे आणण्याचं खरं काम जगभरातल्या अनेक टी२० स्टारनी केलं. ही स्पर्धा २०१७ ला पहिल्यांदा यूएईमधे खेळवण्यात आली. 

तसं बघायला गेलं, तर या १० ओवरच्या क्रिकेटचा इतिहास फार जुना आहे. भारतातल्या अनेक टेनिस बॉलवर खेळवण्यात येणार्‍या स्पर्धा, गल्लीतल्या मॅच १० ओवरची असते. पण, या गल्लीतल्या १० ओवरच्या मॅचला खरं ग्लॅमर आणि दर्जा मिळाला तो यूएईत.  आता या लीगला आयसीसीनेही मान्यता दिलीय. भविष्यात क्रिकेटच्या ‘एमएसएमई’ क्लबमधे अजून एक प्रकार दाखल करण्याचे संकेतच दिलेत.

या लीगमधे केरळ किंग्ज, मराठा अरेबियन आणि डेक्कन ग्लॅडिएटर ही भारतीय नावं असणाऱ्या टीमही आहेत. त्यामुळे ही लीग भारतीय चाहते आणि भारतीय क्रिकेटपटू यांना आकर्षित करण्यासाठी सज्ज झालीय. यामधे सध्या २४ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू खेळतात. त्यामुळे हा लहान फॉरमॅट ग्लोबल स्तरावर पोचवायला वेळ लागणार नाही.

टिपिकल भांडणं होतील आंतरराष्ट्रीय

भारताचा हाणामारी स्पेशालिस्ट विरेंद्र सेहवाग, इंग्लंडच्या विश्वविजेत्या टीमचा कॅप्टन इऑन मॉर्गन यांनी या टी १० क्रिकेटला पाठिंबा दिलाय. आता या टी १० क्रिकेट लीगमधे भारताचा लाडका टी २० स्पेशालिस्ट युवराज सिंगही आपला हात आजमतोय.

टी १० क्रिकेटचं आकर्षण आता फक्त यूएईपर्यंतच मर्यादित राहिलेलं नाही. तर त्याची भुरळ वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या देशांनाही पडली आहे. तेही आपल्या देशात अशी लीग सुरू करण्याच्या तयारीत आहेत. 

पण या फॉरमॅटबद्दल बॉलरमधे नाराजी आहे. त्यांच्या मते, त्यांना फक्त २ ओवर टाकायला मिळतात. शिवाय, या प्रकारात अनेक खेळाडूंवर फक्त फिल्डिंग करण्याचीच नामुष्की येणार आहे. त्यामुळे गल्ली क्रिकेटमधली ती टिपिकल भांडणं आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोचण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : विराट कोहलीच्या माथ्यावर ‘३६’चा शिक्का लावणारी टेस्ट सिरीज

क्रिकेटपटूंचं द्वंद्व युद्ध

टी १० चं बाळसं धरतंय ना धरतंय तोपर्यंत क्रिकेटच्या ‘एमएसएमई’ क्लबमधे सामील होण्यासाठी दार ठोठावलंय ते अल्टिमेट क्रिकेट चॅलेंजनं. ही क्रिकेट मॅच नाही, तर क्रिकेटपटूंचा सामना आहे. या फॉरमॅटनं छोटं होण्याच्या प्रक्रियेत क्रिकेटमधून ११ हा आकडा आणि टीमचा खेळ ही बिरुदावलीच हद्दपार केली.

हा क्रिकेटचा नवा वैयक्तिक अवतार या महिन्यापासूनच दुबईत सुरू होतोय. या फॉरमॅटमध्ये मॅच फक्त दोन खेळाडूंमधेच रंगणार आहे. बाकी विकेटकिपर, फिल्डर आणि बॉलर हे फक्त मदत करण्यासाठी असणार, त्या काही टीम नसतील.

आणखी एक विशेष म्हणजे, हे युद्ध एका पिंजर्‍यात डब्लूडब्लूई सारखं होणार आहे. याचे नियमही भंजाळून सोडणारे आहेत. या स्पर्धेत ख्रिस गेल, युवराज सिंग, शाहिद आफ्रिदी, केविन पिटरसन यासारखे दादा लोक दिसणार आहेत. म्हणजे हा फॉरमॅटही तुफान ग्राहक खेचण्यासाठी चांगला मसाला देणारा ठरण्याची शक्यता आहे.  

पुस्तकी क्रिकेट विसरा!

‘अल्टिमेट क्रिकेट चॅलेंज’मधे दोन खेळाडूंना टेस्ट क्रिकेटप्रमाणे प्रत्येकी दोन डाव खेळण्याची संधी मिळणार आहे. पण प्रत्येक डाव हा फक्त १५ बॉलचा असणार आहे. आता हे १५ बॉल टाकण्यातही ऑप्शन देण्यात आलेत. ज्या खेळाडूंमधे सामना आहे त्यातील एकाला कमीत कमी ८ बॉल टाकावेच लागणार आहेत आणि उरलेले ७ चेंडू तो खेळाडू बदली खेळाडू म्हणजेच ‘एस’कडून टाकून घेऊ शकतो.

प्रत्येक डावात एक विकेटकिपर, एक बॉलर आणि एक फिल्डर त्या मुख्य खेळाडूला मदत करण्यासाठी देण्यात येतील. तसंच बॅट्समनला एका विशिष्ट भागात बॉल मारल्यानंतर धावा मिळतीत. हे आपल्या गल्ली क्रिकेट सारखंच आहे. कंपाऊंडला लागला की दोन रन. त्यामुळे इथं पुस्तकी क्रिकेटचं तंत्र विसरायचं आणि गल्लीतलं आत्मसात करायचं.

पांढर्‍या टेस्टमधे गुलाबी रंग

थोडक्यात, हे सगळे क्रिकेटचे ‘एमएसएमई उद्योग’ सुसाट सुटलेत. त्यांच्या या आर्थिक आणि जनाधार मिळवण्याच्या शर्यतीत टेस्ट क्रिकेट आणि काहीअंशी वनडे क्रिकेट या बड्या आणि जुनाट कंपन्यांची फरफट होण्याची शक्यता आहे. क्रिकेटच्या पालनहारांना कसोटीला काळाच्या काळोखात लुप्त होण्यापासून रोखण्यासाठी दिव्याखाली आणावं लागले. 

पांढर्‍या शुभ्र टेस्टमधे गुलाबी रंग भरण्याचा उपद्व्याप करावा लागला. टेस्ट क्रिकेट सध्या जात्यात सापडलंय, तर वनडे क्रिकेट सुपात आहे. कारण, यालाही क्रिकेटच्या नव्या ‘एमएसएमई’ने जबरदस्त पर्याय दिलेत.

हेही वाचा : 

लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी

आरसीबीचा विराट म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार!

जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं

महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का?